krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

कृषी आणि तंत्रज्ञान : भारतात गोंधळ!

1 min read
भारतातील 60 टक्के कापूस क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. या प्रदेशांसाठी कपाशीचे संकरित वाण याेग्य नसल्यामुळे भारतातील कापसाचे सरासरी उत्पादन कमी हाेत आहे. इतर देशांमध्ये 5 ते 6 महिन्यांच्या कालावधी असलेल्या या पिकाचा भारतातील कालावधी 7 ते 8 महिन्यांचा आहे. भारतात हायब्रीड वाणांच्या अनियंत्रित वापर व प्रसार हाेत असल्याने बीटी कापसावरील कीटकांची संवेदनशीलता वाढली आहे.

🌱 कापसाचे उत्पादन वाढले, कीटकनाशकांचा वापर घटला
बीटी कापूस सन 2002 मध्ये भारतात दाखल झाल्यानंतर पहिली पाच वर्षे ‘बोलगार्ड’ मोन्सँटोने (Monsanto) विकसित केलेला अनुवांशिक – सुधारित बीटी कापसाने बोंडअळीचे प्रभावीपणे नियंत्रण केले. त्यामुळे भारतातील कापसाचे उत्पादन 67 टक्क्यांनी वाढले. साेबतच अमेरिकन बोंडअळीमुळे होणारे पिकाचे माेठे नुकसान कमी झाल्याने कीटकनाशकांचा वापर 33 टक्क्यांनी घटला. सोबतच कापसाच्या उत्पादन वाढीला इतर बाबीही कारणीभूत ठरल्या आहेत. याच काळात भारतात रासायनिक खतांचा वापर 36 टक्क्यांनी वाढला व संकरित कापसाचे क्षेत्रही दुप्पट झाले. गुजरातमध्ये सिंचनाखालील कापसाच्या लागवड क्षेत्रात वाढ झाली. ‘इमिडाक्लोप्रिड’सह (Imidacloprid) बीजप्रक्रिया आणि रस शोषण करणाऱ्या कीटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी किमान सहा नवीन कीटकनाशकांचा वापर व्हायला लागला.

🌱 चूक संकरित वाणाची, दोष ‘Bolgard-II’ला
तथापि, सन 2006 मध्ये ‘Bolgard-II’ Bt कापूस, ज्यामध्ये ‘Bolgard’ च्या मूळ ‘Cry1Ac’ जनुकाच्या व्यतिरिक्त ‘बॅसिलस थुरिंगिएन्सिस’ नावाच्या मातीच्या जीवाणूपासून प्राप्त झालेले दुसरे जनुक Cry2Ab समाविष्ट झाल्यानंतर परिस्थिती बदलली. त्यामुळे एकूण एकरी क्षेत्रामध्ये बीटी हायब्रीड्सचा वाटा 38 टक्क्यांवरून 96 टक्क्यांपर्यंत वाढला. साेबतच रासायनिक खतांचा वापर 70 टक्क्यांनी वाढला असून, सन 2006 पासून भारतातील प्रति हेक्‍टरी कापसाचे उत्पादन 1,500 ते 1,700 किलोवर (15 ते 17 क्विंटल) स्थिरावले होते. एवढेच नव्हे तर, कपाशीवर रस शाेषण करणाऱ्या किडींच्या हल्ल्याचे प्रमाण वाढल्याने कीटकनाशकांचा वापर 92 टक्क्यांनी वाढला. याचा दोष ‘734 Bolgard-II’ या संकरित वाणाला दिला जाऊ लागला. पहिल्या पाच वर्षांत भारतातील जवळजवळ सर्वच कापूस क्षेत्राने या वाणाला मान्यता दिली. या संकरित वाणांपैकी बहुतेक वाण पानांच्या हॉपर (Hopper) आणि पांढऱ्या माशींना अतिसंवेदनशील होते. कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे या कीटकांमध्ये ‘कीटकनाशक – प्रतिरोधकता’ विकसित होण्याच्या प्रक्रियेला वेग आला. त्याहूनही चिंताजनक बाब म्हणजे, गुलाबी बोंडअळी, जी सन 1980 नंतर भारतात जवळजवळ नियंत्रणात आली हाेती, ती ‘Bolgard-II’ला वेगाने प्रतिकार करून लागली. कारण, गुलाबी बाेंडअळीत प्रतिकारक्षमता विकसित झाली आहे.

🌱 संकरित वाण केवळ भारतातच
विशेष म्हणजे, भारत कपाशीच्या संकरित वाणांच्या सापळ्यात अडकला असल्याने बीटी कापूस तंत्रज्ञानाच्या पूर्ण क्षमतेचा वापर करू शकला नाही. ही बाब विचित्र असली तरी खरी आहे. कारण, जगात भारत हा एकमेव असा देश आहे की, जाे ‘बीटी कॉटन हायब्रीड्स’ची लागवड करतो. इतर देशांमध्ये मात्र कपाशीचे ‘सरळ वाण’ वापरले जाते आणि कापसाचे उत्पादन घेतले जाते. पिकांचे संकरित वाण अधिक उत्पादन देत असल्याचा समज भारतात रुढ झाला आहे. खरं तर, भारतातील 95 टक्के कापूस लागवड क्षेत्र बीटी संकरित वाणाखाली असल्याने भारतात कापसाचे उत्पादन सर्वाधिक असायला हवे होते. मात्र, तसे हाेताना दिसत नाही, हे सत्य आहे. इतर देश कपाशीच्या सरळ वाणांची लागवड करीत असूनही त्यांच्या कापसाची प्रति हेक्टरी उत्पादकता भारतापेक्षा अधिक आहे. जगातील इतर देशांमध्ये कापसाची उत्पादकता प्रति हेक्टर 2,700 किलाेपेक्षा (27 क्विंटल) कमी नाही. खरं तर, पाकिस्तान आणि चीननेही ‘बीटी – कॉटन हायब्रीड्स’ची कल्पना नाकारली असून, तिथे मोन्सॅन्टोचे अस्तित्व नाही.

🌱 संकरित वाण गुलाबी बाेंडअळीला अनुकूल
भारतातील कापसाचे 60 टक्के क्षेत्र पावसावर अवलंबून आहे. या प्रदेशासाठी संकरित वाण याेग्य नसल्यामुळे भारतातील कापसाचे सरासरी उत्पादन इतर देशांच्या तुलनेत कमी आहे. इतर देशांमध्ये कपाशीच्या पिकांचा कालावधी 5 ते 6 महिन्यांच्या तर भारतात ताे 7 ते 8 महिन्यांचा आहे. संकरित वाणांच्या झाडांची घनता प्रति हेक्टरी सुमारे 11,000 ते 16,000 असून, सरळ वाणाच्या झाडांच्या घनता जागतिक सरासरीच्या दशांश आहे. संकरित वाणाला जास्त पर्णसंभार असल्याने या वाणाची उच्च घनतेची लागवड करणे अव्यवहार्य आहे. संकरित कापूस शेतात रोपांची संख्या कमी असल्यामुळे प्रत्येक रोपाला जास्त प्रमाणात बोंडांची निर्मिती करणे आवश्यक असते. जे दीर्घ कालावधीसाठी वाढतात. पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रासाठी दीर्घ कालावधी चांगला नाही. विशेषत: चाैथ्या ते सातव्या महिन्यात फुले व बाेंड निर्मितीच्या गंभीर अवस्थेत पिकाला ओलावा आणि पोषक तत्वांचा ताण सहन करावा लागतो. परिणामी, उत्पादन कमी होते. हायब्रीड्स वाण सामान्यत: उच्च रासायनिक निविष्ठांसह सिंचनाची सोय असल्यास चांगली कामगिरी करतात. परंतु, तेथेही दीर्घकालीन संकरित गुलाबी बोंडअळीसारख्या कीटकांना अनेक चक्रांमध्ये वाढण्याची हे वाण संधी देतात. गुलाबी बाेंडअळी प्रामुख्याने हिरव्या बोंडांमध्ये विकसित हाेते.

🌱 भारतात बीटी तंत्रज्ञानाचा वापर केवळ संकरित वाणासाठी
बीटी कापूस हे बोंडअळी नियंत्रित करण्यासाठी एक शक्तिशाली आणि उपयुक्त तंत्रज्ञान आहे. जगात हे तंत्रज्ञान अमेरिकन बोंडअळी, गुलाबी बोंडअळी आणि ठिपकेदार बोंडअळीच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरले. परंतु, भारतात हे तंत्रज्ञान केवळ खासगी कंपन्यांकडेच उपलब्ध असल्याने त्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर केवळ संकरित वाणातच समाविष्ट करण्यासाठी केला आहे. या कंपन्यांनी हे तंत्रज्ञान सरळ वाणांमध्ये समाविष्ट केले असते तर, शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीत जतन केलेले याच तंत्रज्ञानाचे बियाणे पुन्हा वापरता आले असते. परंतु, भारतात हे तंत्रज्ञान सरळ वाणात उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांना कंपन्यांकडून बियाणे खरेदी करण्यावाचून पर्याय उरला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील मातीला अनुकूल असले किंवा नसले तरी संकरित वाणांची लागवड करावी लागते. सन 2008 पर्यंत पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या बागायती पट्ट्यात बीटी संकरित कापसाच्या लागवडीचे एकरी क्षेत्र नगण्य होते. त्यानंतरच्या काळात या प्रदेशातील संपूर्ण कापूस क्षेत्र व्यावसायिक बीटी संकरित कापसाने व्यापले गेले आणि या संकरित वाणांनी सर्व सरळ वाणांची जागा घेतली. यामध्ये कीटक आणि रोगांना सहन करणाऱ्या उत्कृष्ट सार्वजनिकरीत्या उच्च उत्पादन देणाऱ्या जातींचा समावेश आहे.

🌱 बोंडअळीच्या सामर्थ्याला कमी लेखणे अंगलट
दुर्दैवाने सन 2006 पासून हायब्रीड्सच्या वाढीमुळे पंजाबमध्ये कापसाच्या पिकावर पांढऱ्या माशीचा मोठा प्रमाणात प्रादुर्भाव व्हायला सुरुवात झाली. त्यामुळे कापसाच्या उत्पादनात घट झाल्याने उत्पन्न फारसे वाढले नाही. या समान परिस्थितीत पाकिस्तानात भारतातील उत्तर-पश्चिम राज्यांच्या तुलनेत कापसाचे उत्पादन 20 ते 30 टक्क्यांनी जास्त आहे. भारतात बीटी कापूस तंत्रज्ञानाचा हा सर्व घाेळ खासगी बियाणे उद्योगाने केला आहे. त्यांनी बोंडअळीच्या (Bolworm) सामर्थ्याला कमी लेखले आणि सक्रिय कीटक प्रतिकार व्यवस्थापन धोरणांची अंमलबजावणी करण्याची गरज कमी केली. गुलाबी बोंडअळी (Pink Bolworm) नावाच्या एका लहान किड्याने ‘Bolgard-II’ तंत्रज्ञान आपल्या गुडघ्यापर्यंत आणले आहे.

🌱 चूक बियाणे कंपन्यांची, दोष शेतकऱ्यांना
गुलाबी बोंडअळीने बीटी कापसाला केवळ 5-6 वर्षातच प्रतिकारशक्ती का निर्माण केली? ही कीड जगात इतरत्र का नाही? हे विचारायला हवे. नॉन-बीटी कापूस बियाणे ‘रिफ्युगिया’ (Refugia) म्हणून लावण्यात आला नाही. याचा दाेष बियाणे उद्योग स्वीकारण्याऐवजी भारतीय शेतकऱ्यांना दिला. त्यामुळे प्रतिकार विकासाला किरकोळ विलंब होऊ शकतो. चीनमध्ये नियमित बीटी कापूस बियाण्यांसोबत ‘रिफ्युगिया’ लागवडीची कोणतीही शिफारस केलेली नाही. तरीही, बीटी-कापूस लागवडीला 18 वर्षे उलटूनही गुलाबी बोंडअळीने प्रतिकारक्षमता विकसित केलेली नाही.

🌱 बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीच्या विकासाला गती देणारे घटक
भारतातील बीटी कापसासाठी तीन घटक वैशिष्ट्यपूर्ण आहेत. ते सर्व संकरांशी संबंधित आहेत. ज्यांनी बोलगार्ड-II (Bolgard-II)ला गुलाबी बोंडअळीच्या प्रतिकारशक्तीच्या विकासाला गती दिली आहे.
✳️ संकरित बोलगार्ड वनस्पतींच्या बोंडांमध्ये 25 टक्के बियांमध्ये आणि बोलगार्ड-II वनस्पतींच्या बोंडांमध्ये 6 टक्क्यांहून अधिक बियांमध्ये बीटी विषारी घटक नसतात. तरुण बोंडअळी सुरुवातीला बिगर बीटी बियाण्यांवर जगू शकतात आणि नंतर जसजसे ते मोठे होतात तसतसे बीटी विष असलेल्या बाकीच्या बिया खातात. हे प्रतिकार विकासास गती देते. जेव्हा बीटी तंत्रज्ञान ‘सरळ वाणांमध्ये’ उपलब्ध असते, तेव्हा बोंडातील सर्व विकसनशील बियांमध्ये विषद्रव्ये असतात. म्हणून प्रतिकार विकासास विलंब होतो.
✳️ संकरित वाणांना अधिक बोंडे/वनस्पती तयार करण्यास जास्त वेळ लागतो. अशा प्रकारे ते सतत अन्नस्रोत उपलब्ध करून देतात. जे गुलाबी बोंडअळी अनेक चक्रांमध्ये वाढण्यास आणि बीटी विषाशी जुळवून घेण्यास मदत करतात.
✳️ भारतामध्ये एक हजाराहून अधिक बीटी कापसाच्या संकरांना योग्य कृषिशास्त्रीय शिफारशीशिवाय मान्यता देण्यात आली. हे संयोगांच्या मॅट्रिक्समध्ये गुलाबी बोंडअळीच्या संख्येला समर्थन देण्यासाठी समकालिक आणि आच्छादित फुलांच्या आणि फळांच्या खिडक्या प्रदान करतात. ज्यामुळे प्रतिकार विकासाला गती मिळते. भविष्यात अमेरिकन बोंडअळीपासून येणारा धोका भयानक आहे.

🌱 सरळ वाणांचा शोध घेणे आवश्यक
पुढील पाच वर्षांपर्यंत कोणतेही नवीन अनुवांशिक-सुधारित उपाय उपलब्ध नाहीत. बियाणे कंपन्यांनी उच्च घनतेच्या लागवडीखालील बीटी सरळ वाणांच्या विक्रीचा शोध घेणे हा एक तात्काळ पर्याय आहे. या सर्वांमध्ये अशा जाती आहेत, ज्याचा वापर ते संकरित विकासासाठी पालक म्हणून करतात. तसेच त्यांनी 5-6 महिन्यांच्या कालावधीच्या काही बीटी कापूस संकरित जातींचा प्रचार केला पाहिजे. ते मध्य आणि दक्षिण भारतात नोव्हेंबर-फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या गुलाबी बोंडअळीच्या हल्ल्यापासून बचाव करू शकतात. विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागात गेल्या पाच वर्षांपासून CICR (Central Institute for Cotton Research) एक शाश्वत पर्यायी पर्याय म्हणून बिगर-बीटी ‘देसी’ कापूस लागवडीचा पाठपुरावा करत आहे.

🌱 CICR चे संशोधन
पावसावर अवलंबून असलेल्या विदर्भ आणि तेलंगणाच्या प्रदेशात कमी उत्पादनखर्चासह उच्च उत्पादन, कमी कालावधीच्या, लवकर परिपक्व आणि संक्षिप्त वाणांसह मिळू शकते. हंगामातील बहुतांश भाग बोंडअळीच्या हल्ल्यापासूनही पीक वाचू शकते, असे आमच्या निरीक्षणावरून असे दिसून आले आहे. याशिवाय, CICR ने सार्वजनिक क्षेत्रातील सुमारे 20 उच्चभ्रू कापसाच्या जातींचे Bt मध्ये रूपांतर केले आहे. यावर्षी महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये बहु-स्थानिक चाचण्यांतर्गत पावसावर अवलंबून असलेल्या भागांसाठी सर्वात योग्य बीटी वाण ओळखण्यासाठी चाचणी केली जाईल. त्यांचे बियाणे 2017 किंवा 2018 पासून कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. सरळ वाणांमध्ये बीटी विष एकसंघ स्थितीत असल्याने म्हणजे बोंडातील सर्व बियांमध्ये ते प्रभावीपणे अमेरिकन बोंडअळीचा मुकाबला करतील आणि कमी कालावधीमुळे गुलाबी बोंडअळीपासून बचाव करतील. उच्च घनतेच्या लागवडीमुळे त्यांना चांगले उत्पादनही मिळेल.

(साभार :- कृषी शास्त्रज्ञ तथा कापूस संशोधक डॉ. के. आर. क्रांती यांच्या 10 मार्च 2016 रोजी इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशित झालेल्या लेखाचा मराठी अनुवाद!)

3 thoughts on “कृषी आणि तंत्रज्ञान : भारतात गोंधळ!

  1. कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांची तळमळीने व मुद्देसूद मांडणी…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

विशेष माहितीपुरक ब्लॉग

error: Content is protected by कृषीसाधना !!