Red velvet mite : मृगाचे किडे – रेड वेल्वेट माईट
1 min readमृगाच्या किड्यांचं आयुष्य सुरू होतं मादीने जमिनीत घातलेल्या अंड्यांपासून. मार्च ते जुलै या काळात मादी साधारण 50 ते 100 अंडी घालते. एका रिसर्च पेपरनुसार काळ्या मुंग्यांच्या वस्तीजवळ ही अंडी घातली जातात. त्यानंतर एक ते दोन महिन्यांनी पिल्लं जन्माला येतात. ही पिल्लं स्वभावाने बांडगुळी असतात. म्हणजे दुसर्या किटकाचं रक्त पिणारी. जमिनीखाली असताना काळ्या मुंग्यांच्या शरीरावर पिल्लं चिकटलेली आढळली आहेत.
विशिष्ट अवस्था प्राप्त झाल्यावर ती जमिनीतून बाहेर येतात आणि थोड्या मोठ्या किटकांच्या शोधात हिंडत राहतात. बग्स, बीटल्स, नाकतोडे, एफिड्स वगैरे किटकांना हेरून त्यांच्या शरीरावर चढतात आणि छिद्र पाडून त्या किटकाचा जीवनरस पीत राहतात. यात किटक मरत नाही.
हे अष्टपाद वर्गातले जीव आहेत. पण यांची गंमत म्हणजे यांना पिल्लावस्थेत सहाच पाय असतात. जसे प्रौढ होत जातात तशी त्यांना पायाची चौथी जोडी उगवते आणि आठ पाय पूर्ण होतात. एक ते दोन आठवडे रक्त पिऊन झालं की पिल्लं होस्टपासून वेगळी होतात आणि मातीत शिरून कोषात जातात. कोषातून बाहेर आल्यावर ती प्रौढ होतात. प्रौढ मृगाचे किडे इतर किटकांना खातात.
वाळवीला पंख फुटण्याच्या वेळेशी यांचं गणित जुळलेलं आहे. पंख फुटलेली वाळवी जेव्हा काही काळाने जमिनीवर उतरते तेव्हा हे तिला खातात. यांचे पुनरूत्पादन देखील मोठं मजेशीर आहे. नर गवताच्या काडीवर चढून तिथे आपले शुक्राणू सोडतात आणि त्या शुक्राणूपासून सिल्कचे धागे जमिनीवर ओढत आणतात. मादी दिसल्यावर ते विशिष्ट प्रकारे नर्तन करून तिला त्या धाग्यांकडे आकृष्ट करायचा प्रयत्न करतात. मादी त्या धाग्यांचा मागोवा घेत शुक्राणूंवर जाऊन बसते आणि शरीरात शोषून घेते.
जेमतेम सात आठ दिवस हे किडे जमिनीवर दिसतात आणि नंतर जमिनीत शिरून सुप्तावस्थेत जातात. आर्द्रता, थंड तापमान आणि पाऊस यांचं गणित जेव्हा जुळतं तेव्हाच ते जमिनीतून बाहेर येतात. या मखमली जीवांचं जमिनीवर दिसणं हे पावसाच्या आगमनाचे निश्चित संकेत आहेत!