krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Lockdown : पुन्हा लाॅकडाऊन का नको?

1 min read
Lockdown : चीनसह जगातील इतर काही देशांमध्ये कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावाचा धसका घेत भारतात पुन्हा लॉकडाऊन करण्याचे नियोजन सुरू असल्याचे दिसते. लाॅकडाऊनमुळे आरोग्याला व अर्थव्यवस्थेला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होत असल्यामुळे सरकारने पुन्हा लॉकडाऊन (Lockdown) घोषित करू नये. तसे केल्यास स्वतंत्र भारत पार्टी लाॅकडाऊन न पाळण्याचे आंदोलन जाहीर करेल, असा इशारा स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसचा (Corona virus) नवीन व्हरीयन्ट (Variant) जगभर झपाट्याने पसरतो आहे व मोठ्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत, असा खोटा प्रचार प्रसारमाध्यमांत जोर धरत आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पुन्हा मास्क वापरण्याची सक्ती आणि लाॅकडाऊन लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनने (Indian Medical Association) सावधानतेचा उपाय म्हणून, सार्वजनिक जागेत मास्क (Mask) वापरण्याची सक्ती, फिजिकल डिस्टन्सिंग (Physical distancing), सर्व प्रकारचे सार्वजनिक, राजकीय कार्यक्रम, लग्न, सार्वजनिक मेळावे घेण्याचे टाळावे, अशा मार्गदर्शक सूचना राज्यांना दिला आहेत. आंतरराष्ट्रीय प्रवास टाळण्याच्या सूचना करण्यात आल्या असून, सर्व विमान प्रवाशांना लसीकरण सक्तीचे केले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची कोविड चाचणी व लक्षणे आढळल्यास त्यांना विलगीकरणात ठेवण्याच्या सूचना 22 डिसेंबर 2022 रोजी दिल्या आहेत.

याची पुढील पातळी म्हणजे लाॅकडाऊन. मागील लाॅकडाऊनमध्ये देशाचे मोठे नुकसान झाले आहे. जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला, कामगारांना हजारो किलाेमीटर पायी चालत जावे लागले. व्यापार व कारखानदारी ठप्प झाली. अनेक जण कर्जत बुडाले. कोविड नियंत्रण यंत्रणेत मोठे भ्रष्टाचार झाल्याचेही नंतर उघड झाले आहे. आता कुठे उद्योग व्यवसाय सुरळीत होऊ पाहत आहेत. अशात पुन्हा लाॅकडाऊन लावल्यास जनतेचे प्रचंड हाल व देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येणार आहे.

ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या अभ्यासात हे निष्पन्न झाले आहे की, ज्या देशांमध्ये कडक लाॅकडाऊन पाळले गेले, तेथे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. अर्थव्यस्थेवर अनिष्ट परिणाम झाले. लहान मुलांच्या आरोग्यावर दुष्परिणाम झाले, असे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. ज्या देशांनी लाॅकडाऊन पाळले नाही, त्यातील स्वीडनमध्ये कोविड काळात मृत्युदर, लाॅकडाऊन करणाऱ्या देशांपेक्षा कमी आहे. कोविड महामारी, स्पॅनिश फ्लूपेक्षा 50 ते 500 पटीने कमी आहे, असे त्यांचे म्हणणे आहे.

स्वतंत्र भारत पार्टीने पहिल्यापासूनच सक्तीच्या लाॅकडाऊनला विरोध केला आहे. सरकारने जर पुन्हा आशा निरुपयोगी, त्रासदायक व नुकसानकारक लाॅकडाऊनची घोषणा केली तर, स्वतंत्र भारत पार्टी त्याला जाहीर विरोध करेल व स्वतःची काळजी घेत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्याचे जनतेला आवाहन करणार आहे. पुन्हा लाॅकडाऊन न करण्याबाबतचे विनंतीपत्र आरोग्य मंत्रालयाला देण्यात येणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!