Sowing of Kharif crops : देशातील 85 टक्के खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण; मक्याकडे झुकता कल
1 min read
Sowing of Kharif crops : यावर्षी चांगल्या पावसामुळे देशभरात खरीप पिकांच्या (Kharif crops) 85 टक्के पेरण्या (Sowing) पूर्ण झाल्या आहेत. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशभरात 1 ऑगस्ट 2025 पर्यंत एकूण 932.93 लाख हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत म्हणजे 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 887.97 लाख हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी करण्यात आली हाेती. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीक्षेत्र 44.96 लाख हेक्टर म्हणजेच सुमारे 5 टक्के अधिक आहे.
♻️ धान आणि मक्यात वाढ, डाळीवर्गीय पिकांमध्ये घट
खरिपाचे मुख्य पीक असलेल्या धानाची (Paddy) पेरणी 319.40 लाख हेक्टरमध्ये झाली आहे. मागील वर्षी 1 ऑगस्ट 2024 पर्यंत देशात 273.72 लाख हेक्टरमध्ये धानाची पेरणी करण्यात आली हाेती. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धानाचे पेरणीक्षेत्र 45.68 लाख हेक्टरने म्हणजेच 16.69 टक्क्यांनी वाढले आहे. विविध डाळवर्गीय पिकांच्या पेरणीक्षेत्रात थोडीशी घट दिसून आली आहे. डाळवर्गीय (Pulse) पिकांचे यावर्षीचे एकूण क्षेत्र 101.22 लाख हेक्टर असून, मागील वर्षी याच काळात ते 101.54 लाख हेक्टर होते. म्हणजेच डाळवर्गीय पिकांचे क्षेत्र 32 हजार हेक्टरने घटले आहे. सर्वाधिक घट तुरीच्या पिकाच्या (Tur crop) पेरणीक्षेत्रात झाली आहे. मागील वर्षी 1 ऑगस्ट 2024 पर्यंत संपूर्ण देशभरात 41.06 हेक्टरमध्ये तुरीची पेरणी करण्यात आली हाेती. यावर्षी 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 38.32 लाख हेक्टरवर तुरीची पेरणी करण्यात आल्याने या पिकाचे क्षेत्र 3.28 लाख हेक्टरने म्हणजेच 6.68 टक्क्यांनी कमी झाले आहे. साेबतच उडदाचे पेरणीक्षेत्रही 2.43 टक्क्यांनी घटले आहे.
♻️ मक्याचे पेरणीक्षेत्र 11.74 टक्क्यांनी वाढले
यावर्षी भरड धान्याची पेरणीक्षेत्र 4.74 टक्क्यांनी वाढली आहे. ते 164.76 लाख हेक्टरवरून 172.57 लाख हेक्टर झाले आहे. ज्वारी (Sorghum) आणि बाजरीच्या (Millet) पेरणीत थोडीशी घट झाली असली तरी, मक्याच्या (Maize) पेरणीक्षेत्रात 11.74 टक्क्यांची लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 1 ऑगस्ट 2024 पर्यंत देशभरात 81.99 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आली हाेती. यावर्षी म्हणजेच 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 91.62 लाख हेक्टरवर मक्याची पेरणी करण्यात आल्याने हे क्षेत्र 9.63 लाख हेक्टरने म्हणजेच 11.74 टक्क्यांनी वाढले. अलीकडे देशात मक्याचा वापर इथेनॉल (Ethanol) तयार करण्यासाठी केला जात असून, दर देखील किमान आधारभूत किमतीपेक्षा अधिक मिळत असल्याने शेतकऱ्यांचा कल तेलबिया (Oilseeds) व डाळवर्गीय पिकांच्या तुलनेत मक्याकडे वाढला आहे.
♻️ तेलबियांखालील पेरणीक्षेत्र 4 टक्क्यांनी घटले
केंद्र सरकार खाद्यतेल (Edible oil) उत्पादनात आत्मनिर्भर हाेण्याच्या गप्पा करीत असताना तेलबियांना (Oilseeds) किमान आधारभूत किमती (Minimum Support Price) एवढाही दर मिळत नसल्याने तसेच सरकार किमान आधारभूत किमतीप्रमाणे शेतकऱ्यांकडील तेलबिया खरेदी करायला तयार नसल्याने देशातील शेतकऱ्यांचा तेलबियांचे उत्पादन घेण्याचा कल कमी झाला आहे. मागील वर्षी 1 ऑगस्ट 2024 पर्यंत देशात 178.14 लाख हेक्टरमध्ये विविध तेलबियांची पेरणी करण्यात आली हाेती. हे क्षेत्र यावर्षी 6.84 लाख हेक्टरने म्हणजेच 4 टक्क्यांनी घटले असून 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 171.03 लाख हेक्टरवर आले आहे. भुईमूगाचे (Peanut) पेरणीक्षेत्र 4.33 टक्क्यांनी घटले असून, सूर्यफूलाचे (Sunflower) पेरणीक्षेत्र 11.97 टक्के आणि सोयाबीनचे (Soybean) पेरणीक्षेत्र 3.98 टक्क्यांनी घटले आहे. मागील वर्षी देशात 1 ऑगस्ट 2024 पर्यंत 123.45 लाख हेक्टरमध्ये साेयाबीनची पेरणी करण्यात आली हाेती. यावर्षी 1 ऑगस्ट 2025 पर्यंत 118.54 लाख हेक्टरवर साेयाबीनची पेरणी करण्यात आल्याने हे क्षेत्र 4.91 लाख हेक्टरने घटले आहे. मागील दाेन वर्षांपासून सोयाबीनचे दर सतत दबावात राहात असल्याने शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले. त्याचा परिणाम साेयाबीनच्या पेरणीक्षेत्रावर झाला आहे.
♻️ उसाचे क्षेत्र वाढले, कापसाचे घटले
देशात उसाचे (Sugarcane) लागवड क्षेत्र 1.63 लाख हेक्टरने म्हणजेच 2.94 टक्क्यांनी वाढले असून, ते 57.31 लाख हेक्टर झाले आहे. मागील वर्षी हे क्षेत्र 55.68 लाख हेक्टर एवढे हाेते. उसाचे वाढलेले क्षेत्र देशातील साखर (Sugar) आणि इथेनॉल (Ethanol) उत्पादनासाठी दिलासादायक ठरणार आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी देशातील कापसाचे (Cotton) पेरणीक्षेत्र 2.36 टक्क्यांनी घटले आहे. यावर्षी 1 ऑगस्ट 2025 पर्यंत देशभरात 105.87 लाख हेक्टरवर कपाशीच्या पिकाची पेरणी करण्यात आली आहे. वाढता उत्पादन खर्च, घटते उत्पादन आणि कायम दबावात राहणारे दर यामुळे शेतकरी कापसाच्या पिकाला पर्याय शाेधत आहे.