krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Protection of wheat crop : गव्हाच्या पिकाचे संरक्षणासाठी महत्त्वाच्या टिप्स

1 min read
Protection of wheat crop : पाणी व्यवस्थापन पेरणी शेत ओलावून वाफसा आल्यावर करावी. पेरणीनंतर साधारणपणे दर 18 ते 21 दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम ते भारी जमिनीत पीक तयार होण्यासाठी चार ते पाचवेळा पाणी द्यावे लागते. सोबतच नुकसान टाळण्यासाठी पिकावरील रोग व किडीचे योग्य वेळी योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

🌐 पाण्याचे नियोजन
पीकवाढीच्या अवस्थेनुसार पाणी नियोजन मुकुटमुळे फुटण्याची अवस्था – पेरणीनंतर 18 ते 21 दिवसांनी, कांडी धरण्याची अवस्था – पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी, फुलोरा आणि चीक भरण्याची अवस्था – पेरणीनंतर 60 ते 65 दिवसांनी, दाणे भरण्याची अवस्था – पेरणीनंतर 80 ते 85 दिवसांनी. अपुऱ्या पाणीपुरवठा परिस्थितीतील सिंचन पाण्याचा तुटवडा असल्यास शेततळ्याच्या माध्यमातून गव्हाच्या पिकास संरक्षित पाणी द्यावे. त्यामध्ये एकच पाणी देणे शक्‍य असल्यास ते 40 ते 42 दिवसांनी कांडी धरण्याच्या अवस्थेत द्यावे. गहू पिकास पेरणीनंतर दोन पाणी देणे शक्‍य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. गव्हास एकच पाणी दिले तर, पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या तुलनेत 41 टक्के घट येते. दोन पाणी दिले तर, उत्पादनात 20 टक्के घट येते. तीन पाणी देणे शक्‍य असल्यास, पहिले पाणी 20 ते 22 दिवसांनी, दुसरे पाणी 40 ते 42 व तिसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे.

🌐 तणाचे व्यवस्थापन
गव्हाच्या पेरणीपासून साधारणत: 30 ते 35 दिवसांच्या आत पिकातील तणाचे प्रमाण लक्षात घेऊन एक किंवा दोन वेळा आवश्यकतेनुसार निंदन करून शेत तणविरहित ठेवावे. गव्हाच्या पिकात अरुंद आणि रुंद पानांच्या तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन आवश्यकता असेल तर पिकाचे वय 25 ते 30 दिवसांचे असताना तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली लेबल क्लेम शिफारशीत योग्य तणनाशक निवडून स्वतंत्र पंप वापरून गहू पिकातील रुंद व अरुंद पानांच्या ताणाचे व्यवस्थापन करावे. तणनाशकाचा वापर करण्यापूर्वी प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे तणनाशकाचा वापर शिफारस कालावधीत करावा.

🌐 खोडकीड
गव्हाचे पीक ओंबीवर असताना बऱ्याच वेळा खोडकिडीचा प्रादुर्भाव आढळून येतो. गव्हाच्या पिकावरील खोडकिडीच्या अळ्या रोपट्यांच्या गाभ्यात शिरून गाभा पोखरतात. परिणामी रोपट्यांचा वरील भाग वाळतो. या किडीच्या व्यवस्थापनासाठी गव्हाच्या पिकात रासायनिक खताचा वापर माती परीक्षणाच्या आधारावर संतुलितरित्या करणे गरजेचे आहे तसेच पिकाच्या वाढीच्या अवस्थांमध्ये गव्हाच्या पिकास पाण्याचा ताण पडणार नाही, याची काळजी घ्यावी.

🌐 मावा व काजळी
गव्हाच्या पिकात बऱ्याच वेळा पिवळसर अथवा काळपट तिळाच्या आकाराची मावा या किडीची पिल्ले व प्रौढ पानाच्या मागच्या बाजूने राहून रस शोषण करताना आढळतात. त्यामुळे पाने पिवळसर रोगट बनतात व नंतर ही मावा कीड आपल्या शरीरातून पिकावर चिकट स्त्राव बाहेर टाकते. त्यामुळे पिकावर काजळी सारखी बुरशी वाढून पाने काळी पडतात. त्यामुळे प्रकाश संश्‍लेषण प्रक्रिया बंद होऊन गव्हाचे रोपटे मरू शकते. गव्हाच्या पिकावरील मावा किडीच्या व्यवस्थापनासाठी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची प्रादुर्भाव लक्षात घेऊन गरजेनुसार योग्य निदान करून निर्देशीत प्रमाणात तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकतेनुसार फवारणी करावी.
Thiamethoxam 25 टक्के WG 1 ते 2 ग्राम अधिक दहा लिटर पाणी किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची गरजेनुसार योग्य निदान करून फवारणी करावी.

🌐 करपा व तांबेरा
गव्हाच्या पिकात पानावरील करपा या रोगाच्या व्यवस्थापनाकरिता प्रादुर्भाव लक्षात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार Mancozeb 75 टक्के WP 20 ते 25 ग्राम अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन आवश्यकतेनुसार फवारणी करावी. तसेच पिकात तांबेरा रोगाची लक्षणे आढळून आल्यास म्हणजे पानावर, खोडावर व ओंब्यावर विखुरलेले नारिंगी रंगाचे फोड आढळून आल्यास ताबडतोब तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा व योग्य निदान करून घ्यावे व गरजेनुसार तांबेरा रोगाची लक्षणे आढळल्यास Propiconazole 25 टक्के EC 20 मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन योग्य निदान करून गरजेनुसार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली फवारणी करावी.

🌐 उंदिरांचा उपद्रव
बऱ्याच वेळा उंदीर गव्हाचे फुटवे व ओंब्या तोडून खाऊन नुकसान करतात. उंदिरांचा प्रादुर्भाव असल्यास उंदिरांच्या व्यवस्थापन करण्याकरिता धान्याचा भरडा 49 भाग, 1 भाग गोडेतेल व 1 भाग Bromadiaolone 0.25 सीबी या प्रमाणात एकत्र मिसळून आमिष तयार करावे व चमचाभर आमिष प्लास्टिकच्या पिशवीत टाकून शेतातील जिवंत बिळामध्ये हे टाकावे किंवा बिळाजवळ ठेवावे. हे विषारी आमिष वापरताना अत्यंत काळजीपूर्वक कुणालाही इतरांना विषबाधा होणार नाही याची काळजी घेऊन वापरणे गरजेचे आहे.

🌐 ही काळजी घ्या
✳️ रसायने वापरण्यापूर्वी लेबल क्‍लेम शिफारशीची शहानिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच रसायनाचा वापर करावा.
✳️ अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी तसेच प्रमाण पाळावे.
✳️ रसायने फवारताना सुरक्षित कीडनाशक वापर तंत्राचा तसेच सुरक्षा किटस वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!