Festival of Pola : बैल सजवायचे की डुकरे?
1 min read
Festival of Pola : शेतकरी म्हणजे मातीतला देव. त्याच्या हातात नांगर असतो, कपाळावर घाम असतो आणि डोळ्यांत भविष्याचं स्वप्न असतं. पण या स्वप्नामागे त्याला खरा आधार देणारा सोबती असतो तो म्हणजे बैल (Bull). शेतकऱ्याने स्वतःच्या लेकरासारखं जपलेलं हे जनावर फक्त शेतीचं साधन नव्हतं, तर त्याचं कुटुंब, त्याचं प्रेम, त्याचं आयुष्य होतं. म्हणूनच बैलपोळा (Pola) हा सण (Festival) शेतकऱ्याच्या हृदयाचा उत्सव होता. बैलाला देव मानून त्याला सजवणं, त्याच्या मेहनतीला प्रणाम करणं, त्याच्या घामातल्या योगदानाला मान देणं – हाच या सणाचा खरा अर्थ होता.
पूर्वीच्या काळी पावसाळा वेळेवर यायचा. शेतात हिरवीगार पिकं उभी असायची, अंगणात धान्याच्या राशींचा सुगंध दरवळायचा. अशा भरघोस परिस्थितीत शेतकरी आपल्या बैलांना सजवून गावभर फिरवायचा. त्या दिवशी गावात एक वेगळाच आनंद असायचा. अंगणातून निघालेला बैल जेव्हा रंगीबेरंगी पिळे बांधून, शिंगांना डागडुजी करून, कपाळावर काजळ लावून, गळ्यात घंटा बांधून निघायचा, तेव्हा त्या दृष्याने आकाशातल्या चंद्र-ताऱ्यांनाही हेवा वाटावा. लेकरं आनंदाने नाचायची, स्त्रिया रांगोळ्या काढून दार सजवायच्या, ढोल-ताश्यांचा गजर व्हायचा आणि त्या सगळ्यात शेतकऱ्याचं मन भरून यायचं. कारण त्याला माहीत असायचं की, हे बैल माझं घर पोटभर ठेवतात, माझ्या कुटुंबाला जगवतात.
पण आज काळ बदलला. जमीन तुकड्या-तुकड्यांनी कमी झाली, शेतीची मजुरी वाढली, दुधासाठी परदेशी जर्सी गायी आल्या, नांगरासाठी ट्रॅक्टर आणि मशिनं आली आणि हळूहळू गावागावातून गावरान बैल गायब झाले. ज्या अंगणातून पोळ्याच्या दिवशी सजवलेला बैल निघायचा, तिथं आज रिकामेपण दाटून आलं आहे. कितीतरी शेतकरी बैल पाळायलाच परवडत नाही म्हणून मशीनकडे वळला.
बैल आणि शेतकरी हे एकमेकांचे प्राण होते. पण ट्रॅक्टरने ती जागा घेतली. ट्रॅक्टर झपाट्याने काम करतो, पिकं लवकर तयार होतात, मजुरी वाचते – हे खरं आहे. पण ट्रॅक्टर कधी मालकाच्या डोळ्यातलं प्रेम ओळखतो का? ट्रॅक्टरला अंगाला हात फिरवला तर तो मान डोलावतो का? नाही! ट्रॅक्टरला कधी अंगणात घंटा बांधून मिरवता येतं का? नाही! तो केवळ लोखंडाचा ढीग आहे. तो माणसाच्या हृदयाला जोडणारा सोबती नाही. म्हणूनच शेतकरी जरी आज ट्रॅक्टर वापरत असला, तरी त्याच्या मनातल्या पोळ्याचा आनंद हरवून गेला आहे.
आज कितीतरी घरांत पोळ्याच्या दिवशी बैलच नाहीत. अंगण ओसाड आहे, पूजा करण्यासारखं काही नाही. शेतकरी हात जोडून देवाला म्हणतो – देवा, बैल नाहीत तरी माझं पीक जगव. माझ्या लेकरांना पोटभर जेवायला मिळू दे. माझं कर्ज फेडायला बळ दे.” पण त्याच्या डोळ्यांतलं पाणी विचारतं – एवढ्या वर्षांचा सोबती कुठं गेला?
याच वेळी सरकारकडून येणाऱ्या बातम्या शेतकऱ्याच्या जखमेवर मीठ चोळतात. महाराष्ट्रातल्या पाच-सात जिल्ह्यांत अतिवृष्टी झाली. पिकं पाण्याखाली गेली, शेतकरी उद्ध्वस्त झाला, संसाराचा डोलारा हलला. अशा वेळी सरकारकडून शेतकऱ्याला आधार द्यायची, दिलासा द्यायची गरज होती. पण उलट बातमी आली – मंत्र्यांनी वराह जयंती साजरी करायला सांगितली. हा काय विनोद आहे का?
एकीकडे शेतकरी पोळा साजरा करायला बैल शोधतोय, दुसरीकडे सरकार शेतकऱ्याला डुक्कर पूजा सांगतंय. हा शेतकऱ्याच्या संस्कृतीचा अपमान नाही का? बैल सजवणं म्हणजे परंपरा जपणं, संस्कृती उचलणं. डुक्कर सजवणं म्हणजे त्या संस्कृतीवर चिखल फेकणं. शेतकरी मनातून विचारतो – आपण बैल सजवायचे की डुकरे? हा प्रश्न फक्त शब्दांचा नाही. हा प्रश्न शेतकऱ्याच्या आत्म्याचा आक्रोश आहे. कारण बैल पोळा हा फक्त सण नाही, तर तो शेतकऱ्याच्या जगण्याचा आधार आहे. बैलाशिवाय शेतीचं पानही हललं नसतं. बैलानेच नांगर ओढला, बैलानेच पिकं उभी केली, बैलानेच शेतकऱ्याला भाकर दिली. म्हणून पोळ्याच्या दिवशी बैल सजवणं म्हणजे शेतकऱ्याच्या घामाला वंदन करणं आहे.
आज गावातल्या मुलांना माहितच नाही की बैल सजवायचे म्हणजे काय. त्यांच्यासाठी शेती म्हणजे ट्रॅक्टर, रासायनिक औषधं, आणि मशीन. पण त्यांना माहित नाही की कधीकाळी या जमिनीवर बैलांच्या घंटानादाने संस्कृती उभी राहिली होती. ही संस्कृती निसटून गेली तर उद्या आपली लेकरं विचारतील – आपल्या आजोबांनी शेती कशी केली? आपण काय उत्तर देणार? ट्रॅक्टर दाखवणार? की डुक्कर पूजा सांगणार?
बैल म्हणजे शेतकऱ्याचा आत्मा. त्याचं स्थान कोणी घेऊ शकत नाही. ट्रॅक्टर जरी सोयीस्कर असला तरी त्यात माया नाही. ट्रॅक्टर धडपडतो, पण बैल मात्र मनाने जोडतो. म्हणूनच पोळा हरवला तरी शेतकऱ्याच्या मनात बैलाचं स्थान आजही चिरंतन आहे. या परिस्थितीत सरकारने शेतकऱ्याच्या भावना समजून घ्यायला हव्यात. बैलपोळ्यासारख्या सणाला राष्ट्रीय ओळख द्यायला हवी. शाळा-महाविद्यालयांत मुलांना या परंपरेची माहिती द्यायला हवी. शेतकऱ्याच्या दुःखात हातभार लावायला हवा. पण होतंय उलटच – जखमेवर मीठ चोळण्याचं काम.
आज बैल हरवत चालले, पोळ्याचा उत्सव हरवत चालला आणि शेतकरी या सगळ्यात हरवत चाललाय. तरीही त्याच्या मनातलं प्रेम बदललेलं नाही. तो अजूनही म्हणतो – माझा बैल माझं लेकरं आहे. तोच माझा प्राण आहे. म्हणूनच या दिवशी आपण सर्वांनी एकत्र विचार करायला हवं – आपण बैल सजवायचे की डुकरे? जर संस्कृती वाचवायची असेल, शेतकऱ्याच्या भावनांचा सन्मान करायचा असेल, तर उत्तर एकच आहे – आपण बैल सजवायचे. कारण बैल म्हणजे शेतीचं हृदय आणि शेती म्हणजे आपल्या जगण्याचा श्वास.
🤝 ही मैत्री विचारांची