krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Monsoon : यंदा ‘मान्सून’ सरासरीपेक्षा कमी बरसणार; ‘स्कायमेट’चा अंदाज

1 min read
Monsoon : 'एल निनो'च्या (El Nino) धोक्यामुळे यंदा 'मान्सून' पाऊस सरासरीपेक्षा कमी बरसणार असल्याचा अंदाज 'स्कायमेट' (Sky mate) या खासगी हवामान संस्थेने वर्तवला आहे. जून-सप्टेंबर या काळातील मान्सून सामान्य प्रमाणापेक्षा कमी म्हणजेच 94 टक्के असले. त्यामुळे देशातील अन्नधान्य व इतर शेतमालाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

🌎 सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता
‘ट्रिपल-डिप-ला निना’मुळे (Triple-Dip-La Nina) गेल्या सलग चार वर्षांत नैऋत्य मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य किंवा सामान्यपेक्षा अधिक राहिलं. आता ला निना संपला आहे आणि एल निनोची शक्यता वाढत आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याचा प्रभाव अधिक असण्याची शक्यता आहे. एल निनोच्या पुनरागमनामुळे यंदा मान्सूनवर परिणाम होण्याची शक्यता आहे, अशी माहिती स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंह यांनी दिली. गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात यंदाच्या मान्सूनमध्ये अपुरा पाऊस पडेल. पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सामान्य सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे.

🌎 एल निनो व ला निना
संपूर्ण जगाच्या हवामानावर आणि पर्जन्यमानावर एल निनोचा थेट परिणाम होतो. एल निनो (El Nino) या स्पॅनिश शब्दाचा अर्थ बालयेशू किंवा छोटा मुलगा तर ‘ला निना’ (‘La Nina) म्हणजेच लहान मुलगी असा होतो. 16 व्या शतकात दक्षिण अमेरिकी मासेमारांना प्रशांत महासागराचे पाणी अचानक नेहमीपेक्षा उबदार होत असल्याचे आढळले. सहसा नाताळाच्या सुमारास हा बदल दिसल्याने त्यांनी ‘एल निनो’ असे नाव दिले. सामान्यत: पश्चिम-प्रशांत महासागरातील पाणी उबदार असल्यामुळे आग्नेय आशियाच्या किनाऱ्यालगत हवेचा दाब कमी असतो. याविरुद्ध पूर्व-प्रशांत महासागरात दक्षिण अमेरिकेलगत पाण्यावर हवेचा उच्च दाब असतो. हवेच्या दाबातील फरकाने वारे आणि त्यासोबत बाष्प पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. त्यामुळे आग्नेय आशियासह भारतीय उपखंडात पाऊस पडतो. एका वर्षीच्या उन्हाळय़ामध्ये सुरू झालेली ही प्रक्रिया पुढील 12 ते 18 महिने टिकू शकते. त्याची तीव्रता तापमानावर ठरते. 4 ते 5 डिग्री फॅरेनहाईट तापमानवाढ झाल्यास सौम्य, पण 14 ते 18 डिग्री फॅरेनहाईटने तापमानवाढ झाल्यास सर्वदूर परिणाम दिसतात.

🌎 दुष्काळ एल निनोशी निगडित
दर दोन ते सात वर्षांनी ‘एल निनो’ परिणाम दिसून येताे. पूर्व प्रशांत महासागरातील पेरू व इक्वाडोरच्या किनाऱ्यालगत नेहमीपेक्षा प्रबळ उष्ण प्रवाह तयार झाल्यामुळे हवेचा दाब कमी होतो. या उलट पश्चिमेला इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया आणि हिंदी महासागरावर उच्चदाब निर्माण होतो. त्यामुळे हिंदी महासागराकडून बाष्पभारित वारे पूर्वेकडे वाहतात. याचा परिणाम म्हणून दक्षिण अमेरिकेत अतिवृष्टी, तर आग्नेय आशियामध्ये अवर्षणाची स्थिती निर्माण होते. एल निनो सक्रिय झाल्यास व्यापारी वारे कमजोर होतात. सागरी प्रवाह व समुद्रपातळीत बदल घडतात. एल निनो प्रबळ असलेल्या वर्षी अटलांटिक महासागरातील चक्रीवादळे कमी होतात. परंतु, भारतीय उपखंडातील बऱ्याच देशांमध्ये दुष्काळ पडतो. भारतात गेल्या 50 वर्षांत पडलेल्या 13 पैकी 10 दुष्काळ एल निनोशी निगडित आहेत.

🌎 दाेन प्रभाव आणि जगाचे जल-वायुमान
‘ला निना’चा प्रभाव याच्या उलट असतो. उष्णकटिबंधातील पश्चिम-प्रशांत महासागराचे पाणी नेहमीपेक्षा थंड झाल्यावर ला-निना प्रभावी होतो. ‘ला निना’ वर्षांत दक्षिण आफ्रिका आणि ब्राझीलमध्ये भरपूर पाऊस पडतो. तसेच तीव्र व्यापारी वारे व सागरी प्रवाहांमुळे थंड व पोषक पाणी पृष्ठभागावर येऊन प्लवक व माशांची पैदास वाढते. एल निनो व ला निना या दोन प्रभावांचा संपूर्ण जगाचे जल-वायुमान ठरवण्यामध्ये महत्त्वाचा वाटा असतो.

🌎 पावसामुळे शेतमालाचे नुकसान
ऑक्टोबर व नोव्हेंबर 2022 मध्ये काेसळलेल्या परतीच्या पावसामुळे कापूस, ऊस, कांदा व इतर खरीप पिकांचे तर फेब्रुवारी व मार्च 2023 मध्ये महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पंजाब, हरयाणा, बिहार या राज्यांमध्ये काेसळलेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे देशभरातील गव्हाच्या पिकाचे 20 टक्के, माेहरीच्या पिकाचे 3 टक्के आणि कांद्याच्या पिकाचे किमान 30 टक्के नुकसान झाले आहे. केंद्र सरकारने लादलेल्या बंधनांमुळे उत्पादनात घट हाेऊनही या तिन्ही शेतमालाचे दर काेसळले आहेत. साेबतच बाजारातील आवक मंदावली असून, केंद्र सरकारने खरेदीी हात आखडता घेतला आहे. केंद्र सरकारने 10 एप्रिल 2023 पर्यंत देशभरात किमान आधारभूत किमतीप्रमाणे 4.4 लाख टन (महाराष्ट्र 95 हजार, मध्य प्रदेश 7 हजार व गुजरात 50 हजार टन) हरभरा खरेदी केला आहे. केंद्र सरकारने एफसीआय मार्फत आधीच 45 लाख टन गहू खुल्या बाजारात विकल्याने तसेच हा गहू पीठ (कणिक) उत्पादक कंपन्यांनी खरेदी केल्याने गव्हाचे दर काेसळले आहेत. त्यामुळे एफसीआयने 10 एप्रिल 2023 पर्यंत मध्य प्रदेशातून 2.60 लाख टन गव्हाची खरेदी केली असून, या काळात किमान 3.41 लाख टन गव्हाची खरेदी होणे अपेक्षित हाेते. हरयाणा, पंजाब व उत्तर प्रदेशात गव्हाच्या खरेदीला सुरुवात झालेली नाही.

🌎 वर्ष – उत्पादन – सरकारी खरेदी – बफर स्टॉक
✴️ 2019-20 – 10.79 – 3.41 – 1.70
✴️ 2020-21 – 10.96 – 3.90 – 2.48
✴️ 2021-22 – 10.77 – 4.33 – 2.73
✴️ 2022-23 – 11.22 – 1.88 – 0.90

🌎 आवक घटली (लाख टन)
✴️ पीक सन 2022 सन 2023 घट
✴️ गहू – 9.64 7.90 18 टक्के
✴️ मोहरी – 17.16 11.35 34 टक्के
✴️ हरभरा – 5.60 4.76 15 टक्के

🌎 महागाई व शेतमालाचे दर पाडण्याचे कारस्थान
काेरडा दुष्काळ पडल्यास देशात अन्नधान्यासाेबतच इतर शेतमालाच्या उत्पादनात माेठी घट हाेऊ शकते. अशा परिस्थिती शेतमालाचे दर वाढू शकतात. असे झाल्यास शहरी मंडळी महागाई वाढल्याच्या बाेंबा ठाेकत केंद्र व राज्य सरकारवर दबाव निर्माण करतील. आगामी 2024 ची लाेकसभा निवडणूक विचारात घेता केवळ मतांचे राजकारण करण्यासाठी केंद्र सरकार शेतमालाचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी आटाेकाट प्रयत्न करेन. शिवाय, शेतमालाची अवाजवी आयात करून देशांतर्गत बाजारातील शेतमालाचे दर पाडण्याचे कारस्थानही करेल. यातून शेतकरी आत्महत्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!