Fertilizers : देशात रासायनिक खतांच्या विक्रीत वाढ
1 min readआर्थिक वर्ष 2022-23 च्या एप्रिल – फेब्रुवारी या 11 महिन्या दरम्यानच्या कालावधीत देशात युरियाचा वापर 341.18 लाख टन एवढा हाेता. सन 2021-22 या आर्थिक वर्षात युरियाचा वापर 338.64 लाख टन हाेता. नॅनो युरियाच्या (Nano urea) वापरायला सुरुवात झाल्याने देशातील पारंपरिक युरियाचा वापर कमी होईल, अशी अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.
सरकार अन्नसुरक्षेवर परिणाम न होऊ देता, पारंपरिक युरियाचा वापर कमी करू इच्छित आहे. मात्र, त्याचवेळी सरकारचा पर्यायी जैव खतांच्या उपलब्धतेची खात्री न करता शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करण्यास भाग पाडण्याचा कुठलाही विचार नाही, असे केंद्रीय खत मंत्रालयाने स्पष्ट केले.
2022-23 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-फेब्रुवारी या कालावधीत प्रमुख खतांची (युरिया, डीएपी, एमओपी आणि कॉम्प्लेक्स) एकूण विक्री 559.97 लाख टनांवर पोहोचली आहे. सन 2021-22 मध्ये या खतांची विक्री 547.09 लाख टन हाेती. त्यामुळे रासायनिक खतांच्या विक्रीत 2.4 टक्क्यांची वाढ नाेंदविण्यात आली आहे. युरिया व डीएपीची विक्री 15.3 टक्क्यांनी वाढून 101.35 लाख टन, एमओपी विक्री 34.7 टक्क्यांनी घटून 15.21 लाख टन आणि कॉम्प्लेक्स खतांची विक्री 11.6 टक्क्यांनी घटून 102.23 लाख टन झाली आहे.