Fertilizers : खते सोन्याच्या भावात
1 min read
Fertilizers : शेतकरी बांधवांनो, आजकाल एक मोठी बातमी कानावर येते आहे – चीननं भारताला खतांचा (Fertilizers) पुरवठा कमी केला आहे. ही काही साधी बातमी नाही, तर आपल्या शेतीसाठी भविष्यात मोठं संकट ठरणारी गोष्ट आहे. जगातल्या खतांच्या बाजारपेठेत चीन हा मोठा खेळाडू आहे. विशेष करून झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, मॅंगनीज सल्फेट, बोरॉन, तसेच चिलेटेड आणि पाण्यात विरघळणारी मायक्रोन्यूट्रिएंट खते – ही सगळी खते चीनकडूनच भारतात मोठ्या प्रमाणावर येतात. आकडेवारी सांगते की, गेल्या वर्षी म्हणजे 2023-24 मध्ये तब्बल 32 लाख टन चिलेटेड व पाण्यात विरघळणारी खते भारताने आयात केली आणि त्यातील तब्बल 65 टक्के खत चीनकडून आलं. पण आता 2025 च्या पहिल्या सहामाहीत हाच पुरवठा जवळपास 30 टक्क्यांनी घटला आहे. याचा सरळ अर्थ असा की बाजारात खते कमी असतील आणि मागणी जास्त असेल, म्हणून भाव गगनाला भिडणार हे ठरलेलंच आहे.
आपल्याला आठवतं का, 2021 मध्ये झिंक चिलेटेड खताच्या भावात किती उडी घेतली होती? दर किलो खत 270 रुपयांवरून थेट 420 रुपये किलो झाला होता. आज पुन्हा तसंच संकट डोक्यावर आलं आहे. टोमॅटो, द्राक्ष, डाळिंब, ऊस, भाजीपाला यासारख्या पिकांना पटकन शोषलं जाणारं चिलेटेड खत लागणारच लागणार. पण त्याचं भाव दुप्पट झालं, तर त्याचा मार सरळ शेतकऱ्यालाच बसणार हे आपण ओळखायलाच हवं.
आता उपाय काय? आपल्याकडे पर्याय आहेत, फक्त त्यांचा योग्य वापर करायचा आहे. आपल्या बाजारात जी खते मिळतात ती साधारणपणे सल्फेट किंवा ऑक्साईड प्रकारची आहेत. ही खते चिलेटेडसारखी झपाट्याने काम करत नाहीत, पण योग्य तंत्राने वापरली तर त्यांचा फायदा निश्चित मिळतो. झिंक सल्फेट किंवा फेरस सल्फेट सारखी साधी खते फवारणी करताना जर स्टिकर -स्प्रेडरसह वापरली, तर त्यांचा परिणाम चक्क 25 ते 30 टक्क्यांनी जास्त होतो. माती तपासणी करून संतुलित खतं वापरली, तर चिलेटेडवर अवलंबून राहायची गरज कमी होते. तसेच कंपोस्ट, शेणखत, जैविक खते यांचा वापर वाढवला, तर मातीचं आरोग्य सुधारतं आणि सूक्ष्म पोषण टिकून राहतं.
सरकारही या संकटावर उपाय काढण्याच्या प्रयत्नात आहे. 2025 मध्ये ‘आत्मनिर्भर पोषणतत्व’ उपक्रम सुरू करून पुणे, नागपूर, हैदराबाद इथे खासगी कारखाने चिलेटेड खतं बनवायला सुरुवात झाली आहे. मात्र या कारखान्यांचा परिणाम बाजारात दिसायला अजून दोन-तीन वर्षे जाणार आहेत. तोपर्यंत आपल्याला चीनवरच अवलंबून राहावं लागणार आहे. त्यामुळे सध्या शेतकरी बांधवांनीच आपल्या खिशावर ताण येऊ नये म्हणून मार्ग काढायला हवा.
खरं सांगायचं तर खतांचा बाजार हा आज केवळ शेतीचा भाग राहिला नाही, तर तो मोठ्या देशांचा राजकीय डाव ठरला आहे. चीन हवं तेव्हा आपला पुरवठा थांबवू शकतो, भाव वाढवू शकतो आणि त्याचा थेट परिणाम आपल्या पिकांवर, आपल्या खर्चावर होतो. त्यामुळे आज शेतकऱ्याने डोळसपणे निर्णय घ्यायला हवेत. शक्य तिथे स्थानिक सल्फेट खतांवर भर द्या, सेंद्रिय व घरगुती खतं वापरा, खताचा वापर नियोजनाने व काटकसरीने करा. सर्वांत महत्त्वाचं म्हणजे शेतकरी एकत्र या, संघटना करा, कारण एकजुटीतूनच आपण या संकटावर मात करू शकतो.
खरं तर खतं सोन्याच्या भावात गेली तरी आपला विश्वास, आपली मेहनत आणि आपलं धैर्य याहून मोठं खत कुठेच नाही. जमिनीत आपण कष्टाचं सोनं पेरतो आणि त्यातूनच आपलं भविष्य उगवतं. भाववाढीचं संकट आलं तरी जागरूक राहिलो, योग्य वेळी स्थानिक उपाय स्वीकारले आणि वैज्ञानिक शेतीकडे वळलो, तर आपण हे संकट नक्की पार करू.
🤝 ही मैत्री विचारांची