krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्यास शेतकरी निरुत्साही

1 min read
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त केंद्र व राज्य सरकारने देशवासीयांना 'हर घर तिरंगा' अभियान राबविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्य प्राप्तीला 75 वर्षे पूर्ण झाली तरी शेतकरी मात्र पारतंत्र्यातच असल्याचा अनुभव पदाेपदी येत असल्यामुळे शेतकरी या अभियानात सहभागी होणार नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांच्या भावना पत्राद्वारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना कळवाव्यात, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

🟢 शेतकऱ्यांची आर्थिक लूट
भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. महाराष्ट्र शासनाने 11 ते 17 ऑगस्ट या काळात सर्व नागरिकांनी आपल्या घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षात भारतातील शेतकऱ्यांचे फक्त आर्थिक शोषणच झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. शेतमालाचे भाव जाणीवपूर्वक पाडण्याचे कारस्थान सतत सुरू आहे. त्यासाठी निर्यातबंदी, साठ्यांवर मर्यादा, अनावश्यक आयात व तत्सम हत्यारे वापरली जात आहेत. शेतकऱ्यांचे भूमी हक्क संकुचित केले आहेत. या अन्यायाविरुद्ध न्यायालयात दाद मागण्यास सुद्धा बंदी आहे, हे कसले स्वातंत्र्य, असा प्रश्नही अनिल घनवट यांनी उपस्थित केला. इंडिया सरकारकडून भारतातील शेतकऱ्यांचे होणाऱ्या आर्थिक शोषनाचा परिणाम म्हणजे देशभरातील लाखो शेतकरी आत्महत्या हाेय. देशात गरिबी व बेरोजगारी वाढत आहे. देश आर्थिक संकटात लोटला जात आहे. अशा परिस्थितीत न मिळालेल्या स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्यात भारतातील शेतकऱ्यांना रस नाही, असेही अनिल घनवट यांनी म्हटले आहे.

🟢 शेतकऱ्याचे मरण हेच सरकारचे धोरण
अनेकांच्या बलिदानानंतर मिळालेल्या भारताच्या स्वातंत्र्याबद्दल शेतकऱ्यांना अभिमान आहे. सालाबादाप्रमाणे 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन शेतकरी साजरा करतील. पण 75 वर्षे होऊनही कृषिप्रधान भारतातील शेतकऱ्यांपर्यंत खरे स्वातंत्र्य पोहोचलेच नाही, याची खंत आहे. आजही शेतकऱ्यांना व्यवसायाचे स्वातंत्र्य नाही. तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य नाही. जमीन किंवा व्यवसायाच्या विस्ताराचे स्वातंत्र्य नाही. स्वातंत्र्यप्राप्ती नंतरही शेतकऱ्याचे मरण हे सरकारचे धोरण राहिले आहे. हे सरकारच्या लक्षात आणून देण्यासाठी व सरकारच्या अशा धोरणाबाबत नाराजी व्यक्त करण्यासाठी हे निवेदन मा. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना पाठवायचे आहे. महाराष्ट्रातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी अशा आशयाचे पत्र महाराष्ट्र शासनाला पाठवले तर शेतकऱ्यांच्या समस्यांवर काही उपाययोजना होण्याची अपेक्षा करता येईल. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या मोहिमेत सहभागी होऊन आपल्या भावना महाराष्ट्र शासनाला कळवाव्यात, असे आवाहन स्वतंत्र भारत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांनी केले आहे.

कृषिसाधना....

1 thought on “‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्यास शेतकरी निरुत्साही

  1. मी पण सहमत आहे आम्ही मजूर वर्ग असून शेतकरी जर पिकवणारा नाही तर मजूर कोणती काम करतील गॅस 1114 रु पहिला होता का कधी चांगले दिवस आले आहे बावा… अमृत मोहसावं मानवा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!