Farm festival : वलगे वलगे… सालन पलगे! देवर्जन…शेत महोत्सव !!
1 min readया दिवशी सकाळी लवकरच शेतकरी आपल्या घरपरिवारासह शेताकडे जातात. अगोदरच्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतीत असणाऱ्या सर्व पिकांची व मातीपासून बनवलेल्या पांडवांची (पंचमहाभूते) पूजा करतात. तर एक व्यक्ती एका रंगविलेल्या माठामध्ये अंबिल भरून त्याचा गावातील ग्रामदेवतेस नैवेद्य दाखवून शेतात कोपीवर आणले जाते. ज्वारी व बाजरीचे उंडे, आंबट भात, सर्व भाज्यांपासून तयार केलेली “भज्जी”, खीर, आंबिल असे एक ना अनेक पदार्थांचा नैवेद्य केला जातो. बनविलेल्या सर्व पदार्थांचा प्रसाद म्हणून वनभोजनाच्या रुपात आस्वाद घेतात.
सणानिमित्त एकमेकांना जेवण्यासाठी आमंत्रणे दिली जातात. ज्यांच्याकडे शेती नाही अशांना आवर्जुन जेवायला शेतात बोलावले जाते. शहरी भागातील लोकांसाठी तर हा सण म्हणजे पर्वणी असतो. या दिवशी उस्मानाबाद व लातूर शहरात तर अघोषित संचारबंदीच असते. शहरे ओस व खेडी माणसांनी व आनंदाने हर्षोल्हासीत झालेली असतात. काही भागात या दिवशी पतंग उडविले जातात. तर काही भागातील लोक सायंकाळी गावात एकत्र जमून ताकदीचे खेळ खेळतात.
एकंदरीत विचार करता इतर सणांमध्ये आढळणारी निसर्गाची हानी या सणांत नाही! याउलट माणसाला निसर्गाजवळ घेऊन जाऊन त्याचे निसर्गाशी घट्ट नाते विणणारा हा सण! रंगीत फुलांच्या मुकुटासह नटलेला करडा, कापणीसाठी आलेली तूर, परिपक्व होऊ लागलेला हरभरा, हवेच्या तालावर नाचणारा गहू, पाखरांना खुणावणारी पोटऱ्यातील ज्वारी असा चोहीकडे दिसणारा हिरवागार आणि प्रसन्न निसर्ग! अशा वातावरणात ऊन, वारा, पाऊस या निसर्ग शक्तींसमोर नतमस्तक होऊन केलेली ही पूजा म्हणजे शेतकरी व निसर्गाची शतकानुशतके चालत आलेली भागीदारीच दर्शविते.
आपल्या सर्वांना ‘वेळ अमावस्ये’च्या अनेक शुभेच्छा!