krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Water literacy : जलक्षेत्रातील तांत्रिकतेबाबत सुज्ञता आवश्यक

1 min read

Water literacy : आज महाराष्ट्र राज्य भीषण दुष्काळाच्या (Drought) उंबरठ्यावर आहे, किंबहुना आपण अगोदरच ‘नो रिटर्न मर्यादा’ ओलांडली आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हायला हवा, या दृष्टीने अनेकजण प्रयत्न करीत आहेत. परंतु तरीसुद्धा जलसाक्षरतेच्या (Water literacy) दृष्टीने आपण बाल्यावस्थेतच आहोत. तज्ज्ञ, प्रशासन आणि लोकसहभाग यात कधी नव्हे एवढी मोठी दरी निर्माण झाली आहे. या सगळ्यात दुष्काळमुक्तीसाठी झटणारे म्हणून जे कोणी भूजल वैज्ञानिक आहेत, यात सुरेश खानापूरकर, उपेंद्रदादा धोंडे अशी मोजकीच नावे आढळतात. याव्यतिरिक्त महाराष्ट्रात केंद्रीय भूजल विभाग आणि भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमधील भूजल वैज्ञानिक आणि काही खाजगी भूजल वैज्ञानिक सातत्याने प्रयत्नरत आहेतही, परंतु ते कदाचित कायदे-नियमांच्या बंधनांमुळे प्रसिद्धीझोतात नसतात. महाराष्ट्राचे जलक्षेत्र अनेक सेलिब्रिटी आणि काही प्रसिद्ध जल महापुरुष वगैरे लोकांनीच व्यापलेले दिसते. मुळात महाराष्ट्राचे जलधोरण म्हणून आपण कुठे चुकत आहोत का? याचे आत्मपरीक्षण होत आहे, असे काही दिसत नाही.‌ या सगळ्या परिस्थितीकडे भूजल वैज्ञानिक म्हणून आपण कसे पाहतो या विषयावर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध भूजल वैज्ञानिक उपेंद्रदादा धोंडे यांच्याशी केलेली ही चर्चा.

🔆 महाराष्ट्र गेल्यावर्षी मुबलक पाऊस पडून देखील या उन्हाळ्यात ग्रामीण व शहरी भागात पाण्याची वानवाच का ?
🎯 ज्या प्रमाणामध्ये पावसाच्या पाण्याचे भूजलात रुपांतर व्हायला हवे, त्या प्रमाणात ते होत नाही. कारण आपले प्रयत्न तांत्रिक दृष्टीने योग्य नाहीत. महाराष्ट्राची जल निरक्षरता हे खरं तर एक मोठे आव्हान आहे. महाराष्ट्रातील जलक्षेत्रात स्वयंघोषित खड्डेखोरांनी धुमाकूळ माजवला आहे आणि यावर कुणाचेही नियंत्रण नाही. प्रशासन व लोकप्रतिनिधी देखील खड्डेखोरांचे समर्थन करताहेत. कुठलीही शैक्षणिक तांत्रिक पात्रता नसलेल्या लोकांना शासन समर्थन – प्रोत्साहन देत आहे. शिवाय, सरकारी भूजल वैज्ञानिक देखील समोर येऊन बोलत नाहीत. कारण त्यांना कुणाचीही नाराजी ओढवून घ्यायची नाही. म्हणूनच ‘महाराष्ट्राचे जलक्षेत्र हे स्वयंभू जलतज्ज्ञांच्या हवाली करणे’ हेच खरे दुष्काळाचे कारण आहे.

🔆 जलतारा सारख्या प्रकल्पाबाबत आपले मत काय? हा प्रकल्प नेमका फायदेशीर आहे का? कसा ?
🎯 दरवेळी कुणीतरी उठतो आणि काहीतरी संकल्पना मांडतो. सदरच्या संकल्पनेची प्रसिद्धीमाध्यमं आणि प्रशासन-लोकप्रतिनिधी मार्फत प्रसिद्धी करवून घेतो आणि लोकांना आकर्षित केले जाते. हे करत असताना तज्ज्ञांना मात्र जाणीवपूर्वक दूर ठेवले. जाते कारण ते अशा गोष्टीतला फोलपणा उघड करत असतात. दर दोन-चार वर्षांनी अशी कुठली तरी संकल्पना येते प्रसिद्ध होते आणि कालौघात विरून जाते. त्याच्या यशापयशाचे कसलेही मूल्यमापन होत नाही, अथवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी निश्चित केली जात नाही. उदाहरणार्थ जलतारा व शोषखड्डा यात तसा विशेष काही फरक नाही. ही संरचना फक्त उथळ जलधराला काही अंशी रिचार्ज करणारी योजना आहे. यातून दुष्काळमुक्तीचे स्वप्न पाहणे म्हणजे मूर्खपणा आहे. शोषखड्डा, मॅजिक पिट इत्यादी नावाने ही संरचना पूर्वीपासूनच आहे. परंतु ती आजवर बहुप्रचलित होऊ शकली नाही. कारण त्याची मर्यादित यशस्वीता. डासमुक्त परिसरासाठी शोषखड्डा ही संकल्पना निर्माण झाली होती आणि सोबतच यात निश्चितपणे काही प्रमाणात उथळ जलधर हा खात्रीनं रिचार्ज होतो. यामुळे तिला पुनर्भरण संरचना देखील मानले गेले. परंतु या संरचनेची व्याप्तीच अत्यंत मर्यादित असल्याने, अर्थात संरचनेसाठी येणारा खर्च आणि तुलनेत फायदा याचे प्रमाण व्यस्त असल्याने याची फार काही यशस्वीता आढळली नाही. त्यामुळे ही योजना तशी उपयुक्त व सुलभ असूनही लोकप्रिय होऊ शकली नाही. म्हणूनच फक्त प्रसिद्धीचा ढोल वाजवत कोणत्याही योजनेला लोकप्रिय करण्याचे तंत्र दीर्घकाळ टिकत नसते. लवकरच लोकांना त्यातला फोलपणा समजतो. परंतु, दुर्दैवाने तोवर लोकांचे मोठे नुकसान होऊन गेलेले असते. अर्थात जसा शासनाला जाब विचारला जातो, तसा जाब या स्वयंघोषित जल महापुरुषांना विचारला जात नाही.

🔆 शेतीत सिंचन व्यवस्था मजबूत करण्यासाठी जलसंधारण म्हणून नेमकं काय केलं पाहिजे ? शेतकऱ्यांनी वैयक्तिक लाभासाठी काय केलं पाहिजे?
🎯 तज्ज्ञांच्या सल्ल्याने गावस्तरावर जल आराखडा तयार करून त्रिस्तरीय पुनर्भरणाचे नियोजन केले पाहिजे. यात वैयक्तिक पातळीवर करण्याच्या पद्धती, सामूहिक पातळीवरील उपक्रम आणि शासकीय मदतीने, अशा प्रकारे कामांचे नेमकेपणाने वर्गीकरण केले पाहिजे. सहज जलबोध अभियानात आपण हे वर्गीकरण केले आहे. याशिवाय केंद्रीय भूजल विभाग तसेच भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा यामध्ये तज्ज्ञ प्रशिक्षित भूजल वैज्ञानिक आहेत, त्यांच्या तज्ज्ञतेचा योग्य वापर केला गेला पाहिजे. जसे सामान्य माणसाला जलसंधारणासाठी भूजल वैज्ञानिकाचे महत्त्व समजले पाहिजे, तसेच ते सेलिब्रिटी व लोकप्रतिनिधींना देखील कळले पाहिजे.

🔆 शेततळे योजना ही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय होताना दिसत आहे, पण खरंच ती फायदेशीर आहे का?
🎯 होय, शेततळे हे निश्चित उपयुक्त आहे, पण जर ते भूजलाचा उपसा करून भरले जात असेल तर मात्र ते मोठ्या प्रमाणात धोकादायक ठरते. कोणत्याही पाणलोटात एका निश्चित संख्येपेक्षा जास्त शेततळी करणे धोकादायक आहे. शेततळ्यापेक्षाही अधिक उपयुक्त असलेले पाझर तलाव दिवसेंदिवस नष्ट होत आहेत, यावर उपाय म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या हद्दीत लहान आकाराचे पाझर तलाव ज्याला आम्ही ‘भैरव कुंड’ असे नाव दिले आहे, अशा प्रकारचे लहान लहान तलाव निर्माण केले पाहिजेत. तेच खऱ्या अर्थाने परिसराला दुष्काळमुक्त करू शकतात. या विषयावर अधिक माहितीसाठी लोकांनी प्रशिक्षित भूजल वैज्ञानिकास संपर्क साधला पाहिजे.

🔆 सरकारी भूजल वैज्ञानिक म्हणून तुमचे पुढील जलक्षेत्रातील उद्दिष्ट काय? महाराष्ट्रातील जलक्षेत्रासाठी तुम्ही काय उपाय सांगाल?
🎯 केंद्रीय भूजल विभागाची काम करण्याची निश्चित पद्धती आहे. यामध्ये संशोधन आणि जलधरांचे व्यवस्थापन मोजमाप या गोष्टी महत्त्वाच्या असतात. परंतु केंद्रीय भूजल विभागाच्या मार्फत उपभोक्त्यांसाठी थेट योजना नसतात. थोडक्यात केंद्रीय भूजल विभागाचे काम म्हणजे राज्याच्या जलधरांची नेमकी स्थिती सांगणे आणि त्यावर उपाय सुचवणे हे आहे. खरंतर राज्य सरकारांनी कोणत्याही प्रकारची जलसंधारण योजना राबविण्यापूर्वी केंद्रीय भूजल विभागाचा, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा या विभागातील तज्ज्ञ भूजल वैज्ञानिकांचा सल्ला घेणे अत्यंत आवश्यक आहे. केंद्रीय भूजल विभागाच्या ध्येयधोरणांचा, तांत्रिक माहितीचा लोकांना अधिकाधिक परिचय व्हावा आणि महाराष्ट्राच्या जलसाक्षरतेसाठी त्याचा फायदा व्हावा यासाठी आपल्या कूवतीनुसार जास्तीत जास्त प्रयत्न करणे प्रत्येक भूजल वैज्ञानिकाचे कर्तव्य आहे, ते मी माझ्या परीने पार पाडत राहीलच. या सोबतच मी विषयतज्ज्ञ म्हणून आणि सहज जलबोध अभियानाच भूमिका म्हणून लोकांपर्यंत जलक्षेत्रातील तांत्रिकता नेमकेपणाने पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करील.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!