krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

विद्यार्थ्यांनो! विद्यार्थी बना

1 min read
शेतकरी संघटनेचे काम मी पंधरा वर्षांपूर्वी चालू केलं. मी काही शेतकऱ्याचा मुलगा नाही. माझ्या गेल्या पाच पिढ्यांत कुणी शेती केली नाही. परदेशातून आल्यानंतर शेतजमीन घेऊन मी शेतकरी बनलो आणि शेतकरी संघटनेच्या कामाला लागलाे. याचं कारण शेतकरी संघटनेच्या सुरुवातीच्या सभांमधून मी सांगितलं आहे. त्यावेळी मी म्हणायचो, 'स्वातंत्र्य मिळालं, इंग्रज या देशातने गेला की दारिद्र दूर होईल, दुःख दूर होईल, देश संपन्न होईल. आज जसं आपण अमेरिका, स्वित्झरलंड या देशांची संपन्नता ऐकतो, तसा हिंदुस्थान बनेल असं स्वप्न आम्हाला गांधीजींनी दाखवलं होतं. तेहेतीस वर्षानंतर आम्ही प्रत्यक्षात असं पाहतो आहो की, गरीबी दूर झाली नाही, गरीबी वाढली, भ्रष्टाचार वाढला. जवळजवळ सगळं वाईटच झालं. उदाहरणार्थ, आता आपल्याला खायला लागणारं पुरेसं अन्न शेतकरी स्वतः पिकवतो, अमेरिकेतून जहाजातून ते आणावं लागत नाही. तसंच, आजपर्यंत देशाच्या सरहद्दी जवळजवळ शाबूत आहेत, जवानांना धन्यवाद द्यायला पाहिजेत; पण अशा काही अपवादात्मक प्रकाशशलाका सोडल्या तर बाकी सारा अंधारच आहे, तो का? असा प्रश्न मला पडला आहे.' आणि स्वातंत्र्य मिळालं पण त्यानंतर देश भरकटला आहे त्याची चिंता वाटली म्हणून मी शेतकरी संघटना काढली, आंदोलनं केली, तुरुंगात गेलो. आयुष्य वाऱ्यावर उधळून दिले. जे काही झालं तो सगळा इतिहास सर्वांना माहीत आहे.

यंदाच्या वर्षी स्वातंत्र्याची पन्नास वर्षे पुरी झाली. खरं म्हणजे, 15 ऑगस्ट 1947 रोजी लाल किल्ल्यावर तिरंगी झेंडा लागला त्याला पन्नास वर्षे पुरी झाली. स्वातंत्र्य मिळालं का नाही मिळालं हा मुद्दा वेगळा; पण पन्नास वर्ष पुरी झाल्याच्या निमित्तानं चांगला मोठा उत्सव चालू आहे. जिकडं पहावं तिकडं 50 आकडा आणि तिरंगी झेंड्याच्या पताका लावलेलं चिन्ह दिसत आहे, गावोगाव सभा होताहेत.स्वातंत्र्य मिळाल्यानंतर गांधी गेले, त्यांच्याबरोबर त्यांचं नेतृत्व गेलं, विचारही गेला, सगळंच गेलं. स्वातंत्र्यानंतर देशानं पंडित नेहरूंचं नेतृत्व स्वीकारलं आणि नेहरू रशियाला जाऊन आले होते. त्यांनी सांगितलं की, ‘समाजवादानं देशाचं भलं होईल.’ म्हणजे, उद्योगधंदा करणारे खोटे, फायद्याकरिता काम करतात ते खोटे! देशाचं भलं व्हायचं असेल तर दिल्लीमध्ये बसून नियोजकांनी देशाचे नियोजन केलं पाहिजे आणि तुम्हा आम्हा जनसामान्यांनी सरकार सांगेल त्याप्रमाणे जी काही नोकरी असेल ती सकाळी दहा ते पाच करायची. हा विचार आपण सगळ्यांनी स्वीकारला. समाजवाद ही फार मोठी गोष्ट आहे. असं अजूनही बहुतेकांच्या मनात आहे. नेहरू रशियाला जाऊन आले असा नमुना हिंदुस्थानात तयार व्हावा म्हणून आपण प्रयत्न केला; पण आता त्या रशियाचंच दिवाळं वाजलं. म्हणजे, आमच्या स्वप्नातला आदर्शच मुळी फुटून गेला. ज्या रस्त्यानं आपण चाललो होतो तो रस्ताच मुळी चुकीचा आहे असं कळलं आणि आज स्वातंत्र्य मिळाल्याला पन्नास वर्षे झाल्यानंतर पुढारी सोडून द्या, पक्ष सोडून द्या, पण माझ्यासारख्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, तुमच्यारख्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निदान हा प्रश्न आला पाहिजे की, ‘हे काय झालं आहे? आपण जायला निघालो देवाच्या आळंदीला आणि येऊन पोहोचलो चोरांच्या आळंदीला, हे झालं कसं काय? रस्ता चुकला कुठे?’

गंमत म्हणजे हे असं होणार हे सांगणारे निदान दोन लोक होऊन गेले. पहिले, इंग्लंडचे त्यावेळचे पंतप्रधान चर्चिल. त्यांनी स्वातंत्र्य देण्याच्या वेळी सांगितलं होतं की, ‘हिंदुस्थानच्या लोकांना स्वातंत्र्य देऊ नका. यांचे पुढारी बसतात. काडीची तोशीस सोसायची यांची ताकद नाही, हे सगळे पेंढा भरलेले पुढारी आहेत; यांची नैतिक ताकद कमी, देशातल्या गोरगरिबांविषयी कळवळा कमी, इंग्रज गेले म्हणजे त्यांच्या जागी बसावं आणि देशाचा सगळा फायदा आपण घ्यावा एवढीच त्यांची लालसा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर इथे पन्नास वर्षांच्या आत जातीच्या आणि धर्माच्या नावानं भांडणं लागतील; हे माझं. हे माझं म्हणून लोक भांडतील; नोकरी मला पाहिजे, मला पाहिजे असं म्हणून भांडतील आणि देशामध्ये पुन्हा एकदा ठगांचं राज्य तयार होईल, रक्ताचे पाट वाहतील.’ असं ज्यानं सांगितलं त्यांचं नाव चर्चिल, इंग्लंडचे प्रतप्रधान.

आपल्या देशात तर एक महात्मा असा होऊन गेला की ज्यानं सव्वाशे वर्षांपूर्वीच आजच्या परिस्थितीच भाकित केलं होतं. त्यावेळी नुकतेच म्हणजे 1883 साली राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. महात्मा जोतिबा फुले यांनी म्हटलं, अरे, तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस म्हणता; पण तुमच्याकडे ‘एकमय लोक’ या अर्थी राष्ट्र आहे काय? ब्राह्मणांना वाटतं आपण ब्राह्मण, मराठ्यांना वाटतं आपण मराठे, प्रत्येक जातिधर्माच्या लोकांना वाटतं की आपण या जातीचे किंवा त्या धर्माचे. कुणाला विचारलं की तू कोण आहेस, तर मी ‘हिंदी’ आहे असं सांगणारी माणसं आहेत किती? असं सांगणारी बहुसंख्य माणसं असली तर ‘राष्ट्र’ आहे आणि मग राष्ट्रीय काँग्रेस करण्यात काही अर्थ आहे आणि मग राष्ट्रीय स्वातंत्र्याचं बघता येईल. आमचा देश असा की बहुसंख्य लोकांना शाळेत जायचा अधिकार नाही, पुस्तक वाचायला अधिकार नाही, देवळात जाण्याचासुद्धा अधिकार नाही; आम्ही एकमेकांना भाऊसुद्धा समजत नाही. आज इंग्रज आहेत म्हणून त्यांच्या धाकाने दिनाद गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. जर का इंग्रज निघून गेला तर इथे पुन्हा पेशावाईचं राज्य तयार होईल आणि सर्वसामान्य माणसाचा इथे काहीही विकास होणार नाही. हे भाकीत जोतिबा फुल्यांनी सव्वाशे वर्षापूर्वी वर्तवलं होतं.

तेव्हा, आज स्वातंत्र्याच्या पन्नासाव्या वर्षी जो गोंधळ आपल्याला दिसतो आहे, तो होणार हे पहिल्यापासून स्पष्ट होतं. तरीदेखील आंधळ्यासारखे आपण चालत गेलो. माझी एकच इच्छा आहे की, आज ‘स्वातंत्र नासलं’ म्हणून आपण डोळ्यातून पाणी काढतो आहोत, पण निदान 2047 साली स्वातंत्र्याचा शंभरावा वाढदिवस येईल तेव्हातरी आपली परिस्थिती थोडी सुधारलेली असावी, आणखी खालावलेली असू नये. आज जगातल्या सगळ्यात दरिद्री, सगळ्यात भिकार देशांत हिंदुस्थानची गणना आहे. शंभर वर्षांनंतर निदान आपण दोनपाच नंबर तरी वर येऊ का? विद्यार्थी जसं परीक्षेतल्या आपल्या नंबरचा विचार करतात तसं. जगाच्या परीक्षेत हिंदुस्थान हा नापास झालेल्या देशांत आहे. शंभराव्या वर्षी तरी आपण निदान पास तरी होऊ का ही चिंता मला आहे; कारण, लोकसभेमध्ये चर्चा झाली, जी आपण टेलिव्हिजनवर पाहिली, त्यात मोठमोठी खासदार मंडळी जे बोलली ते बोलणं ऐकून माझी मोठी निराशा झाली. या लोकांना, ‘आपली वाट चुकली, नवी वाट शोधायला पाहिजे.’ हेसुद्धा माहीत नाही, आपण चाललो आहोत तीच वाट बरोबर आहे, असं ही मंडळी लोकसभेमध्ये बोलली. हे अगदी चिंताजनक आहे, यात देशाला मोठा धोका आहे.

शेतकरी संघटनेने सेवाग्राम येथे 28 ते 30 जानेवारी 1998 या दिवसात देशातल्या सगळ्या, फक्त शेतकऱ्यांची नाही, नागरिकांची एक जनसंसद आमंत्रित केली आहे. दिल्लीतल्या संसदेमध्ये जी चर्चा होऊ शकली नाही, ती लोकांनी करावी; एक दिवस लागो, दोन दिवस का कितीही दिवस लागोत. सेवाग्रामला गांधीजींचा आश्रम आहे तिथं बसावं आणि ‘स्वातंत्र्य का नासले?’ आणि ‘आता त्यातून मार्ग कसा काढायचा’ यावर चर्चा करावी, अशी ही ‘जनसंसद’ बोलावण्यामागची अपेक्षा आहे. या जनसंसदेची तयारी करताना मी जिल्हा महिला अधिवेशने आणि विद्यार्थी मेळावे घेत फिरत आहे. ’50 वर्षांत स्वातंत्र्य का नासले?’ या प्रश्नाबद्दल तुमचं मत काय आहे, सर्वसामान्य नागरिकाचं मत काय आहे? हे ऐकणं हा यामागचा उद्देश आहे. मला पुढाऱ्यांचं मत नको आहे. मला तज्ज्ञांचं मत नको आहे, अर्थशास्त्रज्ञानीच गेल्या पन्नास वर्षात सारा देश बुडवला. म्हणून मला सर्वमासान्य माणसांचं मत हवं आहे.

या विद्यार्थी मेळाव्यात प्रामुख्याने ज्यांचा शेतीशी संबंध आहे. ज्यांचे आईवडील शेतीवर आहेत असेच विद्यार्थी आहेत; शिक्षणाच्या निमित्ताने आर्णी, यवतमाळ सारख्या शहरात आलेली ही शेतकऱ्याच्या घरची मुलं आहेत. त्यांना जे सांगायचं आहे ते मी 1985 साली एका पत्रात – महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना पत्र – सांगून टाकलं आहे. प्रत्येक पक्षाची संघटना असते. ते विद्यार्थी निवडणुका लढवतात. कोणी विद्यार्थी निवडणूक लढवीत असेल तर पक्ष त्याला पैसे पुरवतो कारण यातूनच पक्षाचे नवे नेते तयार व्हावेत. मग, पक्षाने काही आंदोलन काढलं की ते विद्यार्थ्यांनाही त्यात घेऊन जातात; विद्यार्थी म्हणजे तरुण रक्ताचे, झटकन तापणाऱ्या रक्ताचे, दगडफेक करायला बरे असतात. म्हणजे फटाफट आंदोलन यशस्वी होईल आणि पक्षाचं नाव होऊन जाईल असं गणित.

शेतकरी विद्यार्थी संघटना ही विद्यार्थ्यांना आंदोलनात यायला सांगत नाही; दगड फेकायला सांगत नाही. धोंडे फेकायला सांगत नाही. विद्यार्थ्यांचा असा वापर करणं म्हणजे पुढच्या वर्षीच्या पिकाचं बियाणं यंदाच खाऊन टाकण्यासारखं आहे, असं शेतकरी संघटना मानते. मग विद्यार्थ्यांनी काय करावं असं मी त्या 1985 च्या पत्रात सांगितलं? ‘विद्यार्थ्यांनी विद्या कमवावी. अभ्यास करणं हा विद्यार्थ्यांचा धर्म आहे. तो अभ्यास त्यांनी कसा करावा? शेतकऱ्याच्या घरची मुलं विद्यार्थी म्हणून शहरात आलात, अडचणी खूप, रहायला जागा नाही. अगदी छोट्या शहरामध्येही माणसं आपल्यापेक्षा चांगली राहातात आणि पुष्कळांच्या बाबतीत एस टीने डब आल तर जेवायची सोय आहे, नाहीतर जेवणाचीही गैरसोय; आपल्याला इंग्रजी म्हटलं की, भीती वाटते आणि त्या मानाने इथे राहणाऱ्या नोकदारांची मुलं इंग्रजी पटकन शिकतात, कसा काय आपला नंबर यायचा. कसं काय आपण पास होणार अशी सतत चिंता.’ त्या पत्रात मी असंही म्हटलं की, ‘तुम्हाला आणखीही एक अडचण येणार आहे. विशेषतः अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असं लक्षात येईल की तुमच्या पाठ्यपुस्कामध्ये जे लिहिलं आहे ते खोटं आहे. उदाहरणार्थ, अर्थशास्त्राच्या पुस्तकात तुम्हाला असं लिहिलेलं सापडेल की हिंदुस्थानातील शेतकऱ्यांची परिस्थिती खूप सुधारली आहे. सरकार त्याला भरपूर मदत करतं, सूट सबसिडी देतं, खतावर सूट आहे, औषधावर सूट आहे, कर्जावर सूट आहे; वर त्याला इन्कमटॅक्स भरावा लागत नाही. त्यामुळे शेतकरी मोठा मालामाल झाला आहे. असं अर्थशास्त्राच्या पाठ्यपुस्तकात लिहिलेलं आहे आणि ही पुस्तकं चागल्या जाणकारांनी, तज्ज्ञांनी लिहिलेली आहेत; पण तुम्हाला माहिती आहे की, हे खोटं आहे; पण तुम्ही जर का पेपरात लिहिलं की हिंदुस्थानातल्या शेतकऱ्याला सबसिडी नाही, त्याची शेती तोट्यात चालली आहे तर तुम्हाल परिक्षेत नापास करतील.’ मग त्या पत्रात शेतकरी विद्यार्थ्यांना मी पहिला सल्ला दिला की, ‘पेपरात लिहिण्याकरिता पुस्तकात जे जे काही खोटं लिहिलं आहे तेसुद्धा शिकून घ्या आणि परीक्षा पास व्हा. सर्कशीमध्ये वाघ असतो वाघाचं काम काही रिंगातून उड्या मारणं आणि खुर्चीवर जाऊन बसणं हे नाही; पण सर्कशीत पोट भरायचं म्हणजे त्याला बिचाऱ्याला रिंगातून उड्या माराव्या लागतात, खुर्चीवर जाऊन बसावं लागतं. तेव्हा, वेळ येईपर्यंत तेही खोटं शिकून घ्या; पण, माझी एक विनंती आहे, आठवड्यातून एक दिवस कुठे तरी एकत्र जमा. आठवड्यातून नाही जमलं तर पंधरा दिवसातून नाही जमलं तर पंधरा दिवसातून एकदा किंवा महिन्यातून एकदा, कधीतरी जमा आणि एक काम करा. शाळा, कॉलेज असलेल्या छोट्याशा शहरातीलसुद्धा रस्त्यातून चालताना काही घरांमध्ये, काही बंगल्यांमध्ये विजेचे दिवे आहेत, दाराखिडक्यांना व्यवस्थित पडदे लावलेले आहेत आणि त्या घराबंगल्यांतले आईवडील एकमेकांशी आनंदाने बोलतात, हसतात, मुलांशी खेळतात, मुलांना खेळणी आणून देतात मुलांचं कौतुक करतात, आपलं बाळ आज किती छान दिसतंय. म्हणून एकमेकांचं कौतुक करतात असं चित्र दिसतं. हे चित्र पाहिल्यानंतर तुमच्या मनात प्रश्न उभा राहिला पाहिजे की, अरे, असं हे सुख माझ्या आईबापांना आयुष्यामध्ये एक दिवससुद्धा भोगायला का मिळालं नाही? हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा, या प्रश्नाचं उत्तर जो अभ्यास देईल तीच खरी विद्या; या प्रश्नाचं उत्तर देणार नाही तो सारा अभ्यास म्हणजे अविद्याच असं समजा.’

या पत्रात विद्यार्थ्यांना मी आणखी एक उदाहरण दिलं, तुमची परिस्थिती कशी आहे? तुम्ही शेतावरून शहरात आलात, म्हणजेच भारतातून इंडियात आलात. रामानं हनुमंताला जसं लंकेत पाठवलं तसं. तुमच्या आईबापांनी तुम्हाला इकडे पाठवलं आहे. यासाठी की, आपली श्रमसिद्ध संपदा भूमिकन्या सीता पळवून नेली आहे. तिचा शोध तुम्ही काढावा; पण रामाने हनुमानाला पाठवल्यानंतर लंकेत आल्यावर, त्यानं सगळं काही पाहिल्यावर ‘वा! रावणाची लंका म्हणजे सोन्याची लंका, प्रचंड वैभवशाली रत्नहिरेमाणकेजडित महाल.’ असं म्हणून जर हनुमानाने विचार केला असता की, ‘अरे, कशाला जायचं रामाकडे परत, आहे काय त्याच्याकडे? वल्कलं नेसतो, कंदमुळे खातो आणि झाडाखाली झोपतो. त्यापेक्षा रावणाकडे अर्जविनंती करून जर का त्याच्याकडे नोकरी शोधली तर मालामाल होऊन जाऊ.’ तर पुढचं रामायण घडलं नसतं.

एवढ्या एका प्रश्नाचं उत्तर तुम्ही शोधा असं सांगितल्याला आता तेरा वर्षे झाली. उघड दिसतं आहे की, माझ्या भाच्यापुतण्यांनी हे काम काही केलं नाही. का केलं नसावं? माझ्या लहानपणी तिसरी चौथीच्या वर्गात अत्र्यांची एक कविता होती.
शाळेत रोज जाताना
मज विघ्ने येती नाना
अशी तिची सुरुवात होती. मग तो विद्यार्थी एकएक अडचण सांगतो. वाटेत फुलपाखरे दिसतात, ती मला म्हणतात, ये आपण खेळू पण मी मोठ टाळतो.
आणि मी निघे
तडक शाळेला
असा प्रत्येक वेळी त्या कडव्याचा शेवट होतो. कुठे टोळ दिसतात, ते म्हणतात ये खेळायला; कुठे गारुडी पुंगी वाजवत असतो, तर कुठे जादुगार खेळ मांडून बसलेला असतो. प्रत्येक वेळी मोहात अडकून घोटाळतो आणि शाळा चुकेल म्हणून मोह टाळून तो ‘निघे तडक शाळेला.’

मी विद्यार्थ्यांना सांगितलं की, या अभ्यासाच्या मागे लागा; पण झालं काय? वाटेमध्ये त्यांना कुणी पुंगी वाजवणार गारुडी दिसला, कुणी जादूगार दिसला! कुणी पुंगी वाजवून म्हणाला अरे या या, पहा तर मी हा प्रभु रामचंद्राचा खेळ कसा मांडला आहे आणि माझे सारे शेतकरी भाचेपुतणे मी सांगितलेला अभ्यासाचा विचाराचा मार्ग सोडून रामाच्या मंदिराकडे वळले. कुणी म्हणाला बाकी काही करण्याची गरज नाही. फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्या म्हणजे तुमचे सगळे प्रश्न सुटून जातील; विचार करायला नको, अभ्यास करायला नको, तुमचे काय प्रश्न आहेत ते मी सोडवून देतो म्हटले की गेले त्यांच्या मागे. अशा तऱ्हेने आपल्या अभ्यासाच्या मार्गामध्ये हे अडथळे येतात.

आता मी विद्यार्थ्यांसमोर उभा आहे. मी जर म्हटलं की, माझी अशी इच्छा आहे की, कोणी विद्यार्थी नापास होऊच नये, माझी मागणी अशी आहे की परीक्षेत कॉपी करायला सर्वांना मुक्तद्वार असले पाहिजे. त्यात अडचण येताच कामा नये आणि जो कोणी विद्यार्थी परीक्षा, कशा तऱ्हेने का होईना, पास झाला असेल त्याला चांगली दोनतीन हजाराची नोकरी मिळाली नाही तर बेकारीचा भत्ता म्हणून काहीतरी मिळालं पाहिजे तर मी तुमच्यात मोठा लोकप्रिय होऊन जाईन आणि तुम्ही ‘शरद जोशी झिंदाबाद’ म्हणून मोठ्याने घोषणा द्यायला लागाल. अशा तऱ्हेच्या गाजराच्या पुंग्या वाजवणारे आणि तरुणांकडून ‘घोषणा’ घेणारे गारूडी पुष्कळ आहेत. तुम्हाला घर पाहिजे? मी देतो; तुम्हाला कपडे पाहिजे. मी देतो; तुम्हाला नोकरी पाहिजे मी देतो; तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो, तुम्ही फक्त एकदा मला मत द्या असं म्हणणाऱ्या गारुड्यांकडे आपण वळलो आणि आज 50 वर्षांनंतर आपण पाहातो आहोत की, अनेक गारुडी आले, अनेक जादुगार आले आणि आम्ही जमिनीमध्ये प्रत्येक वेळी आणखी खचतो आहोत.

गेल्या पन्नास वर्षांत विद्यार्थ्यांच्या दृष्टीने शिक्षणाच्या बाबतीत काय घडलं? इंग्रज जेव्हा गेले तेव्हा देशामध्ये शाळा फार थोड्या होत्या. होत्या त्या शहरात होत्या. खेडेगावामध्ये एखादा गुरुजी असायचा तो शिकावायचा, विशेषतः काही ठराविक जातीतल्या मुलांनाच शिकवायचा. थोड्या शाळा होत्या त्या शाळेमधील शिक्षकांना त्या काळी पगार असायचा दरमहा आठदहा रुपये. प्राथमिक शिक्षक म्हणजे अत्यंत गरीबीमध्ये राहणारा. विद्यार्थ्यांना ज्ञानदान करणारा असा पवित्र माणूस समजला जाई. प्राथमिक शिक्षकांच्या विरुद्ध अगदी 1971 सालापर्यंत, कोणी बोलत नसे. आता सगळीकडे जीवन शिक्षण मंदिरं गावोगाव निघाली; गावातील गुरुजी गेले. खाजगी शाळा जवळजवळ संपुष्टात आल्या, जिल्हा परिषदेने मास्तर नेमायचे, पगार साडेतीनचार हजार रुपये, काही कमी नाही. ती नोकरी मिळवायची झाली तर गेल्यावर्षी ऐशी हजार रुपये कुणाला तरी द्यावे लागायचे असे ऐकू येते, यंदा हा दर किती वाढलाय कुणास ठाऊक? हे शिक्षक कधी शाळेमध्ये आले तर येतात, नाही तर येत नाहीत; शिकवलं तर शिकवतात, नाहीतर शिकवत नाही. माझ्या शेजारच्या गावात एक शिक्षक फक्त पगार घ्यायला येतो आणि महिनाभर आपल्या बदली शाळेत यायला त्याने पाचशे रुपयांमध्ये दुसरा एक पोटशिक्षक ठेवून दिला आहे.

आज शिक्षणाचा दर्जा काय आहे? सातवी पास होवो, दहावी पास होवो किंवा अगदी एम.ए. झालेला असो; मुलाला मराठीतलं एक वाक्य लिहून दाखव म्हटलं तर तेसुद्धा धड लिहिता येत नाही अशी आज परिस्थिती आहे. इंग्रजी, विज्ञान हे विषय तर सोडूनच द्या. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा आमची लोकसंख्या होती 34 कोटी लोक निरक्षर होते, लिहितावाचता न येणारे होते. आज हिंदुस्थानची लोकसंख्या 94 कोटी आहे आणि त्यातले 42 कोटी निरक्षर आहेत. स्वातंत्र्याच्या आधी डॉ. सी. व्ही. रामन किंवा जगदीशचंद्र बोस यांच्यासारखे शास्त्रज्ञ या देशात तयार होत होते, ज्यांना नोबेल पारितोषिक मिळत होतं, एवढंच नव्हे तर ज्यांच्या विद्वत्तेला मोठी मान्यता होती असे विद्वान तयार होत होते. आज हिंदुस्थनातल्या शास्त्रज्ञांना नोबेल पारितोषिकांच्या यादीतसुद्धा त्यांचं नाव येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांपैकी बरेच जण आता काॅम्प्युटरचं शिक्षण घेत असतील. काॅम्प्युटरमध्ये दर आठ दिवसांनी काही नवीन शोध लागताहेत आणि काय नवीन शोध लावायची धडपड चालली आहे याचा अंदाजसुद्धा आमच्यातील तज्ज्ञांना नसतो, इतके आम्ही जगाच्या मागे गेलो आहोत. शाळा वाढल्या, कॉलेज वाढली, पुढाऱ्यांची मोठी मोठी कॉलेज झाली, शिक्षणक्षेत्रात पैसे खूप खेळू लागले; पण तिथं शिक्षण म्हणून काही राहिलं नाही. जशी दारूची दुकानं निघाली आणि हातभट्ट्यासुद्धा निघाल्या. हे का झालं? या प्रश्नाचं उत्तर, मला वाटतं, तुम्हा विद्यार्थ्यांना द्यावं लागणार आहे. मी माझ्या पिढीच्या वतीने माझे कान पकडून तुम्हा तरुण मंडळीची क्षमा मागतो की, आमच्या पिढीनं या देशाचं वाटोळं केलं; पण तुम्ही जर का आमच्या पिढीचा रस्ता सोडला नाही आणि गप्प बसून राहायचं ठरवलं तर हा देश आता वाचत नाही हीही खूणगाठ बांधून घ्या.

मी गेल्या महिन्यांमध्ये बर्लिनला एका परिषदेकरिता गेलो होतो. तिथून अमेरिकेला गेलो. जरा बरं वाटत नव्हतं. तर डॉक्टरांना दाखवावं म्हणून गेलो, तिथं कळलं की, अमेरिकेत अनेक नावाजलेले डॉक्टर हे हिंदुस्थानी आहेत. आपल्या देशात डॉक्टर झालेले विद्यार्थी सगळे भेटायला मिळतात ते अमेरिकेत मिळतात किंवा इंग्लंडमध्ये मिळतात आणि माझ्या गावामध्ये जर का बाळंतीण अडली तर तिला पाहायला एकसुद्धा भारतीय डॉक्टर उपलब्ध नसतो. ही शिक्षण पद्धतीची चूक झाली. ही चूक का झाली? जर आपण स्वातंत्र्य मिळालं म्हणतो, आपल्या देशाचं सरकार आलं असं म्हणतो तर इथे शिक्षणाची पद्धत अशी झाली कशी की ज्यामुळे डॉक्टर आणि इंजिनिअर या गरीब देशामधल्या गरीबांच्या पैशांनी शिकले आणि नंतर पैसे कमवण्याकरिता परदेशात निघून गेले आणि आमच्या देशातल्या मायबापड्या जर बाळंतपणात अडल्या तर त्यांना उपचार द्यायला एक हिंदी डॉक्टर येथे नाही?

मी काय म्हणतो ते अधिक स्पष्ट व्हावे म्हणून एक उदाहरण सांगतो, समजा, आपण मुंबई, पुणे, नागपूर, वर्धा यासारख्या शहरांमध्ये वैद्यकीय महाविद्यालये काढतीच नसती किंवा घाई न करता सावकाशीने काढली असती आणि सुरुवातीला जर हिदुस्थानचा पंतप्रधान हा हिंदुस्थानातल्या गोरगरीबांचे, मायबापड्यांचं दुःख जाणणारा असता तर तो म्हणाला असता, ‘सध्या कॅन्सरवर ट्रीटमेंट नाही मिळाली तरी चालेल, सध्या हार्ट पेशंट मेले तरी चालतील – मी हार्ट पेशंट आहे तरी मी हे म्हणतो आहे; पण पहिल्यांदा औषधोपचाराची अशी योजना करू या की 90 टक्के लोकांच्या आजारांवर उपचार करता यावेत. 90 टक्के लोकांचे काय आजार आहेत? प्यायला शुद्ध पाणी नाही म्हणून पोटाचे आजार, खरूज, नारू आणि ग्रामीण भागातला अभ्यास असं सांगतो की, एकही स्त्रीरोग झालेला नाही अशी एकही स्त्री ग्रामीण भागात जवळजवळ नाही. या आजारांचे उपचार करायला कोणी नाही म्हणून मी असं म्हटलं असतं की बारावीमध्ये 90 टक्के आणि 103 टक्के मार्क कोणाला मिळाले ते बाजूला राहू द्या, गावातली दाई, गावातली जी म्हातारी बाई एखाद्या बाईचं बाळंतपण जवळ आलं म्हटल्यावर धावत जाते. तिला मी वैद्यकीय शिक्षण देणार आहे; तिला मी फक्त तीन महिन्यांचा कोर्स देतो, जास्त खर्चसुद्धा नको. गावामध्ये एखादी बाळंतीण अडली तर तिचं बाळंतपण त्यातल्या त्यात सुखरूप कसं होईल याचं शिक्षण जर तिला दिलं असतं तर हिंदुस्थानातल्या लोकांचं दुःख, वेदना कितीतरी कमी झाल्या असत्या. तुम्ही शहरांमध्ये कॉलेज का काढली? जोतिबा फुल्यांनी सांगितल्याप्रमाणे, याचा अर्थ असा की तुमच्या नावाचा, तुमच्या देशाचा म्हणून झेंडा लाल किल्ल्यावर लागला, तुमच्या रंगाची माणसं पंतप्रधान झाली, तुमच्या रंगाची माणसं मंत्री झाली म्हणून असं वाटायला लागलं की आपल्याला स्वातंत्र मिळालं तरी पण प्रत्यक्षात सत्तेवर बसलेल्या माणसांना इंग्रजांनासुद्धा गोरगरीबांविषयी जितका कळवळा होता, तितकाही नाही. इंग्रजांनी गावोगाव दवाखाने काढले, कॉलरा निर्मूलनासाठी काम केलं, प्लेग निर्मूलनासाठी काम केलं; पण तेवढीसुद्धा सहानुभूती नसलेली आमची माणसं सत्तेवर आली. तसं नसेल तर मग, धरलेल्या मार्गाची काही चूक आहे हे कबूल करून दुसऱ्या मार्गाचा शोध घेऊन त्या मार्गाने चालायला सुरुवात केली पाहिजे.’

शिक्षणासंबंधी ही अशी अवस्था आहे. तरुणांच्या मनामध्ये आजकाल नोकरीचा विषय असतो म्हणून मी एक धोक्याची सूचना देऊन ठेवतो. एक गोष्ट खरी आहे की तुमच्या आईबापांनी तुम्हाला कॉलेजमध्ये शिकायला पाठवलं ते या विचाराने की, ‘बाळांनो, काही करा; चांगलं शिका पण शेतीत नका येऊ. शेतकी कॉलेजचं जरी शिक्षण घेतलं तरी बँकेमध्ये जा, शेतकरी अधिकारी व्हा आणि शेतकरी अधिकारी व्हा आणि शेतकऱ्यांना शहाणपण शिकवा शेती कशी करावी याचं; पण, शेती करायला नका येऊ; याल तर मराल.’ आपण सगळेजण शहरात विद्यार्थी म्हणून आलो ते खरं नाही; विद्येच्या शोधार्थ आलोच नाही. आपण आलो आहोत एका कागदाच्या कपट्याच्या शोधार्थ, ज्याला म्हणतात ‘डिग्री सर्टिफिकेट’ किंवा ‘डिप्लोमा सर्टिफिकेट’ हे सर्टिफिकेट कशासाठी हवं आहे? विद्या काहीही न मिळे, पण हे सर्टिफिकेट म्हणजे, तरुणांना रोजगार देऊन बेरोजगारी दूर कशी करावी यासाठी आम्ही एक समिती स्थापन करीत आहोत, तुम्ही आम्हाला मदत करा. मी त्यांना एकच सल्ला दिला, ‘बेरोजगारी दूर करायची आहे? काही समिती नको, काही बजेट नको आणि काही सरकार नको. मी कोणाला हवी त्याला एका दिवसात नोकरी देतो; फक्त एक अट आहे. तुम्ही जर का माझ्याकडे नोकरीत लागून शंभर रुपयांचे उत्पादन केलं तर त्यातले नव्याण्णव रुपये तुमचे, माझ फक्त एकच रुपया. ही नोकरीची अट ज्याला मान्य असेल त्याला नोकरी द्यायला मी तयार आहे.’ आपण त्या नोकरीमध्ये भाकरी काही टाकणार आहोत का? सर्वसाधारणपणे नोकरदार, मग तो दिल्लीचा असो, मुंबईचा असो, यवतमाळचा असो का आर्णीचा असो. एकदा नोकरी लागली की काम करायचा काही संबंधच नाही, दोन ओळी लिहिताच येत नाहीत, आधीच्या कारकुनाने फाईलीमध्ये जे काही मसुदे लिहिले असतील तसाच मसुदा लिहून साहेबाच्या पुढे ठेवायचा, साहेबानं म्हटलं, ‘काय गाढवा, काय लिहितोस?’ की म्हणायचं, ‘बरं साहेब, दुसरा लिहून आणतो.’ आणि दुसरा लिहून लिहून द्यायचा आणि मग पे – कमिशन कधी हातं आणि आपला महागाईभत्ता कधी किती वाढणार याचा विचार करत करत 50 वर्षे काढायची आणि रिटायर झालं की मोकळे.

मध्ये सहकारी साखर कारखान्याच्या संबंधात एका तज्ज्ञांनी हिशोब केला की साखर कारखान्यामध्ये जर का एक मनुष्य नेमला तर त्याला नेमल्यापासून तो रिटायर होईपर्यंत कारखान्याला खर्च येतो 40 लाख रुपये. हे काहीच नाही. केंद्र शासनातल्या एका नोकरदाराचा एका वर्षाचा सरासरी खर्च 80 हजार रुपये आहे. आता जर का या नोकरदारांनी ऐंशी हजार एक रुपयांचं काम सरकारकरता केलं आणि ऐंशी हजार रुपये घेतले तर चालेल, काही चिंता नाही; पण एक पैशाचंही काम करायचं नाही, उलट जे काम करीत असतील त्यांना अडथळा आणायचा; कोणी रिपोर्ट मागायला गेला, कॉपी मागायला गेला. लायसन्स मागायाला गेला. परमिट मागायला गेला की, त्याला टिंगवून ठेवायचं. पुन्हा हात पसरायचा, लाच खायची आणि मगच जमलं तर काम करायचं असा नोकरदार असला तर बेरोजगारी संपायची कशी? एक नोकर नवीन घेणं हे मालकाला जेव्हा अधिक फायद्याचं तेव्हा नोकऱ्या वाढतील. तेव्हाच बेरोजगारी संपेल.

कोणी जर म्हणू लागलं की, ‘नोकऱ्या नाही मिळाल्या तर मी तुम्हाला आठशे रुपये भत्ता देतो.’ तर विचार करा, सगळ्या बेरोजगारांना आठशे रुपये भत्ता दिला तर काय होईल? एक कप चहाची किंमत चारशे रुपये होईल. अर्थशास्त्रामध्ये न बसणाऱ्या या गोष्टी आहेत. बेरोजगारी संपायची असेल तर आपल्याला उत्पादक व्हायला लागेल. तुम्ही विद्यार्थी आहात, शिक्षण संपल्यावर आपल्याला नोकरी मिळायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं म्हणून मी तुम्हाला धोक्याची सूचना देऊन ठेवतो. तुम्हाला नोकरी मिळाली ना एखादी की मग देशाचं काय होतं. आहे याचा विचारसुद्धा तुमच्या मनात येणार नाही. देश जाईना का खड्ड्यात, आपल्याला मिळाली ना नोकरी, आपण मोकळे झालो ना देशाच्या टोपलीत भाकर टाकणार नाहीच; पण दुसऱ्या कुणीतरी कष्टानं तयार केलेल्या भाकऱ्या वाढत्या भुकेने खात राहाणार. असा विचार तुम्ही करणार; पण तुमच्यापैकी फार थोड्यांना नोकरीचं भाग्य मिळणार आहे. समाजवाद संपला आहे. आपल्या शाळाकॉलेजांमध्ये ज्याला एक इंग्रजातलं वाक्य लिहिता येत नाही. एक मराठीतलं वाक्य लिहिता येत नाही तो एम.ए. होतो कसा? आणि त्याला नोकरी मिळते कशी? या समाजवादाच्या जमान्यामध्ये नोकरदारांनी काही केलं पाहिजे अशी अपेक्षाचं काही केलं पाहिजे अशी अपेक्षाच नाही. एकदा नोकरी मिळाली म्हणजे जहागीरीच मिळाली; पुढे काळजी करण्याचं कारणच नाही, कारण त्याला काढणारं कुणीच नाही. परवा प्रामाणिक सरकारी नोकर भेटला. तो म्हणाला, ‘गेल्या महिन्यापर्यंत माझा महिन्याचा पगार बारा हजार रुपये होता. पाचवा वेतन आयोग झाला आणि माझा पगार एका महिन्यात साडेएकोणीस हजार झाला. मला इतकं वाईट वाटून राहिलं आहे की, मी बारा हजारांचं ही काम करत नव्हतो.’ तुम्हाला जर का काही काम न करता साडेएकोणीस हजार मिळत असतील तर त्याचा अर्थ असा की शेतामध्ये घाम गाळणाऱ्या शेतकऱ्याला, शेतमजुराला, शेतमाऊलीला त्यांनी गाळलेल्या घामाचंसुद्धा दाम मिळणार नाही; कारण ते तुम्ही खाल्लेलं असेल. जर का कष्ट न करता, घाम न गाळता कुणाला काही फळ मिळत असेल तर त्याचा अर्थ असा की, घाम गाळणाऱ्या कुणातरी दुसऱ्याचं फळ त्याच्या हातातून काढून घेऊन तो खातो आहे.

ही सगळी परिस्थिती मी तुम्हा विद्यार्थ्यांसमोर ठेवली. उद्देश असा की, या विषयावर तुम्ही विचार करावा, अभ्यास करावा. कोणी तरी येऊन फूस लावून देतं त्याला बळी पडून विचार करून नका, आमच्या पिढीनं जी चूक केली ती तुम्ही करू नका हे सांगण्याकरिता हे तुमच्यापुढं मांडलं. म्हणजे 1985 साली जो दिला तोच संदेश – अभ्यास करा आणि उत्तर शोधा की, ‘आमच्या आईवडिलांना एक दिवससुद्धा सुखाचा का मिळाला नाही.’ हे करताना ज्या काही अडचणी येतात, गारूडी जादूगार दिसतात, आपलं लक्ष वेधून घेतात त्यांच्यापासून सावध राहायण्याकरिता दोन गोष्टी सल्ला म्हणून सांगतो. तुम्ही अभ्यासातून अमूकच एक निष्कर्ष काढा हे मी सांगत नाही. माझंच म्हणणं ऐका असंही सांगत नाही. फक्त सावधानतेचा इशारा देतो.

विचार करण्याच्या मार्गामध्ये दोन मोठ्या अडचणी असतात. एक म्हणजे, आपण लहान असतो तेव्हा आपले आईबाप काय शिकवतात? वडीलधाऱ्यांचा प्रेमादर करावा! योग्यच आहे. आई आपल्याला वाढवते त्यामुळे आईविषयी प्रेम असतंच, वडिलांविषयीही असतं; पण लहान मुलांना पहिल्यापासून सांगतात की, मोठ्या लोकांना जितकी अक्कल असते तितकी लहान मुलांना येण्याची शक्यता नाही. मला हे घरामध्ये मानतात याचं फारसं वाईट वाटत नाही; पण बाहेरसुद्धा तसंच सरधोपटपणे मानतात याचं वाईट वाटतं. एक अनुभव सांगतो. लातूर जिल्ह्यातली बरीच मुलं हल्ली परीक्षेत पहिली येतात, लातूर पॅटर्नमुळे. लातूरच्या मुख्याध्यापकांनी एकदा मेरीट लिस्टमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांचा माझ्या हस्ते सत्कार ठेवला. मी स्टेजवर उभा राहिलो. एकेका मुलाचं नाव घेतलं जाऊ लागलं. पहिली दुसरी आलेली मुलं. कुणी संस्कृतमध्ये पहिला आलेला, कुणी गणितात पहिला आलेला. अशी ती बिचारी मुलं येत होती आणि माझ्या पाया पडत होती. मला शरमल्यासारखं वाटलं. कारण, मी मोठा आहे म्हणजे काय, त्यांच्या दृष्टीनं त्याच्यापेक्षा फक्त वयानं मोठा आहे. ही मुलं इतकी बुद्धिमान, ही उद्या काय कर्तबगारी दाखवतील, काय विद्वत्तेची भरारी मारतील! अशा या उद्याच्या शिल्पकारांना मी त्यांच्यापेक्षा केवळ वयानं मोठा आहे म्हणून माझ्या पाया पडायला लावणं ही किती वाईट गोष्ट आहे? वडीलधाऱ्यांचा आदर राखावा हे घरामध्ये ठीक आहे; पण एकदा घराच्या बाहेर पडलं की लोक सांगतात, ‘गुरुचा आदर राखावा.’ काही मर्यादेपर्यंत राखवा हे ठीक आहे. पुढे म्हणतात, ‘मोठी माणसं असतात त्यांचं ऐकावं’ मग ही मोठ्या माणसांची यादी दिवसेंदिवस वाढत जाते. कोणी म्हणतं, मार्क्सने असं म्हटलं, कोणी म्हणतं गांधींनी असं म्हटलं, कोणी म्हटलं शिवाजीनं असं केलं, कोणी म्हणतं विवेकानंदांनी असं केलं, कोणी म्हणतं महंमद पैगंबराने तसं केलं; कोणी म्हटलं भगवतगीतेमध्ये कृष्णानं असं सांगितलं आणि कोणी म्हटलं येशू ख्रिस्तानं तसं सांगितलं की, आम्ही बिचारे घाबरून जातो आणि समजतो एवढी थोर माणसं आहेत ना त्यांचच आपण ऐकलं पाहिजे.

तुम्हा विद्यार्थ्यांना, एक अत्यंत कठोर वाटणार, सत्य सांगतो. कोणत्याही एका पिढीतला माणूस, एका पिढीतला अडाणी हा याच्या मागच्या पिढीतल्या विद्वानापेक्षा विद्वान असतो. कारण प्रत्येक पिढी मागच्या पिढीच्या खांद्यावर उभी असते. तेव्हा कोणीही मनुष्य मोठा असेल तर आदर बाळगायला हरकत नाही; पण पूर्वी कोणीतरी काही मोठं तत्त्व सांगितलं आहे म्हणजे त्याच्यापढे आपण जायचंच नाही हा रामदासांचा धोपटमार्ग चोखाळलाच पाहिजे असं नाही. विद्यार्थी मित्रांनो, कृपा करून, यापुढे धोपटमार्गाने चालू नका. आम्ही तर कबूल करतो आहोत की, ‘मागच्या पिढीने चुका केल्या, तुम्ही मागच्या पिढीचा मार्ग धरला आणि त्यांच्या पावलांवर पाऊल टाकून चाललात तर तुम्ही खड्ड्यात पडणार हे निश्चित आहे.’ तर तो मार्ग धरू नका. कोणाही माणसाचं मोठपण गृहीत धरू नका. कोणाही माणसानं दुसऱ्या एखाद्या माणसाला सदाकाळचा पुरुषोत्तम मानावं हा विचारांचा अंत आहे, हा बुद्धीचा शेवट आहे. कोणाही व्यक्तीचा सदाकाळ आदर्श बाळगू नका.

अजून एक लहानसा सल्ला. जगामध्ये असं एकही पुस्तक नाही की ज्यामध्ये जगाच्या सुरुवातीपासून ते जगाच्या अंतापर्यंत सगळं शहाणपण लिहिलेलं आहे. गजनीचा महंमद आला तो वायव्येच्या एका बौद्धांच्या विद्यापीठात गेला; प्रचंड ग्रंथालय होतं. त्यानं विचारलं, ‘हे काय आहे?’ लोक म्हणाले, ‘ग्रंथ आहेत.’ त्यानं विचारलं, ‘त्यात काय आहे?’ लोक म्हणाले, ‘त्यात पुष्कळ ज्ञान आहे.’ तो म्हणे, ‘कुराणामध्ये जे लिहिलं आहे, त्याच्यापेक्षा वेगळं आहे का? तसं असेल तर ते खोटं आहे. सगळे ग्रंथ जाळून टाका आणि कुराणात जे लिहिलंय तेच जर यांच्यात लिहिलं असेल तर या ग्रंथाची गरज काय?’ असं ग्रंथालयं जाळणारे ‘महंमद गजनी’ आजही आपल्यामध्ये आहेत. मी जोतिबा फुल्यांचा मोठा भक्त आहे. मी स्वतःला जोतिबांचा शिष्य म्हणवतो; पण, तुम्हाला कुणाला जोतिबा फुल्यांचं मत पटत नसेल तर तुमचं मत स्पष्टपणे मांडण्याचा तुम्हाला अधिकार आहे. त्या अधिकाराकरितासुद्धा मी लढायला तयार होईन. मी गांधींना मानतो, पण गांधींवर कुणी टीका केली म्हणजे त्यांचं घर जाळून टाका असं मी म्हणून कसं चालेल. मी बाबासाहेब आंबेडकरांना फार थोर माणूस मानतो; पण कोणी जर म्हणायला लागलं की, आंबेडकरांविरुद्ध कोणी लिहिलं म्हणून जाळा त्याची पुस्तकं तर समजा हा महंमद गजनीचा नवा अवतार आहे; त्याला थारा देऊ नका. कोणतंही पुस्तक मोठं नसतं. कायमचं मोठं नसतं. कुराण मोठं नाही, बायबल मोठं नाही आणि भगवतगीतासुद्धा मोठी नाही हे लक्षात ठेवा. कारण, हे सगळे एका काळचे थोर ग्रंथ आहेत. नव्या काळाचा थोर ग्रंथ लिहिण्याचं काम तुमच्याकडे आलं आहे म्हणून तुम्हाला विद्यार्थी म्हणायचं, म्हणून तुम्हाला तरुण म्हणायचं.

विद्यार्थ्यांचं मंडळ असतं, विद्यार्थ्यांची संघटना असते. तसं युवा संघटनांची. तरुणांची भूमिका काय असं फारजण बोलतात. असं बोलणारांविषयी मला शंका आहे. मला परवा दिल्लीला काँग्रेसच्या युवा संघटनेचे प्रमुख युवा संघटनेचा अध्यक्ष कसा काय झाला? चालतं, म्हणे! पहिल्यांदा वयोमर्यादा पस्तीस होती, हळूहळू चाळीस झाली… मी म्हटलं थोड्या दिवसांनी मीसुद्धा युवा संघटनेत येऊ शकेन! तरीही तरुण कोण आहे? मी जर 18 किंवा 21 वर्षाच्या तरुणाला म्हटलं की, ‘चल, समोर छान डोंगर दिसतो आहे, जाऊ या आज आपण चढायला, कठीण असला म्हणून काय झालं?’ आणि तो जर म्हणाला, ‘नको बाबा, मी आतापर्यंत कधी डोंगरावर चढलोच नाही, चढणं जमेल का नाही कुणास ठाऊक? आईवडिलांची परवानगी घेतली पाहिजे…’ या अठराविसाच्या माणसाला तरुण म्हणणार काय? तारुण्य कोणामध्ये आहे असं म्हणायचं? याची एक व्याख्या आहे. माणसाला तारुण्यात एक गोष्ट जमते. जी आयुष्यात पुढे कधी जमत नाही. देशाला स्वातंत्र्य हवं आहे असं वाटल्यानंतर समद्रामध्ये उडी फेकणारे सावरकर हे फक्त तारुण्यातच सावरकर असतात; हसत हसत फाशी स्वीकारणारे भगतसिंग – सुखदेव – राजगुरू हे फक्त तारुण्यातच म्हणजे जी गोष्ट तारुण्यातच तसं करू शकतात. कारण, तारुण्य म्हणजे जी गोष्ट आपल्याला पटते आणि प्रिय वाटते त्याकरिता संबंध जीव फेकून देण्याची तयारी असण्याची अवस्था. जन्माचं सर्टिफिकेट बघून कोणाला तरुण म्हणता येणार नाही. तरुणपणी माणसं प्रेम का करतात? कारण आपल्याला जी व्यक्ती प्रिय वाटते तिच्या प्राप्तीकरिता आयुष्य फेकून देण्याची त्यावेळी तयारी असते.

ही तारुण्याची ताकद जर तुमच्याकडे असेल तर एक गोष्ट करा. देशाची गेली पन्नास वर्षे आम्ही फुकट घालवली. आम्हाला भलं काही करता आलं नाही, माझ्यासारखी काही माणसं धडपड करत राहिली; पण आमच्या डोळ्यांदेखत इंग्रजांच्या तावडीतून स्वतंत्र झालेली भारतमाता या सगळ्या नतद्रष्ट लोकांनी ओढत ओढत द्रौपदीसारखी भर दरबारात काढली आहे. तिला वाचवण्याचं काम करायची हिम्मत आणि बुद्धी निदान तुमच्या पिढीत येवो अशी फक्त इच्छा आणि अशा व्यक्त करतो.

(21 नोव्हेंबर 1997)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!