Cotton prices fall : कापूस दराच्या घसरणीला सेबीची अघोषित वायदेबंदीच जबाबदार!
1 min readकापूस गाठीचे वायदे ‘कॉंट्रॅक्ट एमसीएक्स’ या कमोडिटी एक्स्चेंजवर उपलब्ध असतात. हेजिंग करण्यासाठी या वायद्याचा वापर अपेक्षित आहे. या कमोडिटी एक्स्चेंजवर ऑक्टोबर 2022 मध्ये जानेवारी 2023 चे वायदे कॉंट्रॅक्ट सुरू होणे अपेक्षित असते. म्हणजे शेतकरी आणि व्यापारी या दोघांनाही नवीन हंगामातील कापसाचे आपापले किंमत जोखीम व्यवस्थापन करणे शक्य होते. परंतु, यावेळी सेबीने जानेवारी 2023 चे कॉंट्रॅक्ट सुरू करण्यास मनाई केली. यानंतर दक्षिणेतील वस्त्रोद्योग व्यापारी यांच्या विरोधामुळे वायदे चालू होण्यास अडचण आली. त्यांची लॉबी वायदे बाजारविरुद्ध केंद्र सरकारकडे हट्ट धरून राहिली. त्यांच्या विराेधाला नमत जानेवारी 2023 वायदा कॉंट्रॅक्ट स्पेसिफिकेशन बदलून चालू करण्यास सेबीने सांगितले.
या संदर्भात अनेक मिटिंग्स झाल्या. परंतु, काहीच निष्पन्न झाले नाही. ही सेबीने केलेली अघोषित वायदेबंदीच आहे. आज डिसेंबर महिन्याचा वायदा ‘टेंडर पीरियड’मध्ये म्हणजे समाप्त झाल्यासारखेच आहे. जानेवारी कॉन्ट्रॅक्ट नसल्यामुळे बाजाराला किंमतीचा सिग्नल बंद झाला. याचा फायदा घेऊन हजर बाजार 1,000 रुपये क्विंटल एवढा मोठ्या प्रमाणात पाडला गेला. शेतकरी घाबरून कापूस विकू लागले. नंदुरबारमध्ये शेतकरी, व्यापाऱ्यांच्या निषेधासाठी रस्त्यावर आले आहेत. वायदे बंदीचा काळ वाढवल्यावर लगेच शेतकऱ्यांचे शोषण सुरू झाले.
कापसाच्या दरात होणाऱ्या पडझडीस सेबीच जबाबदार आहे. म्हणून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी कापसाचे वायदे सुरू करण्याची मागणी करायला हवी. येत्या 23 जानेवारी 2023 रोजी बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथील सेबीच्या कार्यालयासमोर होणाऱ्या स्वतंत्र भारत पार्टीच्या धरणे आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट, प्रदेशाध्यक्ष मधुसुदन हरणे, माजी आमदार तथा माजी प्रदेशाध्यक्ष वामनराव चटप, महिला आघाडी प्रदेशाध्यक्ष सीमा नराेडे यांनी संयुक्तरित्या केले आहे.
🟢 या आहेत मागण्या
🔆 केंद्र सरकारने सोयाबीनसह इतर तेलबिया, हरभरा, गहू यासह अन्य सात शेतीमालाच्या वायद्यांवरील बंदीला दिलेली एक वर्षाची मुदतवाढ त्वरित रद्द करावी.
🔆 कापसाचे सन 2023 चे वायदे त्वरित सुरू करावेत.
🔆 यापुढे कधीही सेबीने/केंद्र सरकारने अशा प्रकारे शेतीमालाच्या वायद्यांना बंदी घालू नये.
🔆 सेबीने वायदे बाजारात हस्तक्षेप करू नये. शेतीमाल बाजार प्रभावितहोईल असे निर्णय घेऊ नये.
🔆 शेतकरी, व्यापारी व प्रक्रिया उद्योजकांच्या या रास्त मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी, सोमवार दि. 23 जानेवारी 2023 रोजी, बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथील सेबी कार्यालय समोर प्रचंड संख्येने उपस्थित रहावे.
🔆 ज्या शेतकरी संघटना व व्यवसायिक संघटनांचा या मागण्यांना पाठिंबा आहे, त्यांनी पाठिंब्याचे जाहीर पत्रक काढावे व आंदोलनात सक्रिय जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे.