भारताने पाकिस्तानात कांदा, टोमॅटोची तातडीने निर्यात करावी
1 min readपाकिस्तानात अतिवृष्टी व महापुरामुळे पीकांचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी पाकिस्तानात कांद्याचे दर 400 रुपये तर तोमरचे दर 500 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचले आहेत.हे दर लवकरच 700 रुपये प्रति किलोपर्यंत वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाकिस्तानातील व्यापाऱ्यांनी भारतातून कांदा व टोमॅटो आयात करण्याची मागणी पाकिस्तान सरकारकडे केली आहे.
भारतात कांदा (Onion) व टोमॅटोला(Tomato) अजूनही उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. भाव मिळत नसल्याने कांदा चाळींमध्ये सडतो आहे तर शेतकऱ्यांना टोमॅटो नाईलाजाने रस्त्यावर फेकावे लागत आहे. अशा परिस्थितीत भारताने पाकिस्तानला कांदा व टोमॅटो निर्यात करण्याचा निर्णय घेतला तर भारतीय कांदा व टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव व दिलासा मिळेल.
भारतात कांदा व साखरेचे दर नियंत्रित करण्यासाठी अनेक वेळा भारताने पाकिस्तानातून कांदा व साखरेची आयात केली आहे. सीमेवर कारगिलचे युद्ध सुरू असताना मोठ्या प्रमाणात साखरेची आयात करण्यात आली होती. भारताने पाकिस्तानला मदत करण्याचा हेतूने नव्हे तर भारतातील कांदा व टोमॅटो उत्पादक शेयकऱ्यांना मदत करण्यासाठी ही निर्यात करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी स्वतंत्र भारत पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी भारतीय शेतकऱ्यांच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व परराष्ट्र व्यवहार मंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली आहे.