Monsoon rain : मान्सून महाराष्ट्रात दाखल
1 min read
Monsoon rain : मान्सून (Monsoon) शनिवारी (दि 24 मे) एका दिवसात केरळ व तामिळनाडू ओलांडून कर्नाटकापर्यंत पोहोचला. मान्सूनने रविवारी (दि. 25 मे) संपूर्ण गोवा काबीज करीत दक्षिण कोकणातील वेंगुर्ला, सावंतवाडी, कुडाळपर्यंत मजल मारली. विशेष म्हणजे, यावर्षी मान्सूनने त्याच्या नेहमीच्या वेळेपेक्षा 11 दिवस आधी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे.
🪀 कोकण व गोव्यात पाऊस
रविवार (दि. 25)पासून संपूर्ण आठवड्यात म्हणजे शनिवार (दि. 31 मे) पर्यंत मुंबईसह संपूर्ण कोकणातील 7 जिल्ह्यात जोरदार ते अति जोरदार पावसाची (Rain) शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर व प्रभाव अधिक राहील.
🪀 उर्वरित महाराष्ट्रातील पाऊस
कोकण वगळता खानदेश, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ अशा उर्वरित महाराष्ट्रातील 29 जिल्ह्यात रविवार (दि. 25 मे) व सोमवारी (दि. 26 मे ) जोरदार पावसाची शक्यता जाणवत असून, मंगळवार (दि. 27 मे)पासून पावसाचा जोर काहीसा कमी हाेईल. पाऊस केवळ भाग बदलत मध्यम पावसाची शक्यता जाणवते. अर्थात मान्सूनच्या महाराष्ट्रातील वाटचालीनुसार आता यापुढे पावसाची कमी अधिक तीव्रता जाणवेल.
🪀 खरीप पिकांची पेरणी
यावर्षी मे महिन्यात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसामुळे जमिनीत भरपूर ओल निर्माण झाली आहे. परंतु, पुढील मशागतीस सध्या वाफसा नाही. त्यातच मान्सूनने रविवारी महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. वाफस्यासह मे महिन्यातच जर पेरणी केली तर ती पेरणी वेळेआधीची आणि अतिआगाप ठरू शकते. कारण उष्ण-सवहनी प्रक्रियेतून अवकाळी पावसाने मिळालेली जमीन ओल आणि प्रशांत महासागरातून मान्सूनी वाऱ्यांनी वाहून आणलेल्या आर्द्रतेतून झालेल्या मान्सूनच्या पावसानंतर पूर्वओलीस मिळालेल्या थंडाव्यातील ओलीची साथ यात नक्कीच फरक आहे, असे वाटते. मान्सूनच्या चांगल्या पावसानंतर जमीन ओलीस अधिक थंडावा मिळाल्यनंतरच जूनमध्ये शेतकऱ्यांनी चांगल्या वाफस्यावरच पेरणीचा विचार करावा, असे वाटते. अर्थात याबाबतचा निर्णय शेतकऱ्यांनी आपल्या स्वतःच्या विवेकानुसार घ्यावा, असे वाटते.