krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Weather Forecasts, Farmers : हवामान अंदाज, शेतकरी अन् बदलता महाराष्ट्र

1 min read

Weather Forecasts, Farmers : बदलत्या हवामानाचा (Weather) सर्वाधिक परिणाम शेतीक्षेत्रावर हाेताे आणि माहिती व नियाेजनाअभावी त्याचा जबर फटकाही बसताे. कारण, आजही भारतीय शेती ही आभाळावर अवलंबून आणि आभाळ मात्र पूर्णपणे कुणाच्याही हातात आलेले नाही. चैत्र महिना सुरू हाेताच शेतकरी आगामी खरीप हंगामाचे नियाेजन करीत ‘यंदा पाऊस कसा असेल’ याचा विचार करीत असताे. पूर्वी पावसाचा अंदाज घेण्यासाठी पंचांग, त्यातील नक्षत्र, त्या नक्षत्रांची वाहने, पक्षी व किडींचे वर्तन याचा आधार घेतला जायचा. गावातील ज्येष्ठ मंडळी, अनुभवी शेतकरी, गुरव, भटजी किंवा परंपरेचे ज्ञान असलेली मंडळी ग्रामदैवतासमोर बसून यंदा भरपूर पाऊस पडेल, काेरड्या दुष्काळाची चिन्हे आहेत, रोहिणी, मृग चांगला, आर्द्रा काेरड्या या व तत्सम विषयांवर चर्चा करत. अलीकडे विज्ञान व तंत्रज्ञानासाेबत हवामानशास्त्र (Meteorology) विकसित झाले आणि आधीची पारंपरिक पद्धती मागे पडत चालली असली तरी बहुतांश शेतकरी (Farmers) परंपरेवर विश्वास ठेवत आहे.

♻️ पारंपरिक पद्धती
महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आजही मान्सूनच्या अंदाजासाठी नक्षत्र (Constellations) आणि चंद्राच्या स्थितीचा वापर केला जातो.
📍 नक्षत्र व त्यांची वाहने
पृथ्वीवरून जेव्हा आपण संपूर्ण आकाश पाहतो, तेव्हा ते आपल्याला 360 अंशांचे एक वर्तुळ दिसते. प्राचीन खगोलशास्त्रज्ञांनी चंद्राच्या प्रवासाचा मार्ग लक्षात घेऊन या 360 अंशांच्या वर्तुळाचे 27 समान भाग केले. या प्रत्येक भागाला किंवा ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात. पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालताना चंद्राला एक फेरी पूर्ण करण्यासाठी म्हणजे आकाशाचे 360 अंश कापण्यासाठी साधारण 27.3 दिवस लागतात. सूर्य जेव्हा एखाद्या नक्षत्रात प्रवेश करतो, तेव्हा त्याला शेतकरी नक्षत्र लागणे म्हणतात. सूर्य एका नक्षत्रात साधारणपणे 13 ते 14 दिवस राहतो. सूर्य ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्राच्या काळात चंद्र जेव्हा पृथ्वीच्या जवळ येतो, तेव्हा त्यांच्या गुरुत्वाकर्षणामुळे आणि तापमानातील बदलांमुळे पृथ्वीवरील वातावरणावर (हवेचा दाब, बाष्पीभवन) परिणाम होतो. यावरूनच मान्सूनच्या पावसाचे अंदाज पारंपारिक पद्धतीत लावले जातात. अश्विनी हे पहिले तर रेवती हे शेवटचे नक्षत्र मानले जाते. यात अश्विनी, भरणी, कृत्तिका, रोहिणी, मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाती, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, मूळ, पूर्वाषाढा, उत्तराषाढा, श्रवण, धनिष्ठा, शततारका, पूर्वाभाद्रपदा, उत्तराभाद्रपदा व रेवती या नक्षत्रांचा समावेश आहे. यातील मृग, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, मघा, पूर्वा फाल्गुनी (पूर्वा), उत्तरा फाल्गुनी (उत्तरा) व हस्त ही नऊ नक्षत्रे पावसाची मानली जातात. प्रत्येक नक्षत्राला विशिष्ट वाहन असते. हत्ती, बेडूक, म्हैस वाहन असेल तर अतिवृष्टी किंवा भरपूर पाऊस, घोडा, गाढव, कोल्हा असेल तर हुलकावणी देणारा पाऊस, कडक ऊन पडणे, वारा जास्त सुटणे, मोर, हरिण वाहन असेल तर पाऊस मध्यम स्वरूपाचा आणि पिकांसाठी चांगला पडतो, असे मानले जाते.

📍 वनस्पतींचे वर्तन (Botanical Indicators)
निसर्गात होणारे ऋतू बदलांचे संकेत वनस्पती आपल्या बहरातून सर्वात आधी देतात. ग्रामीण भागात झाडांच्या निरीक्षणावरून पावसाचा अचूक अंदाज घेतला जायचा. उन्हाळ्याच्या शेवटी बहावा (Amaltas) झाडाला जेव्हा गर्द पिवळी फुले (सोनेरी झुंबर) येतात, त्यानंतर साधारण 45दिवसांनी मान्सूनचे आगमन होते, असा जुना अंदाज आहे. ज्या वर्षी आंब्याला जास्त मोहर येतो, त्या वर्षी दुष्काळ किंवा कमी पाऊस असतो, ज्या वर्षी चिंचेला जास्त चिंचा येतात, त्या वर्षी पूर किंवा भरपूर पाऊस होतो, जांभळाची फळे काळीभोर व रसरशीत येणे हे चांगल्या मान्सूनचे लक्षण असल्याचे मानले जाते.

📍 प्राण्यांचे व कीटकांचे वर्तन (Zoological Indicators)
प्राणी आणि कीटकांची संवेदनशीलता मानवापेक्षा जास्त असते. हवेतील दाब आणि आर्द्रतेतील बदल त्यांना लगेच जाणवतात. उन्हाळ्याच्या शेवटी जर मुंग्या आपली अंडी तोंडात धरून सुरक्षित किंवा उंचावरच्या ठिकाणी जाताना दिसल्या, तर 24 to 48 तासांत मोठा पाऊस येणार असल्याचा संकेत असतो. टिटवी (Lapwing bird) तिचे घरटे जमिनीवर करते. टिटवीने शेतात कोणत्या ठिकाणी अंडी घातली आहेत, यावरून पावसाचा अंदाज लावला जायचा. जर तिने जमिनीच्या उंचावरच्या भागावर अंडी घातली, तर त्या वर्षी खूप पाऊस पडून सखल भागात पाणी साचणार असा समज होता. जर तिने 4 अंडी घातली तर मान्सूनचे चारही महिने चांगले पाऊस पडणार असे मानले जायचे. उन्हाळ्याच्या शेवटी बेडकांचे मोठ्याने ओरडणे व मोर चोहोबाजूला केकारव करू लागणे म्हणजे पाऊस अगदी दारात आला आहे, असे समजले जायचे.

♻️ हवामानशास्त्र व विभाग
हवामानशास्त्राचा इतिहास मानवाच्या गरजेतून सुरू झाला. इसवी सन पूर्व चौथ्या शतकात (सुमारे 350 ई.स.पूर्व) प्रसिद्ध ग्रीक तत्त्वज्ञ ॲरिस्टॉटल (Aristotle) यांनी मेटिओरोलॉजिका (Meteorologica) नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथातूनच हवामानशास्त्र (Meteorology) या शब्दाचा जन्म झाला. यात त्यांनी पाऊस, ढग, वारा आणि उल्का याविषयीचे पहिले वैज्ञानिक तर्क मांडले. 17 व्या शतकात हवामानाचा अचूक अंदाज घेण्यासाठी उपकरणांची गरज होती. त्यामुळे 1643 मध्ये इव्हानगेलिस्ता टोरिसेली यांनी हवेचा दाब मोजण्यासाठी बॅरोमीटर (Barometer) चा शोध लावला. याच काळात गॅलिलिओ व इतर शास्त्रज्ञांनी तापमापक (Thermometer) विकसित केले. पुढे 1873 मध्ये व्हिएन्ना येथे आंतरराष्ट्रीय हवामान परिषदेत आंतरराष्ट्रीय हवामान संघटना (IMO – International Meteorological Organization) स्थापन झाली. सन 1951 मध्ये या संघटनेचे रुपांतर संयुक्त राष्ट्रांच्या जागतिक हवामान संघटनेत (WMO – World Meteorological Organization) झाले. वराहमिहिर यांच्या बृहत्संहिता ग्रंथात आणि चाणक्यांच्या अर्थशास्त्र ग्रंथात पावसाचे मोजमाप (Rain gauge) कसे करावे आणि त्यावरून शेतीचे नियोजन कसे करावे, याचे सविस्तर वर्णन आहे. पर्जन्यमापनासाठी द्रोण नावाचे एकक वापरले जात असे.

ब्रिटिशांनी सागरी व्यापारासाठी हवामानाचा अंदाज घेण्यासाठी 1792 मध्ये मद्रास (चेन्नई) येथे पहिली वेधशाळा सुरू केली. त्यानंतर 1804 मध्ये मुंबई (कुलाबा) व 1829 मध्ये कोलकाता येथे वेधशाळा सुरू झाल्या. 1864 मध्ये कोलकात्यात आलेल्या भीषण चक्रीवादळामुळे आणि 1866 व 1871 मधील प्रचंड दुष्काळामुळे ब्रिटिशांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याने त्यांना भारतात एका केंद्रीय हवामान संस्थेची गरज भासू लागली. त्यामुळे त्यांनी 15 जानेवारी 1875 रोजी भारतीय हवामान विभाग (IMD – India Meteorological Department) ची अधिकृत स्थापना केली व व मुख्य कार्यालय काेलकाता येथे तयार केले. हेन्री फ्रान्सिस ब्लॅनफोर्ड (Henry Francis Blanford) यांची पहिल्या संचालकपदी नियुक्ती केली. 1963 पासून हवामानाच्या डेटा प्रक्रियेसाठी संगणकाचा वापर सुरू झाला. 1982 पासून भारताने स्वतःच्या INSAT उपग्रहाच्या मदतीने ढगांचे थेट फोटो मिळणे सुरू केले. त्यामुळे चक्रीवादळांचा अंदाज अचूक येण्यास मदत झाली. ऑक्टोबर 1999 च्या ओडिशातील महाचक्रीवादळानंतर (Super Cyclone) 2002 पासून किनारपट्ट्यांवर डॉप्लर वेदर रडार (Doppler Weather Radars) बसवायला सुरुवात झाली. त्यामुळे हवामान, हवेचा वेग, दाब, आर्द्रता, ओसिएन डायपाेल (Ocean Diepael), अल-निनो (El Nino), ला-नीना (La Nina) यासह अन्य महत्त्वाच्या बाबींवर अभ्यास करून अत्यंत अचूक, तासाभरातील बदलांचा, ढगफुटी व चक्रीवादळांचा अंदाज घेणे सोपे झाले. सध्या भारतात 48 डाॅप्लर वेदर रडार कार्यरत असून, 70 डाॅप्लर वेदर रडार लावणे नियाेजित असले तरी अंतिम उद्दिष्ट्य 126 डाॅप्लर वेदर रडार लावण्याचे आहे. सध्या आयएमडी थ्री-डायमेंशनल मॅथेमॅटिकल मॉडेलिंग (Numerical Weather Prediction) वापरून अंदाज वर्तवते.

♻️ हवामान तज्ज्ञांचे पीक
हवामान विभागाच्या दिमतीला कृषी विद्यापीठे, इस्रो, स्कायमेट, ॲक्वा वेदर यासारख्या सरकारी व खासगी संस्थाही आल्या. अलीकडे, हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे अतिपाऊस, महापूर, ढगफुटी, अवकाळी पाऊस, चक्रीवादळ, गारपीट यासंदर्भातील मॅसेज साेशल मीडियावर सारखे फिरत असतात. यात अनेक तज्ज्ञ असे आहेत की, ज्यांचा शिक्षणात हवामानशास्त्र हा विषय अभ्यासाला नव्हता, अशी मंडळी अंदाज व्यक्त करताना हवामान बदलांची शास्त्रीय कारणे सांगत नाही व शेतकरी देखील त्यांना विचारत नाही. उलट, त्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवतात. यात त्यांच्या काही पाेस्ट भीतीदायक असतात.

♻️ महाराष्ट्राचे हवामान
ब्रिटिश हवामान शास्त्रज्ञाच्या मते, महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा विचार करता येथील हवामानाचा अचूक अंदाज बांधणे अत्यंत अवघड आहे. कारण, महाराष्ट्र हे अनेक हवामान पट्ट्यांचा संगम असलेले राज्य आहे. राज्यात सह्याद्रीच्या उंच कडेकपाऱ्या, कोकणचा दमट समुद्रकिनारा, मराठवाड्याचा कोरडा पट्टा, विदर्भातील उष्ण हवामान, गडचिरोलीतील घनदाट जंगल आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्र व खानदेशात वेगळी परिस्थिती आहे. येथे दर 10 किमीवर हवामान व पावसाचे स्वरूप बदलते. एका गावात मुसळधार पाऊस पडतो, तर शेजारच्या गावात ढगही दिसत नाहीत. ही महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. म्हणून हवामानाची ‘एक राज्य – एक अंदाज’ ही पद्धती महाराष्ट्रात चुकीची ठरते.

📍 कोकण किनारपट्टी (सम व दमट हवामान)
अरबी समुद्राच्या जवळ असल्यामुळे येथील हवामान वर्षभर सम (फारसे न बदलणारे) आणि प्रचंड दमट (Humid) असते. येथे उन्हाळ्यात फार कडक ऊन नसते आणि हिवाळ्यातही फारशी थंडी जाणवत नाही.

📍 सह्याद्रीचा घाटमाथा (थंड व अति-पर्जन्याचा प्रदेश)
हा भाग उंची जास्त असल्यामुळे महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळा यासारख्या घाटमाथ्यांवरील वातावरण वर्षभर हवामान थंड व आल्हाददायक असते. मान्सूनचे बाष्पयुक्त वारे सह्याद्री पर्वताला अडतात आणि वर जाऊन थंड होतात. त्यामुळे घाटमाथ्यावर प्रचंड प्रतिरोध (Orographic) पाऊस पडतो. महाबळेश्वर येथे वार्षिक 5,000 ते 6,000 मिमी पेक्षा जास्त पाऊस नोंदवला जातो. नैऋत्य मोसमी वाऱ्यांमुळे (Southwest Monsoon) येथे 2,500 ते 3,000 मिमी इतका प्रचंड पाऊस पडतो.

📍 मध्य महाराष्ट्र व मराठवाडा (पर्जन्यछायेचा व निम-शुष्क प्रदेश)
सह्याद्री ओलांडल्यानंतर मान्सूनच्या वाऱ्यांमधील बाष्प कमी होते. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्राचा पूर्वेकडील भाग (अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूरचा काही भाग) आणि संपूर्ण मराठवाडा हा पर्जन्यछायेच्या प्रदेशात (Rain-shadow region) येतो. येथील हवामान कोरडे व विषम असते. उन्हाळ्यात तापमान 40°C पर्यंत जाते, तर पाऊस अवघा 500 ते 700 मिमी पडतो. मराठवाड्यात पावसाची अनिश्चितता जास्त असल्याने हा भाग अनेकदा दुष्काळाला तोंड देतो.

📍 विदर्भ (विषम आणि उष्ण हवामान)
समुद्रापासून दूर असल्यामुळे विदर्भाचे हवामान अत्यंत विषम (Extremes of Climate) आहे. उन्हाळ्यात प्रचंड उष्णता आणि हिवाळ्यात कडाक्याची थंडी असते. उन्हाळ्यात (विशेषतः मे महिन्यात) नागपूर, चंद्रपूर, वर्धा, अकोला या जिल्ह्यांमध्ये तापमान 45°C ते 47°C पर्यंत पोहोचते व तीव्र उष्णतेची लाट (Heatwave) जाणवते. विदर्भाला नैऋत्य मान्सूनच्या अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर अशा दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो. पूर्व विदर्भात (गडचिरोली, गोंदिया, भंडारा) पावसाचे प्रमाण वाढून ते 1,000 ते 1,500 मिमी पर्यंत जाते, तर पश्चिम विदर्भात (अमरावती, वाशीम, बुलढाणा) पाऊस मध्यम असतो.

♻️ शेवटच्या घटकाशी कमकुवत संवाद
यातून मार्ग काढण्यासाठी स्थानिक पातळीवरील सूक्ष्म निरीक्षण, स्थानिक हवामान केंद्रे, अचूक डेटा व त्याचे योग्य विश्लेषण करणे गरजेचे आहे. अलीकडे भारतीय हवामान विभागाची कामगिरी सुधारली आहे. मात्र, त्यांनी व्यक्त केलेले अंदाज व मार्गदर्शन राज्यातील शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाेहाेचताे काय, हे बघणे आवश्यक आहे. राज्य सरकारने कृषी व हवामान विभागाच्या मदतीने याेग्य उपाययाेजना करणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रत्येक तालुक्यात सूक्ष्म हवामान केंद्रे, प्रत्येक गावात पर्जन्यमापक यंत्रे लावणे, ग्रामपातळीवरील डिजिटल सूचना व्यवस्था, मोबाइलवर स्थानिक भाषेतील अलर्ट, कृषी सहायकांमार्फत हवामान सल्ला, स्थानिक रेडिओ व सोशल मीडिया यांचा योग्य वापर झाला पाहिजे. कारण अर्धवट माहिती अज्ञानापेक्षा धोकादायक असते.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!