Seeta temple Raveri : रावेरी – एक शक्तीपीठ
1 min readत्या रावेरीच्या सीता मंदिराची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून वेगळ्या संदर्भ व स्पष्टीकरणांसह होत असते. पूर्वीपासून भग्नावशेष सांभाळत, काळाशी, उन्हा-पावसाशी झगडत, अंधार उपेक्षा आणि दुर्लक्ष सहन करत उभं असलेलं परित्यक्ता सीता मंदिर; युगात्मा शरद जोशींच्या (Sharad Joshi) निश्चयानुसार, त्यावेळच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गावोगाव फिरून त्या विचारांच्या केलेल्या प्रचाराचा परिणाम म्हणून पुन्हा देखण्या रूपात उभं राहिलं. युगात्मा शरद जोशींनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि सीतेच्या परित्यक्त आयुष्याचं काळं सावट दूर करून तिच्या सक्षम मातृत्वाला अतिशय आदराने जगासमोर आणले. परित्यक्ता सीता स्वयंसिद्धा ठरली.
सीतानवमी आणि रावेरीचं स्वयंसिद्धा सीतामंदिर
तिथे सक्षम मातांचं होणारं कौतुक, त्यासाठी येणारे शेतकरी संघटनेचे नेते आणि पाईक. अशा कार्यक्रमाचं रूप जनमानसात रुजलं आहे. पण तरीही कुणी कुणी तिरपा प्रश्न विचारतातच. ‘म्हणजे तुम्ही रामाच्या विरोधात आहात का?’ यावर उत्तर सरळ सोपं आहे. इतिहासातल्या चुकांवर तावातावाने चर्चा करण्यापेक्षा आज वर्तमानात त्या घडू नयेत, असे प्रयत्न करणे योग्य आहे. रामाच्या विरोधात सीतामाई कधी नव्हती, आम्हीही नाही. संसार दोघांचा असतो. प्रत्येक समस्या दोघांनी मिळून सोडवायची, ही संघटनेची शिकवण आहे. संसारात एकमेकांवर कुरघोडी करण्यापेक्षा सामंजस्य असणं महत्त्वाचं. एकमेकांना साथ देणं महत्त्वाचं. जशी सीतेने श्रीरामाला दिली. पण, दुर्दैवाने जेव्हा श्रीरामाने सीतेचा त्याग केला तेव्हा सीतेने ती स्वयंपूर्ण असल्याचे जगाला दाखवून दिले. श्रीरामाने नातं संपवलं. सीतेने जबाबदारी स्वीकारली. रामाने पाठ फिरवली, सीतेने नात्यांचं महत्त्व जपलं. रामाने लोकापवादाला मानलं आणि महत्त्व दिलं. सीतेने लोकापवादाला जुमानलं नाही. कर्तव्याला महत्त्व दिलं. सीतेचा त्याग करून राम हळहळत राहिला. त्याग होऊनही सीता निर्भयपणे, निश्चयाने कर्तव्य करत राहिली. सीतेने आततायीपणा केला नाही. विवेकाने, विचाराने महर्षि वाल्मिकींचा आधार घेतला. मुलांना जन्म दिला. त्यांना वाढवलं घडवलं. त्या राजकुमारांचं व्यक्तीमत्व फुलवलं. पण, त्यांच्यावर अधिकार सांगीतला नाही. रघुवंशाकडे पाठ फिरवून ही मानिनी जणू भूमीगत झाली.
दंतकथा, लोककथांच्या फुलांपानांखालचा इतिहास मूळ स्वरुपात वाचला तर, त्या काळच्या वेगवेगळ्या स्त्रियांशीही ओळख होते. सीतेला औरस मुलगी ‘आत्मजा’ म्हणून घडवलं जनकाने. ‘जणू नांगराच्या फाळातून जन्म घेतलेल्या’ या मुलीबद्दल जनकाला अपार माया आहे. त्या काळच्या रिवाजाप्रमाणे तिच्या स्वयंवराचा ‘पण’ धनुर्विद्येत निपुण असण्याचा होता. उर्मिला, मांडवी आणि श्रुतकीर्ती. सीतेच्या या तिन्ही बहिणींचे स्वयंवर नव्हते. कुठला ‘पण’ ही नव्हता. त्या काळात विवाह म्हणजे दोन कुळांचा संबंध होता. विवाह घडवून आणण्याचा अधिकार राजकुळांच्या गुरूंना होता. त्यानुसार विश्वामित्रांनी राम-सीता, लक्ष्मण-उर्मिला, भरत-मांडवी, शत्रुघ्न-श्रुतकीर्ती असे विवाह घडवून आणले. रामाच्या वनवासाच्या 14 वर्षांत त्या तिघींनी अयोध्येत आपआपली जबाबदारी सांभाळली होती.
वाल्मिकी रामायणात अनेक स्त्रियांचे विस्तृत उल्लेख आहेत. दहशतवादी, आतंकी, ताटका आहे. स्वत:च पद, प्रतिष्ठा, आपल्या गुरुकुलाची ख्याती आणि जबाबदारी विसरून ‘इंद्र माझ्यावर भाळला’ म्हणून हुरळून जाणारी, जाणून बुजून अविचाराने वागणारी, मग पश्चात्तापाने प्रायश्चित्त घेणारी अहल्या आहे. घराणं कितीही मोठं असलं तरी, कितीही संपन्न असलं तरी राज्यकारभार आपल्या स्वत:च्याच मुलाच्या हातात हवा, हे कैकेयीला शिकवणारी मंथरा आहे. दु:खाने मोडून पडणारी कौसल्या आहे. भरताच्या वाटेतून रामाला दूर करण्यासाठी वैधव्याला सुद्धा स्वीकारणारी कैकेयी आहे. कुठल्याही परिस्थितीत सगळ्या बाजूंनी विचार करणारी, खरं योग्य आणि मोजकं बोलणारी सुमित्रा आहे. अनेक लोकांबरोबर स्वत: कष्ट करून नद्यांचे पाट-कालवे काढण्याची कल्पना प्रत्यक्षात उतरवून, दुष्काळावर, नापिकीवर मात करणारी ‘माता अनसूया’ आहे. अतिशय उथळ विचारांची, आपला बाईपणा मिरवणारी, तरुण दिसण्याचा केविलवाणा अट्टाहास करणारी धूर्त शूर्पणखा आहे. आपल्या गुरूबंधूंच्या मदतीने प्रचंड मोठी सरोवरे बांधून काढणारी, घनदाट वनांच्या अनेक मालिका उभ्या करणार, ते निसर्ग वैभव जोपासणारी सांभाळणारी, कधीही न कोमेजणारी ‘घामाची फुले’ फुलवणारी ‘सिद्धसम्मता’ शबरी आहे. आणि अतिशय राजसी व्यक्तिमत्वाची परिपक्व विचारांची तारा आहे.
वाली-पत्नी तारा खऱ्याखुऱ्या स्वतंत्र विचारांची धनीण आहे. ज्या रामाने आपल्या पतीला छद्मयुद्धात – झाडाआडून बाण मारून ठार केले, त्याच रामाच्या पत्नीच्या शोध आणि मुक्तीसाठी ही तारा संपूर्ण वानरराज्य अभंग ठेवून पणाला लावते. न पाहिलेल्या सीतेबद्दल तिला ‘स्त्री’ म्हणून वाटणारी संवेदना अजोड आहे. ताराचं राजकारण इतकं स्वच्छ, सरळ आणि अचूक आहे की, श्रीराम सुद्धा ते राजकारण लंकेतले युद्ध आणि अयोध्येतल्या राज्याभिषेकापर्यंत आदरपूर्वक पुढे नेतात. अशोकवनात सीतेच्या वागण्या बोलण्याने प्रभावित होऊन सीतेची सखी झालेली त्रिजटा आहे. बिभीषण रामाकडे गेल्यावर लंकेत सीतेची सर्वतोपरी काळजी घेणारी, रावणाच्या विरोधात निर्भयपणे उभी राहणारी बिभीषणाची पत्नी सरमा आहे. नवऱ्याच्या श्रीमंतीमुळे स्वतंत्र विचार आणि शब्दही हरवून बसलेली, सीतेबद्दल असूया बाळगणारी मंदोदरीही वाल्मिकींनी वर्णिलेली आहे. सीतेला या सगळ्यांच्या विचारांनी कृतींनीही घडवलं आहे. स्त्री स्वभावाच्या या वेगवेगळ्या छटा. काही चांगल्या काही वाईट.
वाल्मिकी सीतेच्या विवेकबुद्धीचं एक उदाहरण सांगतात. सीता अशोकवनात असताना देवराज इंद्र तिला चोरून भेटला. त्याने स्वत:ची ओळख दिली आणि मदत करण्याची इच्छा बोलून दाखवली. अजेय रावणाच्या दुर्लंघ्य लंकेत नजरकैदेत एकाकी असलेली सीता, राम लक्ष्मणाच्या लंकेत येण्याबद्दल काहीही शाश्वती नसताना इंद्राला उत्तर देते, ‘देवराज, तुमच्या अशा वागण्यामुळे, माझ्या पतीचीही कुणी साथ देणारे आहे, हे पाहून समाधान वाटलं. माझे वडील राजा जनक आणि माझे सासरे महाराज दशरथ यांच्या इतके तुम्हीही आदरणीय आहात.’ भोवतालच्या परिस्थितीचं पूर्ण भान ठेवून इंद्राला ओळखून असणारी सीता त्याला इतकं समर्पक उत्तर देते. आदराने त्याची जागा दाखवून आदरानेच मदत नाकारते. इंद्रासारख्या ‘आदरणीयांना’ सन्मानपूर्वक लांब ठेवायचे असते. हे सीतेकडून शिकायला हवे.
सीतानवमीला सीतेच्या अनेकानेक गुणांचा विचार करताना त्या काळातल्या इतर स्त्रियांबद्दलही जाणून घ्यायला हवे. समाजात अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या, वेगवेगळ्या विचारांच्या स्त्रिया आजही आपण बघतो. कुणासारखं वागायचं कुणासारखं नाही, हे ठरवण्यासाठी आत्मभान आणि आत्मसन्मान का आणि कसा जपायचा हे समजून घेण्यासाठी इतिहासातले संदर्भ समजून घेऊन वर्तमानात जगण्यासाठी सीतानवमीचं प्रयोजन आहे.
®️ सीतानवमी शनिवार, दि. 29 एप्रिल 2023 राेजी आहे.