krishisadhana

Food | Fodder | Fabrics | Fuel | Pharmaceutical

Milk or Dangerous Chemicals : दूध की रसायनांचा घातक खेळ?

1 min read

Milk or Dangerous Chemicals : तुकाराम मुंढे यांनी महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या (FDA – Food and Drug Administration) आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला आणि महाराष्ट्रातील बाजारपेठेतून जुलै महिन्यात राेजचे किमान 20 लाख लिटर दूध (Milk) अचानक गायब झाले. या दुधाची राेजची किंमत किमान 8 काेटी रुपये तर महिन्याची किंमत तब्बल 240 काेटी रुपये आहे. अचानक गायब हाेणारे हे दूध भेसळ व रसायनयुक्त असल्याचे एफडीएच्या धाडीत व या दुधाच्या नमुन्यांच्या प्रयााेगशाळा तपासणी अहवालात निष्पन्न झाले आहे. कृत्रिम दूध (Synthetic Milk) कसे तयार केले जाते? त्यात काेणती रसायने (Chemicals) मिसळून प्रक्रिया केली जाते? स्लाे पाॅयझन (Slow poison) असलेल्या या रसायनांचा मानवी आराेग्यावर काय परिणाम हाेताे?

♻️ दुधाचे उत्पादन, मागणी व वापर
सन 2024-25 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरवर्षी सरासरी 166.26 लाख टन म्हणजेच 1,614 कोटी लिटर दुधाचे उत्पादन (Production) होते. राज्यात दररोज सुमारे 455 ते 460 लाख लिटर म्हणजेच 4.55 ते 4.60 कोटी लिटर दूध एकूण उत्पादन होते. नागरिक 2.40 ते 2.50 काेटी लिटर दूध राेज पिण्यासाठी व चहासाठी वापरतात तर 2.10 ते 2.20 काेटी लिटर दूध दही, ताक, तूप, पनीर, बटर, मावा आणि दुधाची पावडर (SMP – Skimmed Milk Powder) बनवण्यासाठी वापरते जाते. राज्यात 68 दूध प्रक्रिया प्रकल्प असून, त्यांची क्षमता दररोज 83.25 लाख लिटर आहे. हिवाळ्यात दूध उत्पादनात 10 ते 15 टक्के वाढ होत असल्याने अतिरिक्त दुधाची पावडर (SMP) व तूप तयार केले जाते. उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन घटते. त्यामुळे दही, ताक व आईस्क्रीमची मागणी (Demand) वाढल्याने गुजरात, कर्नाटक व इतर राज्यांमधून दुधाची आवक करावी लागते.

♻️ कृत्रिम दूध कसे तयार केले जाते?
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI – Food Safety and Standards Authority of India) व अन्न तंत्रज्ञान वैज्ञानिकांच्या मते, कृत्रिम दूध तयार करण्यासाठी नैसर्गिक दुधाचे गुणधर्म भौतिक व रासायनिकदृष्ट्या तयार केले जातात. नैसर्गिक दुधात पाणी, फॅट (स्निग्धता), प्रोटीन्स (केसीन), लॅक्टोज (साखर) आणि काही खनिजे असतात. याच घटकांचे रसायने वापरून कृत्रिम दूध तयार केले जाते.

पाणी हा कृत्रिम दुधाचा मुख्य भाग म्हणजे बेस आहे. या पाण्याला पांढरा रंग येण्यासाठी त्यात दुधाची SNF (Solids-Not-Fat) मिसळली जाते. यातील नायट्रोजनची पातळी नैसर्गिक दुधासारखी आणण्यासाठी त्या पाण्यात युरिया किंवा अमोनियम सल्फेट मिसळले जाते. हे दुधाची प्रयाेगशाळेत चाचणी केल्यास त्यात प्रोटीन असल्याचे भासते. नैसर्गिक दुधातील फॅटची जागा घेण्यासाठी कृत्रिम दुधात अतिशय हलक्या दर्जाचे रिफाइंड तेल, व्हेजिटेबल ऑइल किंवा डालडा अथवा अथवा पामतेलातील स्निग्धांश मिसळले जाते. पाणी व तेल एकत्र मिसळण्यासाठी त्यात Emulsifier साठी डिटर्जंट पावडर किंवा वॉशिंग पावडर टाकली जाते. डिटर्जंटमुळे तेल व पाणी एकमेकांत मिसळून दुधासारखा दाट आणि पांढरा फेसाळ द्राव तयार होतो. या दुधाला नैसर्गिक पांढरा रंग व दाटपणा (Viscosity) आणण्यासाठी त्यात स्टार्च, मैदा, लिक्विड पॅराफिन किंवा ब्लॉटिंग पेपरचे पाणी मिसळले जाते. हे दूध लवकर आंबट होऊ नये किंवा खराब हाेऊ नये तसेच चव टिकून राहावी, यासाठी त्याचा pH समतोल राहावा म्हणून कॉस्टिक सोडा (Sodium Hydroxide) व फॉर्मेलिन (Formalin) वापरला जाते. फॉर्मेलिन हे एक अत्यंत विषारी रसायन असून, दूध अनेक दिवस खराब होऊ नये, यासाठी त्यात Preservative) म्हणून फॉर्मेलिन घातले जाते. या दुधाला नैसर्गिक गोडवा आणण्यासाठी त्यात स्वस्त ग्लुकोज पावडर मिसळली जाते.

♻️ नैसर्गिक व कृत्रिम दुधाच्या चाचण्या
📍 स्पर्श व फेसाळपणा – नैसर्गिक दूध तळहातावर चोळल्यास नेहमीसारखे वाटते. कृत्रिम दूध तळहातावर चोळल्यास चिकट आणि डिटर्जंटसारखा फेसाळ स्पर्श होतो.
📍 उकळल्यानंतरचा रंग – नैसर्गिक दूध उकळल्यानंतर रंग बदलत नाही. कृत्रिम दूध उकळल्यानंतर किंवा साठवून ठेवल्यानंतर पिवळसर पडते.
📍 चव – नैसर्गिक दुधाची चव सौम्य गोडसर असते. कृत्रिम दुधाची चव कडवट किंवा रसायनासारखी वाटते.
📍 स्टार्च चाचणी (आयोडीन) – नैसर्गिक दुधात आयोडीनचे 2 थेंब टाकल्यास दुधाचा रंग बदलत नाही. कृत्रिम दुधात आयोडीनचे 2 थेंब टाकल्यास दूध निळे/काळे पडते.
📍 युरिया चाचणी – नैसर्गिक दुधात सोयाबीन पावडर मिसळल्यास दुधाचा रंग बदलत नाही. कृत्रिम दुधात सोयाबीन पावडर व लाल लिटमस टाकल्यास दुधाचा रंग लाल किंवा गुलाबी होतो.
📍 5 मिली दुधात 2-3 थेंब टिंक्चर आयोडीन किंवा आयोडीन टाकल्यास दुधाचा रंग गडद निळा झाल्यास त्यात स्टार्च किंवा मैदा मिसळल्याचे स्पष्ट हाेते, तर रंग न बदलल्यास दूध शुद्ध आहे असे समजावे.
📍 5 मिली दुधात अर्धा चमचा सोयाबीन पावडर किंवा तूर डाळीची पावडर मिसळा. 5 मिनिटांनंतर त्यात लाल लिटमस कागद (Red Litmus Paper) बुडवा. जर लाल लिटमस कागद निळा झाला, तर दुधात युरिया मिसळला आहे, असे समजा.
📍 3 मिली दुधात 10 थेंब हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (HCl) आणि 1 चमचा साखर मिसळा. मिश्रण 5 मिनिटे तसेच ठेवा. ते लाल किंवा गुलाबी झाल्यास दुधात वनस्पती तूप/तेलाची भेसळ असल्याचे स्पष्ट हाेते.
📍 5 मिली दुधात 1-2 थेंब फिनॉल्पथलीन (Phenolphthalein) द्रावण टाका. दुधाचा रंग गुलाबी झाल्यास त्यात कॉस्टिक सोडा, सोडियम कार्बोनेट किंवा न्युट्रालायझर्स मिसळले आहे, असे समजा.
📍 लाकूड, काच किंवा फरशीच्या गुळगुळीत पृष्ठभागावर दुधाचा एक थेंब टाका आणि तो पृष्ठभाग थोडा तिरपा करा. नैसर्गिक दूध हळूहळू खाली वाहते व मागे पांढरा डाग/रेषा सोडते. भेसळयुक्त/पाणीदार दुधाचा थेंब पटकन खाली वाहून जातो आणि मागे कोणताही पांढरा डाग सोडत नाही.
📍 एका पारदर्शक बाटलीत 5 मिली दूध व 5 मिली पाणी एकत्र करा. बाटली काही सेकंद जोरात हालवा. नैसर्गिक दुधाच्या वरच्या भागावर अगदी थोडासा फेस तयार होतो आणि तो लगेच निघून जातो. कृत्रिम दुधावर साबणासारखा घट्ट व बराच वेळ टिकणारा फेस तयार होतो.
📍 दूध मंद आचेवर उकळा व थंड झाल्यावर किंवा 24 तास ठेवून नंतर त्याचे निरीक्षण करा. नैसर्गिक दुधाच्या रंगात कोणताही बदल होत नाही. कृत्रिम दूध कॉस्टिक सोडा किंवा रसायनांमुळे पिवळसर पडते.

♻️ स्लाे पाॅयझन कसे आहे?
🔆 कृत्रिम दुधामध्ये वापरली जाणारी रसायने मानवी शरीर व आराेग्यासाठी अत्यंत घातक असतात.
🔆 या दुधातील युरिया व कॉस्टिक सोडा यामुळे मुत्राशय (Kidney) आणि यकृताला (Liver) कायमस्वरूपी हानी पोहोचते.
🔆 डिटर्जंट व फॉर्मेलिनमुळे पचनसंस्थेचे आजार हाेतात, पोटात अल्सर आणि कर्करोगाचा (Cancer) धोका निर्माण हाेताे.
🔆 या दुधामुळे लहान मुलांच्या शारीरिक व मानसिक वाढीवर अत्यंत गंभीर आणि विपरीत परिणाम होतात.

♻️ भेसळ/कृत्रिम दूध विकण्याची पद्धती
अन्न सुरक्षा व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या तपासातील माहितीनुसार, भेसळ अथवा कृत्रिम दूध 100 टक्के स्वतंत्रपणे न विकता ते गाई किंवा म्हशीच्या नैसर्गिक दुधात मिसळतात. 1 लिटर मूळ दुधात ठराविक प्रमाणात म्हणजेच 10 ते 30 टक्के कृत्रिम दूध मिसळले जाते. शुद्ध दुधात कृत्रिम दूध मिसळल्यामुळे त्याचा रासायनिक उग्र वास व कडवट चव कमी हाेते. त्यामुळे सामान्य ग्राहकाला किंवा प्राथमिक लॅक्टोमीटर चाचणीत (Lactometer Test) फरक लगेच लक्षात येत नाही. हे भेसळयुक्त दूध कलेक्शन सेंटर्स, स्थानिक गवळी, दुधाच्या डेअऱ्या किंवा हॉटेल-मिठाईच्या दुकानांमध्ये पुरवले जाते. काही प्रकरणांमध्ये कृत्रिम दूध अजिबात मूळ दुधात न मिसळता थेट विकल्याचेही निदर्शनास आले आहे. या दुधाचा वापर हॉटेल व मिठाई व्यावसायिक खोवा, पनीर, खवा, पेढे किंवा मिठाई बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात करतात. कारण या दुधाची किंमत नैसर्गिक दुधाच्या तुलनेत स्वस्त असते.

©️ मातीतलं विज्ञान

कृषिसाधना....

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected by कृषीसाधना !!