krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

शेतकऱ्यांनाे!… दिवाळीत साेयाबीन विकून स्वतःचे दिवाळे काढू नका!!

1 min read
मध्य प्रदेश, राजस्थानातील नवीन साेयाबीन (Soybean) बाजारात (Market) आले असून, महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, कर्नाटक व इतर राज्यातील साेयाबीन बाजारात यायला किमान एक महिना आहे. बहुतांश शेतकरी साेयाबीन विकून दिवाळी साजरी करतात. सध्या साेयाबीनचे दर 4,600 ते 5,700 रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत. बाजारातील साेयाबीनची आवक (Arrival) हळूहळू वाढत असतानाच काही सटाेडियांसह व्यापाऱ्यांनी वायदे (Commodity Future market) बाजारातील साेयाबीनच्या साैद्यांवर बंदी घालावी, अशी मागणी करायला सुरुवात केली. या शेतकरी विराेधी मागणीला 'साेपा' (SOPA-The Soybean Processors Association of India)ने समर्थन दिल्याने दिवाळीपूर्वी साेयाबीनचे दर (Soybean Rate) वाढण्याची शक्यता मावळली आहे. याच काळात शेतकऱ्यांनी साेयाबीनची विक्री केल्यास त्यांना माेठे आर्थिक नुकसान साेसावे लागणार असल्याने त्यांनी साेयाबीन विक्रीचे याेग्य नियाेजन (Proper planning) करणे आवश्यक आहे.

🌎 वायदे बाजार आणि उद्याेजक, व्यापाऱ्यांची संघटना
भारतात वायदे बाजाराला सन 2003 मध्ये सुरुवात झाली. देशांतर्गत शेतमाल बाजाराप्रमाणे वायदे बाजारातील केंद्र सरकारचा अवाजवी हस्तक्षेप आहे. केंद्र सरकार दरवेळी शेतकऱ्यांचे आर्थिक हित लक्षात घेण्याऐवजी काही उद्याेजक (Entrepreneur), व्यापारी (Merchant), माेठे गुंतवणूकदार (Investors) व राजकीय मंडळींच्या मागणी व त्यांचे आर्थिक हित जाेपासण्याला अधिक महत्त्व देते. त्यामुळे दाेन दशकानंतरही भारतीय वायदे बाजार पाहिजे तसा विकसित व पक्व हाेऊ शकला नाही. विशेष म्हणजे, ही मंडळी दरवर्षी देशातील सोयाबीनचा संपूर्ण बाजार नियंत्रित करण्याचा प्रयत्न करते.

🌎 वायद्यांवरील बंदीची मागणी
वायदे बाजारातील हळदीच्या (Turmeric) साैद्यांवर बंदी घालण्याची मागणी ताजी असताना आणि 15 ते 20 दिवसात नवीन साेयाबीन बाजारात येण्याच्या प्रतीक्षेत असतानाच साेयाबीनच्या वायद्यांवर बंदी घालण्याची मागणी जाेर धरू लागली. या मागणीला समर्थन दिल्याने ‘साेपा’ने समर्थन देत साेयाबीनच्या साैद्यांवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी सेबी (Securities and Exchange Board of India) पत्रही दिले. ‘साेपा’ने सहा वर्षात तिसऱ्यांदा ही मागणी केल्याने साेपाचा खरा चेहरा समाेर आला. शिवाय, या मागणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.

🌎 वायदे बाजाराचे महत्त्व
वायदे बाजार हा जगभरातील शेतमालाच्या बाजारपेठेवर लक्ष ठेवत असल्याने शेतमालाचे (Agriculture Commodity) उत्पादन (Production) आणि मागणी (Demand) यातील प्रमुख दुवा म्हणून काम करते. शेतमालाच्या उत्पादनाचे सरकारी आकडे दरवर्षी बाजार प्रभावित करून दिशाभूल करते. मात्र, वायदे बाजार शेतमालाच्या पेरणी, उत्पादन व बाजारातील पुरवठा, आयात व निर्यातीचे आकडेही याेग्य पद्धतीने व खरे देतात. काही उद्याेजक, व्यापारी, गुंतवणूकदार व सटाेडियांना भारतातील बाजार व्यवस्था त्यांच्या हातात ठेवून अवाजवी नफा कमवायचा आणि शेतकऱ्यांना लुटायचे आहे. त्यासाठी ही मंडळी वायदे बाजाराला बदनाम करण्याची व शेतमालाच्या साैद्यांवर बंदीची मागणी करण्याची तसेच त्यासाठी केंद्र सरकारवर दबाव निर्माण करण्याची एकही संधी साेडत नाही.

🌎 वायदे बाजाराबाबत शेतकरी अनभिज्ञ
महाराष्ट्रासह देशभरातील शेतकरी (Farmer) वायदे बाजार आणि त्यातील व्यवहाराबाबत आजही अनभिज्ञ आहेत. शेतमालाचे भाव काेसळल्यास शेतकरी स्थानिक व्यापाऱ्यांना जबाबदार धरतात आणि निर्णय घेणारे सत्ताधारी आणि त्यांना निर्णय घेण्यास भाग पाडणारे साेपाचे पदाधिकारी, माेठे उद्याेजक, व्यापारी, गुंतवणूकदार व सटाेडिये मात्र नामानिराळे राहतात. या मंडळीला वठणीवर आणण्यासाठी शेतकऱ्यांनी वायदे बाजारावर लक्ष केंद्रित करून शेतमालाच्या साैद्यांवरील बंदी व त्याच्या मागणीच्या विराेधात आवाज उठवायला पाहिजे. दोन वर्षापूर्वी शेतकऱ्यांनी वायदेबंदीला विराेध केल्यानंतर वायदे व्यवहार सुरूच ठेवण्यात आले हाेते. बाजार व्यवस्था आपल्या मुठीत ठेवण्याची इच्छा बाळणाऱ्या व त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या मंडळींवर वचक निर्माण करण्यासाठी शेतकऱ्यांनी वायदे बाजाराचे ज्ञान संपादन करणे काळाची गरज आहे.

🌎 एमएसपी आणि सध्याचे दर
केंद्र सरकारने सन 2022-23 च्या हंगामासाठी साेयाबीनची किमान आधारभूत किंमत (MSP-Minimum Support Prices) 4,300 रुपये प्रति क्विंटल जाहीर केली आहे. सन 2020-21 च्या हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात साेयाबीनचे दर 10,000 रुपये प्रति क्विंटल तर सन 2021-22 च्या हंमागाच्या शेवटच्या टप्प्यात हेच दर 8,700 रुपयांपर्यंत चढले हाेते. सध्या देशभरातील बाजारात साेयाबीनचे दर 4,600 ते 5,700 रुपये प्रति क्विंटल असून, हे दर एमएसपीपेक्षा 300 ते 1,400 रुपयांनी अधिक आहेत.

🌎 बाजाराची क्षमता आणि शेतमालाची आवक
प्रत्येक बाजारपेठेची विशिष्ट क्षमता (Market capacity) असते. बाजारपेठेतील शेतमालाची आवक (Arrival), गाड्या लाेड (Load) व अनलाेड (Unload) करणे, व्यापारी व दलालांची कॅश लिमिट (Cash limit), त्यांची शेतमाल खरेदीची क्षमता (Purchase capacity), खरेदी केलेला शेतमाल साठवून (Stock) ठेवण्याची व्यवस्था याचा एक स्टॅंर्डड फारमेट (Standerd farmet) असताे. या फारमेटपेक्षा म्हणजेच क्षमतेपेक्षा अधिक म्हणजेच एका दिवशी 2,000 गाड्यांची क्षमता असलेल्या बाजारात 5,000 ते 10,000 गाड्या शेतमालाची आवक झाल्यास त्या बाजारपेठची स्टॅंर्डड सिस्टिम चोकअप (Standard System Chokeup) हाेते. अशा परिस्थिती व्यापारी व दलाल त्यांची कॅश लिमिट लक्षात घेत कमी दराने शेतमाल खरेदी करतात. याचा फायदा स्टाॅकिस्ट घेतात. दर काेसळल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेते. साेयाबीन बाजारासंदर्भात दसऱ्यानंतर व दिवाळीपूर्वी ही परिस्थिती मागील किमान 20 वर्षापासून अनुभवायला येत आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्याच्या नादात शेतकऱ्यांचे दिवाळे निघते तरी व्यापरी व उद्याेजक मोठा नफा कमावतात.

🌎 मग दिवाळी साजरी करायची कशी?
शेतकऱ्यांना जर त्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून घ्यायचा असेल तर त्यांनी बाजारपेठ व वायदे बाजारावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. शेतमाल विकण्याची घाई न करता बाजारातील शेतमालाची आवक स्थिर ठेवणे शेतकऱ्यांनी शिकायला हवे. प्रत्येक शेतकऱ्याला दिवाळीचा सण तर साजरा करायचा आहे. मग, घरी आलेले साेयाबीन विकले नाही तर दिवाळी साजरी करायची कशी? हा प्रश्न निर्माण हाेताे. शेतकऱ्यांनी दिवाळी व इतर खर्चाचा हिशेब लावून तेवढेच साेयाबीन दसऱ्याच्या पूर्वी विकावे. उर्वरित साेयाबीन घरी साठवून ठेवण्याची व्यवस्था करावी. त्यामुळे दिवाळी तर साजरी हाेईल, शिवाय, एकमुस्त साेयाबीन कमी दरात विकण्यामुळे हाेणारे आर्थिक नुकसान टाळता येईल.

🌎 साेयाबीन विकायचे तरी कधी?
काेणताही व्यापारी अथवा दलाल हा पैसे कमावण्यासाठीच धंदा करताे. त्यासाठी ताे माेठी गुंतवणूक करून धाेका पत्करण्याची तयारी देखील ठेवताे. हे जरी खरे असले तरी शेतकऱ्यांनी आपण बाजारात लुटल्या जावू नये किंवा आपली लूट हाेणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक आहे. दिवाळीनंतर किमान 15 दिवस बाजारपेठा बंद असतात. त्या बाजारपेठा दिवाळीनंतर सुरू हाेताच साेयाबीनच्या दरावर लक्ष ठेवून शेतकऱ्यांनी हळूहळू साेयाबीन बाजारात विकायला काढावे. दिवाळीनंतर साेयाबीनच्या दरात तेजी येत असल्याचे मागील 20 वर्षात अनुभवास आले आहे. यावर्षी दिवाळीपूर्वी साेयाबीनचे दर 6,000 रुपये प्रति क्विंटलच्या वर जाण्याची शक्यता नाही. या काळात सोयाबीनचे दर ‘एमएसपी’पेक्षा कमी (4,300 रुपये प्रति क्विंटल) होणार नाही व 6,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा अधिक होणार नाही, याची ‘सोपा’ व त्यांचे हस्तक काळजी घेणार आहे. दिवाळीनंतर हेच दर 7,000 रुपये ते 8,000 रुपयांच्या दरम्यान किंवा त्यापेक्षा अधिक हाेण्याचा अंदाज शेतमाल बाजार अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी दिवाळी साजरी करण्याच्या नादात संपूर्ण साेयाबीन कमी दरात विकून स्वत:वर दिवाळं ओढवून घेऊ नये, ही विनंती!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!