आधुनिक धृतराष्ट्रांची राजवट
1 min read
आचार्य विनोबा भावे यांनी भगवतगीतेच्या केलेल्या अनुवादात गीताईत पहिला श्लोक आहे….
त्या पवित्र कुरुक्षेत्री, पांडूचे आणि आमुचे
युद्धार्थ जमले तेंव्हा, वर्तले काय संजया.
शाळेत गीताईच्या तासाला हा श्लोक म्हणताना खूप हसू यायचं. राजाचं नाव कसं झोकदार हवं विक्रमादित्य… हर्षवर्धन… चंद्रगुप्त….! पांडू हे काय राजाचं नाव….? शाळकरी वयात या श्लोकात विशेषतः ‘पांडूचे’ आणि ‘आमुचे’ या दोन शब्दात दडलेला अर्थ कळत नव्हता. शेतकऱ्याची घरलक्ष्मी झाल्यावर मात्र त्या श्लोकाचा अर्थ उमगला. धृतराष्ट्राची अनीती, धूर्तपणा, कावेबाजपणा, वागण्यातील क्रौर्य हे सगळं त्या दोन शब्दांतून कळलं. आतापर्यंत सगळ्यांवर सारखंच प्रेम करतो, असं भासवणाऱ्या धृतराष्ट्राने स्पष्टपणे सांगितलं… पांडूचे आणि आमुचे… वेगवेगळे आहेत. जे पांडूचे आहेत, ते आमचे नव्हेत. ‘आमचे’ आहेत तेच आमचे.
🌐 राज्यकर्त्यांचा चलाखपणा
आजकाल पुढाऱ्यांची भाषणं ऐकताना सव्वाशे कोटी भाऊ-बहिणींना घातलेली साद असो की, दोन्ही हात पसरून गंमतीशीर अभिनिवेशात महाराष्ट्रातल्या तमाम भावा-बहिणींनो… अशी हाक दिलेली असो… ऐकल्या बरोबर चटकन् लक्षात येतं, या सव्वाशे कोटींमधले आणि तमाम मराठी लोकांमधेही असेच दोन गट आहेत. धृतराष्ट्रानी खरं खरं सांगितल की, पांडूच्या मुलांना मी आपलं मानत नाही. पण आजचे राज्यकर्ते धृतराष्ट्रापेक्षा चलाख, चतुर आहेत. ते अनवधानाने ही असलं काही बोलत नाही.
🌐 राज्यकर्ते-नाेकरशहांची चंगळ
राज्यकर्त्यांनी एकदा का खुर्ची काबीज केली की, खुर्चीची सुरक्षा व देखभाल करायला काही खुर्ची-बहाद्दर लागतात. त्यापैकी काही मोठमोठ्या परीक्षा दिलेले लेखणी-बहाद्दर असतात. त्यांना नोकरशहा म्हणतात. वेगवेगळ्या पदांवर नेमणूक केलेले हे नोकरशहा ‘आमुचे’ या गटात मोडतात. यांची निष्ठा खुर्चीशी असते. स्वत:च्या आणि राज्यकर्त्यांच्याही. त्यामुळे खुर्चीला प्राथमिकता. राज्यकर्ते या नोकरशाहीला खूप जपतात. त्यांच्या मासिक वेतनातच महसूलाचा फार मोठा भाग खर्च होतो, हे युगात्मा शरद जोशींनी सप्रमाण सिद्ध करून दिलं आहे. निवृत्ती वेतन नावाचे बक्षीसही त्यांना आत्तापर्यंत मिळत होते. राज्यकर्त्यांना डोईजड झाल्याने राज्यकर्त्यांनी स्वत:चे निवृत्ती वेतन अव्याहत सुरू ठेवले नोकरशहांचे बंद केले. पण त्यांना मिळणाऱ्या सोयी सवलती बघितल्या की, आश्चर्य वाटते. एकतर जगबुडी झाली तरी त्यांना त्यांचे मासिक वेतन निश्चित मिळते. ते वेतन आयोगामुळे दिवसेंदिवस वाढतच जाते. त्यांना महागाई भत्ता नावाचा ‘वर’ मिळालेला असतो. महागाई फक्त धान्याची आणि कांद्याची होते. खता, बियाण्यांच्या किमती वाढल्या तर असे ‘वर’ मिळत नाहीत. दर महिन्याला उत्पन्नाची हमी असल्यामुळे ‘ते’ विम्या सारख्या योजनांचा उपयोग करून घेतात. शेतकऱ्यांचा विमा सरकार नामक व्यवस्था उतरवते. शंभर शेतकऱ्यांकडून विम्याचे पैसे गोळा करून एखाद्या शेतकऱ्याला त्यातले थोडे देतात. त्याला विमा उतरवण्याचे व्यसन जडते.
🌐 कर्मचाऱ्यांचा खादाड व कामचुकारपणा
एखाद्या कार्यालयात एकदा नोकरीला चिकटले की झाले. जबाबदारीने काम केले नाही तरी चालते. फक्त दहा ते पंधरा टक्के कर्मचारी नेकीने काम करतात, असे अनेक सर्वेक्षणे सांगतात. शिवाय, काम पुढे सरकवायचे असेल तर कागदासोबत पैसा जोडावा लागतो. तिथे कुणाचाही मुलाहिजा नाही. अगदी ‘सजातीयांचा’ सुद्धा. कार्यालयीन कामाचे स्वरूप असे असते. शेतकऱ्यांना वीज बिल वाढवून देऊन त्यांची सक्तीने वसुली…. ही विद्युत विभागाच्या कर्मचाऱ्यांची आणि राज्यकर्त्यांची एकत्रित कर्तबगारी आणि कर्तव्यनिष्ठा सगळ्यांनीच बघितली आहे. त्या बिलांबाबत बोलायला गेल्यावर त्या अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर पश्चात्ताप किंवा ओशाळलेपणाची एकही रेषा नव्हती. उलट, दिली चुकीची बिले. खोटेपणा करून दिली वाढवून… त्यात एवढा त्रागा करायचे काय कारण? आता दुरुस्त करून देणारच आहोत ना…. असा साळसूद भाव होता. सगळ्या नोकरशाहीला…. सगळ्या खात्यांच्या अधिकाऱ्यांच्या, कर्मचाऱ्यांच्या तैनाती फौजेला शेतकरीच पोसत आहे.
🌐 शेतकऱ्यांचे कष्ट बेदखल
नोकरशहा करत असलेल्या आणि करत नसलेल्या कामांबद्दल वर्तमानपत्रात खूप काही वाचायला मिळते. एकतर 365 दिवसांपैकी कमीतकमी 100 दिवस तर त्यांना कामच करावे लागत नाही. शनिवार, रविवार सुट्टीच असते. 26 जानेवारी, 15 ऑगस्ट, थोरामोठ्यांच्या जयंती-पुण्यतिथी, या दिवशी देशप्रेम व्यक्त करायला काम बंद असते. नोकरदार लोकांच्या कुटुंबियांना सुद्धा एक वरदान असते…. अनुकंपा तत्वावर मिळणारी नोकरी. म्हणजेच मासिक वेतनाची हमी. एखाद्या कर्मचाऱ्याचा सेवेत असतानाच मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांपैकी एकाला त्याच कचेरीत नोकरी मिळते. शेतकरी कष्ट करताना मेला तरी त्याची दखल कोणी घेत नाही. त्याच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कुटुंबाच्या डोक्यावर जसाच्या तसा राहतो. या आणि अशा अनेक सवलती कर्मचारी महिलांना मिळतात, तेव्हा त्यांच्या नशिबाचे कौतुक वाटते. त्याही ‘आमुच्या’ गटात मोडतात. त्यांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीनंतरही पगारी सुट्टी असते. शेतकरणी तर हा विचारही मनात आणू शकत नाहीत. या शहरी सुशिक्षित महिला शाळा, कॉलेजात, वेगवेगळ्या ऑफिसात काम करतात. तिथे तंत्रज्ञान यांच्या मदतीला असते. खर्डेघाशी, हिशोब करायला लागू नये म्हणून टेबला-टेबलावर कॉम्प्युटर असतात. शेतकरणी मात्र आजही बोटे जखमी होईपर्यंत निंदण करत आहेत. त्यांच्या हातचा विळा सुटलेला नाही. त्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ हा प्रकार तर सांगून समजावूनही खरा वाटत नाही.
🌐 आर्थिक चक्रव्यूहात अडकले शेतकरी
धृतराष्ट्राला साळसूदपणाचा आव त्याच्या आंधळेपणामुळे घेता आला. त्याच्या मनात हे दोन गट आणि तट सुरुवातीपासूनच होते. आजही धृतराष्ट्राच्याच नीतीने आणि रीतीने सगळा कारभार चालू आहे. कुठे डोळे उघडे ठेवायचे, कुठे बंद हे ठरलेले आहे. पांडवांना कोंडीत पकडण्याच्या प्रत्येक प्रयत्नाला धृतराष्ट्राचे आशीर्वाद होते. आज शेतकऱ्यांना जमेल तिथे कोंडीत पकडले जात आहे. आर्थिक चक्रव्यूहात सापडून कितीही अभिमन्यू मेले तरी खोटे रडण्यापलीकडे धृतराष्ट्र काही करत नाही. घटनेत नसलेली असभ्य, अनिष्ट परिशिष्टे घुसडली आहेत. त्यामुळे सुईच्या टोकावर मावेल एवढीही जमीन शेतकऱ्याच्या मालकीची असू शकत नाही.
🌐 भारत आणि इंडिया द्विराष्ट्रवाद
मध्यंतरी द्विराष्ट्रवादाच्या संकल्पनेवर तावातावाने चर्चा झाली. कुणी जिनांना, कुणी सावरकरांना, कुणी सर सय्यद अहमद यांना त्याचे श्रेय आणि अपश्रेयही दिले. आर्य आणि मूलनिवासी हा तर काही लोकांचा आवडता विषय आहे. पण भारत आणि इंडिया या द्विराष्ट्रवादाबद्दल बोलायची कुणाचीही तयारी नाही. देश आतल्याआत दुभंगतो आहे. भारतातून इंडियात पलायन किंवा स्थलांतर करणारे निर्वासितांचे जगणे जगत आहेत. आता हा द्विराष्ट्रवाद घराघरात पोहोचला आहे. भावाभावांमधे एक नोकरशहा तर दुसरा
शेतकरी आहे. शेतकऱ्यांच्या लढ्याची तीव्रता यामुळेही थोडी कमी झाली आहे. नोकरदार भावाची आणि त्याच्या बायको-मुलांचीही ऐट असते. त्यापैकी कुणी शेतात कष्ट करत नाहीत. पण कापूस, सोयाबीनच काय वांगी, मिरची, टमाटे, कारली …. सगळ्यांकडे त्यांचे लक्ष असते. शेती करणाऱ्यांना काही कळत नाही असे गृहीतच धरून टीव्हीवरच्या शेतीची उदाहरणे दिली जातात. शेतकरी भावाची मुले आपल्याच शहरी भावंडांकडे बघत आपल्यालाही कधीतरी कुठेतरी नोकरी मिळेल, अशा आशेवर जगत असतात. नाईलाजाने शेतात काम करत असतात. एखाद्याला नोकरी मिळाली तर रात्रीतून त्याचे वागणे बदलते. तो शेतीबद्दल उघडउघड तिटकारा दाखवायला लागतो. त्यालाही शेतीत काम करण्याची आणि शेतीत काम करणाऱ्यांचीही लाज वाटू लागते.
🌐 एकाच घरात शाेषित व शाेषक
आता शोषित आणि शोषक एकाच घरात आहेत. आज शोषक बेपर्वा आहेत. शोषणाच्या व्यवस्थेत सहभागी आहेत. पुढच्या पिढीवर काय परिणाम होईल, याचा विचार ते करत नाहीत. यापुढे नोकऱ्या फार कमी असतील आणि त्या वंशपरंपरेने मिळणार नाहीत. एकाच घरात एक भाऊ शोषण व्यवस्थेचा पुरस्कर्ता आणि दुसरा त्या व्यवस्थेचा बळी आहे. हा द्विराष्ट्रवाद फार भयानक आहे. आजे, काके तसे मामे, सासरे, सोयरे, सखे, गुरुबंधू, मुले नातू, दोन्ही सैन्यात सारखे. अर्जुनाला रणांगणात जे दृश्य दिसले ते सगळीकडे दिसत आहे. लढाई जिंकण्यासाठी आपल्या जवळ ‘कृष्णनीती’ आहे. आपण अभ्यास करून निश्चयाने उभे राहिले पाहिजे.