Turmeric futures market : हळदीच्या सुवर्ण झळाळीला हवे वायदे बाजाराचेच कवच
1 min read
Turmeric futures market : शेतमाल बाजारातील चढ-उतार ही नैसर्गिक बाब आहे. मात्र, केंद्र सरकारला शेतमालाच्या दरातील हा चढ-उतार नकाे आहे. वायदे बाजाराबाबत (Futures Market) शेतकऱ्यांमध्ये पाहिजे तशी जनजागृती नसली तरी अलीकडे व्यापाऱ्यांसाेबतच काही शेतकरी उत्पादक कंपन्या (Farmer Producer Company) व शेतकरी शेतमालाच्या दरातील चढ-उतार, शेतमालाची मूल्य पडताळणी (Price Discovery), भविष्यात दर (Future rate) व इतर महत्त्वाच्या बाबी बघणे, शेतमालाची खरेदी-विक्री करण्यासह इतर बाबींसाठी वायदे बाजाराचा प्रभावीपणे वापर करीत आहेत. ऑगस्ट 202 मध्ये ‘एनसीडीईएक्स’ (National Commodity and Derivatives Exchange)च्या निजामाबाद येथील गोदामातील हळदीमध्ये (Turmeric) भेसळ व गुणवत्तेबाबत तक्रारी समोर येताच एनसीडीईएक्सच्या प्राॅडक्टस् ॲडव्हायझरी कमिटीच्या (PAC – Products Advisory Committee) सदस्यांनी त्या गाेदामाची पाहणी करीत चाैकशी सुरू केली. हळदीच्या काही व्यापाऱ्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी याचे भांडवल करीत हळदीच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी केली. व्यापाऱ्यांच्या या मागणीमुळे नेमका कुणाचा कसा फायदा हाेणार आहे, कुणाचे कसे नुकसान हाेणार आहे, हे बघणे गरजेचे आहे.
♻️ प्रकरण नेमके काय आहे?
निझामाबाद येथील एनसीडीईएक्सच्या गाेदामात ठेवलेल्या माेजक्या पाेत्यांमधील हळदीत भेसळ असल्याचे एनसीडीईएक्सच्या पीएसी सदस्यांच्या निदर्शनास आले आणि त्यांनी लगेच या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत संपूर्ण गाेदामाची बारकाईने पाहणी करीत चाैकशी सुरू केली. भविष्यात असले गैरप्रकार हाेणार नाही, शेतमालाच्या गुणवत्तेला कुठेही तडा जाणार नाही, विक्रेते आणि खरेदीदार यांचे आर्थिक हित धाेक्यात अथवा संकटात येणार नाही, याची काळजी घेत या व्यवस्थेत आणखी सुधारणा करण्यासाठी एनसीडीईएक्स प्रयत्न व प्रभावी उपाययाेजना सुरू केल्या आहेत. परंतु, काही पाेत्यांमधील भेसळीचे भांडवल करून इतर पाेत्यांमधील हळदीच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणे, त्यासाठी हळदीचा वायदे बाजार बंद करण्याची मागणी करणे, या मागणीतून उत्पादकांसह विक्रेते आणि खरेदीदारांचे दर निर्णय अधिकार हिरावून घेणे, हळदीची प्राइस डिस्कव्हरी व फ्यूचर रेट संपुष्टात आणत त्यांना आर्थिक संकटात ढकलणे कितपत याेग्य आहे? ही मागणी करणाऱ्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील हळद व्यापारी आघाडीत आहेत. त्यांनी वसमत (जिल्हा हिंगाेली) येथील काही हळद व्यापाऱ्यांना हाताशी धरण्याचा प्रयत्न केला. या मागणीला हळद उत्पादक, शेतकरी उत्पादक कंपन्या, गुंतवणूकदारांसह अनेक व्यापाऱ्यांनी विराेध दर्शवित हळदीचे वायदे सुरू ठेवण्याची मागणी रेटून धरली आहे.
♻️ हळदीचे उत्पादन व निर्यात
जगात भारत हा सर्वात माेठा हळद उत्पादक व निर्यातदार देश आहे. जगातील एकूण हळद उत्पादनाच्या 75 टक्के हळदीचे उत्पादन (Production) एकट्या भारतात हाेते. सन 2023-24 च्या हंगामात जगात एकूण 13.18 लाख मेट्रिक टन हळदीचे उत्पादन झाले हाेते. यातील 10.54 लाख मेट्रिक टन हळदीचे उत्पादन भारतात झाले हाेते. सन 2022-2 मध्ये भारतात 11.69 लाख मेट्रिक टन हळदीचे उत्पादन झाले हाेते. जे जगाच्या एकूण उत्पादनाच्या 75 टक्क्यांपेक्षा जास्त होते. मसाले बोर्डाची हळद लागवड आकडेवारी विचारात घेता महाराष्ट्रानंतर सर्वाधिक लागवड तेलंगणामध्ये होते. त्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, ओडिशा, पश्चिम बंगाल या राज्यांचा क्रमांक आहे. काेराेना काळात हळदीचे दर 30 हजार रुपये प्रतिक्विंटलवर गेले हाेते. मध्यंतरी हळदीला चांगला दर मिळल्याने देशात हळदीचे लागवड क्षेत्र आणि उत्पादन वाढत आहे.
📍 हळद उत्पादनातील वाटा
🔆 भारत – 75 टक्के
🔆 चीन – 8 टक्के
🔆 म्यानमार – 4 टक्के
🔆 इंडाेनेशिया – 3 टक्के
🔆 बांगलादेश – 3 टक्के
🔆 नायजेरिया – 3 टक्के
🔆 व्हिएतनाम – 2 टक्के
🔆 इतर देश – 2 टक्के
हळदीच्या जागतिक बाजारपेठेवर भारताचे वर्चस्व असून, एकूण निर्यातीतही (Export) भारतच आघाडीवर आहे. भारत एकूण उत्पादनाच्या 10 ते 12 टक्के हळदीची निर्यात करते. गुणवत्ता (Quality) आणि कर्क्यूमिन (Curcumin)मुळे जगात भारतीय हळदीला माेठी मागणी आहे. त्यामुळे मागील काही वर्षात भारतीय हळदीची निर्यात 9 ते 11 टक्क्यांनी वाढली आहे. भारत दरवर्षी सरासरी 2 लाख मेट्रिक टन हळद 150 हून अधिक देशांमध्ये निर्यात करतो. अमेरिका, आखाती देश, इराण, मलेशिया, बांगलादेश हे भारतीय हळदीचे प्रमुख आयातदार देश आहेत.
📍 हळदीची निर्यात
वर्ष – निर्यात
🔆 2020-21 – 1 लाख 83 हजार 868 टन.
🔆 2021-22 – 1 लाख 52 हजार 758 टन.
🔆 2022-23 – 1 लाख 70 हजार 85 टन.
🔆 2023-24 – 1 लाख 62 हजार टन.
📍 हळद निर्यात व उलाढाल
वर्ष…… निर्यात… उलाढाल
🔆 2019-20 – 1,37,650 टन – 1,286 काेटी रुपये.
🔆 2020-21 – 1,83,868 टन – 1,722 काेटी रुपये.
🔆 2021-22 – 1,52,758 टन – 1,564 काेटी रुपये.
🔆 2022-23 – 1,70,085 टन – 1,666 काेटी रुपये.
सध्या देशातील एकूण उत्पादनाच्या 5 ते 7 टक्के हळद शेतकऱ्यांकडे शिल्लक असून, किमान 90 टक्के हळद व्यापाऱ्यांकडे आहे. त्यांनी ती 10 ते 15 हजार रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करून गाेदामांमध्ये ठेवली आहे.
♻️ एनसीसीएलचे गाेदाम आणि शेतमालाचे निकष
वायदे बाजारात साैदे करून शेतमाल विकणाऱ्यांना त्यांचा शेतमाल एनसीडीईएक्सच्या गाेदामांमध्ये (Warehouse) ठेवावा लागताे आणि त्या गाेदामांमधून खरेदीदार त्या शेतमालाची उचल करताे. या गाेदामात शेतमाल ठेवण्यापूर्वी त्याच्या दर्जाच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व निकष पूर्ण करणे बंधनकारक असते. याच निकषांची पडताळणी करून एनसीसीएल विक्रेत्यांकडून शेतामाल स्वीकारते आणि त्याचे नमुने घेऊन व माेजमाप करून ताे गाेदामात ठेवते. त्यामुळे गाेदामात निकृष्ट प्रतिचा अथवा भेसळ शेतमाल जाण्याची शक्यता खूपच कमी असते. निझामाबाद हे एनसीडीईएक्सचे हळदीचे बेंचमार्क असल्याने तिथे त्यांचे गाेदाम आहे. त्याच गाेदामात ती हळद व्यापाऱ्यांनी ठेवली आहे. एनसीसीएल (NCCL – National Commodity Clearing Limited)ही कंपनी एनसीडीईएक्सला गाेदाम सुविधा पुरवित असल्याने या दाेन कंपन्यांमध्ये तसा करार झालेला आहे. या गाेदामातील काही पाेत्यांमध्ये आढळून आलेली हळदीची भेसळ ही गंभीर बाब असली तरी हा खाेडसाळपणा काही व्यापाऱ्यांनी गाेदाम व्यवस्थापनातील स्थानिक व्यक्तींना हाताशी धरून केल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट हाेते.
♻️ शेतमालातील भेसळीची प्रथा
शेतमालात भेसळ करून पैसा कमावण्याची सवय अनेक व्यापाऱ्यांना फार पूर्वीपासून जडली आहे. देशातील कृषी उत्पन्न बाजार समित्या या भेसळीचे प्रमुख केंद्र आहे. व्यापारी त्यांच्या भाषेत या भेसळीला ‘पाला करणे’ असे संबाेधतात. या भेसळीतून ते व्यापारी चांगले पैसे कमावतात. ही भेसळ काही व्यापारी करीत असले तरी त्याचे खापर मात्र शेतकऱ्यांच्याच माथी फाेडले जाते. निझामाबाद येथील गाेदामातील भेसळीचा प्रकार हा याच मानसिकतेतून करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील पाच ते सहा व्यापाऱ्यांना हाताशी धरून हा प्रकार केल्याची चर्चाही ऐकायला मिळाली.
♻️ सांगलीतील व्यापारी
सांगलीतील या व्यापाऱ्यांचा हळदीच्या बाजारपेठेवर जबरदस्त पकड आहे. विशेष म्हणजे ते स्वत: हळद उत्पादक असून, दर्जेदार हळदीचे उत्पादन करतात. ते त्यांच्या काही शेतकऱ्यांना हळदीच्या दर्जेदार उत्पादनासाठी सर्व प्रकारच्या कृषी निविष्ठा पुरवितात. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना वेळावेळी मार्गदर्शन करून आर्थिक मदतही करतात. या व्यापाऱ्यांकडे आज माेठ्या प्रमाणात हळदीचा साठा आहे. त्यांना हळदीच्या बाजारात पारदर्शकता नष्ट करून तेजी आणायची आहे आणि त्यांची हळद चढ्या दराने विकायची असून, पुढील हंगामात शेतकऱ्यांकडून कमी दरात हळद खरेदी करायची आहे.
♻️ विक्रेते दर निर्णय अधिकार गमावणार
मुळात वायदे बाजारात दर आधीच माहिती हाेत असल्याने विक्रेत्यांना त्यांच्या शेतमालाचा दर ठरविण्याचा माेलाचा अधिकार प्राप्त हाेताे. मे 2025 मध्ये सुरू झालेल्या वायद्यांची मुदत 20 ऑगस्ट 2025 ला संपली आहे. 1 ऑक्टाेबर 2025 ला एप्रिल 2026 चे वायदे सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे सर्वांनाच एप्रिल 2026 मधील हळदीचे दर ऑक्टाेबर 2025 मध्येच कळणार आहेत. वायदे बाजार आणि हळदीच्या दरातील ही पारदर्शकता काही व्यापाऱ्यांना संपुष्टात आणायची आहे. ते वायदे खुले करू नका, अशी मागणी करीत हे व्यापारी इतरांचा दर निर्णय अधिकार हिरावून घेत आहेत. ते स्वत: आर्थिक स्वार्थासाठी शेतकऱ्यांसह इतरांची दिशाभूल करीत आहे. हळदीच्या वायद्यांवर बंदी घातल्यास हळद विक्रेते त्यांचा दर निर्णय अधिकार गमावणार आहे. व्यापाऱ्यांच्या दबावाला बळी पडून केंद्र सरकारने सन 2007 मध्ये तुरीच्या वायद्यांवर बंदी घातली. ती आजतागायत कायम आहे. 20 डिसेंबर 2021 पासून साेयाबीन व साेया काॅम्प्लेक्स, माेहरी व माेहरी काॅम्प्लेक्स त्यानंतर हरभरा, गहू, मूग, बिगर बासमती तांदूळ व कच्च्या पामतेलाच्या वायद्यांवर 31 मार्च 2026 पर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे या शेतमालाचे दर निर्णय अधिकार उत्पादकांनी गमावले आहेत. या सर्व शेतमालाचे दर वर्षभर दबावात राहण्याचे प्रमाण वाढले असून, उत्पादक शेतकऱ्यांना किती व कसे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे हे सर्वश्रृत आहे.
♻️ कुणाचे नुकसान, कुणाचा फायदा?
वायदे बंद केल्यास हळदीची मूल्य पडताळणी (Price Discovery) संपुष्टात येणार आहे. वायद्यांवर बंदी घातल्यास हळदीची प्राइस डिस्कव्हरी संपुष्टात येऊन शेतकरी, गुंतवणूकदार, प्रक्रियादार, इतर व्यापारी व निर्यातदारांना फ्यूचर रेट कळणार नाही. त्यांना दराबाबत अंदाज बांधणे कठीण जाईल. ते त्यांचे दरावरील नियंत्रण गमावणार असल्याने या सर्वांचे माेठे आर्थिक नुकसान हाेणार आहे. माेजकेच व्यापारी हळदीचे दर नियंत्रणात ठेवतील. ते शेतकऱ्यांकडून कमी दरात हळद खरेदी करीत प्रक्रियादारांना चढ्या दराने विकणार असल्याने त्यांचा माेठा आर्थिक फायदा हाेणार आहे. खरेदीदार व प्रक्रिया उद्याेगांना पुढील दर कळणार नसल्याने त्यांनाही आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. शिवाय, त्यांना हवी त्या दर्जाची हळद माेठ्या प्रमाणात उपलब्ध हाेण्याची शक्यता मावळणार आहे. या सर्वांना भविष्यातील दर (Future rate) कळणार नाही. या बंदीचा हळदीच्या निर्यातीवर तसेच प्रकिया उद्याेगांना दर्जेदार हळद मिळण्यावर विपरित परिणाम हाेणार आहे. ते आर्थिक संकटात सापडणार असल्याने हळदीला वायदे बाजाराचे कवच असणे अनिवार्य आहे.