MJO & Monsoon Rainfall : एमजेओ आणि मान्सूनचा पाऊस
1 min read
MJO & Monsoon Rainfall : भारताला दरवर्षी माेसमी वारे (Monsoon winds) आणि या वाऱ्यांच्या अरबी समुद्रीय व बंगालच्या उपसागरीय शाखा पाऊस देतात. या माेसमी वाऱ्यांना अर्थात मान्सूनला (Monsoon) अल-निनाे (El Nino) अथवा ला-निना (La Nina) प्रभावित करते, त्याचप्रमाणे मॅडेन -जुलियन ऑसिलेशन अर्थात एमजेओ (MJO – Madden-Julian Oscillation) मान्सून व अल-निनाेला प्रभावित करते. एमजेओ ही एक प्रचंड, ग्रहीय स्तरावरील वातावरणीय गडबड आहे, जी विषुववृत्तावरून (Equator) पूर्वेकडे प्रवास करते आणि 30 ते 60 दिवसांत एक जागतिक प्रदक्षिणा पूर्ण करते. साप्ताहिक ते मासिक कालावधीत उष्णकटिबंधीय (Tropical) हवामानातील बदलांचा (Climate Change) हा सर्वात महत्त्वाचा चालक आहे. मान्सूनवरील अल-निनाे व ला-निनाचा प्रभाव कमी करण्यासाठी एमजेओ आणि आयओडी कारणीभूत ठरतात. एवढेच नव्हे तर, पाऊस व हवामानाबाबत व्यक्त केले जाणारे अंदाजही चुकवितात.
♻️ एमजेओचा शाेध
एमजेओ अर्थात मॅडेन-जुलियन ऑसिलेशन (Madden-Julian Oscillation) ही जागतिक हवामानशास्त्रातील अत्यंत महत्त्वाची व गुंतागुंतीची संकल्पना आहे. भारतीय मान्सूनचा जोर वाढण्यात किंवा कमी करण्यात तसेच पाऊस पूर्णपणे गायब होण्यात (Monsoon Break) एमजेओ अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताे. आकाशात फिरणारा ढगांचा समूह व वाऱ्याच्या लाटेच्या प्रवासाला हवामानशास्त्रात एमजेओ असे संबाेधले जाते. हवामान प्रभावित करणाऱ्या या ढगांचा समूह व वाऱ्याच्या लाटांचा रोलँड मॅडेन (Roland Madden) आणि पॉल जुलियन (Paul Julian) या दोन अमेरिकन शास्त्रज्ञांनी सन 1971 मध्ये शोध लावला. त्या दाेन्ही शास्त्रज्ञांच्या नावावरून याला ‘मॅडेन-जुलियन ऑसिलेशन’ असे नाव देण्यात आले. उष्णकटिबंधात सर्वाधिक ठळकपणे आढळत असले तरी, त्याचा प्रभाव जागतिक स्तरावर पसरलेला असून, तो मध्य-अक्षांश प्रदेशांतील हवामानावरही परिणाम करतो.
♻️ एमजेओचे स्वरूप
एमजेओ हा समुद्राच्या पाण्याच्या तापमानामुळे निर्माण होणारा ढग, पाऊस व वाऱ्यांचा एक विशाल समूह आहे. हा समूह प्रामुख्याने उष्णकटिबंधीय (Tropical) भागात म्हणजेच आफ्रिकेच्या किनारपट्टीजवळ हिंद महासागरात तयार हाेताे. हा समूह पुढे तिथून पश्चिमेकडून पूर्वेकडे सरकत पॅसिफिक महासागराकडे प्रवास करतो. हा प्रवास पृथ्वीच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे असा गोल चक्रासारखा सतत प्रवास करीत असतो. हा समूह संपूर्ण पृथ्वीची एक फेरी साधारणत: 30 ते 60 दिवसांत पूर्ण करतो. या समूहाचा वेग 14 ते 28 किमी प्रतितास असताे. त्यामुळे याला Intraseasonal Oscillation म्हणजेच ऋतूच्या अंतर्गत येणारा बदल म्हणतात.
♻️ एमजेओची कार्यपद्धती
विषुवृत्तावर (Equator) म्हणजेच आफ्रिकन किनारपट्टी व हिंद महासागाच्या भू-मध्य रेषेवर सूर्याची किरणे सरळ पडत असल्याने हा भाग अधिक गरम असताे. हा समूह या भागात येताच अधिक प्रभावी हाेताे. तिथे ढगही तयार हाेतात. कोरिओलिस फोर्समुळे या भागात हवा वारंवार मागे-पुढे हाेते. गरम तापमानामुळे हवा सागरी भागातून वर जाते व कमी दाबाचा पट्टा तयार हाेताे. वर गेलेली गरम हवा थंड हाेते व आर्द्रतेमुळे तिथे ढगांची निर्मिती हाेते. त्यामुळे मेघगर्जनेसह पाऊस पडताे.
♻️ एमजेओच्या प्रवासाचे टप्पे
एमजेओ ढग, पाऊस, वारे आणि वातावरणीय दाब यांचे नियमन करून हवामानावर लक्षणीय प्रभाव टाकतो. त्यात दोन मुख्य, एकाआड एक येणाऱ्या दाेन अवस्थांचा/मुख्य टप्प्यात (Phases) समावेश असतो.
📍 वर्धित संवहनी/सक्रिय/अनुकूल टप्पा (Enhanced Rainfall Phase)
या टप्प्यात हवेचा दाब कमी होतो आणि तापमानामुळे समुद्राचे पाणी उबदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर बाष्पीभवन होते. यामध्ये पृष्ठभागावरील वारे अभिसारी होऊन हवा वरच्या दिशेने ढकलतात. परिणामी, आकाशात ढगांचे आच्छादन वाढते व प्रचंड ढग तयार होतात व मुसळधार पाऊस पडतो.
📍 अवरुद्ध अवस्था/शांत/प्रतिकूल टप्पा (Suppressed Rainfall Phase)
या टप्प्यात कोरडी हवा वरून खाली बसते. पृष्ठभागावर जास्त दाब असतो आणि परिस्थिती स्वच्छ व कोरडी असते. त्यामुळे आकाश निरभ्र होते, ढग नाहीसे होतात आणि पाऊस पूर्णपणे थांबतो.
एमजेओच्या संपूर्ण प्रवासाची भौगोलिक स्थिती समजण्यासाठी हवामान शास्त्रज्ञांनी त्याचे 8 टप्पे पाडले आहेत. हवामानशास्त्रज्ञ एका वर्तुळाकार आकृतीवर दर्शविलेल्या 8-टप्प्यांच्या चक्राचा वापर करून एमजेओचा (MJO) मागोवा घेतात. वाढलेल्या संवहनी (ओल्या) टप्प्याचे स्थान जागतिक हवामानावरील परिणाम निश्चित करते.
🔆 टप्पा-1 : आफ्रिकेचा पश्चिम भाग आणि हिंदी महासागराची सुरुवात. पश्चिम हिंद महासागरावर वाढीव पर्जन्यवृष्टी होण्यास सुरुवात होते.
🔆 टप्पा – 2 व 3 : हिंद महासागर (Indian Ocean) – हा टप्पा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आर्द्र टप्पा आफ्रिका, हिंद महासागर आणि भारतीय उपखंडावरून हळूहळू पूर्वेकडे सरकतो.
🔆 टप्पा – 4 व 5 : सागरी खंड (इंडोनेशिया, मलेशिया परिसर). वाढलेले संवहन सागरी खंडापर्यंत (इंडोनेशिया, मलेशिया आणि पश्चिम पॅसिफिक) पोहोचते.
🔆 टप्पा – 6, 7 व 8 : पॅसिफिक महासागर आणि अटलांटिक महासागर. चक्र पुन्हा सुरू होण्यापूर्वी, वाढलेला पाऊस पश्चिम पॅसिफिक आणि अमेरिकेवरून पूर्वेकडे आणखी पुढे सरकतो.
♻️ जागतिक हवामानाचे परिणाम
मोठ्या वातावरणीय प्रभावामुळे एमजेओचा जागतिक हवामानावर खोलवर परिणाम होतो.
📍 मान्सून
एमजेओच्या सक्रिय टप्प्यांमुळे दक्षिण आशिया (भारतासह) आणि ऑस्ट्रेलियामध्ये मान्सूनच्या पावसाची तीव्रता वाढू शकते, तर मंदावलेल्या टप्प्यांमुळे दुष्काळ पडू शकतो किंवा मान्सूनच्या आगमनात व्यत्यय येऊ शकतो.
📍 उष्णकटिबंधीय चक्रीवादळे
प्रबलित अवस्थेतील वरच्या दिशेने जाणारी हवा आणि गडगडाटी वादळे, चक्रीवादळे तयार होण्यासाठी आणि तीव्र होण्यासाठी आवश्यक असलेली उचल आणि आर्द्रता प्रदान करतात.
📍 मध्य-अक्षांशीय हवामान
हे अत्यंत तीव्र हिवाळी हवामान, तापमानातील विसंगती आणि मुसळधार पावसावर (उदा. पश्चिम अमेरिकेतील वातावरणीय नद्या) प्रभाव टाकू शकते.
एमजेओ उप-हंगामी कालखंडावर कार्य करत असल्यामुळे व्यावसायिक हवामानशास्त्रज्ञ तीव्र हवामान घटना व मान्सूनच्या स्वरूपाचा अंदाज आठवडाभरापूर्वी घेण्यासाठी त्यावर अवलंबून असतात.
♻️ एमजेओ आणि भारतीय मान्सूनचा संबंध
भारतीय हवामान खात्यासाठी (IMD) मान्सूनचा अंदाज लावताना MJO चा मागोवा घेणे अनिवार्य असते.
🔆 भारतासाठी फायदेशीर
जेव्हा एमजेओ 2 व 3 ऱ्या टप्प्यात असतो, तेव्हा हा ढगांचा विशाल समूह हिंद महासागरात (भारताच्या खाली) असतो. तो नैऋत्य मोसमी (मान्सून) वाऱ्यांना प्रचंड ऊर्जा व बाष्प पुरवतो. त्यामुळे भारतात मान्सून सक्रिय होतो, पावसाचा जोर वाढतो व देशभरात दमदार पाऊस पडतो.
🔆 भारतासाठी नुकसानकारक
जेव्हा एमजेओ 4 ते 8 व्या टप्प्यात असतो, तेव्हा एमजेओ हिंद महासागर ओलांडून पुढे इंडोनेशिया किंवा पॅसिफिक महासागराकडे निघून जातो. त्यामुळे भारतातील बाष्प व ढग तो स्वतःसोबत खेचून नेतो. परिणामी, भारतात पावसाचा मोठा खंड (Monsoon Break) पडतो. या काळात कडक ऊन पडते व पाऊस गायब होतो.
🔆 चक्रीवादळांची निर्मिती
जर उन्हाळ्यात किंवा मान्सून संपताना (ऑक्टोबर-नोव्हेंबर) एमजेओ हिंद महासागरात सक्रिय असेल, तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तीव्र चक्रीवादळे (Cyclones) निर्माण होण्यास पोषक वातावरण तयार होते.
♻️ अल निनो व एमजेओ मधील फरक
अल निनो (El Nino) व एमजेओ (MJO) यात मोठा फरक आहे.
📍 एल-निनो/ला-निना : हा समुद्राच्या तापमानाचा पॅटर्न स्थिर असतो आणि त्याचा प्रभाव वर्ष किंवा अनेक महिने राहतो.
📍 एमजेओ : हा सतत प्रवास करणारा वेगाचा पॅटर्न आहे, जो केवळ 30 ते 60 दिवसांत बदलतो. त्यामुळे दुष्काळी (अल-निनो) वर्षातही जर एमजेओ हिंद महासागरात आला, तर तो काही आठवड्यांसाठी भारतात चांगला पाऊस पाडू शकतो.
📍 रिमोट कंट्रोल : एमजेओ हा जागतिक हवामानाचा एक असा रिमोट कंट्रोल आहे, जो हिंद महासागरात आल्यावर भारताच्या पावसाची स्पीड वाढवतो आणि पॅसिफिकमध्ये गेल्यावर पावसाचा स्पीड कमी करतो.
♻️ सध्याची स्थिती
एमजेओचा एकूण प्रवास 30 ते 60 दिवसांचा असतो. या दरम्यान तो एकूण 8 टप्प्यांमधून जातो. या गणितानुसार एमजेओ एका टप्प्यामध्ये सरासरी 4 ते 8 दिवस राहतो. परंतु, हा काळ कायम स्थिर नसतो. एमजेओचा वेग आणि तीव्रता नेहमी बदलत राहत असल्याने त्याचे वर्गीकरण दोन पद्धतींमध्ये होते.
🔆 वेगवान प्रवाह (Fast MJO)
कधीकधी एमजेओचा हवेतील प्रवाह अत्यंत गतिमान असतो. अशा वेळी तो एका टप्प्यात अवघे 3 ते 5 दिवस राहून वेगाने पुढच्या टप्प्यात निघून जातो.
🔆 संतत किंवा संथ प्रवाह (Slow/Stagnant MJO)
काही वेळा समुद्राचे तापमान आणि वाऱ्यांची स्थिती अनुकूल असल्यामुळे एमजेओ एकाच ठिकाणी रेंगाळतो. अशा वेळी तो एकाच टप्प्यात 10 ते 12 दिवसांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ स्थिर राहू शकतो.
जून 2026 च्या अखेरच्या आठवड्यातील हवामान परिस्थितीनुसार, मॅडेन-जुलियन ऑसिलेशन (MJO) हा टप्पा 2 (Phase-2) मधून प्रवास करत आहे. तो अतिशय संथ गतीने टप्पा 3 (Phase-3) च्या दिशेने सरकत आहे. याचा अर्थ असा की, एमजेओ ढग व वाऱ्यांचा विशाल समूह सध्या हिंद महासागराच्या (Indian Ocean) पश्चिम आणि मध्य भागावर सक्रिय आहे. भारत व महाराष्ट्रासाठी पावसाच्या दृष्टीने अत्यंत अनुकूल स्थिती आहे. कारण, एमजेओ जेव्हा 2 व 3 या टप्प्यांमध्ये असतो, तेव्हा तो भारतीय मान्सूनसाठी सर्वाधिक फायदेशीर मानला जातो. हिंद महासागरातील एमजेओच्या सक्रियतेमुळे अरबी समुद्रातून बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे वेगाने वाढू लागला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकण, घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मान्सूनचा जोर अधिक वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
©️ मातीतलं विज्ञान