krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Government Robber : आजचे सरकार हे पूर्वाश्रमीच्या दरोडेखोरांचा उत्क्रांत अवतार

1 min read

Government Robber : पहिल्यांदा शेतकऱ्यांनी (Farmers) हातात नांगर धरला, तो सरकारने दिला होता का? ऊन, पाऊस, वादळं यापासून सुरक्षित राहण्यासाठी शेतकऱ्यांनी पहिला आडोसा करून घर तयार केले ते सरकारने (Government) दिले होते का? शेतकऱ्यांनी आणि चांभाराने मिळून जी पहिली चामड्याची मोट तयार केली, ती सरकारने दिली होती का? वाळत जाणाऱ्या पिकाला शेतकऱ्याने पहिल्यांदा उपलब्ध साधनांनी पाणी घातले आणि आपले पीक वाचवले, त्यात सरकारचा काही सहभाग होता का? ही यादी प्रत्येकाला वाढवता येईल. असे प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारले पाहिजेत. थोडक्यात पहिल्यांदा आपल्या पूर्वज शेतकऱ्याने स्वतःला पुरून इतरांना खाऊ घालण्याइतपत उत्पादन वाढवले त्यामुळेच मानवाच्या विकासाला वेग आला.

जेमतेम 10 हजार वर्षांपूर्वी शेतीचा शोध लागला, शेतीभोवती वस्त्या आणि गावे वसली. माणसाने आपल्या पोषणाच्या, संरक्षणाच्या आणि प्रजोत्पादनाच्या प्रेरणा संतवण्याच्या उद्देशाने उत्क्रांतीच्या मार्गात येणारा प्रत्येक अडथळा दूर केला. एका एकाला जमत नसेल तर सामूहिक प्रयत्नातून अडथळ्यावर मात केली. एखाद्या वस्तूची गरज निर्माण झाली की समाजातील हुशार आणि हुन्नरी माणूस जुगाड करून ती निर्माण करतो. एखादे नवीन उत्पादन तयार झाले, ते लोकांना आवडले, त्या वस्तूची मागणी वाढू लागली की, ती ग्राहकांच्या दारात नेऊन देणारे खटपटी लोक पुढे येतात.

जसे जसे उत्पादन वाढत जाते,वस्तूंची देवघेव वाढत जाते तसे तसे वाहतुकीची साधने निर्माण केली जातात. पाण्यातून अथवा चिखलातून वाट काढण्याची शक्कल लढवणारे वाहतुकीची साधने निर्माण करतात. व्यापाराच्या आणि संपर्काच्या गरजेतून रस्ते तयार केले गेले. वेगवेगळ्या क्षेत्रात हुशार आणि हुन्नरी तंत्रज्ञ आपापले क्षेत्र निवडतात आणि विकसित करत राहतात. जसा जसा उत्पादक वस्तूंच्या देवघेवीचा व्यवहार वाढत जातो, तसे तसे बाजारपेठ आणि तंत्रज्ञान विकसित होत जाते, तसेच भांडवल पुरवठादारही निर्माण होतात आणि वित्त पुरवठा करत असतात.

विकास निसर्गसिद्ध असतो, मानव एकमेकांच्या हितासाठी तो करत असतो, त्यासाठी सरकारची आवश्यकता लागत नाही. पण समाजातील प्रत्येक माणूस इतका सरळ, प्रामाणिक आणि समजदार नसतो, काही माणसे सरळ आणि समंजसपणे वागत नाहीत. समाजात काही उनाड, विकृत, लबाड, कामचोर, ऐतखाऊ, चोर वृत्तीचे लोक प्रत्येक पिढीत जन्माला येतात आणि समाजातील प्रामाणिक, सरळ, सज्जनांचे जगणे मुश्किल करत असतात.

शेतीचा शोध लागला तेव्हाही लबाड लोक आजूबाजूला असणार. रिकामटेकडे चोर वृत्तीचे लोक शेतकऱ्यांच्या शेतात पिकले, की त्यावर डोळा ठेवून त्याची चोरी करू लागले. पहिल्यांदा शेतकऱ्यांनी त्यांचाही बंदोबस्त केला असेलच. मग ही चोर मंडळी समूहाने पुन्हा पून्हा येऊ लागली आणि शेतकऱ्यांना धाक दाखवून आणि बदडून धान्य नेऊ लागली. अशा घटना वारंवार घडू लागल्यावर एका टप्प्यावर शेतकऱ्यांनी त्यांचे वर्चस्व मान्य केले.

शेतकरी सर्जक त्याला शेतीत गुंतून पडावे लागते, त्यामुळे तो गुंडपुंडांशी वारंवार लढू शकत नाही. ज्या दिवशी चोर, बदामश, दरोडेखोर यांचे वर्चस्व शेतकऱ्यांनी मान्य केले, आपल्या धान्याच्या संरक्षणासाठी चोरांना काही हिस्सा देण्याचे कबूल केले तेव्हापासूनच सरकारची सुरुवात झाली. कालांतराने या चोर दरोदेखोरांना अतिरिक्त अधिकार हवेसे वाटू लागले. त्यांनी आपले अधिकार क्षेत्र निर्माण केले. त्यातूनच सरकारचा विस्तार वाढवत गेला.
थोडक्यात आजचे सरकार पूर्वश्रमीच्या चोर, लबाड, ऐतखाऊ, दरोडेखोर यांचे आधुनिक स्वरूप आहे.

मानव समाजाच्या वेगवेगळ्या टप्प्यात सरकारचे स्वरूप बदलत जाते, तशी त्यांची लुटाण्याची पद्धत बदलत जाते. आलीकडील उदाहरण द्यायचे झाले तर, एखादा स्टॅलिन शेतकऱ्यांवर रणगडे घालून जमिनी हडपतो तर एखादा नेहरू संविधान बदलून आणि कायदे करून शेतकऱ्यांच्या जमिनी हडपतो. इतिहास तपासला तर शेतकऱ्यांना लुटण्यात आणि त्यांचे मुडदे पाडण्यात स्टॅलिन, जवाहरलाल नेहरू किंवा आजचे नरेंद्र मोदी यांच्यात काहीही फरक नसतो.

राजे राजवाड्यांचे राज्य गेले, पेशवाईची सत्ता गेली, मुसलमानांची सुलतानी गेली, इंग्रजांची मानमानीही संपली. आता आपले लोकशाही सरकार अस्तित्वात आले. गांधी म्हणायचे इंग्रज शेतकऱ्यांचा कच्चा माल स्वस्त घेतो आणि पक्का महागात विकतो, तो शेतकऱ्यांची दुहेरी लूट करतो. इंग्रज गेला आता आपले सरकार आले शेतकऱ्यांना बरे दिवस येणार. गोडस्याने महात्मा गांधींना मारले आणि शेतकऱ्यांचे दशावतार चालूच राहिले. गोडस्याने केवळ गांधींनाच मारले नाही तर त्याने भविष्यात होणाऱ्या लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा पाया तयार करण्यासाठी नेहरूजींना वाट मोकळी करून दिली.
त्यामुळे महात्मा गांधी गेल्यामुळे हिंदुत्ववादी तर आनंदले असतील पण त्यापेक्षा अधिक जवाहरलाल नेहरू मनातून समाधानी झाले असतील.

⚫ गांधी गेल्यामुळे नेहरूजींना सत्तेत मनमर्जी निर्णय घेण्याची संधी निर्माण झाली. नेहारूंनी आपले मूळ स्वरूप लगेच दाखवले. त्यांनी मूळ संविधानात नसलेले परिशिष्ट-9 संविधानाला जोडले आणि एका झटक्यात शेतकऱ्यांचा न्याय मागण्या अधिकार संपुष्टात आणला.

⚫ शेतजमीन धारणा कायदा निर्माण करून आणि तो परिशिष्ट-9 मध्ये टाकला. या कायद्याने शेतकऱ्यांना आपल्या मर्जीने व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य नाकारले, त्याच्या विरोधात न्याय मागता येईना.

⚫ आवश्यक वस्तू कायदा बनवला आणि तोही परिशिष्ट-9 मध्ये टाकला. या कायद्याने शेतकऱ्यांना आपल्याच शेतीमालाचे भाव ठरवण्याचे स्वातंत्र्य हिरावऊन घेतले. याच्याही विरोधात न्याय मागण्याचा रस्ता बंद केला.

⚫ इंग्रज गेले पण त्यांनी तयार केलेला जमीन अधिग्रहण कायदा अस्तित्वात होता. त्याचाही नेहरूजींनी परिशिष्ट-9 मध्ये समावेश केला. शेतकऱ्यांना त्याच्याही विरोधात न्याय मागता येत नाही.

काँग्रेस क्रूर होती, शेतकऱ्याची लुटारू होती म्हणून शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान केले. भाजपा परिवार आणि नरेंद्र मोदी उठता बसता नेहरु घराण्याला लाखोली वाहत असतात. शेतकऱ्यांना लुटण्यासाठी नेहरूजींनी केलेला वरीलपैकी एकही कायदा रद्द करायला तयार नाहीत. उलट त्या कायाद्यांचा वापर अत्यंत क्रूरपणे करून शेतीमालाचे भाव पाडत आहेत, आणि शेतकऱ्यांना आत्महत्येच्या मार्गाकडे वळवत आहेत. खरंच नरेंद्र मोदीजी यांची छाती छप्पन इंचाची असेल आणि त्यांचे काळीज वाघाचे असेल तर वरीलपैकी किमान एक तरी कायदा रद्द करून दाखवतील.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!