Social menu is not set. You need to create menu and assign it to Social Menu on Menu Settings.

June 11, 2026

krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agricultural Technology : बाटल्या त्याचं, जुगलबंदी नवी

1 min read

Agricultural Technology : एका अनुभवी कृषी शास्त्रज्ञांसोबत प्रदीर्घ चर्चा करण्याची संधी मिळाली. शेतीतील (Agriculture) वाढते खर्च, नवीन औषधे, बदलणारे हवामान, महागडी बियाणे आणि शेतकऱ्यांची मानसिकता यावर आमचा गंभीर संवाद सुरू होता. सध्याच्या संकटातून मार्ग काढण्यासाठी मी सहजच त्यांना एक प्रश्न विचारला ‘सर, शेतीमध्ये आता एखादे नवीन क्रांतिकारक औषध, नवीन बियाणे किंवा असे काही जादुई तंत्रज्ञान (Technology) येणार आहे का, ज्यामुळे शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न एका झटक्यात सुटतील?’ शास्त्रज्ञ हलकेसे हसले, क्षणभर शांत राहिले आणि अतिशय मार्मिक शब्दात म्हणाले, ‘क्रांती आता नवीन औषधांत नाही, तर जुन्या ज्ञानाच्या योग्य आणि शास्त्रीय वापरात आहे.’ हे वाक्य फक्त उत्तर नव्हते, तर आजच्या भारतीय शेतीचे जळजळीत वास्तव होते!

🔳 नवीन औषधांची जादुई प्रतीक्षा कशासाठी?
ते पुढे समजावून सांगत होते, आज जगभरात शेतीवर हजारो संशोधने सुरू आहेत. नवीन कीटकनाशके, बुरशीनाशके आणि बियाण्यांवर अब्जावधी रुपये खर्च होत आहेत. पण एक नवीन रासायनिक रेणू (Molecule) शोधून तो बाजारात आणायला 8 ते 12 वर्षे लागतात. सरकारी परवानग्या, हवामान चाचण्या, पर्यावरणीय अभ्यास, मानवी आरोग्यावरील परिणाम आणि कंपन्यांची गुंतवणूक यात मोठा वेळ जातो. हजारो प्रयोगातून एखादेच औषध अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचते. त्यामुळे दरवर्षी बाजारात एखादे चमत्कारिक औषध येईल आणि आपली शेती सुधारेल, अशी अपेक्षा करणं पूर्णपणे चुकीचं आहे.

🔳 मग आजच्या परिस्थितीत शेतकऱ्यांनी नेमकं काय करावे?
त्यावर त्यांनी अत्यंत ठामपणे सांगितलं, आपल्या हातात जे आहे, त्याचा वैज्ञानिक वापर करावा. जुनी औषधे चुकीच्या पद्धतीने वापरली तर ती निष्प्रभ वाटतात. पण तीच योग्य वेळी, योग्य प्रमाणात आणि योग्य कॉम्बिनेशनमध्ये वापरली तर आज, 25 वर्षांनंतरही उत्कृष्ट परिणाम देतात. जुने बियाणे असो किंवा जुनी पद्धत… त्याला विज्ञानाची जोड दिली की तीच गोष्ट नवीन आणि प्रभावी बनते.

🔳 बदल तंत्रज्ञानाचा, यश मात्र योग्य वापराचे
📍 भारतीय शेतीचा इतिहास पाहिला तर प्रत्येक मोठी क्रांती ही केवळ एखाद्या जादुई औषधामुळे घडलेली नाही.
🔆 हरितक्रांती :- सुधारित बियाणे, योग्य सिंचन आणि खत व्यवस्थापन यांच्या अचूक संगमामुळे आली.
🔆 ठिबक सिंचन :- यामुळे केवळ पाण्याची बचत झाली नाही, तर पिकाला गरजेनुसार पाणी देण्याची शिस्त लागली.
🔆 हायब्रीड बियाणे :- याने उत्पादन वाढवले, पण त्यासाठी योग्य मशागतीची गरज होती.

म्हणजेच, बदल तंत्रज्ञानामुळे झाला, पण यश मिळाले ते त्याच्या योग्य आणि अचूक वापरामुळे. आज अनेक कंपन्या पूर्णपणे नवीन औषध शोधण्यापेक्षा जुन्याच प्रभावी औषधांचे वैज्ञानिक कॉम्बिनेशन तयार करत आहेत. बुरशीनाशक, सूक्ष्म अन्नद्रव्य आणि जैविक घटक यांचे संतुलित मिश्रण योग्य मार्गदर्शनाखाली वापरल्यास कमी खर्चात अधिक परिणाम मिळतात.

🔳 सोशल मीडियाची फवारणी आणि तिजोरी रिकामी!
आज नेमकी उलटी गंगा वाहत आहे. सोशल मीडियाच्या युगात कोणीतरी एखादा व्हिडिओ टाकतो, ‘हे औषध वापरा आणि टनाचा उतारा घ्या.’ हजारो शेतकरी दुसऱ्याच दिवशी आपल्या शेतात ती फवारणी सुरू करतात. ना मातीची चाचणी, ना हवामानाचा अभ्यास, ना पाण्याच्या गुणवत्तेचा विचार! परिणाम काय? खर्च अफाट वाढतो, पिकावर रोगांचा प्रतिकार मरणार नाही इतकी प्रतिकारशक्ती (Resistance) कीड तयार करते, उत्पादन घटते आणि जमिनीचे आरोग्य बिघडते. शेतीमध्ये ‘जास्त औषध म्हणजे जास्त फायदा’ किंवा ‘दुकानातून महागडे औषध आणले म्हणजे पीक चांगले येणार’ हा विचार सर्वात घातक आहे.

📍 विज्ञान सांगते…
🔆 जागतिक शेतीचा कानमंत्र :- ‘लो-कॉस्ट प्रिसिजन फार्मिंग’
🔆 आज जगभरात कमी खर्चातील अचूक शेतीवर (Precision Farming) भर दिला जात आहे.
🔆 इस्रायलने पाण्याच्या थेंबाथेंबाचा हिशोब ठेवून वाळवंटात चमत्कार घडवला.
🔆 नेदरलँड्सने प्रगत तंत्रज्ञानाच्या जोरावर अत्यंत कमी जमिनीत जगातील सर्वोच्च उत्पादन मिळवून दाखवले.
🔆 अमेरिका डेटा आणि सॅटेलाइट तंत्रज्ञान वापरून पिकाला लागणारे अचूक खत व्यवस्थापन करते.
🔆 आपल्या भारतातील कृषी विद्यापीठांनीही हवामान आणि मातीनुसार उत्कृष्ट संशोधन केले आहे. समस्या संशोधनात किंवा शास्त्रज्ञांमध्ये नाही, तर ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत योग्य पद्धतीने आणि योग्य मानसिकतेने पोहोचण्यात आहे.
🔆 BT कापसाचे उदाहरण आपल्यासमोर आहे. बीटी कापसाने सुरुवातीला मोठी उत्पादन क्रांती घडवली, पण योग्य व्यवस्थापनाअभावी आज खर्च वाढला, कीटकांचा प्रतिकार वाढला आणि बाजाराची नवीन आव्हाने उभी राहिली. म्हणजेच तंत्रज्ञान कितीही मोठे आले, तरी मानवी अभ्यासाला पर्याय नाही. म्हणूनच, पुढील काळात यशस्वी शेतकरी तोच असेल, जो जास्त खर्च करणारा नाही, तर जास्त अभ्यास करणारा असेल!

🔳 समृद्ध शेतीसाठी आजची 7 सूत्री
🔆 शेतकरी मित्रांनो, जर शेती खऱ्या अर्थाने फायद्याची करायची असेल, तर केवळ कंपन्यांच्या जाहिरातींवर विसंबून न राहता स्वतः विज्ञानी व्हावे लागेल. त्यासाठी खालील गोष्टींची सवय लावा.
🔆 नियमित माती व पाणी परीक्षण :- जमिनीला नेमकी कशाची भूक आहे हे ओळखा, त्यानुसारच अन्नद्रव्ये द्या.
🔆 हवामान आधारित नियोजन :- हवामानाचा अंदाज घेऊन फवारणी आणि खतांचे वेळापत्रक ठरवा, जेणेकरून औषधे वाया जाणार नाहीत.
🔆 खतांचा संतुलित वापर :- रासायनिक खतांचा अतिवापर टाळून पिकाच्या गरजेनुसार डोस द्या.
🔆 सेंद्रिय आणि जैविक घटकांचा मेळ :- जमिनीचा पोत (सेंद्रिय कर्ब) सुधारण्यासाठी शेणखत, कंपोस्ट आणि जिवाणू खतांचा वापर वाढवा.
🔆 अनावश्यक फवारण्यांना फाटा :- केवळ भीतीपोटी किंवा शेजाऱ्याने केली म्हणून फवारणी करणे थांबवा.
🔆 अचूक कॉम्बिनेशन :- कृषी सेवा केंद्र चालकांच्या सांगण्यावरून बाजारातील कोणतीही औषधे एकत्र मिसळू नका, वैज्ञानिक सल्ला घ्या.
🔆 बाजारपेठेचा अभ्यास :- बाजारात कोणत्या पिकाला कधी मागणी असते, हे पाहूनच पिकाचे नियोजन करा.

🔳 शेवटी काय टिकणार?
आपले भारतीय शास्त्रज्ञ अपयशी नाहीत; त्यांनी अत्यंत मर्यादित साधनात जगाला दिशा देणारे संशोधन केले आहे. पण आता खरी जबाबदारी आपली म्हणजेच शेतकऱ्यांची आहे. विज्ञानावर विश्वास ठेवणे, स्वतःच्या शेतातील प्रत्येक बदलाचे निरीक्षण करणे आणि कमी खर्चात अधिक नफा मिळवण्यासाठी अभ्यासपूर्ण शेती करणे ही काळाची गरज आहे. शेती हा आता केवळ कष्टाचा खेळ राहिलेला नाही, तो नियोजनाचा व्यवसाय झाला आहे. भविष्यकाळात निसर्गाच्या आणि बाजाराच्या वादळात तोच शेतकरी पाय रोवून टिकेल, जो जमिनीशी भावनिक आणि विज्ञानाशी प्रामाणिक राहील!

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!