Sowing of Kharif crops : खरीप पिकांची पेरणी कधी करावी?
1 min read
Sowing of Kharif crops : यावर्षी मे महिन्यात महाराष्ट्राच्या बऱ्याचशा भागात अनपेक्षितपणे भरपूर पाऊस झाला. त्यामुळे बक्कळ अशा उपलब्ध ओलीवर शेतकरी आगाप पेरणी करू इच्छितात. पण आगाप पेरणी जरी शक्य असली तरी किती आगाप करावी, यालाही मर्यादा आहेत. आतापर्यंतच्या अनुभवावरून शेतकऱ्यांना काही पिके सोडली तर 1-2 जूनची पेरणी खूपच आगाप वाटते. शिवाय जून महिन्यात पावसाचे वितरण कसे असेल, याचाही अंदाज शेतकऱ्यांना नाही. सध्या वाफसा स्थिती अनुकूल होत आहे. सध्या पेरणी केली तर बिजांकुरणही होईल. परंतु, पुढे तीन आठवडे पाऊसच आला नाही तर पेरणी (Sowing) धोक्यात ही येऊ शकते, ही भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.
🔆 पावसाचा खंड
हवामान अभ्यासक जूनमध्ये पावसाचा खंड, माहिती अशी चॅनेल व इतर प्रसार माध्यमांद्वारे पसरवित आहेत. पावसाचा खंड हा शब्द ऐकल्यावर पेरणी निर्णयासाठी त्यांच्या मनात अजूनच अधिक गोंधळ स्थिती ही बातमी करत आहे. बरं, त्यांच्यानुसार पावसाचा खंड हा किती दिवसांचा यातही मत भिन्नता आहे. प्रत्येकजण वेगवेगळ्या दिवसांचा खंड सांगत आहेत. काही शेतकऱ्यांकडे सिंचनासाठी पाणी आहे, तर काहींकडे अगदीच मर्यादित पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणी निर्णय होत नाही. ज्या ठिकाणी अजून मान्सून पूर्णपणे देशात पोहोचलेलाच नाही, तर मग पावसाचा खंड ही संकल्पना अस्तित्वातच येऊ शकत नाही. मान्सून पूर्णपणे देशात पोहोचून तो सेट होतो, तेव्हाच ‘पावसाचा खंड’ ही संकल्पना जन्माला येते, असे हवामानशास्त्र सांगते. तेव्हा उपलब्ध मॉडेल आधारित न दिसणारा पाऊस म्हणजे पावसाचा खंड असा समज करून मीडियाद्वारे घोषित केले आहे.
🔆 जून महिन्यातील पावसाचा अंदाज
एक तर जून महिन्यात पावसाची सरासरी पाहिली तर संपूर्ण महाराष्ट्रात जून महिन्यात साधारण 17 ते 18 सेंटीमीटर पाऊस, 15 ते 20 दिवसात होणे अपेक्षित असते. परंतु, मान्सून आगमनाचा काळ व त्याची चालू असलेली वाटचाल बघता सरासरी इतका पाऊस, सरासरी इतक्या दिवसात प्रत्येक वर्षी होतोच असे नाही. हवामान खात्याचा महाराष्ट्रसाठीचा 2025 च्या जून महिन्यातील पावसाचा अंदाज हा सरासरी इतका तर तूरळक ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक आहे. म्हणजेच सरासरी इतका मानला तर जून महिन्यात 15 ते 20 सेंटीमीटर इतका पाऊस व्हावा, अपेक्षित आहे. सर्वात जास्त पाऊस हा जुलै महिन्यात साधारण 28 ते 30 सेंटीमीटर व्हावा, असे अपेक्षित असते. पुण्या-मुंबईत पोहोचलेल्या मान्सूनची गेल्या 4 ते 5 दिवसांपासून प्रगती नाही. मान्सून आहे त्याच ठिकाणी खिळलेला जाणवत आहे.
🔆 पावसाची शक्यता काय आहे?
हवामान खात्याच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजानुसार 2025 च्या जून महिन्यात पुढील 19 दिवस म्हणजे 19 जूनपर्यंत अधिक जोरदार पावसाची शक्यता सध्या तरी जाणवत नाही. मग हंगाम सुरू होणाऱ्या जून महिन्यात 15 ते 20 सेंटीमीटर सरासरी इतका पाऊस आपण कसा काय अपेक्षित करू शकतो. परंतु, जून महिन्याच्या उर्वरित 10 ते 12 दिवसात 19 जून नंतर जेव्हा मान्सून उर्जितावस्थेत येतो. तेव्हा ती सरासरी भरून काढू शकतो. किंवा दरम्यानच्या काळात एखादी प्रणाली किंवा चक्रीय वाऱ्याची स्थिती किंवा अरबी समुद्रात एखादे चक्रीवादळ निर्मिती सारख्या घटना निर्माण झाल्या व मान्सूनच्या प्रवाहास बळकटी आली तर पाऊस होऊ शकतो. अन्यथा 19 जूननंतर पाऊस होऊ शकतो.
🔆 उर्जितावस्थेचा अभाव
मग 19 जून नंतरच्या उर्वरित जूनमध्ये पाऊस कशामुळे होवु शकतो, याची शक्यता पाहिली तर भारत द्वि-ध्रुवीता व एन्सो या दोन्हीही स्थिती तटस्थ अवस्थेत असून पावसाला पूरक नसल्या तरी त्या पावसाला मारक नाहीत. शिवाय, सध्या एमजेओ हा सध्या भारत महासागरीय वि्षुववृत्तीय परीक्षेत्राच्या बाहेर असून, तो 19 जुनच्या दरम्यान तो त्याची ग्लोबल फेरी पूर्ण करून भारत महासागरीय वि्षुववृत्तीय परीक्षेत्राच्या फेज 2 व 3 मध्ये यावा, असे अपेक्षित आहे. मान्सून पुढे झेपावण्याकरिता व जी उर्जितावस्था व बळकटी येण्यासाठी लागणाऱ्या ऊर्जेला किंवा ताकतीच्या संधीला एम. जे. ओसिलेशन्समुळे सध्या अधिक उर्जितावस्था येणे दिसत नाही. वातावरणाच्या या घडामोडीचा फटका मान्सून प्रगतीस पर्यायाने महाराष्ट्रात मोसमी पाऊस वेगाने वेळेत अन् जोरात कोसळण्याच्या शक्यतेवर काहीसे विरजण पडल्यासारखे वाटत आहे.
🔆 काय आहे हे ‘एम. जे. ओसिलेशन्स’
विषववृत्त दरम्यान वातावरण व समुद्र अशा दोघांशी निगडित उष्ण कटीबंधातील ‘एम. जे. ओसिलेशन्स’ म्हणजे म्यॅडन ज्यूलियन झोके. एम. जे. ओसिलेशन्सच्या दोलनांची विषूववृत्ता(झिरो डिग्री अक्षवृत्ता)वर 30 ते 60 दिवसांच्या अंतराने, नैसर्गिकपणे त्याच्या नेहमीच्या नियमितआवर्तनानुसार पश्चिमेकडून (आफ्रिकेच्या पूर्व किनारपट्टीपासून) पूर्वेकडे पॅसिफिक समुद्रापर्यंत, ताशी साधारण 4 मीटर प्रतिसेकंद वेगाने ताशी 15 किमी वेगाने जाणाऱ्या वातावरणीय, हवा, आर्द्रता व उष्णता ऊर्जतून घडणारे ढग व होणारा पाऊस इ. अशा लहर स्वरुपातील प्रक्रिया सतत घडत असतात. मान्सून काळात या लहरी मान्सूनचे आगमन ‘लवकर किंवा उशिरा’ तसेच मान्सून धारा कोसळताना ‘अतितीव्र किंवा क्षीण’ करत असतात.
ही जागतिक पातळीवर घडत असलेली प्रक्रिया 50 वर्षांपूर्वी म्हणजे 1971 साली रोलॅण्ड म्यॅडन व पॉल ज्यूलियन या दोन शास्त्रज्ञांनी निरीक्षणावरून शोधून काढलेली आहे. परंतु याचा जास्त सकारात्मक किंवा नकारात्मक फटका मात्र जास्त करून भारत, श्रीलंका, मालदीव व आस्ट्रेलिया या देशांच्या मोसमी पावसावर होतो. उत्तर अमेरिकेत येणारे महापूरही यामुळेच येतात. चक्रीवादळची निर्मिती, त्यांच्या तीव्रतेत वाढ वा कमी होणे. आर्टिककडून येणारी व वाढणारी थंडी इ. घटनाही यामुळे घडतात. सध्या एमजेओ साखळी साठी जरी सध्याचे 10-12 दिवस अनुकूल वाटत नसले तरी 19 जूनच्या दरम्यान भारतीय समुद्रा (फेज 2 व 3)मध्ये या साखळीची सक्रियतेता काहीशी जाणवत असून मान्सूनला मदत करू शकते असे दिसते. महाराष्ट्रातील पावसाच्या वातावरणाची या स्थितीनुसार शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यावा.