krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Gram pod borer : हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन

1 min read
Gram pod borer : शेतकरी बंधुंनाे! आगामी काही दिवसात विशेषत: फुलोरा अवस्थेत हरभऱ्याच्या पिकावर (Gram crop) घाटेअळीचा (Pod borer) प्रादुर्भाव होऊ शकतो. तेव्हा शेतकरी बंधुंनी या किडी विषयीच्या मूलभूत बाबी जाणून घेणे गरजेचे आहे.

🟢 घाटेअळीची ओळख व नुकसानीचा प्रकार
✳️ हरभऱ्यावरील घाटे अळीचा मादी पतंग नवतीच्या पानावर, कोवळ्या शेंड्यावर, कळ्यावर व फुलावर एक एक अशी एकेरी खसखशीच्या दाण्यासारखी अंडी घालतो. या अंड्यातून साधारणत: दोन ते तीन दिवसात अळी बाहेर पडते.
✳️ ही अळी सुरुवातीला पानावरील हरितद्रव्य खरडून खाते. त्यामुळे पाने प्रथम पिवळसर पांढुरकी होऊन वाळतात व गळून पडतात. या अळ्या थोड्या मोठ्या झाल्यावर हरभऱ्याची पूर्ण पाने कोवळी देठे खाऊन फस्त करतात.
✳️ या किडीच्या तीव्र प्रादुर्भाव झाला असता झाडावर फक्त फांद्या शिल्लक राहतात. पुढे हरभऱ्याला फुले लागल्यावर व घाटे लागल्यावर या अळ्या फुले व घाटे यांचे नुकसान करतात.
✳️ मोठ्या झालेल्या अळ्या घाट्यांना छिद्र करून आतील दाणे खाऊन घाटे पोखरतात. एक घाटेअळी संपूर्ण कालावधीत हरभऱ्यात 30 ते 40 घाट्यांचे नुकसान करू शकते.

🟢 घाटेअळीसाठी एकात्मिक व्यवस्थापन योजना
✳️ हरभरा पिकात नैसर्गिक पक्षी थांबे नसल्यास ताबडतोब हरभऱ्याचे शेतात बांबूचे त्रिकोणी पक्षी थांबे प्रति हेक्‍टर 20 पक्षी थांबे या प्रमाणात शेतात लावावे. त्यामुळे पक्षांना आकर्षित करून पक्ष्यांद्वारे अळ्या वेचून खाण्याचे काम सोपे होण्यास मदत होते.
✳️ हरभरा शेतात शेतकरी बंधुंनी घाटे अळीच्या सनियंत्रणाकरिता एकरी 2 म्हणजेच हेक्टरी 5 कामगंध सापळे पिकाच्या उंचीच्या वर साधारणत: एक ते दीड फूट उंचीवर Helilure या कामगंध गोळीसह लावावे.
✳️ या कामगंध सापळ्यात सतत 2 ते 3 दिवस 8 ते 10 घाटेअळीचे नर पतंग ही सरासरी आढळल्यास घाटे अळीच्या व्यवस्थापनाकरिता व्यवस्थापन उपाययोजना अंमलात आणावयाची आहे, असा त्याचा संकेतार्थ घ्यावा.
✳️ शेतकरी बंधुंनो, वेळोवेळी हरभरा पिकात निरीक्षणे घ्यावी. हरभरा पिकात 1 ते 2 घाटे अळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास किंवा सरासरी 5 टक्के हरभऱ्याच्या घाट्यांचे नुकसान आढळून आल्यास आर्थिक नुकसानीची पातळीच्या आधारावर घाटे अळीच्या व्यवस्थापनासाठी खालील प्रमाणे कीटकनाशकाची फवारणी करावी.
✳️ पहिली फवारणी साधारणत: 40 ते 50 टक्के फुलोऱ्यावर हरभरा असताना करावी. यात पिकावर 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 20 मिली अधिक 10 लिटर पाणी या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका बाबीची पहिली फवारणी करावी.
✳️ दुसरी फवारणी पहिल्या फवारणीनंतर साधारणत: 15 दिवसांनी करावी. यात पिकावर इमामेक्टीन बेंजोएट 5 टक्के SG 4.4 ग्रॅम अधिक 10 लिटर पाणी किंवा Ethion 50 टक्के प्रवाही 20 मिली अधिक दहा लिटर पाणी किंवा Chlorantraniliprole 18.5 टक्के SC 2.5 मिली अधिक दहा लिटर पाणी
या प्रमाणात घेऊन कोणत्याही एका कीटकनाशकाची योग्य निदान करून आर्थिक नुकसानीची पातळी लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली गरजेनुसार फवारणी करावी.

🟢 फवारणी करताना ही काळजी घ्या
✳️ फवारणी करताना लेबल क्‍लेम शिफारशीची शहनिशा करून लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणेच रसायनाचा वापर करावा.
✳️ फवारणी करताना शिफारशीत मात्रेत कीटकनाशकाचा वापर करावा तसेच अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी.
✳️ फवारणी करताना एकाच कीटकनाशकाचा सतत वापर करू नये तसेच लेबल क्‍लेम शिफारशीप्रमाणे कीटकनाशक बदलून कीटकनाशकाचा वापर करावा.
✳️ फवारणी करताना सुरक्षा किटस चा वापर करावा तसेच फवारणी करताना सुरक्षित फवारणी तंत्राचा वापर करावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!