Monsoon & Sowing : जूनमध्ये मान्सून खोळंबणार, पेरणीची घाई नकोच
1 min read
Monsoon & Sowing : नैऋत्य मान्सून (Monsoon) सध्या मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात पुढे सरकला आहे. तो मुंबई, मराठवाडा, पूर्व विदर्भ, कर्नाटकसह महाराष्ट्राच्या आणखी काही भागात बंगळुरूसह तामिळनाडूचा उर्वरित भाग, तेलंगणाचा काही भाग आणि आंध्र प्रदेशचा आणखी काही भागापर्यंत पोहोचला आहे. तीन दिवसात बरीच प्रगती करत महाराष्ट्राचा आणखी काही भाग,उर्वरित कर्नाटकचा काही भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा काही भाग उर्वरित पश्चिम मध्य भाग आणि बंगालच्या उपसागराचा आणखी काही भाग, ईशान्य राज्ये आणि उप हिमालयीन पश्चिमेचा काही भाग घेणार.
🎯 मोसमी वाऱ्याना ब्रेक कशामुळे?
रशियाकडील जास्त दाबामुळे अफगाणिस्तान, पाकिस्तान मार्गे कोरड्या हवेचा पुरवठा जास्त होईल आणि ही कोरडी हवा मान्सूनसाठी घातक ठरते. कारण ती मान्सूनच्या प्रक्रियेत आवश्यक असलेल्या आर्द्रतेच्या प्रमाणास बाधा पोहोचवते. मान्सून म्हणजे उबदार, आर्द्र हवा समुहांमुळे होणारा पाऊस. जर हवा कोरडी असेल, तर ती बाष्पीभवन कमी करते. ज्यामुळे ढग तयार होण्यास मदत होत नाही. कोरड्या हवेचे मान्सूनवर परिणाम होतात.
🎯 आर्द्रता कमी होणे
कोरड्या हवेमुळे वातावरणातील आर्द्रता कमी होते. ही आर्द्रता ढगांच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. आर्द्रता कमी झाल्यास ढग तयार होत नाहीत आणि पाऊस पडत नाही, ज्यामुळे मान्सून कमी होतो.
🎯 पावसाचे प्रमाण कमी
कोरड्या हवेमुळे पाऊस कमी पडतो. ढग तयार होण्यासाठी पुरेसा ओलावा न मिळाल्यास पाऊस कमी होतो किंवा कधीकधी पाऊस पडत नाही.
🎯 मान्सूनपूर्व पाऊस विश्रांती घेणार, शेतीचे कामे उरकवा
1 व 2 जून दरम्यान संपूर्ण राज्यातील चारही (मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, काेकण) विभागात पावसाची शक्यता ही विखूरलेल्या स्वरुपात आणि गडगडाटी स्वरुपात राहील. पावसाचे प्रमाण हे मुंबई, कोकण, अहिल्यानगर, पुणे आणि नाशिक या भागात जास्त राहील. कमी वेळेतच जास्त पाऊस अनुभवायला येईल. बाकी विभागात 1 जूनपासून ते 6 जूनपर्यंत सूर्यदर्शन राहील. यावेळी शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणीसह शेतीच्या हंगामपूर्व मशागतीची कामे उरकून घ्यावी. पुढे जमिनीत पुरेसा ओलावा आल्यानंतरच पेरणीचा (Sowing) निर्णय घ्यावा. 7 ते 10 जून दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ तसेच मराठवाड्यातील हिंगोली, नांदेड या भागात मोजक्याच ठिकाणी पाऊस राहील.
साधारण पेरणीलायक पाऊस हा विदर्भात 13 ते 17 जून, मराठवाडा 21 ते 28 जून आणि उत्तर महाराष्ट्रात 17 ते 21 जून पासून अपेक्षित आहे. ज्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, त्यांनी आताच्या मान्सूनपूर्व ओलीवर पेरणी केली तरी चालेल.