Cichlid fish : पिल्लांची काळजी घेणारे सिकलिड मासे
1 min readया वेळी पेटी साफ केल्यानंतर नेहमीप्रमाणे माशांच्या टाकीतील देखावा न ठेवता त्यात समुद्रातली रेतू टाकायचं ठरवलं आणि काही दगड-गोटे आणि रेती घालून टाकीच सुशोभीकरण केलं. बोईसरला जाऊन तीन जोडी पोलार सिकलिड जातीचे मासे घेऊन आलो. या आधी देखील मी ह्या जातीचे मासे पाळले होते. तेव्हाही त्यांना भरपूर पिल्ले झाली होती. पण, एक किंवा दोन दिवस पलीकडे ती जगत नसत. कारण त्यांना जीवनाच्या सुरुवातीला आवश्यक असलेलं शेवाळ माशांच्या टाकीत तयार होत नसे. पण यावेळी मात्र समुद्रातील रेती वापरल्यानं आणि टाकी साफ करताना केलेल्या आळस पणामुळे मी रेती स्वच्छ धुतली नाही, ज्यामुळे त्यात बरेच क्षार आणि खनिजे तशीच राहिली असावी. परिणामी, तीन एक आठवड्यात माशांच्या टाकीत काचेवर आतल्या बाजूला शेवाळ उगवल. बायको कित्येकदा ती शेवाळ साफ कर म्हणून ओरडत होती आणि मी मात्र दुर्लक्ष करत होतो.
त्यात इकडे टाकीत मात्र तिन्ही माशांनी टाकी मधले वेगवेगळे कोपरे निवडले आणि दगडांच्या आडोश्याला खड्डा खोदणे सुरू केलं. एखादी जोडी दुसऱ्या माश्याच्या अंगणात गेली की, लगेच तिथली जोडी दुसऱ्या जोडीला हुसकावून लावत असे. त्यांच्या ह्या व्यवहारावर मी बारीक लक्ष ठेवत होतो. कधी कधी मुद्दामून हे मासे एकमेकांवर धूळ तोंडात पकडून फेकत असत आणि माझ्या अंगणात का आलास आला तर धूळ फेकून मारेन, असं करत असत.
पुढे काहीच दिवसात पहिल्या जोडीनं अंडी दिली. अगदी लहान रव्याच्या दाण्याइतकी असतील ती. सिक्लिड जातीतले मासे अंडी घालतात आणि जोपर्यंत पिल्ले बाहेर येत नाहीत, तोवर ते अंड्यांच्या भोवती पहारा देत राहतात. दोघंही आई आणि बाप मिळून अंड्यांना पहारा देत होते. बरोबर 24 तासांनी लहान लहान पिल्ले अंड्यातून बाहेर पडली आणि त्या वेळी बहुतेक पिल्लांना पोहता येत नव्हते. ती थोडा वेळ पंख हलवून लगेच वाळूपासून एक दोन इंच वर येऊन दमून खाली बसायची. त्यावेळी आपल्या पिल्लांना कोणी खाऊ नये म्हणून दोघं आई बाप खूप काळजी घेत होते. काही पिल्ले दुसऱ्या जोडीच्या हद्दीत गेली की लगेच दोघंही जाऊन तोंडात पकडून त्यांना त्यांच्या घरट्यात (वाळूच्या खड्ड्यात) आणून ठेवत.
\
हा क्रम सुरू होता, त्यावेळी नेहमीप्रमाणे या वेळी देखील लवकरच ही पिल्ले मरून जातील असं वाटत होत. पण, सुदैवाने माझा आळस त्यांच्यासाठी वरदान ठरला. काचेवर उगवलेले लहान लहान शेवाळ पिल्ले खाताना मी पाहिले आणि माझ्या आळशीपणामुळे ह्या पिल्लांना जीवनावश्यक असलेलं शेवाळ टाकीवर उगवलं होत. जर मी समुद्रावरची रेतु नीट धुवून मग टाकीत घातली असती तर, कदाचित शेवाळ उगवण्यासाठी आवश्यक असलेली खनिजे देखील वाहून गेली असती, पण तसे झाले नाही. ना मी माझ्या बायकोचं ऐकून काच साफ केली, त्यामुळे काचेवर शेवाळीचा पातळ थर जमा झाला. ज्यावर ही पिल्ले चरायला लागली आणि मग मी दर रोज तासनतास ही पिल्ले काय करतात ? त्यांचे आई बाबा त्यांचं संगोपन कसे करतात, हे उत्सुकतेने पाहत होतो. हळूहळू पिल्ले मोठी झाली. तब्बल आठवडाभर दोन्ही मासे आपल्या पिल्लांच्या सोबत चरायला निघत होते. त्यांचं वागणं पिल्ले फिर्वणाऱ्या कोंबडीप्रमाणे. आपल्या पिल्लांवर लक्ष ठेवत. एखाद पिल्लू लांब गेलं की, लगेच त्याला तोंडात पकडून आणून दगडात असलेल्या गुहेत आणून टाकत. टाकीची लाईट बंद केली, अंधार पडला की, सगळी पिल्ले क्रमाक्रमाने तोंडात पकडून दोघं आई बाप आपल्या खड्ड्यात नेत आणि पिल्ले देखील एकमेकांच्या जवळ थांबून त्यावर आई आणि वडील मासे जागता पहारा देत असत. हे तब्बल आठवडाभर चाललं मग पिल्ले थोडी मोठी झाली आणि आत्ता ती शेवाळीसोबत आणखी खाद्य देखील खाऊ लागली. तोवर दुसऱ्या आणि शेवटी तिसऱ्या जोडीने देखील पिल्ले दिली.
आता मात्र एक नवीनच चित्र मी पाहिलं. पहिल्या जोडीच्या माशांची पिल्लं थोडी मोठी झाली होती. त्यामुळे पहिली जोडी पुन्हा विणीच्या तयारीत होती. अश्यात शेजाऱ्यांना देखील पिल्ल झाली.आता मात्र दोन्ही जोड्यांकदे स्वत:ची पिल्ले होती, कदाचित त्यामुळेच किकाय पहिल्या जोडीला मातृत्वाच्या उकळ्या फुटल्या असाव्या. ज्यामुळे शेजाऱ्याच एखादं पिल्लू आपल्या हद्दीत आणलं की लगेच पहिली जोडी त्याला पकडून आपल्या घरट्यात न्यायची. असं करता करता पहिल्या जोडीनं दुसऱ्या जोड्डीची तब्बल तीस एक पिल्ले चोरली आणि दोन्ही जोड्या आता आपआपल्या पिल्लांची काळजी घेणं सुरू आहे आणि पहिल्या वेळेची पिल्ले आता आत्मनिर्भर झाली आहेत. लवकरच त्यांना मोठ्या टाकीमधून लहान टाकीत हलवायचा विचार आहे. बघु या वेळ कधी मिळतो.
तो वेळ मिळो ना मिळो, निरीक्षण करण्यासाठी आपल्याकडे वेळच वेळ आहे. ह्यातून निसर्ग किती अद्भुत आहे आणि अगदी लहान माशांना देखील पिल्लांची काळजी कश्याप्रकारे असते आणि काळजी जर घेतली नाही तर, आपली पिल्ल कश्याप्रकारे दुसर कोणी तरी पळवून नेईल, त्यानंतर तुमची लेकरं तुमची न राहता त्यांची काळजी जो घेईल, त्यांनाच आई वडिलांचा दर्जा देतात, हेही निसर्गाकडून शिकायला मिळालं.
तूर्तास रजा घेतो. बिन भिंतीची उघडी शाळा, सारे इथले गुरू, झाडे, वेली, पशू पाखरे यांशी दोस्ती करू. निसर्गच मोठा गुरू आहे.