krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Sea salty water : समुद्राचे खारे पाणी पिण्यायोग्य करणे कितपत याेग्य?

1 min read
Sea salty water : वाढत्या मुंबईची गरज म्हणून राज्य सरकार समुद्राचे खारे पाणी (Sea salty water) पिण्यायोग्य (Drinkable) करण्याच्या प्रयत्नात आहे. वर देखी ही संकल्पना खूपच छान आहे, असे जरी वाटत असले तरी या संकल्पनेचा पर्यावरणावर काहीच प्रभाव पडणार नाही का? तर उत्तर आहे हो! कारण, जेवढं समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी घेतलं जाईल, त्याच्या निम्मेच पाणी पिण्यायोग्य होऊन निम्मे पाणी अति क्षारयुक्त बनेल. जे कदाचित पुन्हा समुद्रात सोडलं जाईल.

या संकल्पनेनुसार दरराेज तब्बल 200 दशलक्ष लिटर पाणी प्रक्रिया केले जाईल. ज्यातून 100 दशलक्ष लिटर पाणी पिण्यायोग्य तर, 100 दशलक्ष लिटर पाणी हे अति क्षारयुक्त होणार आहे. जे कदाचित मड येथील समुद्रात पुन्हा सोडले जाईल. तसे झाल्यास मुंबईची वाढती पाण्याची गरज पूर्ण होईल. कदाचित पण त्याची खरी किंमत येथील समुद्रातील माशांना आणि त्यावर अवलंबून असलेल्या मासेमार लोकांना भोगावी लागेल. कारण, हे 100 दशलक्ष लिटर अति क्षारयुक्त पाणी जेव्हा समुद्रात जाईल, तेव्हा तेथील पाण्याची क्षारता वाढवेल. ज्यामुळे येथील परिसरातील विद्राव्य प्राणवायूचे प्रमाण कमी होऊ शकते. ज्यामुळे मोठ्या प्रमाणत मासे मरू शकतात. शिवाय खेकडे, कोळंबी इत्यादी कवच वर्गीय प्राण्यांना त्यांची वाढ झाल्यावर कवच बदलावे लागते. ज्यासाठी विविध जीवनाच्या टप्प्यात विविध क्षारता हवी असते. जसे की, जीवनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात खेकड्यांना 35 ppt चे शुद्ध खारे पाणी लागते. या खेकड्यांची पिल्ले जेव्हा विकसित होतात, त्यावेळी ते किनारी भागातील खाडी समुद्रात जिथे 15 ppt चे निम खारे पाणी मिळेल. तिथे पहिली कात टाकतात. अशावेळी क्षारता अधिक असेल तर, कात बदल न झाल्याने पिल्ले मरून जातात. हेच इतर कवच वर्गीय सागरी जीवांचे होते.

कित्येक सागरी प्रवाळे देखील बदललेल्या क्षारतेमुळे प्रभावित होतात. त्याच बरोबर समुद्रात सोडल्या जाणाऱ्या अतिरिक्त क्षारयुक्त पाण्यामुळे सागरी परिसंस्थेला घातक असलेले गुलाबी लाल रंगाचे डायनो फ्लाजेलेट प्रजातीच शेवाळ वाढण्याचा देखील संभव अधिक होतो. तसे झाल्यास खूप मोठ्या प्रमाणात मासे मरू शकतात. मुंबईच्या समुद्राचा विचार केल्यास आधीच अधून मधून हे लाल शेवाळ मुंबईतील प्रदूषण आणि सागराचे वाढते तापमान यामुळे वाढत आहे. ज्यामुळे कधी कधी मुंबईत रात्री चमकणाऱ्या लाटा दिसतात. कदाचित हे प्रकार अधिक वाढीस लागतील असे वाटते. जे आपल्याला दिसायला जरी विलोभनीय वाटत असले तरी ते समुद्राचे बिघडलेले आरोग्य दर्शवते.

वरील सर्व गोष्टी विचारात घेतल्यास सागरी पाणी गोडे करणे मुंबईकरांसाठी जरी सोयीचे वाटत असले तरी येथील पाण्यात राहणारे खरे खुरे आद्य मुंबईकर मात्र फार मोठी किंमत मोजणार हेच खरे. तरी शासनाने असे प्रकल्प राबवित असताना अति क्षारयुक्त पाणी समुद्रात न सोडता त्याचे मीठ बनवता येईल का? याचा विचार आधी केला पाहिजे. त्यानंतर मुंबईमध्ये दर वर्षी पाण्याची गरज वाढतच जाते, यावर अजिबात नियंत्रण नाही. कारण मुंबई अमर्याद वाढत राहिली आहे. 100 हून अधिक माळ्याच्या इमारती उभ्या होत आहेत. दरवर्षी लाखो लोकं मुंबईत राहायला येत आहेत. त्यामुळे मुंबईची पाण्याची हाव वाढतच चालली आहे. तरी मुंबईतील बांधकाम प्रकल्पावर नियंत्रण न ठेवल्यास संपूर्ण समुद्र बरबाद झाला तरी मुंबईची हाव पूर्ण होणार नाही. मुंबईची लोकसंख्या अधिकाधिक वाढती ठेवणे पर्यावरणीय दृष्ट्या परवडणारे नाही.

आजवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक निवासी संकुलात रिकाम्या जागा उपलब्ध असल्यास तिथे पर्जन्य जल संकलन प्रणाली (रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम) बसवणे अनिवार्य करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर संपूर्ण मुंबईत प्रत्येक नळावर पाण्याची बचत करणारी तोटी लावणे अनिवार्य केल्यास खूप मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होईल. ज्यामुळे शासनाचे काेट्यवधी रुपये वाचतील. शिवाय, पुढे जाऊन खारे पाणी गोडे करण्याची गरज भासणार नाही आणि सागरी पर्यावरण देखील शाबूत राहील. शेवटचे पण अत्यंत महत्त्वाचे म्हणजे पाणी, वीज इत्यादी संसाधनांचा कमीत कमी वापर करणे शाळा आणि महाविद्यालयातून प्रात्यक्षिक पद्धतीने शिकवणे आणि जबाबदार नागरिक घडवणारी शिक्षण प्रणाली प्रभावीपणे राबवणे ही काळाची गरज आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!