krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Cotton production decreased virus : केंद्रीय कृषिमंत्री म्हणतात, ‘व्हायरस’मुळे कापसाचे उत्पादन घटले

1 min read

Cotton production decreased virus : ‘व्हायरस’मुळे (virus) देशातील कापसाचे उत्पादन (Cotton production) कमी हाेत असून, शेतकरी संकटात सापडले आहेत. त्यांना दिलासा देण्यासाठी व्हायरसचा प्रतिकार करणारे व हवामान अनुकूल कापसाचे बियाणे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यावर निर्णय घेण्यासाठी काेयम्बतूर (तामिळनाडू) येथे शुक्रवारी (दि. 11 जुलै) बैठक आयाेजित केली आहे. या बैठकीत कापसाच्या व्हायरसचा प्रतिकार करणाऱ्या बियाण्यांवर चर्चा केली जाईल, हे वक्तव्य आहेत केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण (Shivraj Singh Chavan) यांचे! त्यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यात त्यांनी ही बैठक तसेच त्यांनी केलेला संकल्प, बैठकीला उपस्थित राहणारी मंडळी व एका टाेल फ्री क्रमांकावर शेतकऱ्यांनी त्यांच्या यासंदर्भातील सूचना नाेंदविण्याबाबत माहिती दिली आहे.

♻️ केंद्र सरकारचा संकल्प
बीटी कापसावर व्हायरसचा प्रादुर्भाव हाेत असल्याने देशातील कापसाची उत्पादकता व उत्पादन कमी हाेत आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहे. देशातील कापसाचे उत्पादन, उत्पादकता व गुणवत्ता वाढविणे, कापसाचा उत्पादन खर्च कमी करणे, शेतकऱ्यांना व्हायरसचा प्रतिकार करणारे व हवामानास अनुकूल असणारे चांगल्या प्रतिचे कापसाचे बियाणे उपलब्ध करून देण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे. यासाठी काेयम्बतूर (तामिळनाडू) येथे शुक्रवारी (दि. 11 जुलै) बैठक आयाेजित केली आहे, असेही केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या व्हिडिओ क्लिपमध्ये म्हटले आहे.

♻️ बैठकीला काेण उपस्थित राहणार?
भारतातील 10 राज्यांमध्ये कापसाचे उत्पादन घेतले जाते. या बैठकीला कापूस उत्पादक राज्यांमधील कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, या राज्यांचे कृषिमंत्री, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी, आयसीएआरचे महासंचालक (Director General), आयसीएआरचे शास्त्रज्ञ, कृषी विद्यापीठांचे प्रतिनिधी, कापड उद्याेजकांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही मंडळी कापसाचे उत्पादन व गुणवत्ता वाढविण्यासंदर्भात विचारविमर्श व चिंतन करणार आहेत, असेही कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या व्हिडिओ क्लिपमध्ये सांगितले आहे. या बैठकीला नेमके काेणते प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत, हे मात्र त्यांनी स्पष्ट केले नाही. यासंदर्भात महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील काही कापूस उत्पादक शेतकरी, शेतकरी संघटना, कृषी विद्यापीठांमधील शास्त्रज्ञ आणि कापड उद्याेगातील महत्त्वाच्या व्यक्तींची चर्चा केली असता, आपल्याला या बैठकीचे निमंत्रण नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या बैठकीला विशिष्ट विचारसरणीचे प्रतिनिधी उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे.

♻️ व्हायरस व गुलाबी बाेंडअळी
कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या व्हिडिओ क्लिपमध्ये केवळ व्हायरसमुळे कापसाचे नुकसान हाेत असल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, गुलाबी बाेंडअळीचा कुठेही उल्लेख केला नाही. कापसावर कॉटन लीफ कर्ल (Cotton leaf curl) व टोबॅको स्ट्रीक (Tobacco Streak) या दाेन व्हायरस (Virus)चा प्रादुर्भाव हाेताे. या व्हायरसचे व्यवस्थापन देखील वेळीच करणे शक्य आहे. वास्तवात, व्हायरसच्या तुलनेत गुलाबी बाेंडअळी (Pink bollworm) कापसाचे अधिक नुकसान करते. गुलाबी बाेंडअळीची नुकसान तीव्रता किमान 60 टक्क्यांपेक्षा अधिक असते. गुलाबी बाेंडअळीचे व्यवस्थापन करताना येणारा खर्च व्हायरसच्या तुलनेत खूप अधिक आहे. शिवाय, गुलाबी बाेंडअळीमुळे कापसाची गुणवत्ता खालावते. व्हायरसचा कापसाच्या उत्पादनावर थाेडा परिणाम हाेत असला तरी गुणवत्तेवर फारसा परिणाम हाेत नाही.

♻️ टाेल फ्री क्रमांक
केंद्र सरकारने केलेल्या संकल्पाबाबत ज्यांचा सूचना करावयाच्या असेल, त्यांनी 18001801551 या टाेल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांनी या क्लिपमध्ये केले आहे. मी स्वत: या क्रमांकावर काॅल करण्याचा प्रयत्न केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी या टाेल फ्री क्रमांकावर संपर्क साधला असता, त्यांनी काही सूचना सुचविल्या आणि त्या केंद्रीय कृषी मंत्रालयाला कळविण्याची विनंती केली. त्यावर आपल्या सूचना सरकारला कळविण्याचा अधिकार आम्हाला नाही. आम्ही या क्रमांकावरून शेतकऱ्यांना शेतीविषयक सल्ला देताे, अशी माहिती संबंधित व्यक्तीने विजय जावंधिया यांना दिली. हा टाेल फ्री क्रमांक दिल्ली येथील केंद्रीय कृषी मंत्रालयातील नसून, महाराष्ट्राच्या कृषी विभागाचा आहे.

♻️ या बैठकीचा मूळ उद्देश
मुळात ही बैठक देशातील कापूस बियाणे उत्पादक कंपन्यांच्या दबावामुळे आयाेजित करण्यात आली आहे. कारण मागील काही वर्षांपासून कंपन्यांना संकरित कापसाचे बियाणे तयार करून विकणे आर्थिकदृष्ट्या परवडण्याजाेगे राहिले नाही. त्यातच शेतकरी प्रतिबंधित तणनाशक सहनशील (Herbicide tolerant) म्हणजेच एचटीबीटी बियाणे वापरण्याला प्राधान्य देत आहे. चालू खरीप हंगामात कापसाच्या बीटी बियाण्यांची विक्री व वापर (Consumption) किमान 62 ते 65 टक्क्यांनी घटल्याने तसेच या बीटी बियाण्यांची जागा प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांने घेतल्याने बीटी बियाणे उत्पादक कंपन्यांना माेठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. ही परिस्थिती भविष्यात आणखी गंभीर हाेण्याची चिन्हे दिसून लागल्याने केंद्र सरकारने एचटीबीटी बियाण्यांचे उत्पादन व वापराला अधिकृत परवानगी द्यावी, यासाठी या कंपन्यांनी केंद्र सरकारवर दबाव निर्माण केला आहे. यात कापड उद्याेजक देखील सहभागी आहेत. याच दबावातून विचारविमर्श करण्यासाठी या बैठकीचे आयाेजन करण्यात आले आहे.

♻️ एचटीबीटी बियाणे, व्हायरस व विराेधाभास
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण कापसाच्या घटत्या उत्पादनाला कापूस पिकावरील व्हायरस जबाबदार असल्याचा दावा करीत आहे. याच व्हायरसला प्रतिकार करण्यासाठी तसेच या बियाण्याची मागणी शेतकरी करीत असल्याने आपण एचटीबीटी कापसाला (Herbicide Tolerant Bacillus thuringiensis cotton) परवानगी देत आहाेत किंवा देणार आहाेत, असेही ते पुढे ठासून सांगतील. शेतकरी या बियाण्यांची मागील आठ वर्षांपासून मागणी करीत आहेत. मात्र, केंद्रातील भाजप नेते व शिवराजसिंह चव्हाण दरवेळी पर्यावरणाचा हवाला देत जीएम पिकांना विराेध करीत आले आहेत. एचटीबीटी बियाणे हे केवळ तणनाशक सहनशील बियाणे आहे. यातील एचटी जनुक ((Herbicide Tolerant gene) व व्हायरस याचा काहीही संबंध नाही. एचटीबीटी बियाण्यांवर व्हायरस किंवा गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव हाेत नाही, असा दावा करणे चुकीचे आहे. गुलाबी बाेंडअळीच्या व्यवस्थापनासाठी त्या बियाण्यांमध्ये बीटी जनुक (Bacillus thuringiensis gene) तर मावा, तुडतुडे व रस शाेषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी त्यात व्हीआयपी-3 जनुक (VIP-3 gene) असणे अनिवार्य आहे. बीटी व एचटीबीटी बियाण्यांमध्ये व्हायरसचा प्रतिकार करणारे काेणतेही जनुके नाहीत. या सर्व बाबींचा उल्लेख शिवराजसिंह चव्हाण करीत नसल्याने त्यांच्या वक्तव्यातील विराेधाभास स्पष्ट हाेताे. तणामुळे कापसाच्या पिकाचे 40 ते 60 टक्के नुकसान हाेते. बियाणे तणनाशक सहनशील असल्यास शेतकऱ्यांना पिकातील तणाचे तणनाशकाची फवारणी करून व्यवस्थापन करणे साेपे जाते. परिणामी, तणामुळे हाेणारे 40 ते 60 टक्के नुकसान टाळता येऊ शकते.

♻️ उत्पादन वाढीसाठी भांडवली खर्च व अनुकूल हवामान आवश्यक
बियाण्यांमुळे काेणत्याही पिकांचे फारसे उत्पादन वाढत नाही, हा आजवरचा अनेकांना अनुभव आहे. उत्पादन वाढविण्यासाठी बियाण्यांसाेबत पिकाला आवश्यक असलेल्या रासायनिक खते, सुक्ष्म अन्नद्रव्ये व इतर बाबींवरील भांडवली खर्च (Package of Practices) वाढवावा लागताे. हवामान अनुकूल असल्यास उत्पादन व गुणवत्तेत वाढ हाेते. उत्पादन वाढीसाेबत खर्च व धाेका वाढताे. भांडवली खर्च वाढवून प्रतिकूल हवामान असल्यास नुकसान सहन करावे लागते. शेतमालाचे उत्पादन वाढले की, केंद्र सरकार त्या वाढलेल्या उत्पादनाचा वापर भाव पाडण्यासाठी करते, हे अनेकदा सिद्ध झाले आहे. भाव पाडल्याने शेतकऱ्यांवरील कर्ज वाढत जाते. समाधानकारक भाव मिळत नसल्याने शेतकरी पर्यायी पिके घेतात. हाच प्रकार कापसासाेबत घडत आहे. केंद्र सरकारने भरमसाठ कर लादून कृषी निविष्ठांच्या किमती आधीच वाढवून ठेवल्या आहेत. त्यामुळे उत्पादन खर्च वाढला आहे. हा खर्च कमी करण्यासाठी सरकार कृषी निविष्ठांवरील कर कमी करणार का? यावर शिवराजसिंह चव्हाण शब्दही बाेलत नाही.

♻️ संकरित वाणाचा हट्ट का? सरळ वाण का देत नाही?
जगातील सर्वच कापूस उत्पादक देशामध्ये कापसाचे बीटी (Bacillus thuringiensis cotton) व एचटीबीटी (Herbicide Tolerant Bacillus thuringiensis cotton) सरळ वाण (Straight varieties) वापरले जाते. भारत मात्र याला अपवाद ठरला आहे. भारतात ही जनुके संकरित वाणात (Hybrid varieties) वापरली जाते. संकरित वाणातील बीटी जनुकांचा ((Bacillus thuringiensis gene) प्रयाेग पूर्णपणे यशस्वी ठरला नाही. बीटी कापसाच्या संकरित वाणावर गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव हाेताे आणि याचा दाेष संकरित वाणाला न देता बीटी जनुकांना दिला जाताे. कापसाच्या सरळ वाणामधील बीटीची जनुके संकरित वाणाच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे कार्यरत असतात आणि गुलाबी बाेंडअळीचा धाेका टळताे, हे देखील प्रयाेगावरून सिद्ध झाले आहे. असे असले तरी भारतातील राज्यकर्ते व धाेरणकर्ते कापसाच्या संकरित वाणाचा अप्रत्यक्षरित्या हट्ट धरत आहेत. विशेष म्हणजे, संकरित वाण हे हायरिस्पाॅण्ड (High response) असते, हायईल्ड (High yield) नसते.

♻️ आम्ही चूक कसे, ते समजावून सांगा!
अमेरिकेत कापसाचे सरळ वाण वापरले जाते. भारतात सन 1970 पर्यंत सरळ वाण वापरले जायचे. आता या वाणात बऱ्याच सुधारणा झाल्या आहेत. आम्ही केंद्र सरकारकडे कापसाचे सरळ वाण उपलब्ध करून देण्याची मागणी करताे आहाेत. त्यासाठी मी केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांना पत्र दिले. त्याआधी अनेकदा कृषी मंत्रालयाशी पत्रव्यवहार केला. सरकार माझ्या पत्रांना उत्तर देत नाही. केंद्रा सरकारने कापसाचे जे बियाणे उपलब्ध करून द्यायचे आहे, ते द्यावे; पण ते सरळ वाणात द्यावे. त्यासाठी सरकारने चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये किंवा संकरित वाणाचा आग्रह धरू नये. आमची मागणी चूक असेल तर ती चूक कशी आहे, हेदेखील सरकारने आम्हाला व शेतकऱ्यांना समजावून सांगावे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ कृषितज्ज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!