Monsoon arrives in Maharashtra : अंदाज चुकवित मान्सून महाराष्ट्रात दाखल
1 min read
Monsoon arrives in Maharashtra : अल-निनाेच्या (El Nino) सावटामुळे मान्सूनला (Monsoon) विदर्भात (Vidarbha) पाेहचायला (arrives) विलंब हाेईल, जूनचा शेवटचा किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात ताे सक्रिय हाेईल, अशा प्रकारच्या सर्व अंदाजांना हुलकावणी देत मान्सून अखेर मंगळवारी (दि. 23 जून) विदर्भात सर्वदूर दाखल झाला. सध्या मान्सूनने मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, परभणी, जालना, बुलढाणा, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात हजेरी लावत, 75 टक्के महाराष्ट्र (Maharashtra) व्यापला आहे. खानदेशसह उर्वरित 25 टक्के महाराष्ट्र व्यापण्यास परिस्थिती अनुकूल आहे. हा पाऊस अरबी समुद्रीय शाखेतून आलेल्या मान्सूनचा आहे.
🔆 अरबी समुद्रीय शाखा तारक
अल-निनाेच्या प्रभावाने यंदा मान्सून कमजाेर राहिल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. दरम्यान, मान्सून 8 जून राेजी काेकणात दाखल झाला. मात्र, माेसमी वारे 14 दिवस तिथेच खिळून राहिले. त्यानंतर मान्सूनने साेमवारी (दि. 22 जून) मुंबई, पुणे, नाशिकसह बराच भाग काबिज केला. दुसरीकडे, बंगालच्या उपसागराची शाखा कमजाेर पडल्याने विदर्भात पाेहचायला आणखी वेळ लागेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला हाेता. विदर्भात सरासरी 15 ते 17 जूनपर्यंत मान्सून दाखल हाेताे, पण गेल्या पाच वर्षात त्याला विलंब हाेत आहे. यावेळी अल-निनाे वर्षामुळे ताे पाेहचायला जुलैची प्रतीक्षा करावी लागेल, असा अंदाज व्यक्त केला जात असताना मान्सने हा अंदाज खाेटा ठरला. यावेळी मान्सूनची अरबी समुद्रीय शाखा विदर्भासाठी तारक ठरली. साेमवारी (दि. 22 जून) गडचिराेली जिल्ह्यातील सिराेंचा येथे पाेहचलेल्या मान्सूनने 24 तासात वेगाने विदर्भातील 9 जिल्ह्यात प्रवेश केला.
🔆 सर्वत्र पाऊस, चंद्रपूरमध्ये सर्वाधिक
मान्सूनच्या पावसाने साेमवारी (दि. 22 जून) रात्रीच चंद्रपूरला जाेरदार हजेरी लावली. चंद्रपूर शहरात मंगळवारी (दि. 23 जून) सकाळपर्यंत सर्वाधिक 75 मि.मी. तर बुलढाणा 58 मि.मी., नागपूर 28.4 मि.मी. आणि गडचिराेलीत 24.6 मि.मी. पावसाची नाेंद झाली हाेती. साेबतच गाेंदिया, अमरावती, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातही मान्सूनच्या पावसाने जाेरदार हजेरी लावली आहे. पहिल्याच दिवशीच्या पावसाने विदर्भातील सर्व जिल्ह्यात सर्वदूर उपस्थिती नाेंदवली. यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यात 57 मि.मी., अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात 31.3 मि.मी. गाेंदिया जिल्ह्यातील सालेकसा येथे 32 मि.मी. आणि नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात 32.2 मि.मी. पावसाची नाेंद झाली आहे. हवामान विभागाच्या अधिकृत नाेंदीनुसार सध्या अकाेला, भंडारा, अमरावती, गाेंदिया हे सर्व जिल्हे 24 तासात मान्सूनच्या पावसाने व्यापतील, असा अंदाज आहे.
🔆 मान्सूनसाठी एमजेओ ठरला अनुकूल
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूरचे वैज्ञानिक डाॅ. प्रवीण कुमार यांनी सांगितले की, महाराष्ट्रात सक्रिय झालेल्या मान्सूनसाठी एमजेओची (मॅडन ज्युलियन ऑसिलेशन – MJO – Madden-Julian Oscillation) प्रणाली कारणीभूत ठरली आहे. एमजेओ म्हणजे विषुववृत्ताजवळील हिंदी महासागरातून पूर्वेकडे सरकणारे ढग व वाऱ्यांचे जागतिक चक्र आहे. ही प्रणाली दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात सक्रिय असताना महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक वातावरण निर्माण झाले. याशिवाय, पश्चिमेकडून वाहणारे दमदार वारे तसेच दक्षिण आफ्रिकेच्या सोमालिया किनारपट्टीकडून येणाऱ्या मान्सून प्रवाहाची स्थितीही सध्या अनुकूल आहे. त्यामुळे अरबी समुद्रातून मोठ्या प्रमाणात आर्द्रता (Humidity) भारताकडे खेचली जात असून, विदर्भात मान्सूनसाठी पाेषक ठरली आहे, असेही डाॅ. प्रवीण कुमार यांनी स्पष्ट केले.
तुम्ही दिलेल्या अंदाजाबद्दल आम्ही खूप आभारी आहोत तुमचा अंदाज खरा ठरलेला आहे