krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

नवीन कापसाच्या खरेदीला सुरुवात सध्याचे दर नाॅट आऊट ₹ 10,000

1 min read
भारतात नवीन कापूस खरेदी हंगामाला (New season of cotton procurement) सुरुवात झाली आहे. हाेडल (Hodal) (हरियाणा) बाजारपेठेत 6 ते 10 ऑगस्ट 2022 या पाच दिवसात नवीन कापसाला प्रति क्विंटल 7,000 ते 8,300 रुपये तर 15 ऑगस्टला 10,800 रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी करण्यात आली. सध्या हा दर प्रति क्विंटल 10,000 रुपयांवर स्थिर झाला आहे. भुना (Bhuna) (हरियाणा) बाजारपेठेत नवीन कापसाच्या खरेदीला प्रति क्विंटल 10,200 रुपये, बरवाला (Barwala) (हरियाणा) 10,000 रुपये, आदमपूर (Adampur) (हरियाणा) 11,700 ते 11,800 रुपये, मथुरा (Mathura) (उत्तर प्रदेश) बाजारपेठेत 9,500 ते 11,000 रुपये प्रति क्विंटल दराने सुरुवात झाली आहे. मागील वर्षीच्या (ऑगस्ट 2021) तुलनेत याच बाजारपेठेतील कापसाचे सध्याचे दर हे 700 ते 2,900 रुपये प्रति क्विंटलने अधिक आहेत.

🌎 कापसाच्या वायद्यात सुधारणा
सन 2022-23 च्या हंगामात दुष्काळामुळे (Drought) अमेरिकेत तर अतिरिक्त पाऊस (Heavy rainfall), काही भागातील उशिरा पेरणी (Late Sowing) आणि गुलाबी बाेंडअळीच्या (Pink bollworm) प्रादुर्भावामुळे भारतात कापासाचे उत्पादन (Production) घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जगात कापसाचा वापर व मागणी (Consumption and Demand) कायम राहणार असल्याने, किंबहुना वाढणार आहे. अमेरिकेत कापसाचे उत्पादन घटणार असल्याचा अंदाज व्यक्त हाेताच आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाच्या दरात सुधारणा व्हायला सुरुवात झाली. न्यूयाॅर्क (New York) येथील इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंजवर (ICE – Intercontinental Exchange) डिसेंबर 2022 चे वायदे 2 टक्क्यांनी सुधारून 116 सेंट प्रति पाऊंडवर तर ऑक्टोबर 2022 च्या वायद्यात 3 टक्क्यांनी वाढ झाली असून, ते 122.58 सेंट प्रति पाऊंडवर पाेहाेचले आहेत. भारतात ऑगस्ट 2022 चे वायदे 48,590 रुपये प्रति गाठ (170 किलो) दराने करण्यात आले. ऑटाेबर व नाेव्हेंबरच्या वायदे दरात जवळपास 6 टक्क्यांनी सुधारणा झाली. ऑक्टोबरचे वायदे 39,830 रुपये तर नोव्हेंबरचे वायदे 35,260 रुपये प्रति गाठ दराने करण्यात आले आहेत. फ्युचर डिलिव्हरी काॅन्ट्रॅक्टची किंमत (Price of futures delivery contract) 2 टक्क्यांनी म्हणजेच 990 रुपयांनी वाढली आहे.

🌎 कापसाच्या दरातील चढ-उतार
मुळात अमेरिका आणि भारतातील कापसाच्या पिकाची स्थिती आणि उत्पादनाचा अंदाज यावर कापसाच्या दरातील सुधारणा अवलंबून असेल. सध्या इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE – Intercontinental Exchange) वरील कापसाचे दर 90 सेंट प्रति पाऊंडवरून 106 सेंट प्रति पाऊंडवर पाेहाेचले आहेत. ऑक्टाेबर, नाेव्हेंबरपर्यंत चित्र आणखी स्पष्ट हाेईल. त्यामुळे देशांतर्गत वायदे बाजारातील कापसाच्या ऑगस्ट आणि डिसेंबर 2022 च्या साैद्यांमध्ये 31,000 रुपयांची तफावत दिसून येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाला यंदा चांगला दर मिळण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. न्यूयाॅर्क येथील इंटरकॉन्टिनेंटल एक्सचेंज (ICE – Intercontinental Exchange))वर ऑगस्ट 2022 चे वायदे 106.91 सेंट प्रति पाऊंड म्हणजेच 67,241 रुपये प्रति खंडी (354 किलो) तर डिसेंबर 2022 चे वायदे 101.80 सेंट प्रति पाऊंड म्हणजेच 64,000 रुपये प्रति खंडीने झाले आहेत. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर भारतापेक्षा थाेडे कमी आहेत. ही स्थिती मागील 10 वर्षात पहिल्यांदाच उद्भवली आहे. दुसरीकडे, मागणी घटल्याने भारतीय सूत व कापडाची निर्यात (Yarn and Garment Export) घटली आहे.

🌎 कापसाचे दर 10,000 रुपयांच्या वर राहणार
मध्यंतरी आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे दर 97 सेंट प्रति पाऊंडपर्यंत खाली आले हाेते. सध्या ते 130 ते 134 सेंट प्रति पाऊंड दरम्यान स्थिरावले आहेत. त्यामुळे भारतीय बाजारात कापसाचे दर 95,000 ते 97,000 रुपये प्रति खंडीपर्यंत पाेहाेचले असून, वायदे बाजारातील साैदे मात्र 1 लाख 2 हजार रुपये प्रति खंडी दराने केले जात आहेत. सध्या सरकीचे दर (Cotton Seed) 3,000 ते 3,400 रुपये प्रति क्विंटल आहेत. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातील कापूस खरेदी हंगाम खऱ्या अर्थाने 15 ऑक्टाेबरपासून सुरू हाेईल. अमेरिकेसाेबतच भारतातही कापसाचा तुटवडा Cotton shortage) असल्याने कापूस दरातील ही तेजी भविष्यातही कायम राहणार आहे. प्रतिकूल वातावरण आणि किडींच्या प्रादुर्भावामुळे साेयाबीनच्या (Soybean) उत्पादनात (Production) घट हाेण्याची शक्यता बळावल्याने ऑक्टाेबरनंतर सरकीचे दर 3,000 रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमी हाेण्याची शक्यता नाही. त्यामुळे नवीन हंगामात कापसाला किमान 9,500 रुपये ते 10,500 रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मागील हंगामात सरकीचे दर 3,800 रुपये प्रति क्विंटलपर्यंत चढले होते. नवीन हंगामात सरकीचे दर 3,500 रुपये प्रति क्विंटलच्या वर गेल्यास कापसाला भविष्यात किमान 12,000 रुपये प्रति क्विंटल किंवा त्यापेक्षा अधिक दर मिळण्याची परिस्थिती सध्या तरी निर्माण झाली आहे.

🌎 सीएआयची क्लाेसिंग-ओपनिंग स्टाॅकसाठी कसरत
1 ऑक्टाेबर ते 30 सप्टेंबर हे कापूस वर्ष मानले जात असल्याने काॅटन असाेसिएशन ऑफ इंडिया (सीएआय – CAI – Cotton Association of India) 30 सप्टेंबर 2022 ला सन 2021-22 च्या हंगामातील कापसाचा क्लाेसिंग (Closing) आणि सन 2022-23 च्या हंगामासाठी ओपनिंग स्टाॅक (Opening Stock) जाहीर करणार आहे. सीएआय सरत्या कापूस हंगामातील कापसाचा क्लाेसिंग आणि नवीन हंगामातील ओपनिंग स्टाॅक किमान 70 ते 75 लाख गाठींचा दाखविण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याअनुषंगाने सीएआयने सरत्या हंगामात कापसाचे उत्पादन 315 लाख गाठींचे हाेणार असल्याचे जाहीर केले. मुळात मे 2022 अखेरीस बाजारात 285 ते 290 लाख गाठी कापूस बाजारात आला हाेता. सन 2021-22 च्या हंगामातील कापसाची मागणी 345 लाख गाठींची हाेती. त्यामुळे देशातील वस्राेद्याेगाला दर महिन्याला किमान 28 ते 29 लाख गाठी कापसाची गरज असते. बाजारात आलेल्या 290 लाख गाठींपैकी 42 लाख गाठींची निर्यात करण्यात आली असून, सध्या देशात 28 ते 30 लाख गाठी कापूस शिल्लक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली. डाॅलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन हाेत कापसाची आयात (Cotton Import) महागात पडत आहे. त्यामुळे कापसाच्या आयातीचे साैदे रद्द करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याने सरत्या हंगामातील कापसाची आयात नगण्य आहे. याच काळात हरियाणा व पंजाबमधील कापूस बाजारात आला असला तरी सीएआयला किमान 70 लाख गाठींचा क्लाेसिंग व ओपनिंग स्टाॅक मेन्टेन (Closing and opning stock maintain) करण्यासाठी कसरत करावी लागणार आहे. सीएआयने सन 2020-21 चा क्लाेसिंग आणि सन 2021-22 चा ओपनिंग स्टाॅक 16 ते 18 लाख गाठींचा असताना ताे 72 लाख गाठींचा दाखविण्यात आला हाेता. सीएआय हाच प्रयाेग सन 2021-22 चा क्लाेसिंग व सन 2022-23 चा ओपनिंग स्टाॅक दाखविण्यासाठी करणार आहे. हा प्रकार देशातील वस्राेद्याेगाचे (Textile industry) आर्थिक हित डाेळ्यासमाेर ठेवून बाजारातील कापसाचे दर स्थिर ठेवण्यासाठी केला जाताे.

🌎 शेतकऱ्यांनी संयम ठेवावा
सन 2022-23 च्या हंगामात कापसाच्या उत्पादनात माेठी घट येणार असून, वापर आणि मागणी वाढणार आहे. त्यामुळे कापसाचे दर वाढण्याचे अंदाज व्यक्त केले जात आहेत. मात्र, केंद्र सरकारचे निर्णय आणि काही महत्त्वाच्या बाबी व बाजारातील उलाढाल यामुळे कापसाच्या दरात चढ उतार येऊ शकतात. शेतकऱ्यांनी हंगाम सुरू हाेताच दरातील या चढ उतारावर लक्ष ठेवत तसेच संयम बाळगत कापूस विकण्याची घाई करू नये. शिवाय, साेशल मीडियावर (Social media) फिरणाऱ्या मॅसेज (Massage)वरही आवाजवी विश्वास ठेवू नये. टप्प्याटप्प्याने विक्री करीत बाजारातील कापसाची आवक स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास पदरात दाेन पैसे अधिक पडू शकतात.

कृषिसाधना....

2 thoughts on “नवीन कापसाच्या खरेदीला सुरुवात सध्याचे दर नाॅट आऊट ₹ 10,000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!