krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Signs of Drought : कडूनिंबाची पानगळ अन् दुष्काळाची चाहूल

1 min read

Signs of Drought : आपल्या शिवारातल्या कडूनिंबांसह (Neem tree) इतर झाडांची पाने अचानक पिवळी पडून गळू लागली आहेत. अनेक शेतकरी बांधव चिंतेत पडलेत, ‘अजून कडक उन्हाळा (Summer) सुरू व्हायचा आहे, पाणी पुरतंय ना पुरतंय तोच ही झाडं अशी निष्पर्ण का व्हायला लागली? झाडांना काय आधीच कळलंय की पुढे पाणीटंचाई (Water Scarcity) किंवा मोठा दुष्काळ (Drought) पडणार आहे?’ हा प्रश्न अगदी रास्त आहे. पण या प्रश्नाचे उत्तर जेव्हा आपण वैज्ञानिक आणि निसर्गाच्या दृष्टिकोनातून शोधतो, तेव्हा अचंबित व्हायला होते!

♻️ अदृश्य मेंदू
आपल्या मनात नेहमी एक प्रश्न असतो, माणसांसारखा किंवा प्राण्यांसारखा वनस्पतींना मेंदू असतो का? विज्ञानाने झाडांच्या अंतरंगात डोकावून पाहिलं, तेव्हा एक भन्नाट सत्य समोर आले. वनस्पतींच्या डोक्यात प्राण्यांसारखा कोणताही लाल-गुलाबी मेंदू किंवा मज्जासंस्था नसते. पण म्हणून झाडं अडाणी किंवा ‘निर्जीव’ अजिबात नाहीत! निसर्गाने वनस्पतींच्या रोमारोमात, खोडात, पानात आणि मुळात एक असा ‘अदृश्य मेंदू’ (Invisible Brain) पेरला आहे, जो आधुनिक विज्ञानालाही थक्क करतो.

♻️ झाडांची ‘हाय-टेक’ संदेशवह प्रणाली
आपल्या शरीरात जशा नसा असतात, तशाच झाडामध्ये झायलेम (Xylem) आणि फ्लोएम (Phloem) नावाच्या अन्न-पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्या असतात. या वाहिन्या केवळ रसच वाहून नेतात असे नाही, तर त्या अत्यंत वेगाने विद्युत लहरी (Electrical Signals) आणि हार्मोन्सच्या माध्यमातून झाडाच्या एका भागाकडून दुसऱ्या भागाकडे निरोप पोहोचवतात. मुळाला खाली काही जाणवले, की क्षणात त्याचा निरोप शेंड्यावरच्या पानाला मिळतो!

♻️ मग कडूनिंबाची पानगळ कशाची खूण?
झाडांना भविष्यातील हवामानाचा आणि दुष्काळाचा अंदाज खरोखरच येतो का? तर उत्तर आहे… होय, शंभर टक्के! जेव्हा वातावरणातली आर्द्रता कमी होते, तापमान हळूहळू वाढू लागते किंवा जमिनीखाली पाण्याच्या ताणाची चाहूल लागते, तेव्हा मुळांमध्ये एबसेसिक ॲसिड (Abscessic acid) नावाचे संप्रेरक तयार होते. हे संप्रेरक पानांना तातडीने संदेश पाठवतं. पाने ही झाडाचे ‘अन्न शिजवणारे स्वयंपाकघरं’ असतात, पण त्याच पानांतून बाष्पीभवनाद्वारे पाणी उडून जात असतं. झाडाला जेव्हा कळतं की पुढे पाण्याचे वेध कठीण आहेत, तेव्हा ते सर्वात पहिला आणि कठोर निर्णय घेते, ताे म्हणजे ‘पानगळ’! पाने गळून पडली की पाण्याचे उत्सर्जन थांबते. झाड स्वतःला सुप्तावस्थेत (Dormancy) नेते आणि खोडात व मुळात साठवलेल्या पाण्यावर स्वतःचा जीव वाचवते. हा झाडाचा पराभव नसून, पुढील पावसाळ्यापर्यंत तग धरून राहण्यासाठी त्याने घेतलेला एक अत्यंत हुशार आणि वैज्ञानिक ‘आत्मसंरक्षणाचा निर्णय’ असतो!

♻️ निर्णयक्षमता :- पाणी, सूर्यप्रकाश आणि ओळखीची माणसं!
वनस्पती किती चतुर निर्णय घेतात, याची काही उदाहरणं पाहिली की थक्क व्हायला होते.
🔆 सूर्यप्रकाशाची दिशा :- झाडाची पाने सतत सूर्यप्रकाशाच्या दिशेने झुकतात, तर मुळं मात्र अंधाराचा आणि पाण्याचा मागोवा घेत जमिनीच्या आत खोलवर निघून जातात.
🔆 मुळांची हुशारी :- जमिनीखाली जिथे खत आणि पाणी जास्त असेल, मुळं त्याच बाजूला आपला मोर्चा वळवतात.
🔆 आपलं कोण नि परकं कोण? :- संशोधनात असे दिसून आले की, जर शेजारी स्वतःच्याच जातीचे दुसरे झाड असेल, तर मुळं एकमेकांना अडथळा न ठरता सहकार्याने वाढतात. पण जर शेजारी तण किंवा परकी वनस्पती आली, तर मुळं आक्रमकपणे वाढून अन्नावर ताबा मिळवतात!

♻️ किडींचा हल्ला आणि झाडांचे गुप्त नेटवर्क
जेव्हा एखाद्या झाडावर किडीचा किंवा अळीचा हल्ला होतो, तेव्हा ते झाड शांत बसत नाही. ते हवेत विशिष्ट प्रकारचा गंध (रसायन) सोडते. हा गंध वाऱ्यासोबत शेजारच्या झाडांपर्यंत पोहोचतो. संदेश मिळताच शेजारची झाडे स्वतःच्या पानांमध्ये कडू व विषारी द्रव्ये तयार करू लागतात, जेणेकरून किडीने तिथे हल्ला केला तरी तिला ते खाता येऊ नये! इतकेच नाही, तर जमिनीखालील बुरशीच्या (मायकोरायझा) जाळ्याद्वारे झाडे एकमेकांना अन्न आणि धोक्याचे इशारे पाठवत असतात.

♻️ शेतकरी भावांनो, आपण काय शिकायचं?
म्हणूनच, सध्या बागेत होणारी पानगळ पाहून घाबरून जाऊ नका. झाडे आपल्याला स्पष्ट सांगत आहेत, ‘बाबांनो, पुढे उन्हाचा कडाका आणि पाण्याचा ताण वाढणार आहे, त्यानुसार पाण्याचे आणि खतांचे नियोजन करा!’ झाडांची ही भाषा, त्यांची ही नैसर्गिक बुद्धिमत्ता आपण जर समजून घेतली, तर पिकांवरील ताण कमी करणे, सिंचनाचे योग्य व्यवस्थापन करणे आणि योग्य वेळी छाटणी व अन्नद्रव्य व्यवस्थापन करणे आपल्याला अधिक सोपे जाईल. निसर्गाने वनस्पतींना दिलेला हा ‘गुपित मेंदू’ माणसाच्या मेंदूलाही विचार करायला लावणारा आहे, हेच खरे!

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!