krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Agriculture sector & technologically skilled manpower : भारतीय कृषिक्षेत्र आणि तंत्रज्ञानक्षम मनुष्यबळाची कमतरता!

1 min read

Agriculture sector & technologically skilled manpower : शेतीवर अवलंबून असणाऱ्या कृषिप्रधान देशात शेतीशी निगडित करिअरच्या वाटा शेकडो असणार, हे उघडच आहे. या वाटा आगामी काळात अधिक विस्तारत जाणार, हे सांगायला कोण्या भविष्यकाराची गरज नाही. ज्यांना ‘क्षितिजापलीकडचा शेंदूर’ पाहायचा आहे. अशा तरुणाने बिनदिक्कतपणे ‘कृषी’मध्ये आवर्जून करिअर करावे, पण ते संशाेधनात्मक असले पाहिजे. अभियांत्रिकी, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासारखा झगमगाट शेतीत नसला तरी शाश्वत करिअरच्या दृष्टीने ॲग्रिकल्चर (Agriculture) संबंधित तंत्रज्ञान करिअरला तोड नाही.

🔆 मुलींची आघाडी
काही वर्षांपूर्वी शेतीचे क्षेत्र करिअरच्या दृष्टीने पुरुषप्रधान मानले जायचे. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. मुलींनाही या क्षेत्रात चांगल्या संधी असून, अनेक जणींनी कृषीची आवर्जून निवड करून चांगले करिअरही घडवले आहे. हे शतक ज्ञानाधिष्ठित भांडवलाचे आहे. कृषिसंबंधित कोणत्याही पदवीधराकडे ज्ञानाचे समृद्ध भांडार असतेच असते. याचा अनुभव अनेकांना अनेक पातळ्यांवर आलेला आहे, कृषी पदवीधरांनी तो वेळोवेळी सिद्धही केला आहे. त्यामुळे शेतीशी संबंधित पदवी व तंत्रज्ञान असल्यास आगामी काळात निर्माण होणाऱ्या हजारो संधींचे सोने करता येईल.

🔆 करिअरच्या संधी
राष्ट्रीय नियोजनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या कृषिक्षेत्रात करिअरच्या दृष्टीने आपल्या देशात तर संधी आहेतच. या ज्ञानाला तंत्रज्ञानाची जोड दिल्यास जागतिक शेतीच्या शिवारातील अनेकानेक संधी सहजपणे उपलब्ध होतील. देशात सध्या 40 ते 45 कृषी विद्यापीठे आहेत. इतर 30 ते 35 विद्यापीठांतूनही कृषी संबंधित शिक्षणाच्या सोयी आहेत. शिवाय, कृषी संशोधन परिषदेसारख्या अनेक संस्थाही आहेत. कृषी विद्यापीठांतून कृषी (अ‍ॅग्रीकल्चर), उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर), जैवतंत्र (बायोटेक्नालॉजी), अन्नतंत्र (फूड टेक्नालॉजी), कृषी अभियांत्रिकी (अ‍ॅग्री इंजिनिअरिंग), गृहविज्ञान (होम सायन्स), कृषी व्यवसाय व्यवस्थापन (अ‍ॅग्री बिझनेस मॅनेजमेंट) आदी विषयांची पदवी मिळवता येते. गेल्या काही वर्षांत शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, बदलतो आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनादेखील शेतीतील मार्केटची जाणीव झाली आहे. त्यामुळे त्याही या क्षेत्राकडे एक व्यवसाय म्हणून पाहताहेत. कमोडिटी बाजाराला समजून घेऊन तंत्रज्ञान वापर केल्यास योग्य फायदा मिळू शकतो. कृषी तंत्रज्ञान क्षेत्र दुर्लक्षित झाले आहे. आज ग्रामीण भागात शेतीत काम करण्यासाठी मनुष्य मिळणे अवघड झाले आहे. 10 ते 15 वर्षांपूर्वी कृषीसाठी मॅनेजमेंट कोर्स कशाला हवा, असे विचारणारी मंडळी आता नामांकित विद्यापीठांतून सुरू असलेल्या ॲग्रि बिझनेस मॅनेजमेंटसह इतर कोर्ससाठी रांगा लावताना दिसतात.

🔆 ॲग्रिकाॅस जाईल तेथे बॉस
कृषिसाठी स्वतंत्र अर्थसंकल्प हवा, हाही विचार बाळसे धरतो आहे. कृषी विषयाशी निगडित नियतकालिकांची संख्याही दिवसेंदिवस वाढतच आहे. हे कशाचे द्योतक आहे? कृषी क्षेत्रातील संपन्न मोठा उज्ज्वल काळ येणार हे ओळखून या क्षेत्रातील व्यापक संधींचा पुरेपूर लाभ घ्यायलाच हवा. ‘ॲग्रिकाॅस जाईल तेथे बॉस’ ॲग्रिकल्चर कॉलेज स्टुडंटला ॲग्रिकाॅस म्हणतात. ‘ॲग्रिकाॅस जाईल तेथे बॉस’ अशी घोषणा नेहमी दिली जाते आणि ते खरेही किंवा खोटे हे एकूण शेतीमध्ये होत असलेली वाताहात बघून लक्षात येईल. कृषी विद्यापीठातील शिक्षण पद्धती व कृषी पदवीधराला करावा लागणारा 14 ते 15 शास्त्रांच्या अभ्यासाऐवजी शेती नवीन संशोधन आणि कृषी विद्यापीठ यांच्या शेतकरी बांधवांना होणार फायदा याकडे लक्ष देणे अधिक गरजेचे आहे.

🔆 वैविध्यपूर्ण अभ्यास
कृषी पदवीचा अभ्यास मोठा वैविध्यपूर्ण आहे. यात हवामानशास्त्र (मेट्रॉलॉजी), कृषिविद्या (अ‍ॅग्रोनॉमी), कीटकशास्त्र (एन्टामालॉजी), वनस्पती विकृतीशास्त्र (प्लँट पॅथॉलॉजी), मृद्शास्त्र (सॉईल सायन्स), कृषी अभियांत्रिकी (अ‍ॅग्री इंजिनिअरिंग), पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र (अ‍ॅनिमल हसबंडरी अँड डेअरी सायन्स), उद्यानविद्या (हॉर्टिकल्चर), जैवतंत्रज्ञान (बायोटेक्नॉलॉजी), वनस्पती वंशशास्त्र (प्लँट ब्रिडिंग अँड जेनेटिक्स), मानसशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, विस्तार शिक्षणशास्त्र आदी शास्त्रांच्या अभ्यासांचा समावेश आहे. यामध्ये डेटा सायन्स, कुत्रिम बुद्धिमत्ता या विषयाचा समावेश करावा लागणार आहे.

🔆 कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्स
कृषी-तंत्रज्ञानात उपक्रम, स्टार्टअप्स आणि उपाययोजनांच्या परिसंस्थेचा संदर्भ येतो, जी पीक उत्पादन वाढवण्यासाठी, कार्यक्षमतेची श्रेणी सक्षम करण्यासाठी आणि अखेरीस कृषी मूल्य शृंखलातील शेतकऱ्यांकरता नफा वाढविण्यासाठी उत्पादने किंवा सेवा वितरित करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा फायदा घेण्यासाठी कार्य करत आहे. भारतात सध्या 3 हजारांहून अधिक कृषी-तंत्रज्ञान स्टार्टअप्स आहेत, ज्यापैकी 1,300 हून अधिक उदयोन्मुख आणि लक्षणीय बदल घडवून आणणारे तंत्रज्ञान- जसे की कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), मशीन लर्निंग आणि इंटरनेट ऑफ थिंग्ज- जे कृषी विषयक कामाला साह्य करण्यासाठी सेन्सर, सॉफ्टवेअर आणि इतर तंत्रज्ञानासह इंटरनेटवरील इतर उपकरणांशी आणि यंत्रणेशी जोडणी आणि देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने जोडले आहे. पण हे तंत्रज्ञान वापर करण्यासाठी सक्षम यंत्रणा आपल्याला विकसित करावी लागणार आहे.

🔆 भारतीय बाजारपेठेची विशालता
भारतीय कृषी-तंत्रज्ञानाला आणखी वाढण्यास भरपूर वाव आहे. आतापर्यंत झालेली प्रगती आणि या क्षेत्राचा जागतिक स्तरावर विस्तार होत असतानाही, देशातील कृषी-तंत्रज्ञान अजूनही प्रारंभीच्या टप्प्यावर आहे आणि 24 अब्ज डॉलर्सच्या संभाव्य बाजार मूल्यापैकी, कृषी क्षेत्रात केवळ 1 टक्काच प्रवेश करू शकला आहे. अद्याप न वापरलेल्या भारतीय बाजारपेठेची विशालता लक्षात घेता, स्टार्टअप्स आणि इतर नवीन कृषी-उद्योगांना त्यांची छाप पाडण्याकरता भरपूर संधी आहेत. ‘अॅग्रिस्टॅक’मुळे या क्षेत्राचे स्वरूप आमूलाग्र बदलेल, असे सर्व संकेत आहेत. राष्ट्रीय शेतकरी नोंदणी संकलित करण्याचे प्रयत्न वेगाने सुरू असतानाही शेतकऱ्यांच्या जमिनीच्या नोंदी अद्ययावत करणे आणि जमिनीची मालकी तपासणे या मोठ्या कामाला गती मिळायला हवी.

🔆 अॅग्रिस्टॅकच्या डिजिटल परिसंस्था
‘डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन अॅक्ट’च्या (डीपीडीपी) अक्षरांचे आणि भावनांचे पालन करणार्‍या मजबूत माहिती संरक्षण यंत्रणादेखील शेतकर्‍यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षिततेबद्दल आणि गोपनीयतेबद्दल प्रचलित भीती दूर करण्यासाठी व्यवस्थित राखणे आवश्यक आहे. या शिवाय, नवीन प्रकारच्या कृषी सेवा सादर केल्या जाऊ शकतात. उदाहरणार्थ, पीक मंडईतील व्यवहार विषयक माहिती ‘अॅग्रिस्टॅक’च्या डिजिटल परिसंस्थेसह एकत्रित केली जाऊ शकते, ज्यामुळे खरेदीदार आणि विक्रेते दोघांनाही फायदा होईल, अशी अंतर्दृष्टी निर्माण होते. कृषी क्षेत्रातील डिजिटल साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कृषी-विकास क्षेत्रात सर्वात वरच्या स्थानी पोहोचणे आवश्यक आहे. ‘शेतकरी उत्पादक संस्था’ (एफपीओ) डिजिटल साक्षरता उपक्रम राबवण्यात आणि शेतकऱ्यांना शिक्षित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. संस्थात्मक किरकोळ विक्रेते आणि अन्न प्रक्रिया कंपन्यांसोबत भागीदारी निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रक्रियेमध्ये कृषी-तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रेरित करण्यासाठी ‘शेतकरी उत्पादक संस्था’ (एफपीओ) देखील अद्यावत तंत्रज्ञान परिपूर्ण ठेवल्या गेल्या पाहिजे.

🔆 तंत्रज्ञान कुशलता आवश्यक
आज तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात प्रगती करत आहे. मात्र, आमच्या कृषी विद्यापीठ शिक्षण क्षेत्रात मात्र तंत्रज्ञान परिपूर्ण शिक्षणापासून वंचित आहे. 2024 हे वर्ष कृषी क्षेत्रासाठी उत्कृष्ट ठरले आहे. कारण वर्षाच्या पहिल्या सहामाहित या क्षेत्राने 2.60 टक्के चांगली वाढ नोंदवली आहे. 2024 मध्ये चांगला पाऊस आणि पावसामुळे खरीप आणि रब्बी हंगामातील बंपर शेती 2025 मध्ये धान्य उत्पादना नवीन विक्रम निर्माण करेल, असे दिसते आहे. कृषिक्षेत्र तंत्रज्ञानाने सज्ज होईल यासाठी मनुष्यबळ (manpower) कुशल असणे आवश्यक आहे. विकसित होणारे तंत्रज्ञान शिक्षण कृषी विद्यापीठ देण्यास सक्षम झाले आहे का? शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगसह दोन तंत्रज्ञानाचा वापर वाढणार आहे. यासाठी आपल्याला कृषी विद्यापीठ येथे शिक्षण घेणारे विद्यार्थी यांना तंत्रज्ञान कुशल (technologically skilled) करावे लागणार आहे. आज जी अकुशल मनुष्यबळ दिसते आहे ते कुशल केल्यास त्यांचा फायदा कृषी पदवीधर यांना होईल आणि शेतकऱ्यांना देखील फायदा होईल.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!