बोर : आनंददायी वृक्ष
1 min read🌱 बोरांचे प्रकार
एक काळ असा होता की, सर्वत्र गावोगावी असंख्य बोरीची झाडे होती. यामध्ये शेकडो प्रकारची बोरे होती. बोरांच्या चवीनुसार आणि आकारानुसार त्यांची नावे असायची. यामध्ये गोड, आंबट, तुरट, साखरी, खोबरा, पिठी, किडकी, अंडाकृती, लमकुळी, याप्रकारची नावे आम्ही मुले त्या बोरींना देत असत. डिसेंबर आणि जानेवारीमध्ये या झाडांना बहर येत असे. यावेळी आम्ही सतत बोरांच्या शोधात सगळीकडे भटकत असत.
🌱 आठवणीतील बोरं
शाळेमध्ये मधल्या सुट्टीमध्ये बोरांचा बाजार भरत असे. या बाजारामध्ये गावातील प्रत्येक वस्तीवरून प्रत्येक झाडाचे बोरे आणली जात असत. यामुळे या बाजारात शेकडो प्रकारची बोरे खायला मिळत असत. यावेळी मी सुद्धा बोरांचा विक्रेता असे. यावेळी आम्ही 10, 20, 25, 50 पैसे असे बोरांची विक्री करत असत. यातून जे पैसे यायचे ते आम्हाला खर्चायला मिळत असत. यामुळे आम्ही रोज शाळा सुटली की, बोरे गोळा करायला जात असत. संध्याकाळी बोरे जमा करून सकाळी शाळेत बोरे विक्रीसाठी नेत असत. त्यामध्ये जो आनंद मिळायचा तो खूप मोठा होता.
🌱 बोरीचे वैशिष्ट्य
आधुनिक काळामध्ये जमिनी बागायती करायच्या नादात मानवाने बोरीची झाडे कोठेही ठेवली नाहीत. यामुळे लहानपणीच हा आनंद संपून गेला आहे आणि निसर्गाची प्रचंड हानी झाली आहे. बोरीची झाडे जमिनीमध्ये पाण्याचा साठा वाढविण्यासाठी मदत करतात. ही झाडें कितीही मोठा दुष्काळ आला तरी तग धरतात. अनेक पक्ष्यांना ही झाडे आसरा आणि अन्न देतात. बोरीच्या झाडांना किंवा त्यांच्या भोंवताली मधमांश्या पोळे तयार करतात. या झाडांना मव्हाळे खूप जास्त प्रमाणात पाहायला मिळतात. यामुळे निसर्गामधील एक महत्वपूर्ण झाड हे आहे.
🌱 बोरींचे संवर्धन
याचा अभ्यास करून नागर फाउंडेशनने या झाडाचे संवर्धन करण्याचा संकल्प केला. आज नागर उद्यान परिसरामध्ये आपण बोरीची अनेक झाडे राखली आहेत, कारण अनेक ठिकाणी ही झाडें उगवतात यामुळे यांना लावण्याची आवशकता नसते. यांना पाणी देण्याची पण आवशकता नाही. कारण ही झाडे कोठेही उगवतात आणि स्वबळावर वाढतात. गरज आहे ती फक्त यांचे संवर्धन कारण्याची.
🌱 आवाहन
नागर फाउंडेशनच्या वतीने आम्ही सर्वाना आवाहन करत आहोत की, प्रत्येकाने आपल्या शेतामध्ये कोठेही किमान एक बोरीचे झाड राखावे आणि त्याचे संवर्धन करावे. निसर्गाचा जो आनंद आपण लहानपणी घेतलेला आहे तो आपल्या मुलांनाही मिळायला हवा.
🌱 शक्य असेल तेवढ्या बोरी लावा आणि वाढवा.
🌱 सर्व मुलांना बालपणीचा आनंद उपभोगण्यासाठी आणि आपले आरोग्य तसेच पर्यावरण समृद्ध करण्यासाठी या आपण बोरींचे रक्षण करू.
🌱 बोरी लावू.. बोरी जगवू..!
🌱 बोरी लावा.. बोरी जगवा.. जीवनाचा आनंद वाढवा…!