Clever leopard : चतूर बिबट्या, माग घेणे कठीण
1 min readवनविभागाचे तत्कालीन फॉरेस्टर शंकर ऐनवाढ आणि दोन गार्ड आणि मी असे आम्ही घटना स्थळी पोहोचलो. शेतकऱ्याने घराबाहेर बकऱ्या ठेवण्यासाठी एक कुडाची पडवी बनवली होती. शेतकऱ्याने बिबट्याला बकरी नेताना पाहिलं होतं. त्याने आम्हाला बिबट्या कोणत्या दिशेला जानवर घेऊन गेला ते दाखवलं. आम्ही पडवी बाहेर बिबट्याच्या पायाचे ठसे पाहिले, नशिबानं पावसाळा असल्यामुळे जमीन ओली होती. त्यावर ठसे स्पष्ट दिसत होते. त्यामुळे घरापासून साधारण 50 मीटर अंतरापर्यंत आम्ही बिबट्याचा माग काढत पुढे आलो. पण नंतर पुढे गवत सुरू झाल्याने माग काढणे वनविभागाला जमले नव्हते. घटना अगदी तास दोन तास आगोदरची असल्याने बिबट्याच्या चालण्याने कुठे गवत झुकलं आहे का? असेल तर ते कुठल्या दिशेला ते मी पाहण्याचा प्रयत्न केला आणि पुढे तशा खाणाखुणा आम्ही शोधायला सुरुवात केली आणि लवकरच आम्ही पुन्हा योग्य तपास करत साधारण 500 मीटर लांब पोहोचलो.
बिबट्या चतुर (Clever leopard) होता, त्याने बकरी नेताना कुठेही फरफटत नेली नव्हती. त्यामुळे माग काढणे कठीण होते. अशा प्रकारे मानेत शिकार उचलून बिबटे एक दोन किलोमीटरवर सहज जातात, हे मी जिम कॉर्बेट यांच्या पुस्तकात वाचलं होत. जे मी प्रत्यक्षात अनुभवत होतो. माग काढत काढत आम्ही एका लहानशा डबक्या जवळ येऊन पोहोचलो. जिथून पुढे शेताकडे जाणारी एक पायवाट होती साधारण आणखी 1.5 किमी पुढे गेल्यावर आम्ाहला बिबट्याचे ठसे आणि बकरीची दाढ मिळाली, ताजी होती त्याला थोड रक्त देखील लागलेलं दिसत होतं, म्हणजे शेतकरी खरं सांगत होता. त्याची बकरी खरोखर बिबट्यानं नेली होती. पण उर्वरित शिकार बिबट्यानं कुठे तरी लपवली असावी? ते शोधत बसण्यात काही अर्थ नव्हता. कारण संध्याकाळ होत आली होती. शिवाय शिकार झालेल्या बकरी ची दाढ देखील मिळाली होतीच, ज्या वरून वनविभागाला शेतकऱ्याला नुकसान भरपाई देणे शक्य होते म्हणून आम्ही माघारी फिरलो.
त्यानंतर आणखी दोन दिवस आम्ही त्या गावात जात राहिलो,पण बिबट्या काही कोणाला दिसला नाही. कदाचित तो पुन्हा गावापासून लांब निघून गेला असावा, असा विचार करत आम्ही त्या गावात जायचं बंद केलं. पण ही नवीन सुरुवात होती, बिबट्या त्याच्यासाठी सुयोग्य असे रेस्टॉरंट शोधत होता, जे शोधत शोधत तो लवकरच दांडा खटाळी येथे येणार होता.