Biodiversity : भौगोलिक विविधता आणि जैवविविधता
1 min read✳️ सजीवांची जडणघडण
वैज्ञानिक भाषेत शेतांच्या ह्या विविध प्रकाराला, Ecosystem diversity किंवा परिस्थतिकीय विविधता असे म्हटले जाते. एखाद्या ठिकाणची भू रचना म्हणजेच परिस्थतिकिय विविधताच (Geographical diversity) त्या भू भागाची जैविक विविधता (Biodiversity) घडवत असते. हीच जैविक विविधता पुढे जाऊन कित्येक सजीवांची जडणघडण करून त्यांच्या जनुकांवर संस्कार करत राहते. ज्यामुळे सजिवांचा विविध प्रजातींमधे विकास होत असतो.
बहुतांशी लोकांना जैविक विविधता म्हणजे नक्की काय? हेच माहिती नसते. त्यामुळे त्याचे फायदे काय? ती का जपायला हवी? ह्याचे अज्ञान असल्यामुळे आपण विनाशाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलो आहोत, ह्याची जाणीव सर्वसामान्याला नाही. जैवविविधता जपणे का गरजेचं आहे? त्यातून मानवजातीचे हित कसे साधले जाईल, मानवाच्या पुढील उत्क्रांतीसाठी तिची खरच गरज आहे का? वाढत्या शहरीकरण आणि शहरी जीवनशैलीमुळे जैवविविधतेचा कसा नाश होतो? त्याचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात? ह्याचा उहापोह करण्यासाठी खास ह्या विषयावर पुढील काही दिवस लिखाण करायचं ठरवत आहे. नद्या, खाड्या, डोंगर, दऱ्यापासून ते खोल समुद्रापर्यंत विविध प्रकारच्या जैविक संपदेची माहिती, तिची जडणघडण कशी होते, ह्यावर लिहिण्याचा प्रयत्न करीत आहे
✳️ भूगोल – जीवशास्त्र भिन्न व पूरक विषय
भूगोल आणि जीवशास्त्र हे दोन्ही भिन्न विषय म्हणून शिकवले जात असले तरी, दोन्ही विषय एकमेकास पूरक आहेत. भूगोलाच्या अभ्यासाशिवाय जीवशास्त्राचा अभ्यास करणे अशक्य व अपुरे आहे. या पृथ्वीवर इतर कोणत्याही परिसंस्थेपेक्षा सागरी परिसंस्था मोठी आहे. परंतु, या परिसंस्थेबद्दल, तिच्या भूगोलाबद्दल, त्यावर अवलंबून असलेल्या जैविक विविधतेबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे. त्यामुळे सुरुवात सागरी परिसंथे पासून करूया.
✳️ जलग्रह व जलीय प्राणी
पृथ्वी हा जलग्रह आहे. तिचा 75 टक्के भाग समुद्राने वेढलेला आहे. पृथ्वीवर जे काही प्राणी आहेत, ते सर्व प्राणी जलीय प्राणी आहेत. माणूस देखील जलीयच प्राणी आहेश् असं म्हणावं लागेल. तो राहायला जरी पाण्याबाहेर असला तरी त्याच्या शरीरात 75 टक्के पाणीच आहे. दुर्दैवाने अभ्यासक्रमात माणूस, इतर पक्षी प्राणी जे जमिनीवर राहतात, त्यांना जमिनी प्राणी असे संबोधले आहे. हे मी असं सांगतो, त्याला कारण आहे, ते म्हणजे ‘माणूस’ माणूस स्वत:ला जमिनी प्राणी समजत आहे. त्यामुळे तो अवतीभोवती असलेल्या सर्व जलीय परिसंस्था उद्ध्वस्त करत चालला आहे. या पृथ्वीवरील एकूण एक जीव जलीय परिसंस्थेचाच एक भाग आहे. त्यामुळे आपण, झाडं, पानं, फुलं राहत जरी पाण्याबाहेर असलो तरी, आपण एक मोठ्या जलग्रहावर राहतो हे विसरून चालणार नाही.
✳️ सजीवांची वर्गवारी
पृथ्वीवरील सर्व सजीवांची वर्गवारी ते किती टक्के पाण्यावर अवलंबून असतात, ह्यावर करायला हवे, असं मला वाटतं. उदा. मासे 100 टक्के जलीय तर बेडूक आणि इतर उभयचर 50 टक्के जलीय आणि सरीसृप – सरडे, पाली, इत्यादी तसेच सस्तन आणि पक्षी इत्यादी 25 टक्के जलीय प्राणी आहेत, अशी नव्याने प्राण्यांची व्याख्या करायला हवी, असं मला वाटतं. पृथ्वीवरील सर्व प्राण्यांना जलीय प्राणी म्हणण्याच्या मागे आणखी एक महत्त्वाचं कारण, आहे ते म्हणजे, प्रत्येक प्राण्याच्या प्रकाराला जगण्यासाठी विशिष्ट असं तापमान आवश्यक आहे. 100 टक्के जलीय प्राणी तापमानाला अती संवेदनशील तर तदनंतर उभयचर आणि त्यानंतर सरीसृप, सस्तन आणि खग. हे तुलनेनं काहीसे उष्णता सहन करू शकणाऱ्या प्रकारात मोडतात.
✳️ पृथ्वी व मानवी शरीरातपाण्याचे प्रमाण
प्राण्यांची अशा प्रकारची वर्गवारी नव्यानं केल्यास आपणही जलीय प्राणी आहोत. जे पृथ्वीवर आहे तेच आपल्या शरीरात हे माणूस विसरणार नाही. उदा. पृथ्वीवर 75 टक्के पाणी तर माणसाच्या शरीरात देखील 75 टक्के पाणी, समुद्राच्या पाण्याची क्षारता आणि माणसाच्या रक्ताची क्षारता देखील सारखीच. थोडक्यात जे पिंडी ते ब्रम्हांडी आणि जे ब्रम्हांडी ते पिंडी. त्यामुळे माणसानं स्वतः लां भूचर न समजता स्वतः जलचर, जलग्रहवासी समजणे खूप गरजेचं आहे. तर आणि तर त्याला पाण्याची आणि अवतीभोवती पसरलेल्या जलीय परिसंस्थांची किंमत कळेल आणि आपण सर्वांनी चालवलेला ह्या जलग्रहाचा नाश थांबेल.
✳️ जलग्रहवासी मानव
माणसाला जगण्यासाठी 23 ते 37 डिग्री सेल्सीअस इतके तापमान लागते.हे तापमान ह्या जल ग्रहाने तयार केलेल्या सागरी आणि भू-जलीय परिसंस्थानी (झाडे, पाने जे काही भूचर प्राणी आहेत, त्यांना भू – जलीय प्राणी असे संबोधले पाहिजे.) घडवले आहे. जलीय आणि भू – जलीय परिसंस्था विकासाच्या हव्यासात नष्ट करून माणूस जो स्वतः एक भू – जलीय प्रकारचा प्राणी आहे, तो जगू शकणार नाही. त्यामुळे माणसानं स्वत:ला जमिनी प्राणी न संबोधता जलग्रहवासी म्हणून नव्यानं ओळखल पाहिजे. (क्रमश:)