Rains in Maharashtra : महाराष्ट्रात कमी-अधिक तीव्रतेने पावसाला सुरुवात
1 min read❇️ कोकण विभाग
मुंबईसह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यासह केरळ व कर्नाटक या राज्यातील संपूर्ण पश्चिम किनारपट्टीत शुक्रवार (दि. 23 जून)पासून पुढील आठवडाभर जोरदार ते अति-जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
❇️ विदर्भ विभाग
विदर्भातील सर्व 10 जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 23 जून) व शनिवारी (दि. 24 जून) मध्यम तर रविवार (दि. 25 जून)पासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
❇️ मध्य महाराष्ट्र व मराठवाडा
वर अंदाजित कोकणातील अति-जोरदार पावसामुळे सह्याद्री ओलांडून मध्य महाराष्ट्रातील 10 तर मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 23 जून) केवळ तुरळक ठिकाणी किरकोळ तर शनिवार (दि.24 जून)पासून मध्यम आणि रविवार (दि. 25 जून)पासून जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
❇️ थोडक्यात मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या अंतर्गत भागातील वर्षांच्छायेच्या टापूत (नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या पूर्व भागात आणि जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, सोलापूर व सांगली जिल्ह्याच्या पश्चिम भागात) मात्र शुक्रवार (दि. 23 जून) व शनिवार (दि. 24 जून) या दोन दिवसात पावसाचे प्रमाण काहीसे कमी असले तरी रविवार (दि. 25 जून)पासून तेथेही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता जाणवते.
❇️ मान्सून अजूनही त्याच्या वाटचालीतच म्हणजे पूर्व-मोसमी पावसाच्या वातावरणातून मोसमी पावसाच्या वातावरणात प्रवेशणाऱ्या संक्रमनीय काळात आहे. त्यामुळे प्रवेश केलेल्या भागाच्या आगमनात एक-दोन दिवस विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटांच्या वातावरणाचा अनुभव येतो. त्यामुळे गोंधळून न जाता पाऊस मोसमी की, पूर्वमोसमी याची शहानिशा न करता पाऊस होत आहे, हे महत्त्वाचे समजावे. पाऊस झाला तर लगेच पेरणी करू नये. या सर्व पार्श्वभूमीवर अपेक्षित चांगल्या ओलीवरच्या पेरणीसाठी 6 जुलैनंतर पेरणीचा निर्णय योग्य ठरू शकतो.
❇️ देशात उष्णतेची लाट लोप पावली आहे. महाराष्ट्रात विदर्भातही उष्णतासदृश (Heat wave) स्थितीही विरळली आहे. सध्या दिवसाचे कमाल तापमान जरी 3 ते 4 डिग्री सेल्सिअसने खालावले असले तरी ते विदर्भ व दक्षिण महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यात सध्याच्या काळातील सरासरी कमाल तापमानापेक्षा अधिक असून तेथे एकंदरीत ते 38 ते 40 डिग्री सेल्सिअस दरम्यान असल्याचे जाणवते.
❇️ उत्तराखंडातील बद्रीनाथ, केदारनाथ तसेच हिमाचल प्रदेशातील पर्यटकांना शुक्रवार (दि. 23 जून)पासून पुढील आठवडाभर ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट व गारांसह जोरदार ते अतिजोरदार पावसाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. एकंदरीत हिमालयीन पर्यटनासाठी वातावरणीयदृष्ट्या सध्याच्या या आठवड्यातील काळ कदाचित गैरसोयीचा ठरू शकतो
❇️ पंढरीवारी (पंढरपूर) करणाऱ्या वारकऱ्यांना रविवार (दि. 25 जून)पासून मध्यम ते जोरदार पावसाच्या शक्यमुळे त्या पुढील 4-5 दिवस मात्र काहीसे गैरसोयीचे जाणवतील.
❇️ ‘बिपोरजॉय’ (Biparjoy) वादळाचा (Cyclone) जोर पूर्णपणे विरला आहे.