Monsoon Arrived : मान्सून कुठपर्यंत पुढे पाेहाेचला?
1 min read
Monsoon Arrived : मान्सूनने (Monsoon) 14 दिवसांच्या विश्रांतीनंतर महाराष्ट्रात पुढे काहीशी प्रगती केली आहे. आज (साेमवार, दि. 22 जून) कोकणातील रत्नागिरी जिल्हा ओलांडून रायगड जिल्ह्याच्या अलिबागपर्यंत तर मध्य महाराष्ट्रात सातारा व सोलापूर जिल्हे ओलांडून पुणे जिल्ह्यात मावळ, मुळशी व पुण्यापर्यंत तसेच दक्षिण अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, कर्जत व जामखेडपर्यंत आणि मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, नांदेड जिल्ह्याचा बराचसा भाग व्यापत मान्सूनने पुढे वाटचाल केली. त्याचबरोबर मान्सून च्या ह्याच अरबी समुद्रीय शाखेनेच तेलंगणा राज्यातून मान्सून दक्षिण विदर्भातील गडचिरोलीतील सिरोंचा तालुक्याच्या प्रवेशद्वारापर्यंत येऊन ठेपला (Arrived) आहे.
🔆 मान्सून मुंबईत कधी?
मान्सून पोहोचलेल्या वरील सर्वच ठिकाणी पावसाने हजेरी लावली नसली तरी मान्सूनचे वारे तेथपर्यंत पोहोचले आहेत. मान्सूनच्या पुढील आगमनासाठी वातावरण अनुकूल असून येत्या 2-3 दिवसांत मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात मान्सून पुढे झेपावेल, असे वाटते.
🔆 कशामुळे मान्सून पुढे सरकला?
पावसाळी हंगामात समुद्रसपाटीच्या पातळीत स्थिरावणारा हवेच्या कमी दाबाचा पूर्व-पश्चिम आस काहीसा दक्षिणेकडे सरकला आहे. आज (साेमवार, दि. 22 जून) तो पंजाब व हरियाणा ऐवजी राजस्थान, बिहार, उत्तरप्रदेश राज्यातून पास होत आहे. तसेच वायव्येकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्याचा जोर कमी झाला आहे. अरबी समुद्रात साडे तीन ते पावणेचार किमी. दरम्यान असणाऱ्या प्रत्यावर्ती वाऱ्याच्या प्रणाली विरळतेकडे गेली आहे. त्यामुळे मान्सुनी वाऱ्यांना बळकटी मिळाली असून, महाराष्ट्रात मान्सूनची वाटचाल झाली आहे.
🔆 सध्याची उष्णतेची लाट व रात्रीचा उकाडा?
आज (साेमवार, दि. 22 जून)पासून पुढील ४ दिवस म्हणजे शुक्रवार (दि. 26 जून)पर्यंत विदर्भात भाग बदलत उष्णतेची तीव्र लाट तसेच रात्रीच्या उकाडा जाणवेल, असे वाटते.