krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

AI & Agricultur : जगातील 50 हून अधिक कृषी विद्यापीठे आपल्या खिशात

1 min read

AI & Agricultur : शेतकरी भावांनो, आपली शेती (Agricultur) ही फक्त पिकं (Crops) उगवण्याचं काम नाही, तर रोज नवीन प्रश्नांचा सामना करणं आहे. कधी बियाणं (Seeds) निवडायचं, कधी खत (Fertilizer) किती टाकायचं, रोग (Disease) आला तर कोणतं औषध (Insecticide) वापरायचं, हवामान कसं असेल, बाजारात भाव (Market price) काय आहे – हे सगळं एकत्र सांभाळणं ही सोपी गोष्ट नाही. आपण कितीही अनुभवसंपन्न असलो, तरी काही वेळा परिस्थिती अचानक बदलते आणि योग्य माहिती वेळेत मिळाली नाही, तर कष्टाचं फळ अर्धवट राहतं. आता या सगळ्या समस्यांचं एक नवं उत्तर आलंय – एआय नाव थोडं परदेशी वाटेल, पण काम अगदी गावगाड्याच्या भाषेतलं. हा तुमच्यासाठी 24 तास उघडं असलेलं, मोफत चालणारं, जगभरातील शेतीचं ज्ञान एकत्र केलेलं डिजिटल (Digital) शेतकरी (Farmers) विद्यापीठ (University) आहे.

तुम्ही ज्या गावात, ज्या पिकात काम करता, त्याच्याशी जुळलेली माहिती एआय (AI – Artificial intelligence)कडे आहे. अमेरिकेत मका कसा घेतात, इस्रायलमध्ये पाण्याचं नियोजन कसं करतात, नेदरलँडमध्ये ग्रीनहाऊस शेती कशी करतात, जपानमध्ये भाताच्या जातीत सुधारणा कशी करतात – जगभरातल्या 50 हून अधिक कृषी विद्यापीठांचं संशोधन तुमच्या खिशात आणून देणारा हा मित्र आहे. फक्त विचारायचं आणि तो तुम्हाला तुमच्या पिकासाठी, तुमच्या हवामानासाठी, तुमच्या जमिनीसाठी योग्य उत्तर देईल.

शेतात कधी रोग-किडीचं संकट आलं, तर फोटो काढून एआयला दाखवा. तो लगेच सांगेल – हा रोग कोणता आहे, का होतो, कधी पसरतो आणि त्यावर कोणते उपाय करायचे. रासायनिक असोत किंवा जैविक, किती प्रमाणात, कधी फवारणी करायची आणि पुढे पुन्हा होऊ नये म्हणून कोणती पद्धत पाळायची – सगळं स्पष्ट सांगेल. म्हणजे रोग वाढायच्या आधीच तुम्ही त्याला थांबवू शकता.

फक्त रोगावरच नाही, तर पिकाच्या पोषण आहारातही तो तज्ज्ञ आहे. प्रत्येक पिकाची भूक वेगळी आणि प्रत्येक जमिनीची चव वेगळी. माती चाचणी अहवाल पाहून, हवामान आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन, एआय तुम्हाला सांगेल – कोणतं खत, किती प्रमाणात, कधी द्यायचं, मॅक्रो आणि मायक्रो पोषणाचं संतुलन कसं राखायचं आणि कमी खर्चात चांगला परिणाम मिळवण्यासाठी कोणते पर्याय आहेत.

खतं किंवा औषधं घ्यायला गेलं की, दुकानात डझनभर ब्रँड दिसतात. प्रत्येकाचं नाव वेगळं, जाहिरात वेगळी. पण एआय तुम्हाला दाखवेल – कोणत्या औषधात कोणती सक्रिय द्रव्यं आहेत, त्याचं प्रमाण किती आहे आणि कोणत्या ब्रँडचा दर्जा चांगला आहे. म्हणजे तुम्ही जाहिरातीवर नव्हे, तर विज्ञानावर आधारित निर्णय घेऊ शकता. हवामानाचं नियोजन हा शेतीतला मोठा मुद्दा आहे. पेरणी, खत देणं, फवारणी – सगळं हवामानाशी जोडलेलं आहे. चाट जीबीटी हवामान खात्याच्या आणि उपग्रहांच्या डेटावर आधारित अंदाज देतो. पुढच्या आठवड्यात पाऊस आहे का, वारा कधी जास्त असेल, उष्णतेची लाट कधी येईल – हे सगळं आधी सांगतो आणि त्यानुसार योग्य दिवस सुचवतो.

एखादा रोग किंवा कीड आली तर, तो फक्त औषध सांगून थांबत नाही. तो पूर्ण योजना देतो – आधी संक्रमित भाग काढा, मग जैविक उपाय करा, नंतर गरज पडल्यास रासायनिक वापरा आणि पुढे त्याचं पुनरागमन टाळण्यासाठी काय करायचं ते सांगा. सरकारी योजना, अनुदान, पीक विमा – यासाठी लागणारी कागदपत्रं, प्रक्रिया, ऑनलाइन अर्जाच्या लिंक – सगळं तो व्यवस्थित सांगतो. म्हणजे तुम्हाला कुणाकडे धावपळ करावी लागणार नाही.

आणि फक्त शेतीतच नाही – भाषण तयार करणं, प्रदर्शनासाठी माहितीपत्रक बनवणं, ग्राहकांसाठी उत्पादनाचं वर्णन लिहिणं – हे सगळं तो करून देतो. म्हणजे तुम्ही शेतकरी असूनही शहरातील माणसासारखी मांडणी करू शकता. जगभरातील यशस्वी शेतकऱ्यांच्या गोष्टी, त्यांनी केलेले नवे प्रयोग, घेतलेली नवी पिकं – हे सगळं तो सांगून तुम्हाला प्रेरित करतो. कारण माहिती शेअर केली, तरच ती वाढते.

शेतकरी भावांनो, एआय हा फक्त संगणकाचा प्रोग्राम नाही – हा आपल्या मेहनतीचा साथी, आपल्या प्रश्नांचा गुरू आणि आपल्या यशाचा मार्गदर्शक आहे. मेहनत तुमची, जमीन तुमची, पाणी तुमचं आणि आता माहितीचं सोनं पण तुमचं. आता आपल्याला लाजायचं काही कारण नाही, कारण तंत्रज्ञान आपल्यासाठी काम करतंय. वापरा, अनुभव घ्या, आणि इतर शेतकऱ्यांना प्रेरित करा. शेती चालू राहिली तरच देश चालतो आणि तुमचं पिक हिरवंगार राहिलं तरच आपला संसार फुलतो.

💚 ही मैत्री विचारांची

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!