Pubilc Holiday : या सुटीची काय गरज होती…?
1 min readवास्तविक हे राममंदिर अयोध्येत आहे. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांना सुटी देऊन टिव्हीवर कार्यक्रम बघण्याव्यातिरिक्त ते दुसरे काय करणार आहेत? आणि कर्मचारी त्यांच्या श्रद्धा ते व्यक्तिगत स्तरावर जपतील. त्याची आर्थिक किंमत सरकारने म्हणजे करदात्यांनी का चुकवावी? (एक दिवसाचा 20 लाख कर्मचाऱ्यांच्या पगाराची रक्कम कोटीत असते.) ज्या कर्मचाऱ्यांना स्थानिक स्तरावर कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल, ते रजा काढून सहभागी झाले असते. सरकारने त्याची काळजी का करावी? सर्व धर्मांच्या श्रद्धा जपण्याच्या नादात प्रत्यक्ष कामाचे दिवस कमी कमी होत आहेत. अगोदरच खूप सुट्या आहेत आणि त्यात ही आणखी एक सुटी. सुटी देऊन अनुनय करायचा आणि सुटी दिली नाही की भावना दुखावायच्या… मात्र, हे लाड फक्त सरकारी नोकरीत असतात. खासगी कंपनी कोणत्याही सण, जयंती, पुण्यतिथीची सुटी देत नाही. तिथे कुणाच्याही भावना दुखावत नाहीत. तिथे कोणीही सुटी मागत नाही की, सरकार सक्ती करत नाही.
मुळात सरकारी यंत्रणा, शाळा महाविद्यालये हे सेवा देण्यासाठी आहे की, कर्मचाऱ्यांच्या धार्मिक भावना, जयंती, पुण्यतिथी व सण साजरे करण्यासाठी आहे, याचे उत्तर शासनाने देण्याची गरज आहे? केवळ आपल्या मतदारांना खुश करण्यासाठी लोकानुनय करण्यासाठी हा सवंग सुटीचा निर्णय घेतला आहे. ‘एक दिवसाच्या सुटीची आर्थिक किंमत सुटी देणाऱ्या पक्षाने शासकीय तिजोरीत भरून मग पक्षाचा राजकीय कार्यक्रम सरकारच्या तिजोरीवर लादायला हवा.’ यानिमित्ताने पुन्हा एकदा अभिवादन करण्यासाठी सुटी या मानसिकतेवर चर्चा व्हायला हवी. सर्व धर्मीय धार्मिक सणांच्या सुटी रद्द कराव्यात. ज्यांना ते साजरे करायचे त्यांनी त्यासाठी रजा घ्याव्यात. त्यात अशा सुट्या तर अजिबात नकोत.