krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton Import : ऑस्ट्रेलियातून कापसाची आयात, दरवाढीसाठी निर्यात वाढवा!

1 min read
Cotton Import : डिसेंबर-2022 च्या सुरुवातीपासून देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर (cotton price) दबावात यायला सुरुवात झाली. त्यातच देशांतर्गत फ्यूचर मार्केटमधील (Futures Market) जानेवारी-2023 मधील कापसाचे वायदे बंद झाल्याने व्यापारी व शेतकऱ्यांना कापसाच्या दराबाबतचे अंदाज येणेही बंद झाले. या महिनाभरात कापसाचे दर 400 ते 800 रुपये प्रति क्विंटलने खाली आले. बाजारातील कापसाची आवक (Arrival) सुरुवातीपासून मंदावली असल्याने सूत आणि कापड उद्याेजकांची तर दर खालावल्याने कापूस उत्पादकांची चिंता वाढली असतानाच केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्याेग मंत्रालय (Ministry of Commerce and Industry) अंतर्गत येणाऱ्या अंतर्गत येणाऱ्या विदेश व्यापार संचालनालयाने (Department of Commerce Directorate General of Foreign Trade) बुधवारी (दि. 28 डिसेंबर 2022) सात ऑस्ट्रेलियन शेतमाल आयात शुल्क मुक्त (Free import duty) केल्याचा निर्णय घेत अधिसूचनाही जारी केली. या शेतमालात कापसाचाही (Cotton) समावेश आहे.

🌎 भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य व व्यापार करार
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आर्थिक सहकार्य व व्यापार करार (Ind-Aus ECTA – India-Australia Economic Cooperation and Trade Agreement) करण्यात आला आहे. या करारांतर्गत ऑस्ट्रेलियातून मसूर (Lentils), बदाम (Almonds), संत्रा (Orange, mandarins), पियर्स (Pears), कापूस (Cotton) हा शेतीमाल हा शेतीमाल भारतात आयात केला जाणार असून, ही आयात नवीन नाेटिफिकेशन (Notification) येईपर्यंत आयात शुल्क मुक्त असेल. या आयातीत शेतीमालाचा काेटाही ठरविण्यात आला असून, त्यात पूर्वीच्या तुलनेत भरमसाठ वाढ करण्यात आली आहे.

🌎 आयातीत शेतीमालाचा काेटा व त्यातील वाढ (मेट्रिक टन)
🔆 शेतीमाल – सन 2022 – सन 2023
🔆 मसूर – 1,233 – 1,50,000
🔆 बदाम – 279 – 34,000
🔆 संत्री – 113 – 13,700
🔆 मॅन्डेरिन – 113 – 13,700
🔆 पियर्स – 30 – 3,700
🔆 कापूस (28 मिमी) – 419 – 51,000
🔆 (कापसाचा आयात शुल्क काेटा हा 51 हजार मेट्रिक टन म्हणजे 3 लाख गाठी असेल. प्रति गाठ 170 किलाे रुई.)

🌎 कापसावरील आयात शुल्क
केंद्र सरकारने फेब्रुवारी 2021 मध्ये कापसाच्या आयातीवर 11 टक्के आयात शुल्क लावला. 1 सप्टेंबर ते 31 ऑक्टाेबर 2022 या काळात हा आयात शुल्क कारण नसताना तात्पुरता हटवण्यात आला हाेता. यावर्षी कापसाचे घटते उत्पादन आणि वाढता उत्पादन खर्च विचारात घेता कापसाला प्रति क्विंटल किमान 9 ते 10 हजार रुपये दर मिळेल, अशी शेतकऱ्यांना आशा हाेती. मात्र, हे दर 9 हजार रुपयांच्या आसपास जात डिसेंबर 2022 मध्ये 6,900 ते 7,200 रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आले. त्यातच या हंगामाच्या सुरुवातीपासून आजवर कापसाची बाजारातील आवक स्थिर व मागील वर्षीच्या तुलनेत 12 ते 17 टक्क्यांनी कमी राहिली आहे.

🌎 सुताची आयात व परिणाम
सन 2021-22 च्या हंगामात कापसाचे दर प्रति क्विंटल 10 हजार रुपयांच्या वर जाताच ते कमी करण्यासाठी वस्राेद्याेग लाॅबीने (Textile lobby) केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला हाेता. ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये देशात चीन व ऑस्ट्रेलियातून व्हिएतनाम मार्गे माेठ्या प्रमाणात सुताची आयात (Yarn import) करण्यात आली. भारतात 28 काऊंट सुताचे दर प्रति किलाे 19 रुपये असताना चीन व ऑस्ट्रेलियातून 10 रुपये प्रति किलाे दराने सूत आयात करण्यात आले. त्यासाठी चीन व ऑस्ट्रेलियन सरकारने त्यांच्या सुताला माेठा इन्सेंटिव्ह दिला. भारतीय सुताची मागणी घटल्याने रुईच्या गाठींची मागणी घटली. रुईची घटती मागणी आणि सेबीने फ्यूचर मार्केटमधील जानेवारी-2023 मधील वायद्यांवर अघाेषित बंदी घातल्याने कापसाचे दर दबावात आले.

🌎 कापसाची आयात
देशांतर्गत बाजारातील कापसाच्या दरात घसरण हाेत असतानाच केंद्र सरकारने ऑस्ट्रेलियात कापसाच्या आयातीला परवानगी दिली. या आयातीत कापसावर 11 टक्के आयात शुल्क आकारला जाणार नसल्याने देशातील कापसाचे दर पुन्हा दबावात येण्याची शक्यता निर्माण झाली. सन 2022 मध्ये भारताने ऑस्ट्रेलियातून 419 टन कापूस आयात केला हाेता. सन 2023 मध्ये मात्र 51 हजार टन म्हणजेच तीन लाख गाठी (एक गाठ 170 किलाे रुई) कापसाची आयात हाेणार आहे. हा कापूस विविध टप्प्यात भारतात येईल. कापूस आयातीची वेळ चुकीची असल्याने दर दबावात आले आहेत.

🌎 भारतातील कापूस आयात (लाख गाठी)
🔆 वर्ष गाठी
🔆 2019-20 – 15.50
🔆 2020-21 – 11.03
🔆 2021-22 – 10.50

🌎 दरवाढीसाठी निर्यात वाढविणे आवश्यक
भारतातील कापसाचा वापर आणि मागणी विचारात घेता तीन लाख गाठी कापसाची आयात फार माेठी नाही. सन 2022-23 मध्ये भारतात कापसाचा वापर किमान 322 ते 325 लाख गाठी असले. उत्पादन मात्र मागच्या हंगामापेक्षा (307.6 लाख गाठी) 15 ते 17 लाख गाठींनी कमी हाेण्याचा अंदाज आहे. ऑस्ट्रेलियातून आयात केला जाणारा कापूस 28 मिमीचा असून, भारतीय कापूस हा 30 मिमि प्लस आहे. केंद्र सरकारने भारतीय कापूस व सुताच्या निर्यातीला प्राधान्य देत इन्सेंटिव्ह जाहीर करून रुई व सुताची निर्यात केल्यास कापसाच्या दरात प्रति क्विंटल किमान 700 ते 1,200 रुपयांनी तेजी येऊ शकते. त्यासाठी भारताने सन 2022-23 च्या हंगामात कापसाच्या किमान 50 लाख गाठींची निर्यात करणे आवश्यक आहे.

🌎 कापसाची निर्यात (लाख गाठी)
🔆 वर्ष निर्यात
🔆 2015-16 – 69.07
🔆 2016-17 – 58.21
🔆 2017-18 – 67.59
🔆 2018-19 – 43.55
🔆 2019-20 -47.04
🔆 2020-21 – 77.59
🔆 2021-22 – 46.00

🌎 बंद व्यवहार व दरवाढीचा अंदाज
प्रतिकूल हवामान, घटते उत्पादन, किडींचा प्रादुर्भाव, दुष्काळ यासह अन्य बाबींमुळे जागतिक बाजारातील कापसाचे दर प्रभावित हाेतात. यात नाताळाच्या काळाचाही समावेश आहे. दरवर्षी 23 डिसेंबर ते 4 जानेवारी हा काळ नाताळाचा मानला जात असल्याने या काळात जागतिक पातळीवर कापूस खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद असतात. त्यामुळे दरात घसरण हाेत असल्याने व्यापारी कमी दरात कापूस खरेदी करण्यावर अधिक भर देतात. 5 जानेवारी 2023 पासून कापसाचे खरेदी-विक्री व्यवहार पूर्ववत सुरू हाेताच देशांतर्गत बाजारातील कापसाचे दर वधारण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारात रुईचे दर सरासरी 1 डाॅलर ते 1 डाॅलर 4 सेंट प्रति पाउंड दरम्यान आहेत. दरवाढीची ही पातळी विचारात घेता भारतीय बाजारपेठेतील कापसाचे दर प्रति क्विंटल 9,400 रुपयांची पातळी ओलांडण्याची शक्यता सध्यातरी कमी आहे.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!