Cassia Auriculata : बालपणीच्या आठवणीतील झाड ‘तरवड’
1 min read
Cassia Auriculata : आपण कधी माळरानावर फिरायला गेलो, तर एक झुडुपवजा वनस्पती आपले लक्ष वेधून घेत, तिचे छोटी छोटी पिवळे धमुक फुले आपल्याला आकर्षित करतात. नवरात्रीमध्ये घटाला याच्या फुलांची माळ घातली जाते. आमच्या लहानपणी या दिवसात आमची आई आम्हाला याची फुले आणण्यासाठी सांगत असे, यावेळी धावतच आम्ही माळावर जाऊन याची फुले घेऊन येत. या झाडाच्या फांद्या तोडून त्याची साल पिळून त्यातील काडी बाहेर काढता येते. आम्ही शाळेत जाताना व सुट्टी दिवशी याच्या फांद्या आणून त्याची साल फिरून काढत असत, यापासून आम्ही पिपाणी बनवत असत व शाळेत जाताना येतात वाजवत असत. याप्रकारे हे झाड आजही आमच्या आठवणीत आहे.
तापलेल्या उन्हातही हसणारा तू,
ओसाड माळरानावर फुलणारा तू।
पिवळ्या सोन्याच्या फुलांनी सजलेला,
निसर्गाचा खरा दागिना तू।
🌳 इतिहास
तरवड (Cassia Auriculata) हे झाड भारतातील कोरड्या परिसरात नैसर्गिकरीत्या आढळते. महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, तेलंगणा या राज्यात मोठ्या प्रमाणात आढळते. याला दक्षिण भारतात आवराम म्हणतात. आयुर्वेदात तरवडाचा उल्लेख ‘आवर्तकी’ किंवा ‘पित्तशामक वनस्पती’ म्हणून आढळतो. चरक संहिता व सुश्रुत संहिता काळातही कडू-तुरट औषधी वनस्पतींचा वापर प्रचलित होता; त्याच परंपरेत तरवड वापरली जात होती, असे मानले जाते. दक्षिण भारतातील सिद्ध वैद्यक पद्धतीत तरवडाचे विशेष स्थान आहे. ब्रिटिश वनस्पतिशास्त्रज्ञांनी 18-19 व्या शतकात भारतातील औषधी वनस्पतींची नोंद केली. त्या काळातील वनस्पती सूचीमध्ये Cassia auriculata – तरवडचा समावेश करण्यात आला आणि त्याचे औषधी व रंगद्रव्य गुणधर्म नोंदवले गेले. यामुळे या झाडाला समृद्ध इतिहास प्राप्त झालेला आहे.
🌳 साहित्य व संस्कृती
तरवडीची पिवळी फुले व कोरड्या जमिनीतही तग धरून उभे राहणे हे चिकाटी, सहनशीलता आणि आशा यांचे प्रतीक मानले जाते. ग्रामीण भागातील ओव्या, लोकगीते व म्हणींमध्ये दुष्काळातही फुलणाऱ्या तरवडीचा उल्लेख आढळतो. पिवळ्या फुलांचा रंग आनंद, प्रकाश व मंगलभाव दर्शवतो. तामिळनाडूत तरवडाला ‘आवराम’ म्हणून ओळखतात. काही सण-उत्सवांत या फुलांचा वापर हार, सजावट व पारंपरिक पेयासाठी केला जातो. सिद्ध वैद्यक परंपरेत या वनस्पतीला विशेष आदर आहे. कोरड्या, उष्ण प्रदेशात सहज वाढणारे झाड असल्याने ते शाश्वत जीवनशैलीचे प्रतीक मानले जाते. शेतकरी व मेंढपाळांच्या जीवनाशी याचे नाते जोडले गेले आहे. दुष्काळातही हिरवेपणा देणारी वनस्पती म्हणून आशेचे प्रतीक मानली जाते. तरवडीच्या फुलांपासून नैसर्गिक पिवळा रंग मिळतो. पारंपरिक कापड रंगविणे व सौंदर्यप्रसाधनात वापर. साहित्यिक वर्णनांत ‘सोनसळी फुले’ ही उपमा तरवडीसाठी वापरली जाते. आजच्या काळात पर्यावरण संवर्धनाच्या साहित्यिक चळवळींत तरवडासारख्या स्थानिक झाडांचा उल्लेख निसर्गाशी सुसंवाद दर्शवण्यासाठी केला जातो. ग्रामीण कवितांमध्ये तरवड म्हणजे रानातील सोनेरी हास्य असे वर्णन आढळते. यामुळे ही झाडे लोकसंस्कृतीचे प्रतीक मानली गेली आहेत.
🌳 झाडाची रचना
तरवड हे कोरडवाहू भागात वाढणारे, काटक, आणि औषधी गुणांनी युक्त असे बहुउपयोगी झाड आहे. या झाडाची उंची 1 ते 3 मीटर पर्यंत वाढते. खोड तपकिरी रंगाचे, कठीण व अनेक फांद्या असलेले असते. साल मऊ व किंचित खडबुडे असते. पाने संयुक्त प्रकाराची असतात. एका पानात 8-12 जोड्या लहान पर्णिकांची रचना असते. पर्णिका लहान, लंबगोल, व गुळगुळीत असतात. पानाचा रंग गर्द हिरवा असतो. फुले तेजस्वी पिवळ्या रंगाची व आकर्षक असतात. फुलोरा झुबक्याचा स्वरूपात असतो. पाकळ्या साधारण 5, मधोमध केसरदळे असतात. पावसाळा व हिवाळा मध्ये फुले फुलतात. फळे शेंगेसारखी असतात. लांबट व चपट्या शेंगा असतात. शेंगामध्ये अनेक बिया असतात. मुख्य मूळ असते, कोरड्या प्रदेशात मूळ जमिनीत खोल जातात. अशा प्रकारे या झाडाची सुंदर रचना असते.
🌳 पर्यावरणीय उपयोग
तरवड या झाडाची मुळे मजबूत व खोल जमिनीत जाणारी असतात, यामुळे जल संवर्धन व मृदा संवर्धन होते. हे झाड खूप कमी पाण्यात चांगले वाढते, यामुळे दुष्काळी परिसरात हरित पट्टा निर्माण करण्यासाठी उपयोगी आहे. याची पिवळी फुले मधमाश्या आकर्षित करतात, यामुळे परागीभवन होण्यास मदत होते. विविध पक्षांना आश्रय व अन्न यापासून मिळते. दाट फांद्या असल्यामुळे शेताच्या भोवताली लावले तर नैसर्गिक कुंपण तयार होते, जनावरांपासून शेताचे रक्षण होते. हवेतील कार्बन शोषून घेऊन तापमानवाढ रोखण्यास मदत करते. यामुळे कोरड्या व दुष्काळी परिसरात ही झाडे खूप महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
🌳 आर्थिक उपयोग
तरवड हे झाड ग्रामीण भागात महत्त्वाचे आर्थिक उत्पन्न देणारे आहे. याची पाने, फुले, साल व बिया औषध उद्योगात वापरतात. यामुळे या उद्योगाला कच्चा माल हे झाड देते. याच्या सुक्या फुलांपासून हर्बल चहा तयार होतो, बाजारपेठेत याला चांगली मागणी आहे. महिला बचत गट माध्यमातून याचा व्यवसाय करता येतो. फुले व साल यापासून नैसर्गिक रंग व त्वचेसाठी लेप तयार होतो. साबण, फेसपॅक, हेअरपॅक अशा उत्पादनांत वापर होतो. स्थानिक पातळीवर लघु उद्योग उभारता येतात. पाने व कोवळ्या फांद्या शेळ्या-मेंढ्यांसाठी चारा म्हणून उपयोगी पडतात, यामुळे दुष्काळी परिसरात याचे महत्त्व अधिक आहे. वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरतात. हे झाड कोरड्या, खडकाळ जमिनीत वाढते, यामुळे पडीक जमिनीत वनीकरण करण्यासाठी उपयोगी पडते.
🌳 आयुर्वेदिक उपयोग
तरवड हे आयुर्वेदात शीत, कडू, तुरट, रसयुक्त व पित्त, कफ, शामक मानले जाते. याची फुले, साल, बिया, पाने, औषधी गुणधर्मांनी युक्त असतात. सुक्या फुलांचा काढा मधुमेहात रक्तातील साखर नियंत्रणासाठी वापरतात. यातील मूत्रल गुणधर्मामुळे लघवीची जळजळ, कमी लघवी यावर काढा देतात. शरीरातील अतिरिक्त द्रव बाहेर काढण्यासाठी मदत करते. शरीरातील उष्णता, आम्लपित्त कमी करण्यासाठी फुलांचा शीतल काढा उपयोगी पडतो. उन्हाळ्यात हर्बल टी स्वरूपात घेता येतो. पानांचा व फुलांचा लेप खाज, फोड, पुरळ यावर लावतात. रक्तशुद्धीकारक गुणामुळे त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते. पानाची पेस्ट जखमेवर लावतात, सूज कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. कडू-तुरट गुणधर्मामुळे भूक वाढते व पचन सुधारण्यास मदत होते. अतिसरात सालाचा काढा उपयोगी मानला जातो. यामुळे ही झाडे आयुर्वेदात अतिशय महत्त्वाची मानली गेली आहेत.
तरवड ही दुष्काळी परिसरात येणारी प्रमुख वनस्पती आहे. आमच्या भागातही ही मोठ्या प्रमाणात आढळते. परंतु काळानुसार लोकांनी इंधनासाठी या झाडाची तोड मोठ्या प्रमाणात केली, यामुळे ही झाडे आता दुर्मीळ झाली आहेत. यामुळे या झाडाचे संवर्धन, संगोपन, रक्षण करण्याचे कार्य नागर फाउंडेशनने हाती घेतले आहे. लोकांमध्ये या झाडाचा प्रचार प्रसार करून आपण त्यांना याचे महत्त्व पटवून देतो. शेताच्या बांधावर ही झाडे लावण्याचा आग्रह धरतो. तसेच जी झाडे निसर्गामध्ये आपोआप येतात त्यांचे रक्षण आपण करतो. यामुळे रवळगावमध्ये या झाडांची संख्या आता वाढू लागली आहेत. सर्वांना आवाहन आहे की, या झाडांची संख्या वाढविण्यासाठी स्वतःला जे शक्य होईल ते कार्य करा, यातूनच निसर्ग संवर्धन होईल व पर्यावरण समृद्ध होईल.