Ethanol Soybean : इथेनाॅलमुळे साेयाबीन दरवाढीला ‘ब्रेक’
1 min read
Ethanol Soybean : केंद्र सरकारने राष्ट्रीय जैवइंधन धोरण-2018 (National Policy on Biofuels-2018) नुसार इथेनाॅल मिश्रित पेट्राेल (EBP – Ethanol Blended Petrol) चा वापर करण्याचे धाेरण आखले आहे. त्याअनुषंगाने सन 2025 पर्यंत पेट्राेलमध्ये 20 टक्के इथेनाॅल (Ethanol) मिसळण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले. सन 2014 मध्ये पहिल्यांदा पेट्राेलमध्ये इथेनाॅल मिसळण्यात आले. तेव्हा त्याचे प्रमाण 1.50 टक्के एवढे हाेते. जून 2020 मध्ये हे प्रमाण 10 टक्के करण्यात आले. पुढे इथेनाॅल उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय जैवइंधन समन्वय समिती (NBCC – National Biofuel Coordination Committee) ने त्यांच्या 20 एप्रिल 2020 आणि 9 नोव्हेंबर 2020 च्या बैठकीत मका (Maize) आणि तांदूळ (Rice) या शेतमालांपासून इथेनाॅल तयार करण्यास परवानगी दिली. याला खऱ्या अर्थाने वेग आला ताे सन 2022 पासून. सध्या पेट्राेलमध्ये 19.93 टक्के इथेनाॅल मिसळले जाते. इथेनाॅल निर्मिती प्रक्रियेत मका आणि तांदळाची ढेप माेठ्या प्रमाणात तयार हाेत असून, त्याचे दर कमी असल्याने व ती पशुखाद्य म्हणून बाजारात येत असल्याने अधिक दरामुळे साेयाबीनच्या ढेपेचे वापर घटला आहे आणि त्याचे परिणाम साेयाबीनच्या (Soybean) दरावर झाले आहेत.
♻️ साेयाबीन, मका व धानाचे पेरणीक्षेत्र
देशात सन 2024-25 च्या हंगामात 125.11 लाख हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. ती यावर्षी म्हणजेच 2025-26 मध्ये 118.54 लाख हेक्टरवर आली आहे. त्यामुळे देशातील साेयाबीनचे पेरणीक्षेत्र 6.57 लाख हेक्टरने म्हणजेच 5.25 टक्क्यांनी घटले आहे. देशात सन 2024-२५ च्या हंगामात 81.99 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी केली होती. यावर्षी 91.62 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आल्याने हे क्षेत्र 9.63 लाख हेक्टरने म्हणजेच 11.74 टक्क्यांनी वाढले. धानाच्या पेरणीक्षेत्रातही यावर्षी 45.68 लाख हेक्टरने म्हणजेच 16.69 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन 2024-25 च्या हंगामात देशभरात 273.72 लाख हेक्टरमध्ये धानाची पेरणी करण्यात आली होती. ती यावर्षी 319.40 लाख हेक्टरवर पाेहाेचली आहे. धानाची पेरणी सुरूच असल्याने या क्षेत्रात पुन्हा वाढ हाेऊ शकते.
♻️ साेयाबीनचे उत्पादन घटणार
आधीच साेयाबीनचे पेरणीक्षेत्र 6.57 लाख हेक्टरने घटले आहे. राेग व किडींमुळे देशातील साेयाबीनची उत्पादकताही कमी हाेत आहे. त्यात यावर्षी सप्टेंबरमध्ये अतिजाेरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या पावसामुळे पीक खराब झाल्यास साेयाबीनच्या उत्पादनात घट येणार आहे. सन 2022-23 च्या हंगामात देशात 124.11 लाख टन साेयाबीनचे उत्पादन झाले हाेते. ते 2023-24 च्या हंगामात घटून 110.00 लाख टनांवर आले तर 2024-25 मध्ये वाढून 123.60 लाख टनांवर पाेहाेचले. सन 2025-26 च्या हंगामात देशात 125 लाख टन साेयाबीनचे उत्पादन हाेण्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालय आणि USDA (United States Department of Agriculture) ने त्यांच्या अहवालात नमूद केला आहे. दुसरीकडे, भारतात तांदूळ व मक्याच्या उत्पादनात मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढ हाेणार आहे.
📌 साेयाबीनचे पेरणीक्षेत्र (लाख हेक्टर)
वर्ष – देश – महाराष्ट्र – घट
🔆 2024-25 – 125.11 – 51.59 – 6.57 (5.25 टक्के)
🔆 2025-26 – 118.54 – 49.26 – 2.33 (4.52 टक्के)
♻️ साेयाढेपेशी मका व तांदळाच्या ढेपेची स्पर्धा
साेयाबीनचे दर हे साेयाढेपेच्या दरांवर ठरतात. भारतात दरवर्षी सरासरी 90 लाख मेट्रिक टन साेयाढेपेचे उत्पादन हाेते. यातील 60 लाख मेट्रिक टन साेयाढेप ही देशातील पाेल्टी खाद्य, 10 लाख मेट्रिक टन साेयाढेप ही पशुखाद्यासाठी वापरली जायची तर उर्वरित 20 लाख मेट्रिक टन साेयाढेप निर्यात केली जायची. इथेनाॅल निर्मितीसाठी मका आणि तांदळाचा वापर सुरू केल्याने व ताे वाढल्याने सन 2021 पासून या दाेन्ही शेतमालांची दरवर्षी किमान 20 लाख मेट्रिक टन ढेप देशांतर्गत बाजारात यायला लागली. यात सरासरी 12 लाख मेट्रिक टन मका आणि 8 लाख मेट्रिक टन तांदळाच्या ढेपेचा समावेश आहे. या दाेन्ही शेतमालांच्या ढेपेचा वापर पाेल्ट्री खाद्य व पशुखाद्यासाठी केला जाताे. त्यामुळे दरवर्षी किमान 20 लाख मेट्रिक टन साेयाढेप शिल्लक राहात गेली.
♻️ ढेपेच्या दरातील तफावत
साेयाढेपेत 46 टक्के प्राेटीन असल्याने या ढेपेचा वापर पाेल्ट्री व पशुखाद्यासाठी केला जाताे. पण मक्याच्या ढेपेत प्राेटीनचे प्रमाण 51 टक्के असल्याने तसेच दरांमध्ये माेठी तफावत असल्याने त्यांच्या स्पर्धा निर्माण झाली. सन 2024 मध्ये साेयाढेपेचे दर 42 रुपये प्रतिकिलाे तर मक्याची ढेप 14 रुपये प्रतिकिलाे आणि तांदळाच्या ढेपेचे दर 24 रुपये प्रतिकिलाे हाेते. सन 2025 मध्ये साेयाढेपेचे दर 42 ते 45 रुपये प्रतिकिलाे झाले तर तांदळाच्या ढेपेचे दर 8 रुपये प्रतिकिलाेवर आले. मक्याच्या ढेपेचे दर मात्र स्थिर राहिले. अधिक प्राेटीन आणि कमी दर यामुळे पाेल्ट्री उद्याेगाने काेंबड्यांच्या खाद्यासाठी साेयाढेपेला पर्याय म्हणून मका व तांदळाच्या ढेपेला प्राधान्य देत खरेदी वाढविली आणि साेयाढेप शिल्लक राहण्याचे प्रमाण वाढत गेले.
♻️ साेयाढेपेची निर्यात मंदावली
जीएम बियाण्यांमुळे ब्राझील, अर्जेंटिना आणि अमेरिकेतील साेयाबीनची उत्पादकता व उत्पादन भारताच्या तुलनेत अधिक असून, खर्च मात्र कमी आहे. पूर्वी जागतिक बाजारात जीएम आणि नाॅन जीएम असा फरक करून साेयाढेपेची खरेदी केली जायची. त्यावेळी तिन्ही देशांच्या जीएम साेयाढेपेच्या तुलनेत भारताच्या नाॅन जीएम साेयाढेपेला अधिक दर मिळायचा व मागणीही चांगली हाेती. त्यामुळे भारतातून साेयाढेपेची निर्यात व्हायची. अलीकडे जागतिक बाजारात जीएम आणि नाॅन जीएम साेयाढेप असा फरक राहिला नाही. जीएम साेयाढेपेचे दर नाॅन जीएम साेयाढेपेच्या तुलनेत कमी असल्याने जीएम साेयाढेपेची मागणी वाढली. त्याचा परिणाम भारतीय नाॅन जीएम साेयाढेपेच्या निर्यातीवर झाला.
📌 साेयाढेप निर्यात (लाख टन)
🔆 2023-24 – 23.33
🔆 2024-25 – 18.00
🔆 2025-26 – 3.87
(2025-26 या वर्षात एकूण 14 लाख टन साेया ढेप निर्यातीचा अंदाज)
📌 साेयाबीन उत्पादन, एमएसपी, सरासरी दर (लाख टन/रुपये प्रतिक्विंटल)
वर्ष – उत्पादन – एमएसपी – सरासरी दर
🔆 2020-21 – 104.56 – 3,880 – 4,166
🔆 2021-22 – 118.89 – 3,950 – 5,491
🔆 2022-23 – 124.11 – 4,300 – 4,951
🔆 2023-24 – 110.00 – 4,600 – 4,150
🔆 2024-25 – 123.60 – 4,892 – 4,175
♻️ साेयाबीनच्या दरवाढीची शक्यता का मावळली?
साेयाबीनच्या दराचे अर्थशास्त्र साेयाढेपेच्या दरावर अवलंबून आहे. देशात बाजारात पाेल्ट्री व पशुखाद्यासाठी मका व तांदळाच्या ढेपेचा वापर वाढल्याने तसेच मागील तीन वर्षांपासून दरवर्षी किमान 20 लाख टन साेयाढेप साेया प्लांटकडे शिल्लक राहात गेल्याने साेयाबीनचे कायम दर दबावात आले. मागील काही दिवसांपासून साेयाबीनच्या दराने प्रतिक्विंटल सरासरी 500 रुपयांची उचल घेतली असली तरी साेयाढेपेची निर्यात संथच आहे. साेयाबीनच्या दरवाढीला भारतातून किमान 22 ते 25 लाख मेटरिक टन साेयाढेप निर्यात हाेणे गरजेचे आहे. साेयाढेपेच्या निर्यातीला केंद्र सरकार सबसिडी द्यायला तयार नाही. त्यामुळे आगामी हंगामात दरवाढीची शक्यता मावळली असून, साेयाबीनचे दर एमएसपीपेक्षा कमी म्हणजेच प्रतिक्विंटल 4,500 रुपयांच्या आसपासच राहतील. सरकारने सन 2024-25 च्या हंगामासाठी साेयाबीनची एमएसपी 4,892 रुपये प्रतिक्विंटल जाहीर केली असली तरी ऑक्टाेबर 2024 ते मे 2025 या काळात संपूर्ण देशभर साेयाबीनचे सरासरी दर 4,100 रुपयांच्या आसपास हाेते. सरकारने एमएसपी दराने फार काही साेयाबीन खरेदी केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते कमी दराने व्यापाऱ्यांना विकले. जागतिक बाजारात भारतीय साेयाढेप व साेयाबीनच्या तुलनेत ब्राझील, अर्जेंटिनाच्या साेयाढेप व साेयाबीनचे दर कमी असल्याने भारताची निर्यात मंदावली आहे. त्यामुळे यावर्षी साेयाबीनला किमान पाच हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळण्याची शक्यता मावळली आहे.