River plowing : नदी नांगरून जलस्तर 500 फुटांवरून 90 फुटांवर?
1 min read
अशा परियोजना जेव्हा शासन राबवते, तेव्हा त्याची धुरा जिल्हा प्रशासन अथवा स्थानिक प्रशासन यांच्याकडे असते. ज्यात कोणीच तज्ज्ञ न,सतो जो नदीची खरी व्यथा समजून तिचा योग्य इलाज करेल.असे इलाज म्हणजे ‘मानेवर गळू आणि पायाला जळू’ म्हणजेच जखम एकीकडे आणि इलाज भलतीकडे असं मी म्हणतो. कारण, नदी जिथे वाहती असते, ते तिचं बेसिन झालं आणि जिथून पाणी नदीत येत तो तिचा Catchment Area झाला (जिथे नदी पावसाचे पाणी पकडते कॅच करते असे क्षेत्र) नदीच्या पात्रापासून किमान 1.5 किमीपर्यंत असलेला भाग म्हणजे नदीचे Catchment क्षेत्र. इथे असणारे डोंगर, जंगल मिळून नदी घडवत असतात. इथे असलेल्या डोंगरात जर घनदाट जंगल असेल तर ते एखाद्या मोठ्या धरणाप्रमाणे पाणी डोंगरात अडवते, जिरवते. ज्यामुळे डोंगर पाण्याने भरून जातो आणि पाणी हळूहळू डोंगरातून सखल भागाकडे प्रवास करते आणि तिथे पायथ्याशी असलेली गावं तिथल्या विहिरी तिथले भूजल त्या भागातून वाहणाऱ्या नद्या वर्षभर प्रवाही राहतात. शिवाय जंगल असल्यानं अतिवृष्टी मुळे मातीची धूप होत नाही. आणि माती पूरासोबत नदी पात्रात, पायथ्याशी असलेल्या सखल भागात येत नाही. ज्यामुळे इथे असलेले झरे, नदीचे पात्र गाळाने भारत नाही. तिची पाणी धारण करण्याची क्षमता देखील वाढते. ज्यामुळे जमिनी अंतर्गत असलेले जलसाठे (aquifers) देखील सुरक्षित राहतात.
राहिली गोष्ट नदी नांगरण्याची तर, तसे केल्यानं नदी पात्रात उन्हाळी सुप्तावस्थेत राहतात असलेल्या शंख, शिंपले, खेकडे, बेडूक इत्यादी मासे नांगरल्याने उघडे पडतात आणि मरून जातात. माती उन्हाळी वेळी नांगरल्याने जो काही उरलेला ओलावा आहे तो ही उलथापालथ झाल्यानं सुकून जातो आणि अधिक भूजलाचे बाष्पीभवन होते. अशा उन्हाळ्याच्या वेळी आधीच नद्यांच्या मध्ये कमी पाणी असतं आणि या लहानशा जलसाठ्यात पावसाळ्यात विण घालण्यासाठी कसे बसे जिवंत राहिलेले खेकडे, मासे इत्यादी प्राणी नदी नांगरल्याने त्यांचा अधिवास नष्ट झाल्यामुळे लोप पावतात. त्यामुळे नदी नांगरणे हा जलस्तर वाढवण्याचा उपाय नसून, जलस्तर वाढवायचा असेल तर भूजल साठ्याचे पुनर्भरण केलं पाहिजे. पावसाळ्यात छतावरचे पाणी विहिरी आणि बोअरवेल मधे सोडणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नदी पात्र सोडून किमान 1.5 किमीपर्यंत कुठलेच सिमेंटचे घाट, निवासी संकुले, इत्यादी प्रकल्प होता कामा नये. जंगलतोड पूर्णपणे थांबली पाहिजे. त्याशिवाय भूजल पातळी खाली जायचं थांबणार नाही.
निसर्ग चाखायचा असेल तर, तो आधी राखायला पण लागतो. निसर्गात नदी नांगरण्या सारखे शॉर्टकट नसतात. त्याच पुनर्भरण करण्यासाठी पुरेसा अवधी आणि मानवी हस्तक्षेप कमीत कमी करून त्याची निगा राखावी लागते. तर आणि तरच पाणी काय मासे देखील मिळतील.