Rui : बहुगुणी व दुर्लक्षित रुई
1 min read
Rui : शेताच्या बांधावर, रस्त्याच्या कडेने, माळावरती एक झाड लांबूनच आपले लक्ष वेधून घेतो, त्याची सुंदर पांढरी फुले आपल्याला आकर्षित करतात, जमिनीपासून खोडाला अनेक फुटवे फुटून ते आकाशाच्या दिशेने वाढतात, हे झाड म्हणजे रुई (Rui). या झाडाला ग्रामीण भाषेत रुइट असे म्हणतात. अनेकांना हे झाड माहितही नसेल किंवा अनेकांनी नुसते नाव ऐकलेले असेल, आजच्या काळात तर हे झाड कोठेतरी एखादे दिसते, जवळपास हे नामशेष झालेले आहे. शनिदेव आणि मारुती यांना याच्या पानाची माळ शनिवारी घातली जाते. असे हे निसर्गातील एक महत्त्वाचे पण दुर्लक्षित झाड आहे.
कठोर मातीत पाय रोवून उभी,
दुष्काळातही राहते हिरवी,
वादळात झुके-पण मोडत नाही,
रुई जगायला मूक शिकवणी देई।
🔆 इतिहास
रुई ही वनस्पती जवळपास जगात सगळीकडे आढळते, भारतीय उपखंडात ती हजारो वर्षापासून पाहायला मिळते. वैदिक व संस्कृत साहित्यात या झाडाला अर्क म्हटले आहे. चरक संहिता व सुश्रुत संहितामध्येही याच्या औषधी गुणधर्मांचा उल्लेख आहे. मध्ययुगीन काळात रुई लोकजीवनात खोलवर रुजली. शिवपूजा व गणेशपूजेत हिची फुले वापरली जात होती. ब्रिटिश काळात या वनस्पतीला उपयुक्त झाड म्हणून पाहिले गेले. या झाडापासून कागद व दोर निर्मितीचे प्रयोग झाले. फळातील रेशमी तंतू उशा, गाद्या, लाईफ जॅकेट भरण्यासाठी वापरले गेले. हे झाड प्राचीन भारतीय संस्कृतीमध्ये लोकसंस्कृतीचे प्रतीक मानले जाते.
🔆 झाडाची रचना
रुई या झाडाची रचना अतिशय सुंदर व मनमोहक असते. याचे सोटमूळ हे जमिनीत खोलवर जाते, त्याला अनेक उपमुळे फुटतात, ही मुळे अतिशय मजबूत असतात. यामुळे जमिनीतील खोलवरील पाणी शोषून घेतात. रुईचे खोड सरळ, गोलसर व काटे नसलेले असते. याचा रंग फिक्कट, राखाडी हिरवा असतो, त्याच्या आतमध्ये पोकळसर व तंतुमय रचना असते. खोडावर हलका मेनचट थर असतो, तो खोडातून पाण्याचे बाष्पीभवन होऊ देत नाही. याच्या फांद्या एकमेकांच्या विरुद्ध दिशेने सरळ वाढतात. त्या ठिसूळ पण मजबूत असतात. याची पाने मोठी, जाड मांसल व अंडाकृती असतात. पानांचा रंग फिक्कट हिरवा, करडा हिरवा असतो, पानांवर सूक्ष्म केसांसारखा थर असतो, जो पानातील बाष्पीभवन रोखतो, पानाची मांडणी समोरासमोर असते. या झाडाला फुले गुच्छात येतात, यांचा रंग पांढरा, गुलाबी व जांभळट छटा असलेला असतो. फुलाची रचना जटिल पण सुंदर असते, कीटक परागीभवांसाठी अनुकूल असते. याचे फळ दोन पिसव्यांसारखे असते, कच्चे फळ हिरवे असते, ते पिकल्यावर तपकिरी होते, हे फुटल्यावर यातून पांढरे, रेशमी केस असलेल्या बिया बाहेर पडतात, या बिया वाऱ्याने लांबपर्यंत जातात, यातून याचा बीजप्रसार होतो. रुईच्या बिया हलक्या व केसांनी वेढलेल्या असतात, हवेबरोबर सहज वाहून जातात व त्यापासून नवीन झाडे उगवतात.
🔆 पर्यावरणीय उपयोग
रुई हे झाड म्हणजे पर्यावरणाचा एक अविष्कार आहे, हे झाड केवळ काटक झाड नाही तर कोरड्या व नापीक प्रदेशातील एक महत्त्वाचा पर्यावरणीय आधारस्तंभ आहे. हे झाड दुष्काळ प्रतिकार करणारे व मृदा संवर्धन करणारे आहे. याची खोलवर जाणारी सोटमुळे जमिनीची धूप रोखतात व पावसाचे पाणी जमिनीत घेऊन जातात. रुक्ष, खडकाळ, व क्षारयुक्त जमिनीत वाढते, यामुळे ओसाड जमिनीचे स्थिरीकरण होते. वाऱ्यामुळे होणारी जमिनीची धूप कमी होते. रुईवर अनेक किटके, मधमाश्या, फुलपाखरे अवलंबून असतात, पक्षी व लहान प्राणी आश्रयासाठी या झाडाचा आधार घेतात. कीटकभक्षी पक्षांना अन्नसाखळीमध्ये या झाडाचा आधार मिळतो. रुईची फुले कीटक परागीभवांसाठी अनुकूल असतात, यामुळे झाडाच्या परिसरातील इतर झाडाना, शेतीतील पिकांना फायदा होतो. रुक्ष व दुष्काळी परिसरात ही झाडे वाढतात, यामुळे येथील हवेतील कार्बन शोषून घेऊन तापमानवाढ कमी करण्यास मदत करतात. झाडांच्या समूहामुळे सावली निर्माण होते, यामुळे जमिनीतील गारवा टिकून राहण्यास मदत होते. रुई दुष्काळी भागात, प्रदूषित वातावरणात, धुळीच्या ठिकाणी तग धरते, यामुळे रस्त्याच्या कडेने, खाणींच्या परिसरात ही झाडे उपयोगी आहेत. खाणकाम झालेल्या, मुरमाड, नापीक जमिनी सुपीक करण्यासाठी ही झाडे लावली पाहिजेत. यामुळे ही झाडे निसर्गाचा अनमोल ठेवा आहेत व जैव विविधतेचा आधार आहेत.
🔆 साहित्य व संस्कृतीमधील महत्त्व
रुई हे झाड साधे, काटक, पण अर्थपूर्ण प्रतिकांनी भरलेले आहे. लोकजीवन, लोकसंस्कृती, अध्यात्म आणि मराठी साहित्यामध्ये रुईला महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. रुईला अनेक ठिकाणी देवाशी जोडलेले आहे, शिवपूजन करण्यासाठी याची फुले वापरली जातात. या झाडाच्या पानाची माळ शनिदेव व मारुती यांच्या गळ्यात घातली जाते, रुईला काही ठिकाणी दुष्ट शक्तींपासून संरक्षण देणारे झाड मानतात. अनेक लोकगीते व लोकथांमध्ये या झाडाचे वर्णन येते. लोकगीतांत रुई अनेकदा कठीण परिस्थितीतही उभे राहणाऱ्या माणसाचे प्रतीक म्हणून येते. या झाडावर अनेक काव्य लिहिली गेलेली आहेत.
माळरानाच्या उघड्या छाताडावर
एकटीच उभी आहेस तू, रुई,
कुणीही न कुरवाळलेली,
तरीही अभिमानाने उभी.
🔆 आर्थिक उपयोग
रुई हे अनेकदा निरुपयोगी समजले जाणारे झाड असले तरी प्रत्यक्षात त्याचे आर्थिक मूल्य खूप महत्त्वाचे आहे. योग्य नियोजन केल्यास ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लावू शकणारे हे झाड आहे. रुईच्या सालीपासून मजबूत नैसर्गिक तंतू मिळतात. यापासून दोर, सुतळी, काथ्या तयार होतात. यामुळे ग्रामीण भागात कुटीर उद्योगाच्या संधी उपलब्ध होतात. रुईचे पाने, फुले, मुळी, दुधळा चिक हे औषधांमध्ये वापरली जातात, यामुळे यापासून आर्थिक उलाढाल होते. रुईची पाने व कोवळी भाग गांडुळखतासाठी उत्तम जैविक घटक ठरतात, यापासून सेंद्रिय खते तयार करून शेतीचा खर्च कमी करता येतो. शेताच्या बांधावर ही झाडे लावल्यास नैसर्गिक कुंपण तयार होते. याची फुले मधमाश्यांसाठी उपयोगी पडतात, यामुळे मधुमक्षिका पालनासाठी फायद्याचे आहे. याप्रकारे योग्य नियोजन करून आपण यापासून चांगले उत्पन्न मिळू शकतो.
🔆 आयुर्वेदिक उपयोग
आयुर्वेदात रुईला ‘आक’ किंवा ‘अर्क’ म्हणतात. हे झाड उष्ण, तीक्ष्ण, कफ-वातनाशक व वेदनाशामक गुणधर्मांचे मानले जाते. सुजलेल्या जागेवर गरम करून बांधल्यास सूज व वेदना कमी होतात. सांधेदुखी, गुडघेदुखी, कंबरदुखीवर पानांचा शेक/लेप लावतात, गळू, फोड, गाठी यावर पानांचा लेप पारंपरिक उपचारात वापरतात. कफविकार, दमा, जुनाट खोकला यावर काही आयुर्वेदिक औषधांमध्ये पानांचा अर्क वापरला जातो. त्वचेवरील खाज, खरूज, चामखिळा यावर रुईचा चीक वापरतात. याप्रकारे हे झाड औषधी गुणधर्मांनी युक्त आहे.
रुई ही धार्मिक वनस्पती म्हणून आपल्याकडे ओळखली जाते. आज या झाडाचा आर्थिक उपयोग काहीच होत नाही, असे समजून त्याकडे समाजाने पूर्ण दुर्लक्ष केले आहे. शेतामध्ये, बांधावर कोठेही ही झाडे ठेवली जात नाहीत. यामुळे आज या झाडांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. या झाडाचा पूर्ण अभ्यास व योग्य नियोजन केले तर हे आर्थिक फायदा देईल व पर्यावरण संरक्षण देखील करेल, या उद्देशाने नागर फाउंडेशन रुईचे संरक्षण, संवर्धन करण्याचे कार्य करते, गावामध्ये अनेक ठिकाणी आपण या झाडांना संरक्षण दिलेले आहे. ही झाडे आपोआप उगवतात, वाढतात, बहरतात, फक्त त्यांचे रक्षण करणे गरजेचे आहे. सर्वांना आवाहन आहे की, जेथे कोठे रुईचे झाड येईल, त्याला तेथेच वाढू द्या, बहरू द्या व मोठे होऊ द्या.