krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Artificial intelligence : ‘हिंदी जाऊ द्या, ती कशीही शिकू’, मुलांना आता ‘एआय’च शिकवा!

1 min read

Artificial intelligence : पूर्वी मुलं माती खात असत, आता ‘नेट’ खातात! आधी अंगणात खेळायची, आता स्क्रीनवर ‘स्क्रोल’ करतात. मोबाईल हातात आला की, मुलं शांत पण बालपण गोंधळात हरवलंय! तंत्रज्ञानाच्या नादात ही पिढी हरवतेय, हे खरंय. पण हाच नाद जर योग्य वळणावर नेला तर कमाल घडू शकते. मोबाईलमध्ये गेम खेळताना वेळ वाया घालण्याऐवजी त्याच मोबाईलवर ‘एआय’ शिकली, तर काय सांगावं पुढचे अब्दुल कलाम आपल्या शाळेतच तयार होतील! म्हणूनच, ‘हिंदी जाऊ द्या हो… ती कशीही शिकू’, असे म्हणत आता वेळ आली आहे शाळांमध्ये ‘एआय’ (AI – Artificial intelligence) शिकविण्याची. शिक्षण विभागाने एक पाऊल पुढे टाकलं, की पालकांचाही होकारच येईल!

आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता, म्हणजेच ‘एआय’ ही केवळ टेक्नॉलॉजी नव्हे तर एक भविष्य आहे. रोजच्या जीवनात मोबाईल, बँकिंग, शिक्षण, आरोग्य अशा अनेक क्षेत्रांमध्ये एआय वापरले जात आहे. त्यामुळे आता भाषा कोणतीही असो, आपण एआय शिकायला हवेच! कारण एआय शिकण्यासाठी इंग्रजी परिपूर्ण असावी असे काही नाही. अनेक मराठी, हिंदी व अन्य भाषांमधूनही शिकण्यासाठी उत्तम साधनं उपलब्ध आहेत. युट्यूब, कोर्सेस आणि चॅटबॉट्समुळे शिक्षण आता कोणालाही कुठेही आणि कधीही मिळू शकते.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, मुलांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढेल. एआयमध्ये एखाद्या समस्येचे निराकरण शोधण्यासाठी लॉजिक आणि विश्लेषणशक्ती लागते. त्यामुळे मुले विचारपूर्वक निर्णय घेऊ लागतात. गणित, विज्ञान, कोडिंग याबद्दल भीती न वाटता ते खेळासारखं शिकण्याची रुची निर्माण होते. एआय शिकताना मुलांना नवीन कल्पना सुचतात, त्या वापरून काहीतरी सर्जनशील निर्माण करण्याची प्रवृत्ती वाढते. उदाहरणार्थ, एआय वापरून आपला स्वतःचा गेम, चॅटबॉट, अ‍ॅप किंवा शिक्षणासाठी उपयोगी टूल्स तयार करता येतात. यामुळे आत्मविश्वास वाढतो.

एखाद्या छोट्या गावातील मुलेसुद्धा मोठ्या शहरातील मुलांइतके तंत्रज्ञान समजून घेऊ शकतात याची जाणीव त्याला होते. स्पर्धात्मक जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक असलेले कौशल्य, जसे की टीमवर्क, डिजिटल साक्षरता, संवादकौशल्य ही एआय शिकत असतानाच नकळत अंगी येतात. शेवटी, एआय जग बदलवण्याचे माध्यम आहे. अशा तंत्रज्ञानाशी मैत्री केली तर आपल्या मुलांचे भविष्य अधिक प्रकाशमान आणि सशक्त होईल हे नक्की!

‘एआय’ शिकण्याची सुरुवात ‘एआय’ म्हणजे काय?, त्याचे प्रकार कोणते?, तो कसा काम करतो? अशा मूलभूत प्रश्नांपासून होते. नंतर थोडा थोडा कोडिंग (Python सारखी सोपी भाषा), डेटा, मशीन लर्निंग हे घटक समजून घेता येतात. सुरुवातीला थोडे अवघड वाटेल पण रोजचा सराव आणि जिज्ञासा ठेवली, तर काही अशक्य नाही. महत्त्वाचे म्हणजे, एआय शिकणे म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचे साधन नाही तर आपल्या भविष्यातील जगाशी संवाद साधण्याची तयारी आहे. त्यामुळे, ‘हिंदी जाऊ द्या हो… ती कशीही शिकू’, पण आता वेळ आली आहे, की आपण पहिल्यापासून ‘एआय’ शिकायला सुरुवात करावी!

📌 5 वी ते 12 वयातील मुले नवीन गोष्टी झपाट्याने शिकतात. त्यामुळे एआयचे मूलभूत आकलन (जसे की मशीन विचार कसा करते?”, डेटा म्हणजे काय?) सहज शक्य आहे.
📌 एआय शिकवण्यासाठी कोडिंगची अडचण नसते. चित्र, कथा, रोबोटिक्सद्वारे मजेशीर पद्धतीने शिक्षण देता येते.

🌎 शिक्षण विभाग काय करू शकतो?
📍 एआय लिटरेसी शिबिरे (एआय साक्षरता) : शिबिरे, जिल्हास्तरावर कार्यशाळा किंवा ऑनलाईन छोटेखानी कोर्सेस सुरू करता येतील.
📍 इयत्ता 5 वीपासून ‘डिजिटल बुद्धिमत्ता’ विषय नवीन शैक्षणिक धोरणामध्ये अशा विषयांचा प्रस्ताव आधीच आहे. एआय, डेटा साक्षरता, डिजिटल सुरक्षा यांचे मुलभूत शिक्षण हळूहळू शाळांमध्ये समाविष्ट करता येईल.
📍 मुलं आपली मातृभाषा वापरून एआय समजू शकतील अशी शिकवण्याची साधनं. अ‍ॅप्स, व्हिडीओज विकसित करता येतील.

🌎 काय बदल घडतील?
📍 विचारशक्ती आणि विश्लेषण क्षमता वाढेल.
📍 एआय शिकताना ‘का?’, ‘कसे?’ असे प्रश्न विचारले जातात. त्यामुळे मुले तर्कशुद्ध विचार करू लागतील. त्यांची निर्णयक्षमता वाढेल.
📍 सर्जनशीलता उफाळून येईल. एआय वापरून आपला गेम, स्टोरी जनरेटर, म्युझिक, इमेजेस तयार करता येतात. मुले केवळ वापरकर्ते न राहता निर्माते बनतात.
📍 जिज्ञासू वृत्ती आणि आत्मविश्वास निर्माण होईल. नवीन कल्पना समजून घेताना ‘मीही करू शकतो’ हा विश्वास निर्माण होतो. ग्रामीण किंवा सर्वसामान्य पार्श्वभूमीतील मुलेही आत्मभानात येतात.
📍 एआय प्रोजेक्ट्स सहकार्याने केले जातात. त्यामुळे एकत्र काम करणे, भूमिका समजून घेणे ही सामाजिक कौशल्ये विकसित होतील.
एआय शिकताना इंटरनेटचा वापर, डेटा सुरक्षितता, ऑनलाईन संवाद हे मुले लवकर शिकतील. यामुळे सुरक्षित आणि जबाबदार डिजिटल नागरिक घडतील.
📍 एआय ही फक्त सॉफ्टवेअर कंपन्यांसाठी नाही. शिक्षण, आरोग्य, शेती, कला अशा अनेक क्षेत्रांमध्ये तिचा वापर वाढतोय. त्यामुळे आजची तयारी उद्याचे यश ठरू शकते.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!