गुलमोहोर : प्रेमाचे प्रतीक
1 min read
जगामध्ये सर्वत्र आढळणारा हा गुलमोहर वृक्ष! सर्व प्रकारच्या हवामानामध्ये हा वृक्ष वाढतो व बहरतो. प्रामुख्याने हा वृक्ष उष्ण तापमानातील आहे. फेब्रुवारीपासून याची पानगळ होण्यास सुरुवात होते. काही दिवस हा वृक्ष पूर्ण सांगाडा उभा केल्यासारखा वाटतो. यानंतर याला बहर येण्यास सुरुवात होते. याला गडद केशरी रंगाची फुले येतात. याला इतकी प्रचंड फुले येतात की, सर्वत्र फुलेच फुले दिसतात. झाडाखाली आणि झाडावरती प्रचंड फुले असतात. तप्त उन्हामध्ये मनाला खूप आनंद देतात ही फुले!

गुलमोहोर हा वृक्ष मूळचा मादागास्कर या देशातील आहे. तेथून तो संपूर्ण जगामध्ये पसरला. भारतामध्ये हा सर्वप्रथम मुंबईमध्ये आढळल्याची नोंद 1840 साली ब्रिटिश वनस्पती अभ्यासकांनी केलेली आहे. हा वृक्ष 50 ते 60 फूट उंच वाढते. यांच्या फ़ांद्या वरती जाऊन परत खाली वाकतात. यामुळे याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. याची फुले मनमोहक, आकर्षक व सुंदर असतात. ही फुले पहिल्याबरोबर माणूस यांच्या प्रेमात पडतो. याच्या फुलातून शेंगा येतात. या शेंगा खूप मोठाल्या असतात. त्या शेंगांमध्ये बी असते बी आणि त्या बियांपासून नवीन वृक्ष तयार होतात.

या झाडाला मराठी साहित्यामध्ये ‘प्रेमाचे प्रतीक’ मानले आहे. तप्त आणि रखरखत्या उन्हामध्ये याची फुले मनामध्ये प्रेमाच्या नाजूक भावना निर्माण करतात. उन्हाळ्यात जेव्हा कोठेही गारवा व हिरवळ नसते, अशा वेळी हा वृक्ष बहरतो. जशी मनामध्ये कोमल प्रेमाची भावना फुलते त्याप्रमाणे. या दिवसांमध्ये जोडपी, प्रेमी युगुले या झाडाकडे आकर्षित होतात आणि तास न तास या झाडाखाली प्रेमाच्या गप्पा मारत असतात. हा वृक्ष मनामध्ये प्रेमाची भावना आणि आशावाद निर्माण करत राहतो. मराठी साहित्यात यावर्ती खूप लेखन झाले आहे, अनेक चित्रपट पण बनले आहेत.

गुलमोहर
ऐन ग्रीष्मातील वैशाख वणवा,
तप्त ऊन्हातील दग्ध जाणीवा।
ओसाड निर्जन रस्ते सारे,
घरट्यात व्याकुळ पक्षी बिचारे।
अशाच उजाड वळणावरती,
केशरी छत्र उभारून धरतीवरती।
होरपळ मिरवीत अंगावरती,
गुलमोहर उभा निःशब्द एकांती।
केशर तांबडी पखरण याची,
करी भलावण सकल पक्ष्यांची।
गर्द ,विस्तृत छाया त्याची,
करी शीतल काया पांथस्थांची।
छायेत केशरी या छत्राच्या,
फुलती मनोरम प्रीतीचे मळे।
संगतीत तांबट फुलांच्या,
रंगून जाती जीव खुळे।
बघूनी दिमाख गुलमोहराचा,
वैशाख वणवा विझून जाई।
ऐन ग्रीष्मातील रुबाब त्याचा,
प्रीतीची मोहोर ऊमटवून जाई।
©️ सौ. ज्योती हसबनीस