krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

आंबा : कोकणाचा राजा

1 min read
आंबा (Mango) नाव ऐकले की, सर्वांच्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय राहत नाही. सर्वांच्या आवडीचा आंबा आज आपल्या भागातून दुर्मिळ होत चालला आहे. आपल्या लहानपणी प्रत्येकाच्या शेतात आंब्याची अनेक झाडे असत. एप्रिल-मे महिन्यात प्रत्येक घरी आंब्याची आढी असे. आम्ही मुले याचा आस्वाद मन भरून घेत असू. परंतु आज गावात आंब्याचे झाड पाहण्यासाही कुठे दिसत नाही. यामुळे नागर फाउंडेशनने या झाडाचे संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे.

🥭 आंब्याची पार्श्वभूमी
‎आंबा हा विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे झाड आणि फळ आहे. अवीट गोडीच्या या फळाला महाराष्ट्रात कोकणचा राजा म्हणतात. एप्रिल-जून हा या फळाचा मोसम असतो. आंब्याचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे. परंतु, दक्षिण आणि दक्षिणपूर्व आशियामधील मोठ्या प्रमाणातील जैववैविध्य पाहता आणि तेथील 250 ते 300 लाख वर्षांचा जीवाश्मांचा इतिहास (Fossil History) पाहता आंब्याचा उगम याच भागात झाला असावा, असे मानण्यात येते.

🥭 फळाचा राजा
कच्च्या आंब्याला कैरी म्हणतात. कैरी ही नेहमीच चवीला आंबट असते, पण जर आंबट नसेल तर तिला खोबरी कैरी असे नाव आहे. आंबा फळाचा राजा आहे.

🥭 राष्ट्रीय फळ, झाड व चिन्ह
दक्षिण आशियामधे हजारो वर्षापासून आंब्याची लागवड करण्यात येत आहे. दक्षिण आशिया तथा भारताच्या संस्कृतीमध्ये आंब्याला विशेष महत्त्व आहे. आंब्याची पाने (डहाळ्या) अनेक धार्मिक हिंदू कार्यक्रमात सजावटीसाठी वापरतात. आंबा हे भारत आणि पाकिस्तान या देशांचे राष्ट्रीय फळ, बांग्लादेशाचे राष्ट्रीय झाड आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्ह आहे.

🥭 आंब्याच्या जाती व उत्पादनातील वाटा
जगाच्या आंबा उत्पादनापैकी 56 टक्के आंब्याचे उत्पादन एकट्या भारतात होते. भारतात आंब्याच्या जवळपास 1,300 जातींची नोंद आहे. परंतु, 25 ते 30 जाती या व्यापारीदृष्ट्या महत्त्वाच्या आहेत. नीलम व हापूस यांच्या संकरीकरणातून कोकण कृषी विद्यापीठाने रत्ना ही जात विकसित केली आहे. गुजरात राज्यातील केशर हे वाण महाराष्ट्रातील कोरडवाहू पट्ट्यामध्ये अतिशय लोकप्रिय आहे. दक्षिण भारतातील तोतापुरी, आंध्रप्रदेशामध्ये बैंगनपल्ली, उत्तर प्रदेशामध्ये दशेरी, लंगडा, दक्षिणेत नीलम, पायरी, मलगोवा या जाती प्रसिद्ध आहेत. याव्यतिरिक्त संशोधन केंद्राने दशेरी व नीलम यांच्या संकरामधून आम्रपाली आणि नीलम व दशेरी यांच्या संकरामधून मल्लिका ही जात विकसित केली आहे. कोकण विद्यापीठाने बिनकोयीची (Seed less) सिंधू ही जात विकसित केली आहे.

🥭 आंबा पिकवण्याची नैसर्गिक पद्धत
कृत्रिमरीत्या आंबा पिकविण्यास ‘आंब्याचा माच लावणे’ किंवा आंब्याची आढी लावणे असे म्हणतात. यासाठी एखाद्या खोलीत वाळलेले तणस वा भाताचे वाळलेले गवत (पिंजर) पसरून त्यावर झाडावर पिकण्यास सुरुवात झालेल्या कैऱ्या ठेवतात. त्यावर पुन्हा गवत वा तणसाचे आच्छादन करतात. अशा प्रकारे साधारणतः 10-15 दिवसात झाकला गेल्यामुळे निर्माण झालेल्या उष्णतेने आंबा पिकतो.

🥭 औषधी गुणधर्म
आंब्याचा मोहोर थंड, रुची उत्पन्न करणारा असून, अतिसार, रक्तदोष, कफ व पित्त दूर करणारा आहे. कैरीमध्ये आम्लता (Acid) आणि क्षाराचे (Alkali) प्रमाण खूप आहे. उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी आणि क्षार कमी होऊन थकवा जाणवतो. या साठी कैरीचे पन्हे उत्तम आहे. पन्हे प्यायालामुळे उन्हाळ्याच त्रास खूपच कमी होतो. कैरीचा कीस फडक्यात घालून डोळ्यावर ठेवल्यास डोळ्यांची दमणूक (थकवा) आणि ताण कमी होतो. आपल्याला आरोग्य देण्याच्या दृष्टीने या दिवसात कैरीची डाळ खाण्याची पद्धत आहे. कच्च्या कैरीचा गर अंगाला लावून अंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही. कैरीच्या बाठीचे चूर्ण हिरड्यांच्या तक्रारी कमी करण्यास उपयुक्त आहे. तसेच हे चूर्ण पाण्यात घालून आंघोळ केल्यास घामोळ्याचा त्रास होत नाही.

🥭 आवाहन
मागील दोन वर्षांमध्ये आपण नागर फाउंडेशनच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर या झाडाविषयी जनजागृती केली. नागर उद्यान येथे 30 आंब्याची झाडे आपण यशस्वी पणे वाढविली आहेत. मी माझ्या शेतात 20 झाडें लावली आहेत. आज गावात प्रत्येक घरी 5-10-20 अशी आंब्याची झाडे आपल्याला पाहायला मिळतील. येणाऱ्या काळात आंब्याचे वैभव परत गावाला प्राप्त होईल, यात आता काही शंका राहिलेली नाही. नागर फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सर्वाना आवाहन करत आहे की, प्रत्येक घरी आणि प्रत्येक गावात आंबा हा लावला गेला पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतला नागर फाउंडेशन आवाहन करते की, बिहार पॅटर्नच्या माध्यमातून आपण प्रत्येक गावामध्ये एक आमराई तयार करावी.

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!